गंगा – डॉ. नेहा सावंत

गंगा

  •  डॉ. नेहा सावंत, दहिसर

शेवटचा तास संपवून, निशा वर्गातून खाली आली. स्टाफरूममध्ये तुरळक शिक्षक होते, बाकीचे त्यांचे पाच तास पूर्ण करून घरी गेले असावेत. आपण विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच अडकून आणि गुंतून पडतो असं वाटून निशाला स्वतःचच हसू आलं. खरं तर तास संपून वीस मिनिटं झाली होती, पण काहीतरी किस्सा सांगत बसली, मुलांनाही किस्सा ऐकण्यात स्वारस्य होतं. त्या नादात निशाला वर्गातून निघायला उशीरच झाला होता. आता स्टेशनपर्यंत तिला एकटीलाच जावं लागणार होतं, नेहमी तिच्यासोबत असणारी राधिका पण गेली होती कारण तिच्या टेबलवर तिची बॅग दिसत नव्हती.

     निशाने मस्टरवर सही केली, थंब बायोमेट्रिक करून बाहेर जाण्यासाठी वळली, तेव्हा तिचं लक्ष तिच्या पुढ्यात हातात लहान बाळाला घेऊन उभ्या असणाऱ्या मुलीकडे गेलं. त्या मुलीच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता मात्र डोळे भरलेले होते. बाळाला घेऊनच ती नमस्कार करण्यासाठी वाकली होती. “अगं, अगं! वाकू नकोस. मला का नमस्कार करतेयस?” निशाने विचारलं.

     “बाई, ओळखलं नाहीत मला? मी गंगा. तुमची विद्यार्थिनी. FYBA वर्गात रोज फळा लिहिणारी”

     “गंगा ? अगं, किती बदलली आहेस? ओळखलंच नाही तुला मी ! अगं, होतीस कुठे तू ? अर्धवटच कॉलेज सोडलंस, मुलींनी सांगितलं की तुझं लग्न झालं आणि तू गावी असतेस. मग इतक्या वर्षांनी आज कशी आलीस ?” उत्साहाच्या भरात निशा घडाघडा बोलत सुटली. आपल्याला उशीर झालाय हे विसरूनच गेली.

     “कॉलेज सोडावं लागलं मला. पण इतक्या वेगात आयुष्यात खूप काही घडलं, कुणाला काही सांगताच आलं नाही. पण मॅडम तुमची खूप खूप आठवण यायची” तिच्या पूर्वीच्या पाणीदार डोळ्यातलं पाणी हरवलं होतं, पण बोलताना मात्र डोळे भरत होते. निशाला मनापासून गंगा भेटल्याचा आनंद झाला होता. खूप काही ऐकलं होतं तिच्याविषयी. पण खरं खोटं काहीच कळत नव्हतं. अचानक आज ती संधी चालून आली होती.

     गंगाच्या हातातलं गोंडस बाळ निशाकडे कुतूहलाने पाहत होतं. “किती गोड आहे ग बाळ ! नाव काय ग ह्याचं? निशाने विचारलं.

     “श्रेयस” गंगा उत्तरली.

     “छानच आहे गुंड्या. अगदी तुझ्यासारखाच गोब-या गालाचा, टपो-या डोळ्यांचा” निशाला बाळाचं कौतुक वाटत होतं. “बरं, तू आज कशी काय आलीस, काही काम आहे का तुझं?” निशाने विचारलं.

     “बोनाफाईड सर्टिफिकेट मिळेल का, त्याची चौकशी करायची होती. पण आता लंच टाईम आहे ना!

खरं तर तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, पण इतक्या उशिरापर्यंत तुम्ही भेटणार नाही असंही वाटलं.” गंगा म्हणाली.

