गारूड

  •  डॉ. नेहा किशोर सावंत, दहिसर पूर्व, मुंबई

                        nehasawant603@gmail.com

दिवाळीची सुट्टी लागली होती. खूप दिवसानंतर आम्ही या घरी राहायला आलो होतो. हे घर आताशा विकेंड होम झालंय. मुंबईत राहायला गेल्यापासून, तिथल्या ध्वनिकल्लोळातून खरंतर मनाला शांतता हवी असली की मी इथे येते.  शांततेला ही एक हवाहवासा सूर असतो स्वर असतो हे इथे आल्यावर मला जाणवतं. इथली पहाट होते तीच कोकिळा, कावळा, चिमणी यांच्या कलरवाने. वातावरणामध्ये एक सुंदर अशी नादमयता निर्माण होते. त्यांच्या त्या कलरवामध्ये विलक्षण चैतन्य असते या आवाजाचं विलक्षण गारुड मनावर पडत असतं. खरंतर या गारुडाच्या ऒढीनेच मी खेचली जाते आणि इथे येते.

जवळजवळ सतरा अठरा वर्ष या सगळ्या आवाजांची मोहिनी अनुभवलेली होती. दिवसाच्या सुरुवातीलाच पहाटेच्या नीरव वातावरणात दूरवरून अजानाची बांग ऐकू यायची ‘आल्लाहू अल्ला, हू अकबर… या बांगेतच देवळातून रेकॉर्डवर लावलेल्या भक्तिगीताचे सूर मिसळले जायचे. हळुहळू आसमंताला पहाटजाग येऊ लागायची. या भक्तिमय स्वरांच्या सोबतीने स्वयंपाकघरात लगबगीने स्वयंपाक करणाऱ्या माझ्या डोळ्या-वरची झोप सहज विरून जायची. आणि कॉलेजला जाण्यासाठी निघताना बोळातल्या पायवाटेवर चर्चमधली घाट म्हणजेच आवेमारीची घंटा निनादायची. तिच्या नादाची आवर्तनं सकाळच्या वातावरणाला ताजतवानं करायची. माणसांबरोबरच कोंबडे, कुत्रे यांचेही दूरवरून सूर ऎकू यायचे. बसस्टॉपच्या आसपास असलेल्या घरांमधून कोंबड्यांची बांग ऐकू यायची, त्या बांगेतूनही जणू ते बोलत असायचे, “येत्ता का जाऊ?” माझ्या मनातल्या या खुळचट कल्पनांनी माझ्याच चेहर्‍यावर नकळत हसू उमटायचं. तो नाद मनात भरूनच माझा प्रवास सुरू व्हायचा, स्टेशनला पोहोचताच अनेकविध आवाजाच्या कोलाहलात मुंबईचा प्रवास सुरू व्हायचा. आता केवळ आठवणी राहिल्यायत मनात.

आताशा मुंबईत राहायला आल्यापासून या नादांना पारखे झालेले कान, त्या नादांच्या आठवणींनी व्याकूळ होऊ लागलेत. त्या आवाजांना साठवून घेण्यासाठी कान अधीर झालेत. क्वचितच सुट्ट्यांचे निवांत क्षण अनुभवायला मिळतात. सुखद पहाटेच्या गारव्यात पक्षांच्या मंजुळ नादाने जाग येते. कावळ्या-चिमण्यांचा हा कलरव विरतो न विरतो तोच सकाळच्या वेळी गुराखी आपल्या गाई बैलांना चरायला नेतात तेव्हा त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळांची किणकिण ऐकू येत असते. त्यांच्या मागोमागच शेळ्या मेंढ्यांना चरायला नेणारे गुराखी असतात, जणूकाही एक ताल कदम ताल करत चालल्यासारखे हे कळप एकमेकांना अंग घाशीत पुढे सरकत असतात. त्यातली काही खट्याळ कोकरं घिसडघाई करत एकमेकांना ढुशी मारीत आनंद घेत असतात, त्यांच्या त्या अंगघुसळीचा अन् बे बे चा एक लयबद्ध असा विलक्षण नाद असतो, त्यांच्या त्या कदमतालातही कमालीचा सूर असतो. 

