‘कॅथलिक’ त्रैमासिकाची सदतीस वर्षे –  प्रा. स्टीफन आय. परेरा

‘कॅथलिक’ त्रैमासिकाची सदतीस वर्षे

  •  प्रा. स्टीफन आय. परेरा

सांडोर, वसई

         एखादे नियतकालिक सुरू करणे ही अगदी साधी व सोपी गोष्ट आहे. परंतु एकदा सुरू केलेले नियतकालिक पुढे सतत अनेक वर्षे प्रकाशित करीत राहणे आणि वाचकांमध्ये त्याची आवड निर्माण करणे हे काम वाटते तितके साधे, सोपे नसते.

         गेली सदतीस वर्ष मी ‘कॅथलिक श्रध्देचा मानबिंदू’ या नावाने एक त्रैमासिक प्रसिद्ध करीत आलो आहे. त्याच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि त्यानंतर हे मुखपत्र चालविताना गेली सदतीस वर्षे आलेले काही अनुभव येथे नमूद करु इच्छितो. त्यातुनच कॅथलिक त्रैमासिकाच्या सदतीस वर्षाच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकता येईल.

पार्श्वभूमी :

         इ.स. १९६२ ते ६५ या काळात दुसरी व्हॅटिकन परिषद भरविण्यात आली, ती एक ऐतिहासिक महत्वपूर्ण अशी परिषद समजली जाते, या परिषदेमुळे चर्चमध्ये अनेक बदल झाले. खिस्तमंडळ अधिकाधीक लोकाभिमुख बनले. उपासनेचा अर्थ लोकांना समजू लागला, भाविकांचा सहभाग वाढविण्यांसाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न केले जाऊ लागले. संस्कृतीकरणाच्या नावाने स्थानिक भाषांमधून उपासना, प्रार्थना आणि संगीत होऊ लागले, प्रापंचिकांना बरेच अधिकारही दिले गेले, एकंदरीत दुसर्‍या व्हॅटिकन परिषदेनंतर खिस्तमंडळाची बंद कवाडे उघडली गेली आणि नवे वारे आत शिरु लागले असे अभिमानाने सांगितले जाऊ लागले.

         काही धर्मपंडितांच्या मते मात्र खिस्तमंडळाने उघडलेल्या कवाड्यामधून नव्या वार्‍यांसोबत काही विषारी वायूही दुदैवाने खिस्तमंडळात शिरु लागले, जागतिक पातळीवर ‘फ्रीमेसनरी’ सारख्या संघटनांद्वारे तयार करण्यात आलेले धर्मगुरु खिस्तमंडळात शिरुन क्रियाशील झाल्याने हळूहळू श्रद्धा हानी होऊ लागली.

         दुसरी व्हॅटिकन परिषद ही एकविसावी एक्यूमिनिकल (Ecumenical) परिषद होती, प्रभू येशूच्या म्हणण्याप्रमाणे ‘एक कळप आणि एक मेंढपाळ’ म्हणून सर्व खिस्ती पंथियांना एकत्र करण्याच्या प्रयत्नासाठी बोलवलेली परिषद होती. त्यामुळे या परिषदेत जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया येथील बरेच प्रॉटेस्टंट धर्मपंडितही सहभागी करुन घेतले होते. त्यांच्या प्रभावाखाली आणि केवळ ऐक्यासाठी (एक्युमिनिझमसाठी) कॅथलिक पंथीय काही पारंपारिक श्रध्दा सोडून देण्यास तयार झाले. त्यावेळी सनातनी परंपरावादींनी आग्रहाची भूमिका घेतली की No ecumenism at the cost of Catholicism, (ऐक्यासाटी कॅथलिक श्रद्धा सोडल्या जाणार नाहीत.)

श्रद्धा म्हणजे काय ?