     “तुझी मनापासून इच्छा होती ना, म्हणून भेट झाली. चल, नाहीतरी अर्धा तास तुला थांबायचं आहेच ना, तर आपण कॅन्टीनमध्ये बसू.” असं म्हणत निशा गंगाला घेऊन कॅन्टीनमध्ये गेली. बाळासाठी गंगा दुधाची बाटली घेऊनच आली होती. त्याला मांडीवर घेऊन दुधाची बाटली त्याच्या तोंडात दिली. हळुवार त्याला थोपटत होती. ते दृश्य पाहून निशाला गहिवरून आलं. किती पटकन ह्या पोरी मोठ्या होतात ना !

     चार वर्षांपूर्वीचे दिवस निशाला आठवले. FYच्या वर्गात पहिल्या बाकावर तीन मुली अगदी खेटून बसायच्या, शाळेपासूनच्या मैत्रिणी. पण त्या तिघींमध्ये लक्षात राहिली ती गंगा. तिच्या टपोऱ्या पाणीदार डोळ्यात सदा कुतूहल दाटलेलं असायचं. दोन घट्ट वेण्या, डोळ्यात काजळ घातलेलं, कपाळावर ठसठशीत टिकली. नीटनेटकी अशी ही गंगा, अगदी लोभस आणि गोंडस लहान मुलीसारखी निष्पाप वाटायची. वर्गात निशा शिरण्याआधीच फळ्यावर सुवाच्य अक्षरात एखादा सुविचार आणि विषय – मराठी असं लिहून ठेवायची. तिच्या या वेगळेपणामुळे गंगा लक्षात राहिली होती. मराठीचा तास तिला फार आवडायचा. निशाच्या प्रत्येक तासाला ती जीवाचे कान करून ऐकत असायची. शिक्षिका होणं हे तिचं स्वप्न होतं. अर्थात दुसरा तिसरा तास असेल तर तिने फळा लिहिलेला असायचा. पण सात वाजताच्या पहिल्या तासाला नेहमीच गंगा धावतपळत यायची. उशीर का झाला ? असं विचारलं तर म्हणायची पाणी भरून यावं लागतं ना ! आमचा पाण्याचा नंबर नेहमी शेवटी असतो. “घरात दुसरं कुणी नाहीये का?” असं विचारल्यावर म्हणायची, “आई दुस-याच्या घरी जेवण बनवायला जाते, मग मी आणि ताई घरातलं काम आटपून यॆतो.” तिचं बोलणं ऎकून निशाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची. पण एखादा दिवस आईला सुट्टी असली की ही मोठ्या आनंदात वर्गात लवकर येऊन बसायची. पण असे क्षण कमीच असायचे.

     कधीतरी निशाने सहज तिची चौकशी केली होती, तेव्हा कळलं की तिची आई धुण्याभांड्यांची आणि स्वयंपाकाची कामं करते. पण आपल्या दोन्ही मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं तिला वाटत होतं. गंगाचे वडील गारमेंट कंपनीमध्ये कामाला होते. पण अचानक कंपनी बंद पडल्यावर घरी बसायची सवय लागली, त्यात दारूच्या आहारी गेले होते. रोजंदारीवर काहीबाही काम करायचे. मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांना लवकर उजवून मोकळं व्हायचं, असा त्यांचा विचार होता. गंगाची मोठी बहीण बारावी शिकली होती, आणि तिने शिवणक्लास केला होता, काहीबाही शिवणाचं काम करायची. घरात थोडासा हातभार लावायची.

