ख्रिस्ती असणे, मी ख्रिस्ती आहे का? ख्रिस्ती कोणाला म्हणायचे ?
- अॅड. अतुल आल्मेडा, निर्मळ
देव प्रजेचा People of God समाज निर्माण करण्यासाठी ख्रिस्त सांगतो, तुम्ही माझ्या मागे या. माझ्या मागे या म्हणजे माझ्या सारखे व्हा. माझी शिकवणूक पाळा. माझा गौरव करू नका, तर माझे आचरण करा. माझी उपासना करण्यापेक्षा माझे आचरण आत्मसात करा. तुम्ही माझे व्हाल. आम्ही काय करतो? आम्ही त्याचा गौरव करतो. पुजा करतो, आचरणाविषयी काय? आपण सर्व भक्त आहोत. शिष्य अनुयायी दुर्मिळ, याचे एकमेव कारण, आपण आम्ही मी कर्मकांडात गुंतून पडलो आहे. मी कर्मकांडालाच धर्म समजतो. ख्रिस्त म्हणतो, धर्म कर्मकांडात नाही, तर तो आचरणात आहे. ख्रिस्त कृतीशिल होता आणि ते त्याने त्याच्या वागणुकीतून, वर्तनातून ते दाखवले आहे. त्याने नुसते शिकवले नाही, तर आचरणात आणले. आपल्याला तसेच करण्याचं तो सांगत आहे. माझ्या मागे या, आपण जाणार का त्यांच्या मागोमाग ? ठेवणार का त्यांच्या पावलावर पाऊल ? तर आपण ख्रिस्ती.. नाहीतर आपण ख्रिस्ती पण कर्मकांडी, यामुळे देव प्रजेचा समाज People of god हा समाज निर्माण होणार नाही. सर्व मानव सहप्रवासी आहेत. त्या सर्व मानव जातीने एकात्मता आणि सहभागितीने जगावे या उद्देशाने जागतिक ख्रिस्तसभा पोप फान्सिस यांच्या नेतृत्वाखाली सिनड भरवत आहे.
ख्रिस्ताची शिकवणूक अनुसरणारे, अंगिकारणारे काही महात्मे –
लियो टॉलस्टॉय, १९ व्या शतकातला महान ऋषी ‘व्हॉट आय बिलीव्ह’ हया त्याच्या पुस्तकात त्यांनी ख्रिस्ताच्या शिकवणुकीविषयी लिहिलं आहे. जगात परमेश्वराचे राज्य यावे. शांतता नांदावी असे वाटत असेल तर हिंसेला हिंसेने उत्तर देऊ नये. जग सुखी व्हायचे असेल तर सर्वांवर प्रेम करावे. त्यांनी आपली भुमिका अनेक पुस्तकाद्वारे मांडली. सगळी चर्चेस येशू ख्रिस्ताचा खराखुरा अर्थ दडवून ठेवतात असे ते म्हणत. श्रीमंत वैभवात राहण्यापेक्षा गरीबीत राहणे त्यांनी स्विकारले. त्यालाच अनुसरुन त्यांना जाहीर झालेले नोबेल पारितोषिकही स्वीकारले नाही. रशियातील चर्चने त्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. परंतू टॉलस्टॉय म्हणाला “मी खिश्चनच आहे. मी सत्याला सर्वश्रेष्ठ मानतो. मी ख्रिस्ती आहे कारण मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.” चर्चने बहिष्कृत केलेला एक खिस्ती.
जॉ बूले, या फ्रेंच कवीने आनंदवन वर लिहिलेल्या कवितेत असे विनविले आहे, की येशू ख्रिस्ताने पुन्हा पृथ्वीवर येण्याच्या दिलेल्या आश्वासनाची त्याला आठवणे करून देत, जॉ बुलने त्याला (ख्रिस्ताला) तु जर येणारच असणार असशील तर आनंदवनात ये, असे विनविले आहे. कारण बाबा आमटेचे कार्य ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती म्हणजे प्रेम करत जगणे. कधीही देवळात न जाणारा कुठलाही संस्कार न घेतलेला खिस्ती. त्यांचा संस्कार प्रेम.
