कॉलगर्ल

  •  सुनिता बर्नड परेरा, गास, मदर तेरेसा शेजोळ

अचानक सोसाट्याचा वारा सुटला होता. ऐन थंडीच्या दिवसात आकाशात काळया ढगांनी गर्दी केली होती. क्षणार्धात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे सुधा कावरीबावरी झाली होती. ऑफिस सुटून ती स्टॉपकडे यायला निघाली असताना अचानक दबा धरुन बसलेल्या अवकाळी पावसाने तिला शिकार केले होते. सुधा चिंब भिजलेली होती. त्यात पवनराजाने संधी साधली होती. पावसाने भिजलेला पदर कसाबसा सावरत ती शेडखाली आली. अवकाळी पावसामुळे सर्वांचीच त्रेधतिरपीट उडाली होती. सुधा मुळातच दिसायला गोरीपान, देखणी आणि सुंदर ! त्यात पावसात भिजल्यामुळे तिचे मूळचे रूप अधिकच खुलले होते पावसाचे टपोरे थेंब तिच्या कुरळ्या बटांशी खेळत, बागडत हळुवारपणे चेहऱ्यावरून ओघळत होते. वयाची चाळीशी गाठलेली सुधा आज चक्क स्वर्गातल्या अप्सरे प्रमाणे भासत होती. विजेच्या दिव्याचे तेज तिचा चेहरा अधिकच उजळून टाकत होते.

स्टॉपवरच्या गर्दीत ती रांगेत बससाठी उभी होती. तिने पर्स मधून रुमाल काढला आणि अवखळपणे बागडणाऱ्या थेंबांना तिने पुसून टाकले. इतक्यात बस आली, बसमध्ये चढण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडाली. सुधाही कशीबशी पर्स सावरत बसमध्ये चढू लागली. पण गर्दीचा धक्का लागून तिचा तोल गेला. अचानक मागून कुणीतरी तिला आपल्या गच्च मिठीत सावरले. मिठीच्या जबरदस्त विळख्यामुळे ती पडता पडता वाचली होती. तोल जातेवेळी घट्ट मिटलेले डोळे तिने उघडले आणि तिला विजेचा जणू करंटच बसला. समोर तिचा भूतकाळ उभा होता, समीरच्या रूपाने……

सुधा नागपूर मधील एका खेडेगावातील अतिशय गरीब घराण्यातील ! शेतात मजुरी करणारे आईवडील आणि चार लहान बहिणी ! आईबाबा शेतात मजुरी करणारे, त्यामुळे चार बहिणीची जबाबदारी तिच्यावर होती. अर्थात आठवीतून तिची शाळा सुटली. आईबाबा यांचा संसार तिने स्वतःच्या खांद्यावर घेतला. पण म्हणतात ना… गरजवंताला अक्कल नसते ! गरिबीला कंटाळून सुधाच्या जन्मदात्यानी तिला एका दलालाला विकले, तेथूनच तिच्या हलाखीला सुरुवात झाली. त्या दृष्ट, क्रूर दलालांनी तिला थेट पिंकीमावशीच्या कोठ्यावर आणले आणी देहविक्रीच्या धंद्यावर बसवले. सुधा मुळात देखणी असल्यामुळे पिंकी मावशीने तिला वेगळ्या स्टेटसमध्ये ठेवले. तिला स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला. सुधा बड्या बड्या राजकीय नेत्यांना आणि मोठमोठ्या बिजनेस वाल्यांना रिझवू लागली. ती खऱ्या अर्थाने त्यांची कॉलगर्ल बनली.