     एक दिवस गंगा स्टाफरूम मध्ये भेटायला आली आणि म्हणाली, “मॅडम, मी आठ दिवस कॉलेजला येणार नाहीये, ताईच लग्न ठरलंय. म्हणून गावी जातेय.” ताईच्या लग्नाचा आनंद तिच्या बोलण्यातून लपत नव्हता. पण ताईचं लग्न झाल्यावर ती परतली तेव्हा हिरमुसलेली वाटली. कारण विचारल्यावर म्हणाली, “ताईचं कसं होणार ? ताईला ज्या गावात दिलीय ते तसं खेडंच आहे. तिला शेतात काम करायची सवय नाही. अंगणात मोठी विहीर आहे अख्ख्या गावाची, ताईला तर पाणी कसं शेंदायचं ते पण ठाऊक नाही.घरात चुलीवरच जेवण करतात तिथे. घरात माणसं पण भरपूर. आणि दाजी पण तिच्यापेक्षा मोठेच आहेत, जेमतेम दहावी पास आणि कडक पण. ताई आमची सावळी असली तरी नाकीडोळी किती देखणी! आमच्या बाबांनी सांगितलं की घर मोठं आहे. कसलं मोठं! हा, आमच्या चाळीतल्या खुरट्या घरापेक्षा मोठं म्हणता येईल. पण आहे शेणामातीचच. आई नको म्हणत असताना बाबांनी लग्नाची घाई केली. खोटंच सांगितलं मोठं घर आहे, शेतीवाडी भरपूर आहे. पण तसं काहीच नाही. फक्त आमच्याकडे हुंडा भरपूर घेतात, या लोकांनी हुंडा घेतला नाही येवढंच. म्हणून बाबांनी घाई केली.”

     एवढ्याशा पोरीच्या मनातली बहिणीची काळजी आणि पोक्तपणा पाहून निशाला तिचं कौतुक वाटलं. “होईल सगळं नीट, तू नको काळजी करुस” निशाने तिला धीर दिला. काही महिन्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीला दिवस गेल्याची बातमी गंगाने दिली होती. पण पुढे परीक्षांची गडबड नंतर मे महिन्याची सुट्टी या गडबडीत गंगा दिसलीच नाही.

     जून महिना लागला. कॉलेजचं नवीन वर्ष सुरू झालं. SYच्या वर्गात वर्षाच्या सुरुवातीपासूनच वर्गात गंगा दिसत नव्हती. वर्गात चौकशी केल्यावर कळलं ती परीक्षेलाही बसली नव्हती. तिच्या दोन मैत्रिणींपैकी एक नापास झाली, दुसरी म्हणाली, “मॅडम, गंगाची बहीण बाळंत झाली, पण वारली. म्हणून गंगा गावी गेलीय.” निशाला हे ऐकून चुटपुट लागली. पण गंगाशी संपर्क कसा होणार ? हळूहळू या चुटपुटीची धार बोथट होत गेली. आणि गंगा आठवणीतून पुसट होत गेली. पण कधीतरी निशाला तिचे पाणीदार डोळे आणि गोबरे गाल आठवायचे. हा सगळा पट आता निशाच्या डोळ्यासमोरून सरकला.

     “मॅडम, काय आणू खायला ?” तंबी वेटरच्या विचारण्याने निशा भानावर आली. गंगाचं बाळ तिच्या मांडीवर दूध पिता पिताच झोपलं होतं. चहा आणि टोस्ट सँडविचची ऑर्डर निशाने दिली, आणि गंगाला म्हणाली, “कॉलेज सोडून चार वर्ष झाली, या चार वर्षात तुला एकदाही मला भेटावसं वाटलं नाही ?”

     “मॅडम, माझ्या आयुष्यात काय काय घडलं कसं सांगू ? या चार वर्षात पहिल्यांदाच माहेरी येतेय. ते पण वडील वारले, त्यांच्या दिवसकार्यासाठी म्हणून घरच्यांनी पाठवलं. नाहीतर तेही पाठवलं नसतं”

     “कधी वारले? आजारी होते का वडील ?”

     “दारुड्या माणसाचं आणखी काय होणार ? दोन्ही पोरींच्या आयुष्याचं मातेरं करून मग पश्चातापात स्वतःची बरबादी केली. दारू पिऊन लिवर खराब झाली, स्वतःची सुटका करून घेतली. पण आमचं काय ? आईची किती इच्छा होती मी शिक्षिका व्हावं. आईला शिक्षणाची किती हौस होती. स्वतः हौस मौज न करता आमच्या शिक्षणासाठी काटकसरीने जगत होती. पण बापाने गळ्यात लोढणं अडकवलं आता कसली आमची सुटका?” गंगा मनातले कढ भडाभडा बाहेर टाकत होती. खूप दिवसांनी तिला असं मन मोकळं करायला मिळालं होतं. मनातलं गरळ ओकणं हाच तिच्या दुःखावरचा पर्याय होता. निशा तिला अजिबात थांबवत नव्हती.