अमेरिकेतील चर्च मोर्मान यांनी महात्मा गांधी यांना मरणोत्तर स्नानसंस्कार देऊन त्यांच्या चर्चमध्ये एक ख्रिस्ती म्हणून सामील करून घेतले. आणि त्यासाठी त्यांनी लियो टॉलस्टॉय, यांच्या देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. Kingdom of God is within you या पुस्तकाचा आधार घेतला. हेच ते पुस्तक ज्यामुळे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी इतके प्रभावित झाले, की ते म्हणाले “माझ्या हातून गीता हिसकावण्यात आली आणि सारा गीतोपदेश जरी मी विसरुन गेलो, तरी ख्रिस्ताच्या पर्वतोपदेशाची प्रत मला तितकाच आध्यात्मिक आनंद देऊ शकेल. कुठलेही ख्रिस्त सभेचे कर्मकांड न करता जगाने मानवतेने स्विकारलेला ख्रिस्त. गांधीजीना आदरपूर्वक श्रध्दांजली वाहणारे ३४४१ शोकसंदेश परदेशातून भारताकडे आले होते. त्यापैकी प्रसिध्द कांदबरीकार पलवर्क म्हणाल्या, की “ख्रूसावर चढण्याची ही दुसरी घटना.”
फ्रान्सिस्कन धर्मगुरु संत मॅक्सीमीलन कोल्बे यांनी हिटलरच्या मृत्यू सापळयातून एका कुटुंबप्रमुखाला वाचविण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. ख्रिस्ती असण्याची साक्ष दुस-यांचे जीवन स्वतः मरुन नोंदविली. मानवी हक्काच्या समर्थक आणि नास्तिकाच्या प्रवर्तक मिसेस अॅनी बॅझेंट यांनी १८८५ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेसची स्थापना केली. ही बाई आपल्या आत्मचरित्रात “आपण ख्रिस्ताची वधू ठरावे अशी त्यांची इच्छा लिहनू ठेवली आहे.”
आर्चबिशप ऑस्कर रोमेरो यांचा २४ मार्च १९८० रोजी गोळया घालून खून करण्यात आला. कारण गरीबांची बाजू घेऊन ते सत्ताधिशाशी संघर्ष करत होते. पोप फान्सिस यांनी बिशप रोमेरोना २०१८ मध्ये शहीद म्हणून जाहीर केले. तीन वेळा शांततेच्या नोबेल परितोषिकासाठी नामांकन झालेले ब्राझील राष्ट्रातील ओलिंदाचे आर्चबिशप डॉम हेल्डर कॅमरा (१९६४-१९८५) केवळ गरीबांची बाजू घेऊन संघर्ष करत होते. म्हणून त्यांना ते नाकारण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्यासह सहकार्य करणार्या अनेक धर्मगुरुंचा मरेपर्यंत छळ करण्यात आला. ज्या दिवशी त्यांची बिशपपदी नेमणूक झाली त्याच दिवशी त्यांनी त्यांची महागडी गाड़ी विकून सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करायला सुरुवात केली. ख्रिस्ताचा अनुयायी खिस्त ।
आर्चबिशप कॅमराच्या जवळपास जाणारे भारतीय बिशप म्हणजे झारखंडचे बिशप जॉर्ज सॅपीन येस गरीबांची बाजू घेऊन संघर्ष करीत होते, तेव्हा सरकारच्या सांगण्यावरुन त्यांची बदली बिहार येथे करण्यात आली. पण त्यांनी ख्रिस्त साक्ष मरेपर्यंत दिली. गरीबाची बाजू घेऊन संघर्ष केला म्हणून सि. राणी मरीया, इंदोर हिचा सावकारी करणार्या लोकांनी समंदर सिंग याला सुपारी देऊन तिचा खून २५ फेब्रुवारी १९९५ मध्ये करण्यात आला. ती त्यावेळी बसमधून प्रवास करीत होती. तिच्यावर चौपन्न वार करण्यात आले होते. तीचे ओठावर शब्द होते “जिजस”. तिच्या खुन्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या सिस्टरची दुसरी बहिण सील्मी पॉल ही सुध्दा सिस्टर आहे. तीने तुरुगांत जाऊन संमदर सिंगला राखी बांधली. त्याने तीव्र पश्चाताप व्यक्त केला. या दोन्ही भगिनीनी ख्रिस्ताची माझ्या मागे या ही आज्ञा तंतोतंत पाळली. मृत्यु पत्करुन आणि क्षमा करुन विचारणार का, हा प्रश्न स्वतःला, आम्ही कुठे आहोत खिस्ती म्हणून ?