सकाळचा नाश्तापाणी झाल्यानंतर थोडासा निवांत वेळ आळसात घालवायचा असतो म्हणून इथल्या झोपाळ्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांचा पदरव ऐकत असते आणि त्याच वेळेला एका फकिराचं गाणं कानावर ऐकू येतं. हा फकीर दर बुधवार आणि शुक्रवारी येतो. “अल्लाही देगा मौला ही देगा” असे एका लयीत गात दारावरून जात असतो, कधीतरी एखादी आर्त सुरावट आकाशाकडे बघून, मान उंचावून डोळे मिटून गातो, तेव्हा तो नादही आसमंतात घुमत राहतो. एखाद्या बाईने “रुको बाबाजी” असं म्हटलं तरच तो थांबतो, त्याच्या हातातला एक चिमटा अधूनमधून तो वाजवत असतो आणि आकाशाकडे पाहून तो म्हणत असतो, “मेरे मोला मेरे अल्लाह, निगाह करम रखना”. दिलेले पैसे आपल्या झोळीमध्ये टाकून आपल्या हातातल्या मोरपिसांचा पिसारा त्या बाईच्या किंवा तिच्या बाळाच्या डोक्या-वरती अलगद फिरवून तो पुढच्या दारात जातो. सकाळ आळसवलेली असली तरी त्याच्या आवाजातला तो आर्त स्वर मनाला भिडत असतो. कोण असेल हा मुल्ला? कुठून येत असेल, कुठे जात असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा मनात भुणभुणू लागतो. क्वचित कधीतरी एखाद्या वारी एक जोगतीण दारावर येते, तिचीही वेळ सकाळचीच असते “यल्लम्माच्या नावाने दे ग बाई, जोगवा दे ग माय” असं म्हणत कडेवरचं पोरग सांभाळत दान मागत जाते. हे सगळे आवाज आता परिचयाचे, सवयीचे झालेत. या लोकांशी फारसं बोलणं होत नसलं तरी आठवड्यातून एकदा तरी त्यांना पाहण्याची, त्यांचा आवाज ऐकण्याची उत्कंठा मनाला लागून राहिलेली असते. हे सगळे आवाज खालच्या बोळात असणार्‍या बैठ्या घरांच्या दारासमोरून जात असले तरी त्या मांगत्यांची नजर सवयीने इमारतीच्या गॅलरीत जाते आणि नकळत त्यांच्या आणि माझ्याही चेहऱ्यावर हास्याची हलकी लकेर उमटते.

साधारण सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक वेगळी लगबग खालच्या बैठ्या घरातल्या अंगणात जाणवते. चाळीतल्या बायका दुपारच्या स्वयंपाकासाठी ‘तिची’ वाट पाहत असतात. दुपारी जेवायला काय करायचं, हा यक्षप्रश्न घेऊन खलबतं सुरू असतात. इतक्यात तिची हाळी ऐकू येते, आणि या बायकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरते. “गो म्हावरा, बेनांसा मावरा” हे शब्द कानावर पडले की सगळ्या “आयली, आयली रेजिना आयली” म्हणत तिच्याभोवती झुंबड घालतात, म्हावर्‍याच्या किमतीत घासाघीस करतात, तेवहा एकेकीच्या आवाजाची पट्टी ऎकण्या-सारखी असते, पैसे देण्याघेण्यावरून, अधिकीचं म्हावरं वर टाकण्यावरून तारसप्तकात आवाजाची फिरत चालते, आणि त्यावरचा सा लावते ती रेजिना ते सारंच ध्वनिसंगीत ऎकण्यासारखं असतं, भरीसभर त्यांच्या कलकलाटात चारदोन मांजरीचे म्यावकार, गुर्गुरणे मिसळून गेलेलं असतं.  रेजीना आपल्यासोबत मासळीचा वास घेऊन आणि तारसप्तकातली हाळी देत पुढे निघून जाते. आणि काही काळासाठी शांततेचं मूकसंगीत आणि वेगवेगळे घमघमाट दरवळत राहतात. खालच्या बोळातून तळणीचे, फोडणीचे चुरचुर घमघमलेले आवाज ऎकू येत राहतात, थोड्याच वेळात दुपार जणू वामकुक्षी घेत कलंडत असल्याचा भास होत राहतो. एक वेगळीच शांतता पसरली जाते. 

