“ख्रिस्तायन ८५ वर्षांचे झाले!”

  •  मुक्ता अशोक  टिळक, नाशिक.

रविवार दिनांक १० फेब्रुवारी १८९५ रोजी मुंबईच्या भायखळा येथील चर्चमध्ये नारायण वामन टिळक (माझे पणजोबा) यांनी बाप्तिस्मा  घेतला. याला ते ‘ख्रिस्तांगीकार’ म्हणत. ते पुढे म्हणतात, “कोणतेही कार्य एकदम होत नाही. ईश्वर आपल्या विशिष्ट कार्यार्थ मूर्तीपूजकासही सद्गुण देऊन साधनीभूत  करून घेतो. देवाने मला आपणाजवळ ओढून घेतले. आज मी देवापुढे ख्रिस्ताचा हात धरून लहान बाळाप्रमाणे उभा आहे.”

पणजोबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पण त्यांची भक्तीशैली अभंग-गायन, भजन-कीर्तन सारे काही टाळ, चिपळ्या, मृदंग घेऊन पौर्वात्यच राहिली. ते उत्तम कीर्तनकार होते. त्यांनी आपल्या कित्येक विद्यार्थ्यांना कीर्तनाचे धडे दिले होते. लक्ष्मीबाई (मा​झ्या पणजीबाई) गावोगाव कीर्तनाचे दौरे करीत असत. रामायणाच्या धर्तीवर ‘ख्रिस्तायन’ लिहावे असा त्यांचा मनोदय १९०९ पासून होता. जसे रामायणाचे निरूपण होते, कथा-प्रवचने होतात, पठण-पारायण होते तसेच ‘ख्रिस्तायन’ महाकाव्याचे केले जावे असा त्यांचा उद्देश होता. प्रवाही ओवीबद्ध कथा-कहाण्या एकाने वाचायच्या आणि इतरांनी श्रद्धेने त्या ऐकायच्या. ही पध्दती सामुदायिक भक्तीला अनुरूप आहे. ख्रिस्ती उपासनेला पौर्वात्य रूप देण्याच्या पणजोबांच्या अनेकविध प्रयत्नातील ‘ख्रिस्तायन महाकाव्य’ हा एक मोठा प्रयोग म्हणता येईल. राहुरीसारख्या शांत आणि निर्वेध वातावरणात हे लिखाण नक्की पूर्ण होईल अशी त्यांना खात्री होती. पण तसे घडले नाही ! डॉ. ह्यूम यांच्या सूचनेवरून ते या कामासाठी साताऱ्याला गेले. त्यांच्या घरावर  ‘ख्रिस्तायनाश्रम’ अशी पाटी झळकू लागली. लेखनिकही मिळाला. पण ‘देवाचा दरबार’ आणि ‘डेक्कन रयत संस्था’ यांच्या रगाड्यात ‘ख्रिस्तायना’ची ओढाताण होऊ लागली. पणजीबाई म्हणत, “ज्या कामासाठी आपण इथे आलोत, ते काही होतच नाहीये!” त्यांचे लिखाण मंद गतीने चालू होते. ११व्या अध्यायाच्या सुमारे १४६० ओव्या लिहून झाल्या होत्या. ते म्हणत, “माझ्या मागे हे काम माझी मुलगी पूर्ण करेल.” दुर्दैवाने पणजोबांचा पोटदुखीचा जुना आजार बळावला आणि ९ मे १९१९ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या हयातीत अपुरे ‘ख्रिस्तायन’ पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले होते.

१९३० साली मुलीचे लग्न झाले. त्यावेळी पणजीबाईंचे लक्ष ‘ख्रिस्तायना’कडे गेले.  त्या म्हणतात, “मनाचा धडा केला.  आता जीव जावो अथवा राहो. ‘ख्रिस्तायन’ पुरे करायचे. गुडघे टेकले, प्रार्थना केली. देवाला वचन दिले, “जे होईल ते होवो. मी आजपासून कविता करणे, पत्रे लिहिणे, इतर वाचन, भेटी-गाठी, शरीराचे आजारपण, मुलांची काळजी, वायफळ गोष्टी किंवा स्मृतिचित्रे लेखन काही काही करणार नाही. देवा, हा बघ टाक हाती घेत आहे. तुला हवे तर तू आपल्या गौरवाकरिता करून घे. नाही तर माझा अंत ह्यातच होऊ दे.” मी प्रार्थना करून टिळकांनी जे ‘ख्रिस्तायन’ लिहिले होते व त्यांच्या मागे दत्तूने जे साडेदहा अध्याय छापले होते ते वाचण्यास घेतले. त्यांचा राहिलेला ११वा अध्याय मी पुरा केला.”