सि ताल्सा जॉन मालमेल SCJM हीसुध्दा झारखंडमध्ये गरीबांच्या बाजूने कार्य करीत होती. तीने गरीब मजदुरांची एकजूट करवून आणली होती. त्यामुळे त्यांना चांगली मजूरी देणे वरिष्ठ लोकांना जाचक वाटत होते. तिच्या विरुध्द अनेक खोटयानाट्या केसेस लावण्यात आल्या. ती घाबरली नाही, लढत राहिली. १५ नोव्हेंबर २०११ रोजी ४० बंधूकधारी माणसांनी तीचे जीवन संपवले. ती ख्रिस्ताची अनुयायी होती. हे तीने जगाला दाखवून दिले. याच झारखंडचे कार्य करत असलेले ज्येष्ठ धर्मगुरु स्वामी स्टेन यांचा सरकारतर्फे तुरुगांत डांबून अलीकडे बळी घेण्यात आला. उदाहरणे असंख्य पण त्याग आणि क्षमा करण्याची प्रचंड ताकद ख्रिस्ताच्या अनुयायात आहे आणि असू शकते. याचं जीवंत उदाहरण श्रीमती ग्लॅडस ग्रॅहम स्टॅन ऑस्ट्रेलियन मिशनरी. ग्रॅहम व त्यांच्या दोन कोवळया मुलांना जीवंत जीपमध्ये जाळण्यात आले. त्यासंबंधी केस न्यायालयात चालू असताना मिसेस ग्लॅडस स्टॅन साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहिल्या. साक्ष संपल्यावर त्या म्हणाल्या, ‘तुम्ही कायदयाची प्रक्रिया करा पण मी त्यांना माफ केले आहे. मला शांती आहे.’
मानव जात केवळ मागणी आणि पुरवठा यामुळे तगलेली नसून तो एका नव्या धर्माच्या उदयामुळे टिकणार आहे. आणि तो धर्म असेल मानववाद. मानवाला संघर्ष टाळून संवाद करणे हे विवेकाचे लक्षण आहे. ख्रिस्त म्हणतो तुम्ही एकमेकावर प्रेम करा, एकमेकांना क्षमा करा तुम्ही माझे आहात हे जगाला कळेल.
जगात शांतता निर्माण व्हावी, समाजात समानता यावी सर्व मनुष्याची एकमेकावर स्वतः प्रमाणे दुस-यावर प्रेम करावे या ख्रिस्ती शिकवणूकीप्रमाणे कृतीशील होणे आवश्यक आहे. नुसतेच जगाचे चांगले व्हावे, असे म्हणून किंवा त्यासाठी प्रार्थना करत राहिल्याने तसे चांगले कधीच होणार नाही. मी आम्ही स्वतः काय करणार हे महत्वाचे आहे. फक्त संकल्प नको. कृती हवी. संकल्पानुसार कृती केली तरच ते कर्तव्य होईल. कृतीची प्रेरणा हे तिचे पहिले वैशिष्ट असते तर प्रत्यक्ष कृती हे दुसरे वैशिष्ट आहे. ख्रिस्ताकडून प्रेरणा घेऊन आपण कर्तव्य करायला पुढे यावयास हवे व ते कर्तव्य प्रत्यक्ष कृतीतून दिसलं पाहिजे. हा सिनडचा उददेश आहे.
क्रिया सर्व प्राणी करतात कार्य किंवा कर्तव्य फक्त माणुसच करु शकतो. आपल्या सर्व क्रिया (actions) स्वतःच्या जीवन जगण्यासाठी असतात तर कर्म कर्तव्य दुसर्याकरीता काहीतरी करणे कर्म हे स्वार्थविरहित असते. क्रिया स्वार्थासाठी असतात. ख्रिस्ताने, महात्मा गांधीने अनेकांनी जीवन जगताना क्रिया आणि कर्म दोन्ही केली आपण काय करतो ? विचार करुया. चितंन करुया. आणि कर्माकडे वाटचाल करण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे पुढे होऊया.
मानववादी धर्मानी नेहमीच मानवतेची पूजा केली आहे. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात जी भूमिका परमेश्वरानी बजावली किंवा गौतमबुध्द आणि ताओ, निसर्गाने जी भूमिका बजावली तीच भूमिका मानवतेने सांभाळणे अपेक्षीत आहे. या जगाला आणि आपल्या जीवनाला एक अर्थ आहे. ते अर्थपूर्ण करणे हे मानवता वादाचे लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आतल्या अनुभवातून केवळ स्वतःच्याच जीवनाचा अर्थ शोधावा असे नव्हे तर संपूर्ण विश्वाचा भाग / अंश म्हणून अर्थ घेणे क्रमप्राप्त आहे. श्रध्देत नैतिक मूल्ये कमी आणि देव जास्त असतो आध्यात्मिक प्रवासात नैतिक मूल्येच असतात.