बऱ्याच दिवसानंतर टळटळीत उन्हाच्या दुपारी एक आवाज आसमंतात घुमला, “कुल्फीयों कुल्फी” आणि मग त्या आवाजासरशी घराघरातून लहान मुलांचे उल्हसित करणारे मंजुळ नादनिनाद ऐकू आले, कलंडलेली दुपार जणू कूस बदलू लागली. आणि वातावरणातली उन्हाची दाहकता हळूहळू सौम्य वाटू लागली. खरंतर कुल्फीयो म्हणताना हातगाडीच्या खाली असलेली घंटी कुल्फीवाला वाजवत येतो त्या घंटीच्या मंजूळ आवाजाने वातावरणात एक प्रकारचा शीतल शिडकावा पडतो.कधी हातगाडीची घंटी वाजवत रणरणत्या दुपारी गोळेवाला येतो. त्या घंटीच्या आवाजाचा कानोसा बाळगोपाळ घेतच असतात. मी वरच्या मजल्यावर राहत असूनही खिडकीतून त्या बर्फाचे गोळे पाहत असताना त्यांच्या रंगाने डोळे सुखावतात तसाच त्या बर्फाच्या गोळ्याचा गारवा मनालाही सुखावून जातो . बर्फाचा गोळा गेला की पुन्हा थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरते. जणू काही ही दुपारच  त्या गोळ्याचे चुपणे घेऊन, गारेगार होऊन पुन्हा कूस बदलते.

 दुपारची उन्हं उतरणीला लागतात तेव्हा दारोदार सायकलच्या घंटीचे आवाज येऊ लागतात, बेकरीवाला जोर जोराने ओरडत असतो ‘पाववाला,  पावलो नरम गरम कडक पाव, जीरा बटर खारी बटर टोस्ट’ अशा आरोळ्या ठोकत दारावरून जात असतो. पुन्हा एकदा खालच्या चाळीतल्या बायका त्या सायकलवाल्यापाशी गोळा होतात त्यांचा काहीसा कलकलाट सुरू होतो आणि घेतलेल्या पाव बटर बिस्कुट बरोबर चहाची रंगत त्या घेत जातात. साधारण तासाभरानंतर डोक्यावर मोठा ॲल्युमिनियमचां टोप घेऊन गुजराती हसमुखलाल “खमण लै लो खमण लै लो” अशी साद घालतो “खमणी लय लो ढोकळा लेलो” असा तो ओरडला की पुन्हा लहान मुलांचा घोळका आणि गलका ऐकू येतो खमणवाल्याची हाक विरते न विरते तोच हरिलाल भाजीवाल्याची गाडी येते त्याच्या गाडीचा भोपू वाजू लागतो “भाजीवाले ताजी भाजीवाले, कांदा बटाटा टमाटावाले” असं तो ओरडू लागला की तिन्हीसांजेची वेळ होत आल्याची जाणीव होते. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायला हवं याची जाणीव गृहिणींना होते आणि मग शिळोफ्याच्या गप्पा आवरून, घेतलेल्या ताज्या भाज्या अंगणातच फतकल मारून निवडायला सुरुवात होते. त्यावेळी चालणारी त्यांची थट्टा मस्करी, घरातल्या उखाळ्यापाखळ्या, याच्या त्याच्या कागाळ्या यांनाही काहीसा उत येतो आणि आवाजाची एक वेगळीच नजाकत पाहायला मिळते. कधी तार सप्तकातील हास्य कधी गडगडाटी हास्यस्फोट तर कधी कुजबुजीची खसखस किंवा आतल्या आवाजात केलेल्या कानगोष्टी, यातून आवाजाचे वेगळेच पैलू दिसून येतात. आणि मग संध्याकाळी दारातल्या क्रूसासमोर मंजुळ अशा लयीत आणि एका विशिष्ट सुरात रोजरी सुरू होते त्या रोजरीच्या मधुर सुरांनी नकळत वातावरणात एक विलक्षण गंभीर शांतता पसरते. ‘हो कृसा सलामी तुला’ हे गीत गुंजत राहतं. ‘नमो मारिया, आम्हावर दया कर’ म्हणत मंद वाऱ्याच्या झुळकी बरोबर रात्रीची चाहूल  लागते.

 चर्च बेल म्हणजे रात्रीची घाट वाजली की पुन्हा एक नीरव शांततेची जणू दुलईच पांघरली जाते गावावर. रात्रीचं विलक्षण मौन संगीत सुरू होतं, रातकिड्यांची किरकिर स्पष्टपणे जाणवत राहते. झोपेला शरण जात उबदार दुलईत शिरलं की दूरवरून स्पष्ट ऐकू येते समुद्राची गहनगभीर गाज, क्वचित शांत वाऱ्याची घुण घुण.

दिवसभराच्या ध्वनींची, नादाची आवाजाची आवर्तनं घोळवित, दिवसाची सांगता होते. नादांच्या या स्पंदनांनी साऱ्या देहात एक अनाम नादसंगीत झिरपत राहतं अविरतपणे…. जे मला कायम उर्जा देत राहतं.