​कोरोनातील लॉकडाऊन आणि पत्रकार – रविंद्र माने

कोरोनातील लॉकडाऊन आणि पत्रकार

  •  रविंद्र माने, जेष्ठ पत्रकार

                                                 मो. – ९६६५८७५३६८

मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलसह अत्यावश्यक असलेली किराणा मालाची दुकानेही हळुहळु बंद झाली. महापालिका, पोलीस, आरोग्य अशी खाती वगळता खाजगी कार्यालये, कंपन्याही बंद       झाल्या. त्यानंतर सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण झाली. सुरवातीला देशात, त्यानंतर राज्यात, शहरात आणि सोसायट्या, वाड्या, गावातही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भितीने घरात बसून राहण्याची पाळी नागरिकांवर आली. त्यानंतर नोकरी गेली, घरातील रेशन, पैसेही संपले, उपासमारीची पाळी जवळ आली.

घरात रहावे तर उपासमारी आणि बाहेर पडावे तर कोरोनाची महामारी अशा दुहेरी संकटात सर्वजण सापडले. अशा भयान परिस्थितीत पोलीस, आरोग्य आणि पालिकेची अत्यावश्यक सेवा मात्र, कोरोनाशी सामना करत आपले कर्तव्य बजावत होती. पोलीस नाक्यावर, चौकात, मुख्य रस्त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा देत होते.

तर आरोग्य यंत्रणे​​तील डॉक्टर,परिचारिका, त्यांचे मदतनिस अगदी सफाई कामगारही आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्यामुळे घरात बसलेल्या नागरिकांना दिलासा मिळत होता. कोरोनाचा कहर ओसरल्यानंतर त्यांच्या सेवेचे कौतुकही करण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून त्यांचा मंडळे, संस्था आणि एनजीओमार्फत जागोजागी सन्मान करण्यात आला. साडी-चोळीपासून सॅनिटायजर, मास्क, ग्लोज, शॉल, सन्मान चिन्ह देवून त्यांचा गौरवही करण्यात आला. अगदी बँक कर्मचार्‍यांचीही विशेष दखल घेण्यात आली. या काळात अनेक संस्थांनी झोपडपट्टीत राहणार्‍यांना घरपोच अन्नधान्य पुरवले. मध्यमवर्गीयांनाही त्यांच्या सोसायट्यांपर्यंत खिचडी, पुलाव पुरवण्याची काळजी जीवदानी ट्रस्ट, बहुजन विकास आघाडी आणि काही पक्षांनी घेतली.

मात्र, या सर्व धावपळीत (धावपळच म्हणावी लागेल) पत्रकार हा घटक नेहमीप्रमाणे उपेक्षीत राहिला. लॉकडाउनच्या काळात समाजाचा हा चौथा आधारस्तंभ आपला जीव धोक्यात घालून, कोरोना रुग्णाचे घर, हॉस्पीटल, गावी जाण्यासाठी धडपडणारी लोकं, घरात अडकून पडलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत रेल्वे स्थानक, बस डेपो, समुद्र किनारे, बाजारपेठा, रस्त्यावर फिरुन नेहमी प्रमाणे वृत्तसंकलन करीत होता. गोरगरीबांना पुरवल्या जाणार्‍या अन्न-धान्याच्या बातम्या करीत होता. पालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि मदतकार्य करणार्‍या संस्थांना प्रोत्साहीत करणार्‍या बातम्या देत होता. धान्य वाटप करताना सर्वांना पत्रकार त्यावेळी हवे होते. मात्र, हे पत्रकार खातात काय ? कसे राहतात, त्यांना कोरोना होणार नाही का ? त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होत असेल यापैकी कोणताही प्रश्‍न कोणालाही चाटून गेला नाही.

         लॉकडाऊन नंतर ८ ते १० महिने अनेक वृत्तपत्रे बंद होती. त्यांची कार्यालये, सर्व आर्थिक व्यवहारही बंद होते. मात्र, वर्तमानपत्रे ऑनलाईन सुरु असल्यामुळे पत्रकारांचे कामही सुरु होते. १० महिन्यांच्या या प्रदिर्घ काळात पत्रकारांना त्यांचे मानधन, वेतन, पगार मिळाला नाही. तरीही त्यांनी आपले काम थांबवले नाही. अन्न-धान्य वाटपाचे वृत्त संकलन करीत असताना आपल्या घरातील चुल त्याच्या डोळ्यापुढे येत होती.

मात्र, चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याने अन्न-धान्यासाठी हात पसरले नाही. त्याची ही घुसमट पत्रकारांची कथीत काळजी वाटणार्‍या समाजातील धुरंधरांनाही कळली नाही. एकाही सामाजिक कार्यकर्त्याने, पदाधिकार्‍याने पक्षाने, संस्थेने त्यांची साधी विचारपुस केली नाही. तरीही हा योद्धा लढत राहिला आहे. त्यात अनेक पत्रकारांना विरमरण आले. अनेक पत्रकार कर्तव्य बजावताना कोरोनाग्रस्त होवून हॉस्पीटलमध्ये कोरोंटाईन झाले. उपचारावर त्यांचे लाखो रुपये खर्च झाले. हे पैसे त्यांनी कसे उभे केले. हे आजतागायत कोणीही विचारात घेतले नाही. अनेक पत्रकारांनी तर घरच्याघरीच उपचार करून घेत पुन्हा आपल्या कर्तव्याला सुरवात केली.

         आजच्या घडीला कोरोना पुर्णतः आटोक्यात आल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले आहे. पत्रकारही पुन्हा कणखरपणे आपल्या कामात गुंतला आहे. त्या दहा महिन्याचा दाहक अनुभव त्याने आणि त्याच्या कुटुंबाने घेतला. त्या खोलात जाण्याची आवश्यकता आता उरली नाही. मात्र, पत्रकारितेची प्रतिष्ठा त्याने आपला जीव धोक्यात घालूनही जपली. त्याला या कठीण समयी फक्त कुटुंबानेच आधार दिला, धीर दिला असे इथे आवर्जुन सांगावेसे वाटते.