इतकं शांत तर
इतकं शांत तर तुला कधीच वाटलं नसेल
इतकं शांत की
तुझ्या उजव्या खांद्यावर बसून
एखादी चिमुकली चिमणी
तुझ्या सर्वज्ञ कानात कुजबूजू शकते
मी पाहू शकतो तुझ्या चेहऱ्यावर आनंद
की तू आहेस
आणि तुझ्या अवतीभोवती चिमण्या
चिमण्या करत नाहीत भांडवल
तुझ्या हातात ठोकलेल्या खिळ्यांचं
तुझ्या रक्तामांसाशी त्यांना
करायचा नसतो कोणताच देवघेवीचा करार
तु देवाचा पुत्रयस
की माणसाचा की कुमारिकेचा की विवाहीतेचा
या गोष्टींचा चिखल चिवडत नसतात चिमण्या
चिमण्या मूकाटपणे मेटिंगरत होतात
तुझ्या डोक्यावरील ध्यानस्थ मुकूटावर
तुझ्याशी असलंच तर चिमण्यांचं
इतकंच जैविक नातं असतं
चिमण्या चिवचिवतात
त्याची प्रार्थना होते
तुझ्या लाकडी पापण्या ओलावतात
तुझे लाकडी ओठ कुजबुजतात
प्रभो, दया कर
आणि हा प्याला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ नकोस.
चिमणी नाही आहे
जी चिमणी आहे
ती चिमणीच आहे असं नाही
एकदा मी पाहिली होती चिमणी
ख्रिस्ताच्या लाकडी खांद्यावर बसलेली
पुन्हा कधीच दिसली नाही
म्हणजे दिसली पण तशी नाही
जशी एकदा दिसली होती
खांदा लाकडीच होता
पण बदलला होता
चिमणी बदलली होती
बसणं बदललं होतं
आणि माझं पाहणं
मी जसं एकदा पाहिलं होतं
चिमणीला ख्रिस्ताच्या लाकडी खांद्यावर बसलेलं
आणि कुजबुजताना ख्रिस्ताच्या सर्वज्ञ कानात
तसं पुन्हा कधीच पाहू शकलो नाही
ख्रिस्त विव्हळला होता
हे पित्या शक्य असेल तर
हा प्याला माझ्याकडून कधीच हिरावून घेवू नकोस
पण पिता घातकी
नेहमीसारखाच
चर्चच्या घंटा घणघणल्या
आणि भाविक पावले वळू लागली चर्चकडे
चिमणी नाही आहे
आणि असलीच जर चिमणी
तर काय फरक पडतो
किंवा नसल्यानेही
ख्रिस्ताने आपले लाकडी कान
झाकून घेतले आहेत.
- इग्नेशियस डायस