     गंगा किती पोक्त दिसू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते लडिवाळ हसू पार लोपलं होतं. गालांचा गोबरेपणा, डोळ्यातला पाणीदारपणा लोपला होता. खरंतर आताच तिचं वय लग्नाचं झालेलं पण ही मात्र आईपण अनुभवत होती. न राहवून निशाने विचारलं, “गंगा, लग्न का असं अचानक केलंस, इतक्या लहान वयात ?”

     “मी कुठे हौसेने केलं? तुम्हाला माहित नसेल कदाचित. ताईच्या बाळंतपणात त्यांनी तिला इकडे पाठवली नाही. आणि माझ्या वडिलांनीही तिला इकडे आणायची तयारी दाखवली नाही. ताईचा जीव गावी रमतच नव्हता. त्यात खूप काम करावं लागत होतं. सासू घालून पाडून बोलायची. गरोदरपणात तिच्याकडे कुणी लक्षच दिलं नाही. खूप अशक्त झाली होती. खाण्यापिण्याची आबाळ होत होती. त्यात तिला मुलगी झाली, म्हणून नंतरही तिची काळजी कुणी घेतली नाही. तिचंही वय लहान. काही कळत नव्हतं. त्यातच ती आजारी पडली, कावीळ झाली तिला. औषधपाणी नीट झालंच नाही आणि त्यातच ती गेली. तान्ही पोर टाकून गेली. तिच्या दिवसकार्याला आम्ही गावी गेलो तेव्हा दाजी म्हणाले की या आईविना लेकराची जबाबदारी कुनी घ्यायची? या लेकराला तुमच्याकडेच घेऊन जा नायतर तुमच्या धाकट्या पोरीचा पाट लावा माझ्याशी. माझ्या बापाला पण तेच हवं होतं. माझ्या लग्नाचा खर्च टाळण्यासाठी या व्यवहाराला तयार झाला. मी आणि आईने तिथच रडायला सुरुवात केली. कारण मोठ्या पोरीची जी परवड झाली ती माझी होऊ नये असं आईला वाटणं साहजिकच होतं. निदान मी तरी शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहून मुंबईतच संसार थाटावा अशी तिची इच्छा होती.”

     “अगं, पण तू तयार कशी झालीस ? सरळ विरोध करायचा होतास, नकार देऊन बाहेर पडायचं होतं” निशा बोलून गेली.

     “मॅडम, हे नकार, बंड, विरोध हे सगळं स्त्रीवाद शिकताना मनात राहतं. हे सगळं कथा कादंबऱ्यामध्ये वाचायला छान वाटतं. प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरं जाताना सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो”

     निशा गंगाचं बोलणं ऐकून चकित झाली होती. खरंच परिस्थितीने या पोरीला किती समंजस आणि पोक्त केलं!

     “मॅडम, माझी सुटका नव्हतीच. त्याने दुसरं लग्न केलं असतं तर त्या बाळाला व्यवस्थित सांभाळलं असतं की नाही कोण जाणे ! आणि माझ्यासाठी माझा बाप कुठला राजपुत्र आणून देणार होता? ताईची ती एकच ठेव आता राहिली होती. नाईलाजाने मला लग्नाला उभं रहावंच लागलं. कालपर्यंत ज्याला मी भावोजी, दाजी म्हणत होते, त्याच्याच नावाचं मंगळसूत्र आता गळ्यात बांधावं लागलं.” असं म्हणून ती रडू लागली. तिच्या मनाची घुसमट निशाला अस्वस्थ करीत होती. वेटरचं लक्ष या दोघींकडे होतं. निशाने बिल चुकतं केलं. तोपर्यंत गंगा जरा सावरली होती. “चल गंगा, निघुया” असं म्हणत निशा उठली.

