अनादी आकर्षण
हवा असतोस तू मला अवतीभवती
तुझ्या नजरेच्या सुयाही
टोचून घ्याव्याश्या वाटतात कधीमधी
सोडून द्याव्याशा वाटतात तुझ्या दिशेला
ओठांच्या स्वैर पाकोळ्या
आणि तुझ्याकडून आलेला प्राणगंध
भरून घ्यावासा वाटतो रंध्रारंध्रात
नाही टाळता येत मला
हे अनादी आकर्षण
आणि खोडताही येत नाहीत
जगण्याचे सनातन संदर्भ
या सगळ्यासहित जगायचंय मला
अगदी स्वत:लाही कसलंही स्पष्टीकरण न देता
तुडवायच्या आहेत मला सगळ्या वाटा
तुझ्याकडे जाणाऱ्या
घसरड्या आणि निसरड्याही
होऊन होऊन काय होईल
घसरून पडेन
मोडतील हातपाय
तसंही तुझ्याच पावलांनी
सरणापर्यंत चालत जायचंय मला
- संगीता अरबुने