कष्टाची बरी भाजी भाकरी… –  फ्रान्सिस डिमेलो

कष्टाची बरी भाजी भाकरी…

  •  फ्रान्सिस डिमेलो, नंदाखाल

            साल नेमकं आठवत नाही. पण १९७९-८०चं साल असावं. मी आमच्या शाळेतल्या मुलांना गोव्याला सहलीला घेऊन गेलो होतो. त्याकाळी गोवा या ठिकाणा​बद्दल सर्वांनाच मोठे आकर्षण होते. गोव्याचे समुद्रकिनारे, तेथील वेगवेगळ्या रंगाची वाळू, नारळी आणि काजूच्या हिरव्यागार बागांनी नटलेला निसर्ग, लाल लाल मातीचे रस्ते आणि मुख्य म्हणजे आगळी वेगळी संस्कृती, देवालये यामुळे गोव्याची सहल म्हणजे स्वर्गीय सुख देणारी !

          त्याकाळी कोकणरेल्वे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे एस. टी. बस अथवा खाजगी बस याशिवाय अन्य पर्याय नव्हता. सहलीत सहभागी झालेल्या मुलांची संख्या फार नसल्यामुळे स्वतंत्र बस परवडण्यासारखी नव्हती. आम्ही थोडी सवलत मिळवून एस.टी. बसनेच मुलांना गोव्याला नेलं होतं. मी आणि माझ्यासोबत लेडीटिचर म्हणून तारकुंडे मॅडम होत्या.

          सहल खूप छान झाली. मुलांनी छान मजा केली. समुद्र किनार्‍यावरील मजा लुटली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत पाली नावाचं गाव लागलं. तेथे बसस्थानकावर आमची बस रात्रीच्या जेवणासाठी थांबली होती. दरम्यान मी हिशोब करून पाहिला. बऱ्यापैकी पैसे शिलक होते आणि सहल तर संपत आली होती. आता काटकसर करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती म्हणून मी मुलांना मुभा दिली, “तुम्हाला हवं ते आणि हवं तेवढं जेवा. वेज-नॉनव्हेज काय हवं ते!”

          माझी मोकळिकीची सूचना मिळताच मुलांनाही काही सुचेनासे झाले. काय घ्यावं, काय नाही घ्यावं? काय खावं आणि काय प्यावं? मुलांनी वेटरला भंडावून सोडलं. कोणी आम्लेट मागवतो, कोणी चिकनकरी तर कोणी फिश फ्राय, तर कोणी साधी राईस प्लेट तर काही मुलांनी तर त्यांच्या आवडीचा मसाला डोसा ! वेटर धावत माझ्याकडे आला, ‘साहेब बघा ना, कोणी काहीही ऑर्डर देतं, बिल देतील का ते?’ मी त्याला आश्वस्त करत म्हटलं, ‘काही काळजी करू नकोस, बिल मी देणार आहे, माझं लक्ष आहे. तुम्ही नीट लिहून ठेवा आणि नंतर हिशोब करून सांगा.’ त्याला हायसं वाटलं. ‘तुम्ही देणार ना बिल ! मग काही हरकत नाही’ दुप्पट उत्साहाने ऑर्डर घेऊन तो मुलांना ऑर्डरप्रमाणे प्लेटस् आणून देऊ लागला. सारी मुलं एकदम तृप्त झाली. सहलीतील शेवटच्या जेवणाचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला हे पाहून आम्हालाही समाधान वाटले.

          शेवटी आम्ही दोघं शिक्षक जेवायला बसलो. वेटर अदबीने येऊन म्हणाला, ‘साहेब बोला, तुमच्यासाठी काय आणू? चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, सुका मटण, बैदाकरी, फिशकरी…..’ मी त्याला थांबवत म्हणालो, ‘आम्हाला साधं वेज जेवण दे. सोबत दही दे म्हणजे झालं.’ तारकुंडे मॅडमनेही वेजच घेतलं.

          शेवटी बिल देण्याची वेळ आली. गल्ल्यावर बसलेले वृद्धत्त्वाकडे झुकलेले हॉटेल मालक, श्री. दांडेकर मला म्हणाले, ‘साहेब तुमचं एकूण बिल ३५६ रुपये झालं आहे. तुम्ही मला ३५६ रुपये द्यायचे पण मी तुम्हाला पावती किती रुपयांची देऊ?’ मी बुचकळ्यात पडलो. मला काही कळेनासे झाले. मी त्यांना म्हटलं, ‘आमच्या मुलांनी आणि आम्ही जे काही खाल्लं त्याचे पैसे तुम्ही मला सांगा. तेवढे पैसे मी तुम्हाला देणार प्रश्न मिटला.’ तेव्हा पुन्हा माझी समजूत घालत ते म्हणाले, ‘अहो, तुम्ही मला ३५६ रुपयेच द्या पण तुम्हाला मी बिल कितीचं देऊ? पाचशेचं, सहाशेचं?’ माझं उत्तर पुन्हा तेच. तेव्हा मात्र ते दांडेकर खाली उतरले. वयाने ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते. तरी देखील मला नमस्कार करीत म्हणाले, ‘सर, खरंच तुम्हाला मनापासून नमस्कार. माझे या धंद्यात केस पिकले. पण तुमच्यासारखा शिक्षक मला पहिल्यांदा भेटला. तुमच्या जागी आणखी कोणी असतं तर माझ्याकडून किमान पाचशे रुपयांचं खोट बिल घेतलं असतं आणि माझ्या हातावर मात्र ३५६ रूपयामधलेही काही कमी दिले असते.’

          मीही हात जोडत त्यांना म्हणालो, ‘बघा मालक ही आमची गिरण कामगारांची मुलं आहेत. कामगारांच्या कष्टाच्या पैशातून चोरून खाण्याइतकी माझी परिस्थिती वाईट नाही. पगार फारसा नसला तरी खाऊन-पिऊन मी सुखी आहे. शिवाय माझे वडीलही शिक्षक असल्यामुळे तुम्ही सांगता त्या गोष्टी माझ्या संस्कारात बसत नाहीत. अस म्हणून त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

          त्या सहलीत मुलांनी खरच खूप मजा केली. त्यांना गोव्याला मी एक सिनेमाही दाखवला. आईस्क्रिम खाऊ घातले (त्याकाळी आईस्क्रिम खाणे हे ही किती अप्रूप होतं!) तरीही काही पैसे उरले. ते प्रत्येक मुला-मुलीला परत करण्यात आले. हो आमच्या शाळेत तेव्हा अगदी २५ पैशांपर्यंतचे पैसे मुलांना परत करण्याची प्रथा होती. आम्हीच सुरू केली होती. त्यामुळेच पालकांचा व शाळेचाही आमच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यावेळी तसे प्रामाणिक आणि नेकीने वागलो म्हणून आज ताठ मानेने माजी विद्यार्थ्यांसमोर उभे राहू शकतो.

‘कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको’.