     “सॉरी मॅडम, माझी रडकथा ऐकून कंटाळला असाल ना, घरी जायला तुम्हाला उशीर होत असेल ना !”

     “नाही ग, कंटाळले नाही. आपण बोटनिकल गार्डन मध्ये जाऊन बसू. तुला जे जे बोलायचं आहे ते मोकळेपणाने बोल” निशाच्या आश्वासक शब्दांनी गंगा सुखावली.

     गंगा आणि निशा दोघीही बोटानिकल गार्डनमध्ये आल्या. वडाच्या झाडाच्या पारावर बसल्या. गंगाने झोपलेल्या श्रेयसला आपल्या बाजूलाच दुपट्यावर झोपवलं. “आपलं हे गार्डन आहे तसच आहे ना ? चार वर्षांनी येतेय इथे. कॉलेजला असताना एखादा तास फ्री असला की मैत्रिणींसोबत इथेच येऊन बसायची. छान गार वाटायचं. इथून निघावसंच वाटायचं नाही” अगदी आनंदाने ती सर्वत्र नजर फिरवत होती.

     “आणखी किती दिवस आहेस इथे? निशाने विचारलं.

     “परवा बाबांचं तेरावं आहे, ते झालं की जाणार. चार वर्षातलं हेच माझं माहेरपण. आता पुन्हा यायला मिळेल की नाही कुणास ठाऊक. आणि मला जास्त दिवस नाही राहता येणार. माझी मुलगी म्हणजे ताईची मुलगी दिव्या आता चार वर्षाची झालीय. खूप जीव आहे माझा तिच्यावर. ताईची उणीव तिला भासू देत नाही.” असं म्हणून पुन्हा डोळे पुसू लागली. निशा गंगाला जवळ घेऊन थोपटत राहिली.

     “हे बघ, असा धीर सोडू नकोस. तू खूप मोठी जबाबदारी उचलली आहेस. ताईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. खचून जाऊ नकोस. तुझं स्वतःचं असं काहीतरी सुरू कर. जे गावातल्या लोकांच्याही उपयोगाचं असेल” निशाचं बोलणं ऐकून गंगा मान डोलवत होती.

     बराच वेळ बोलण्यात गेला. श्रेयस जागा झाला होता. निशाने त्याला प्रेमाने उचलून घेतलं. “किती गोड आहे तुझा लेक.”

“हो ना! गोरा गोमटा मुलगा झाला, म्हणून त्याचे लाड होतायत. आणि माझा छळ होत नाही इतकंच. मलाही मुलगी झाली असती तर माझाही छळ झाला असता. कारण माझ्या धाकट्या जावेला मुलगीच झाली तर तिला पण टोचून टोचून बोलत असतात. ह्यांना फक्त वंशाचे दिवे हवेत, का कशासाठी माहीत नाही. तशी सासू माझी चांगली धडधाकट आहे पण तिला फक्त सासूशाही मिरवायची असते. सुनांकडून कामं करून घ्यायची असतात. आपण सुना असताना त्रास भोगला मग आता आम्ही त्याचं उट्ट काढणार इतका कोता विचार करतात ह्या बायका.”

     एक विदारक सत्य ती बोलून गेली होती.

     “मॅडम, दिव्या दोन वर्षाची झाली नाही, ताईच्या दुःखातून मी नुकतीच सावरत नाही तोच सासरच्या मंडळींचा तगादा सुरू झाला आता तुझी कूस उजवू दे. वंशाला दिवा मिळू दे. नशीब श्रेयसचा जन्म सुखरूप झाला. गोरागोमटा नातू झाला म्हणून माझी पण आबाळ झाली नाही”

     “बरं, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस ?”

