कविता – आयवन क्रास्टो

जुदास

माझ्या चतकोर भाकरीसाठी,
मी अनेक भागीदार बनवले;
तूही त्यांत होतास.
माझ्या पुण्याईचे बळ,
मी निवडलेल्यांस दिले;
तूही त्यांत होतास.
माझ्या संवेदना मी वाटत होतो,
तूही त्यांत होतास.
माझ्या आत्म्याला देवाने दिलेली देणगी,
मी सढळ हाताने अर्पण केली;
तूही त्यांत होतास.
तुला मी अधिपती नेमले,
स्वर्गाची वाट दाखवली,
चमत्काराचे प्राक्तन दिले,
या बदल्यात…..
तू मला विकून मोकळा झालास
जुदासा, तू आजही जिवंत आहेस!

  • आयवन क्रास्टो, उमराळे, वसई