         श्रद्धा हा संस्कृत शब्द श्रत (म्हणजे सत्य) आणि धा म्हणजे धारण करणे. या शब्दावरुन बनला आहे. ज्याचा अर्थ सत्य व सत्यावर आधारित गोष्टीवरील विश्वास. श्रध्दा ही केवळ तर्क किंवा पुराव्यावर आधारित नसते तर ती एक आंतरिक भावना असते. डोळ्यांना न दिसणार्‍या व कोणताही पुरावा नसलेल्या गोष्टींवर ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.  दुसर्‍या व्हॅटिकन परिषदेनंतर कॅथलिक श्रद्धांमध्ये झालेल्या हानीमुळे पुराणमतवादी आणि नवमतवादी अशा दोन विचारसरणी निर्माण झाल्या. पुराणमतवाद्यांनी दुसर्‍या व्हॅटिकन परिषदेवर टीका करताना म्हटले, या परिषदे मुळे The Rhine flows into the Tiber. र्‍हाईन नदीचे पाणी टायबरमधून वाहु लागले. र्‍हाईन नदी ही जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रीया मधून वाहणारी म्हणजे प्रॉटेस्टंट विचारसरणी आणि टायबर ही कॅथलिक विचारसरणीचे प्रतीक या अर्थाने हे म्हटले गेले.

         आपल्याकडेही सदर दोन्ही विचारसरणी सुरु झाल्या, त्यातून श्रद्धाहानीचा धोका दिसू लागला, अशावेळी आम्ही काही मंडळी मॉन्सिनियर सेबेस्टीन वाझ, मॉन्सिनियर फिलिप तवारीस आणि आमचे गुरुवर्य फा. बर्नड भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो की खिस्तमंडळात कोणीही अतिपारंपारिक अगर अनिपुराणमतवादी असू नये. काही बुरसटलेल्या पारंपारिक गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. मात्र सगळ्याच पारंपारिक गोष्टी पायदळी तुडविल्या जाऊ नयेत कारण some Traditions are the pillars of the Church. काही पारंपारिक श्रद्दा ह्या खिस्तमंडळाच्या पायाभूत श्रद्धा आहेत.

         याच पार्श्वभूमीवर आही काही मंडळींनी ‘बॅसिन कॅथलिक असोशिएशन’ नावाची संस्था सुरू करून  ‘कॅथलिक श्रध्देचा मानबिंदू’ या नावाने त्रैमासिक सुरू केले. (१९८८) कॅथलिक श्रद्धा जतन करणे हे मुख्य उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून ही संस्था व त्रैमासिक आपले कार्य करीत असते.

         या ठिकाणी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मुलनचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मते “जी श्रद्धा माणसाची शारीरिक, आर्थिक अगर भावनिक असे कोणत्याही प्रकारचे शोषण करीत असते ती अंधश्रद्धा होय. (संदर्भ, साधना जुलै २०१८) या व्याख्येनुसार पाहू गेल्यास कॅथलिक मूलभूत श्रद्धांपैकी कोणतीच श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, कॅथलिक म्हणजे जागतिक धर्म म्हटलेल्या आपल्या धर्माच्या कोणत्याही श्रद्धा कोणत्याही प्रकारचे शोषण करणार्‍या नाहीच उलट भावनिक पोषण करणार्‍या निकोप श्रद्धा आहेत असेच म्हणावे लागेल.

         ‘कॅथलिक श्रध्देचा मानबिंदू’  हे त्रैमासिक गेली सदतीस वर्ष श्रद्धाबांधणीचे कार्य करीत आले आहे, त्यामधून दुर्मिळ, ऐतिहासिक माहिती प्रसिद्ध केली जाते. अधूनमधून काही विशेषांकही प्रसिद्ध केले जातात. उदा. मिस्सा विशेषांक (मराठी आणि इंग्रजी आवृती), पवित्र मरियेने दिलेल्या महत्वाच्या दर्शनांची सविस्तर माहिती देणारा मरिया दर्शन विशेषांक तर अलीकडचा क्रॉस विशेषांक ज्यामधून क्रुसाविषयी सविस्तर माहिती तसेच वसईतील आगाशीपासून दक्षिण वसईतील पाली पर्यंतच्या शतक महोत्सवी क्रूसाची माहिती देण्यात आलेली आहे.

         बिशप थॉमस डाबरे, बिशप एडविन कोलासो यांनी आमच्या कार्याची नेहमी स्तुती करुन आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत तसेच अनेक धर्मगुरुंनी आणि पुष्कळशा भाविकांकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीमुळेच गेली सदतीस वर्षे आम्ही कॅथलिकचे अंक विनामुल्य भाविकांना देत आलो आहोत. मागील काही वर्षापासून कॅथलिक छापील दोन हजार पाचशे प्रती व्यतिरिक्त पी. डी. एक फाईलद्वारे हा अंक जगभर पसरविला जातो. धन्यवाद… HAPPY CHRISTMAS…