     “आमच्या गावातच छोटंसं हॉस्पिटल नव्याने उभारलय. तिथेच श्रेयसचा जन्म झाला. त्या डॉक्टर अगदी तुमच्याच सारख्या आहेत. त्यांनीच मला त्यांच्याकडे रिसेपशनिस्ट म्हणून काम करशील का असं विचारलंय.

     तुला पुढे शिकायचं असेल तर तू बाहेरून परीक्षा देऊ शकतेस. घरी काहीच कल्पना देऊ नकोस. असं बजावलं आहे. बघू प्रयत्न करीन. म्हणूनच मला दाखला हवाय, तो न्यायला आलेय.”

गंगेच्या बोलण्याने निशाचे डोळे भरून आले. कोणत्या मातीने बनलेल्या असतात ह्या मुली ? कुठून येतो हा जिवट, चिवटपणा यांच्या अंगात ?

     “गंगा, तुला हॉस्पिटल मध्ये काम करायला घरातल्यांची परवानगी आहे ?”

     “परिस्थितीच तशी मजबूर करते. आताशा शेतीवाडीत वर्षभर घरात पुरेल इतकंही धान्य पिकत नाही. खाणारी तोंडं मात्र वाढताहेत. मधल्या २ वर्षातील कोरोनाने तर जीवनाची सगळी गणितच बदलली. आरोग्याचं, आरोग्यसेवेचं महत्त्व सगळ्यांनाच पटलं. नाही म्हणायला कोरोना काळात गावात सुधारणाही झाल्या थोड्याफार. पण शेती भातीवर मात्र परिणाम झाला. गावातली तरुण मुलं आता नोकऱ्या शोधू लागलीत. माझा नवराही आता नोकरीच्या शोधात आहे. पण शिक्षण दहावी त्यामुळे चांगली नोकरी मिळणं कठीण. स्वतःचा काही व्यवसाय करायचा तर भांडवल नाही आणि कौशल्यही नाही. इतरांनी पक्की घरं बांधलेली पाहून, त्यालाही पक्कं घर बांधावं वाटू लागलंय. चिंतेतच असतो. मला धास्ती वाटू लागली. माझ्या बापासारखा हा दारूच्या वाटेला जायला नको, म्हणून एक दिवस जरा दबकतच विचारलं, मी थोडा पैशासाठी हातभार लावला तर चालेल का ? नुसतच चूल मुल करायचं तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय ? जरा कपाळावर आठीच आली होती त्याच्या, पण परिस्थितीच्या चटक्याने आता स्वभाव पण निवळला आहे हेच काय ते सुख. त्यामुळे मला नोकरी चालून आलीय म्हटल्यावर नकार देण्याचा प्रश्नच येत नाही.”

     “नक्कीच कर ही नोकरी. आणि पुढे शिकण्याचा प्रयत्न कर. शिक्षिका होण्याची तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल”

     “तुमचा आशीर्वाद असू द्या” असं म्हणून गंगा नमस्कार करायला वाकली. तिला भरल्या डोळ्यांनी निशाने कवेत घेतलं आणि म्हणाली, “तुझी हालहवाल कळवत जा”

     असं म्हणून तिला सोबत घेऊन कॉलेजच्या ऑफिसमध्ये आली. तिचा अर्ज स्वतःच क्लार्ककडे देऊन दोन दिवसात बोनाफाईड सर्टिफिकेट तयार ठेवायला सांगितलं. एव्हाना गंगेच्या कुशीतला श्रेयस कुरबुर करू लागला होता. गंगेचा निरोप घेणं निशाच्या जीवावर आलं होतं. गंगा मात्र तिच्या लाडक्या बाईना भेटून सुखावली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची चमक दिसत होती. भरल्या डोळ्यांनी बाईंचा निरोप घेऊन ती निघाली होती. तिची पाठमोरी लेकुरवाळी सावली आत्मविश्वासाने पावलं टाकीत चालली होती…