एके रात्री ती हॉटेलमधून परतत असतानाच अचानक तिच्या गाडीला अपघात झाला. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली त्यावेळी ती समीरच्या घरी होती. त्याच्या बेडवर झोपलेल्या तिच्या हातापायांना बँडेज बांधले होते, आणि समीर तिची सेवा करत होता. ’प्रेम म्हणजे केवळ वासना, आपली शारीरिक भूक भागली की चिंधी झालेल्या वस्त्रासारखे स्रीला फेकून देणे‘ अशी प्रेमाची व्याख्या करणारी सुधा आज प्रेमाचे एक वेगळेच रूप अनुभवत होती. सुधा समीरचे निर्व्याज प्रेम पाहून मनोमनी सुखावली होती. समीरला तर सुधा पहिल्या नजरेत आवडली होती. तिला गाडीतून बाहेर काढतानाच तो अक्षरश: तिचे रूप बघून वेडावला होता. इतके लावण्य त्याने आयुष्यात बघितले नव्हते. दोन दिवस त्याने मन लावून तिची सेवा केली होती. शुद्धीवर येताच सुधा देखील समीरने केलेली सेवा पाहून मनोमनी आनंदली होती. दोघेही एकमेकांकडे आपसूकपणे आकर्षित झाली होती. समीर श्रीमंत आईवडीलांचा एकुलता एक मुलगा ! उच्च शिक्षित ! वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. आणि हाच समीर आज सुधाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. शेजारी स्पिकर वर मधुर गीत वाजत होते,

’सुर तेच छेडिता, गीत उमटले नवे‘.

आणि इथे समीर सुधा ह्यांच्या प्रेमाचा वृक्ष बहरत होता.

समीर सुधा आता भेटू लागले. कधी बागेत, कधी सिनेमा तर कधी बीचवर ! त्यांच्या प्रेमाला बहर येऊ लागला. एकमेकांचे स्पर्श हवेहवेसे वाटू लागले. समीरच्या उबदार मिठीत ती विरघळू लागली, तर सुधाच्या मनमोहक लावण्याचा तो दिवाना झाला. पण वास्तवाचे चटके जगावेगळे असतात. समाज आणि कुटुंब एका कॉलगर्लला आपली सून म्हणून स्वीकारू शकत नाही, हे वास्तव जेव्हा सुधासमोर आले तेव्हा ती होरपळून गेली. समीरने आईवडीलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ ! प्रेमाचा सौदा करण्यात आला आणि साम, दाम, दंड, भेद या शस्त्रांचा वापर करून अखेर समीरचे मातापिता यशस्वी झाले. सुधा समीरला टाळू लागली. प्रेमाचा पारिजातक सुकला होता. फुले इतरस्त्र विखुरली आणि सुधा पुण्याला निघून गेली. तिथे कॉन्व्हेन्टमध्ये आश्रमात ती राहू लागली. शिक्षणाची आवड असणाऱ्या सुधाने शिक्षण पूर्ण केले आणि ती नोकरी करू लागली. एका कॉलगर्लचे परिवर्तन झाले होते. तिला सिस्टरांनी आधार दिला होता. तिने पण संधीचे सोने केले आणि ती स्वपायावर उभी राहिली.

पुढे अनेक वर्षानी तिची मुंबईत बदली झाली, आणि ती मुंबईत नोकरी करू लागली. आणि आज अचानक तिचा भूतकाळ तिच्या समोर उभा ठाकला होता. वयानुरूप समीर काहीसा पोक्त दिसत असला तरी देखणेपणा तसाच होता. दोघेची पावसात भिजले होते. समीरची गाडी पावसामुळे खराब झाली होती, त्यामुळे तो प्रायव्हेट टॅक्सी करण्याच्या बेतात असतानाच त्यांची नजर सुधावर पडली होती. सुधा अजूनही अविवाहित होती. समीरने सुधाचा ध्यास सोडला नव्हता, त्यामुळे सुधा आयुष्यातून निघून गेल्यावर त्यानेही लग्न केले नाही. आणि आज अचानक नियतीने दोघांची भेट घडवून आणली होती. अवकाळी पावसात दोघांच्या डोळ्यात आसवांचा पूर आला होता. हीच संधी साधून समीरने तिला मागणी घातली, “सुधा, तू शुक्राची चांदणी, मी आकाशातील तारा, बनशील का आयुष्यभर माझा सहारा“.

सुधाने बेभान होऊन समीरला घट्ट मिठी मारली आणि आपली मुक संमती दर्शवली.