त्या दिवसापासून पणजीबाई स्वतःला खोलीत बंद करून घेत. दुपारी बाहेर पडत. मग पुन्हा अंधार पडेपर्यंत खोलीत बंद ! 

सुमारे शतकापूर्वी ‘ख्रिस्तायन’ लेखनाची सुरुवात झाली. तेव्हाची मराठी भाषा – लेखन, जोडाक्षरे, उच्चारण हे सारे आज आपल्याला एक अनुभव देऊन जातात. पणजोबा मुळातच तैलबुद्धीचे ज्ञानवंत कवी होते. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर अलंकारिक असूनही ओघवती-सरल. पणजीबाई जाणत्या वयात लिहा-वाचायला शिकल्या. साधी-सोपी, घरगुती अशी त्यांची प्रवाही भाषा. दोघांची दोन टोके. भावना मात्र एकच – ख्रिस्तावर अनिवार भक्ती आणि प्रेम. ख्रिस्ताच्या अद्भुत जीवन चरित्राचे लेखन पणजीबाईंनी आपले जीवित कार्य मानले. त्यांना आपल्या धर्मांतराचे प्रयोजन कळाले. त्या म्हणतात, “देवाने मला आपल्या जवळ घेतले कारण त्याला माझ्याकडून ‘ख्रिस्तायना’ची पूर्तता करून घ्यायची होती. पणजीबाईंच्या लेखनात भावनेचा ओलावा आहे.  त्यांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने ख्रिस्तचरित्राचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा कसून अभ्यास केला होता. धर्मांतर करताना त्यांच्या मनाची जी तळमळ झाली होती ती त्या त्या क्षणाला नीट पारखून घेतली होती. त्यामुळे आपण ज्या गोष्टी करीत आहोत त्या एका विशिष्ट ध्येयानुरूप करीत आहोत असा त्यांचा आत्मविश्वास होता.

पणजोबांनी लिहिलेल्या ‘मंगल’, ‘आत्मनिवेदन’ आणि  ‘आश्वासन’ या प्रारंभीच्या तीन अध्यायांमधे कविचे परमेश्वराला वंदन, स्वतःची दुर्बलता आणि परमेश्वर पित्याने भक्ताला दिलेली आश्वासने या गोष्टी आहेत. ४थ्या ‘जन्म’ या अध्यायात येशूजन्माचा इतिहास, ६०० वर्षांपूर्वी त्याविषयी संदेष्ट्यांनी केलेली भाकिते, भविष्यकथन इथपासून प्रारंभ होतो. ११व्या अध्यायाच्या १०६ ओव्या पणजोबांनी लिहिल्या. नंतरच्या ७५व्या अध्यायातील येशूच्या पुनरुत्थानापर्यंतचे लेखन पणजीबाईंनी केले. हेरोद, बारा शिष्य, योहानाचा शिरच्छेद, शिष्यांचे गर्वहरण, लाजार, यहुदा विश्वासघात, पिलात न्यायसभा, शासन, क्रूसखांबभार, सात उद्गार, प्राणोत्क्रमण व पुनरुत्थान हे अध्याय डोळ्यात पाणी आणतात. त्यांनी मानवी स्वभावाचे बारकाईने केलेले निरीक्षण आणि अभ्यास स्पष्ट जाणवतो. आपल्याकडे पित्याने सोपविलेले कार्य आपण पूर्ण केले आहे, याचे समाधान त्यांना मिळाले. आणि अवघ्या दोन महिन्यातच त्यांना पित्याचे बोलावणे आले. फक्त पाच वर्षांत साठी उलटून गेलेल्या पणजीबाईंनी ८३७६ ओव्या लिहिल्या त्या देवाच्या गौरवासाठीच !

पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने शिष्यांना आणि इतर लोकांना दर्शन दिले. या महान घटनेचे वर्णन शेवटच्या ७६व्या अध्यायात देवदत्त नारायण टिळकांनी (माझे आजोबा) केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक कवी गिरीश – शंकर केशव कानेटकर (नाटककार वसंत कानेटकर यांचे वडील) यांच्या सूचनेवरून ‘प्रभूदर्शन’ या समारोपात्मक अध्यायाचे लेखन झाले आणि १५ डिसेंबर १९३८ रोजी ‘संपूर्ण ख्रिस्तायन खंडकाव्य’ ग्रंथ रूपाने प्रकाशित झाले. देवदत्त टिळकांनी आपल्या माता-पित्याच्या कार्याला पूर्णत्व दिले. त्यांच्या कथनाचा ओघ, भाषा सौष्ठव, धार्मिक भावनेचा ओलावा आणि माता-पित्यांबद्दलचा आदर लेखनात स्पष्ट दिसतो. ‘ख्रिस्तायन’ तीन कवींनी लिहिले आहे. म्हणून कवी गिरीश याला ‘त्रिवेणी संगम’ म्हणतात.

‘ख्रिस्तायना’तील ९वा अध्याय ‘समीक्षक’ हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण समीक्षकाच्या निमित्ताने पणजोबांनी ख्रिस्ताकडे जाणारी आपली स्वतःची वाटचाल अतिशय प्रभावीपणे वर्णन केली आहे. अशोक देवदत्त टिळक (माझे वडील) यांनी हा अध्याय विशेष स्पष्टीकरण देऊन प्रसिद्ध केला आहे. अयन म्हणजे जाणे, प्रवास. ख्रिस्तायन म्हणजे ख्रिस्ताकडे जाणे!!

ख्रिस्ताने अलौकिक प्रेम आणि स्वार्थत्यागाने जगाचे कल्याण केले. अशा एका श्रेष्ठ प्रेषिताचे चरित्र रेखाटताना भावनिक उदात्तता अबाधित रहावी म्हणून पणजोबांनी  योजलेले ‘ख्रिस्तायन’ हे शीर्षक काव्यमय आहे!

पणजीबाईंच्या लेखनातील  ‘पुनरुत्थान’ या ७५ व्या अध्यायातील शेवटची  ओवी  अशी…..

“पुनरुत्थान अध्याय l 

ख्रिस्त कृपे पूर्ण होय l 

ख्रिस्तचरणी तरणोपाय l 

करा जय जय घोष मुदा ll१३१ll

आणि ख्रिस्तायनातील ‘प्रभुदर्शन’ या अंतिम अध्यायात देवदत्त टिळक लिहितात….

“ख्रिस्ताब्द एकोणीसशें आडतिस l 

जयंतीचा ये जवळ दिवस  I

महाकाव्य यें तों पूर्णत्वास l

करा जयघोष प्रभूचा ll११६ll”

अर्धशतकापूर्वीची गोष्ट, अहमदनगर मधील एक शिक्षिका आपल्या गोड आवाजात येशूच्या पुनरुत्थानदिनी भल्या पहाटे उपासनेप्रसंगी ख्रिस्तायनातील ‘पुनरुत्थान’ हा अध्याय सर्व भक्तांसाठी वाचीत असत. काही वर्षांपूर्वी पुणे येथील रेव्ह. प्र. कों तेलोरे गावोगाव जाऊन संपूर्ण ख्रिस्तायनाचे निरूपण करीत असत.

आजही सोलापूर येथील एका कुटुंबामध्ये ख्रिस्तायनातील काही अध्यायांचे सामूहिक पठण होत असते. यामध्ये एकूण चार पिढ्यांचा सहभाग असतो.

अहमदनगर ही रेव्ह. नारायण वामन आणि लक्ष्मीबाई टिळकांची कर्मभूमी. येथील ‘कोकऱ्याची मंडळी’ या चर्चने ख्रिस्तायनाचे  अखंड वाचन सलग चार दिवसांसाठी आयोजित केले होते. समारोप १० फेब्रुवारी २०१५ या दिवशी झाला. दिनविशेष असा की यादिवशी पणजोबांच्या ‘ख्रिस्तांगीकारा’ला १२० वर्षे पूर्ण झाली. या पठणात मुक्ता अशोक टिळक, विद्यागौरी नारायण टिळक या दोन पणतींसह अनेक ख्रिस्ती आणि ख्रिस्तीतर बंधू भगिनींचा सहभाग होता.

आपण असे उपक्रम हाती घेऊन ‘ख्रिस्तायन’ आणि त्याचे तीन कर्ते यांचे स्मरण करूया.