कथांच्या लाखो नद्या – डॉ. फेलिक्स डिसोजा

कथांच्या लाखो नद्या

  •  डॉ. फेलिक्स डिसोजा, भुईगाव

         कथाकार विवेक कुडू यांचा ‘चार चपटे मासे’ हा कथासंग्रह शब्द पब्लिकेशन कडून नुकताच प्रकाशित झाला आहे. विवेकच्या एका कथेतील निवेदक म्हणतो, ‘आम्ही पाण्यात अट्टल बुडणारे, खोल जागा माहीत असलेले’, विवेकच्या सर्वच कथेत पाण्याचा संदर्भ आहे, पाण्यावर जगणारी, पाण्यात बुडून मरणारी, पाण्यात खेळणारी, वाहून जाणारी, ओलिचिंब होणारी, पाण्यामुळे संपन्न होणारी, पाण्यामुळे बरबाद होणारी अनेक माणसे विवेकच्या कथेत येतात.

         त्यांच्या कथा वाचताना वाचकाला पाण्याची ओल सतत जाणवत राहते. हा पाणी नदीचा, समुद्राचा, पावसाचा पाणी आहे. या पाण्याच्या डोहात बुडून (डुंबून) खोल जागा माहीत असलेल्या कथाकाराने खोलवर विरघळून गेलेल्या माणसांचे अंत:स्तर शोधून व्यापक जीवनानुभव आविष्कृत केला आहे. गोष्ट सांगण्याची ओघवती शैली, आठवणी, स्वप्ने, पात्रांच्या सूक्ष्म हालचाली, त्या हालचालीतून उभी राहिलेल्या जीवंत व्यक्तिरेखा, व्यामिश्र आणि संपन्न अनुभवाची सरमिसळ, बोलीभाषेतील संवाद या सर्व पातळ्यावर विवेक कुडू यांची कथा यशस्वी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कथा वाचताना एक दृश्यमालिका डोळ्यासमोर उभी राहते, सिनेमा पाहत आहोत अशी दृश्य समोर उभी ठाकतात. विवेकाच्या कथेत सतत वाहणारा पाण्याचा प्रवाह आहे. या प्रवाहावर तरंगणारा आणि पाण्यात खोलवर बुडालेला जीवनानुभव वाचकाला कथेच्या प्रवाहात ओढत राहतो.

         ‘डब्बलडेकर या कथेतील नायक म्हणतो, ‘डब्बलडेकर आपल्या बिळातून छोटे छोटे खडे काढतो तसे मीही माझ्या स्वप्नांचे खडे काढायचो.’ आजूबाजूच्या झकपक वातावरणाचा चंदेरी धुराळा पाहून त्या धुराळयात दिवास्वप्नं पाहायची आणि कसल्यातरी फंदात अडकून पडायचं आणि एकदा का या फंदात अडकले की फसवणुकीशिवाय त्यातून सुटका नाही. या कथेतील धनेश या चक्रात अडकला आहे. त्याला लागलेले झटपट श्रीमंत होण्याचे वेड आणि त्याने रंगवलेली स्वप्ने याची एक दृश्य मालिका कथाकार उपरोधिक, विनोदी शैलीत सादर करतो. परिस्थिती डोकं वर काढू देत नाही म्हणून माणसे स्वत:च्या कोशात स्वत:ला चॉकलेटच्या रॅपरसारखे गुंडाळून घेतात. सुरक्षित आणि झटपट श्रीमतीचा मार्ग म्हणून पैशाचा पाऊस पाडणारा बाबाच्या नादी लागतात किंवा दोन तोंडाचा डब्बलडेकर साप शोधण्याच्या मागे लागतात, एकवीस नखं असलेल्या कासव शोधण्याच्या फंदात अडकतात. या कथेतील वर्णन आणि नायकाचे स्वप्ने वाचताना मध्येच खुद्कन हसू येते, पण हे हसणे निखळ विनोदासारखे नाही, या स्वप्नामागे आणि त्यातून निर्माण होणार्‍या विनोदामागे करुणा प्रवाहीत झाली आहे.

         कथाकाराला मानवी जीवनाविषयी असलेली आस्था आणि करुणा याची वेळोवेळी प्रचिती येत राहते. म्हणून या कथासंग्रहातील सर्वच कथेत मानवी जीवनाकडे पाहणारी करुणार्द दृष्टी  जाणवते, जीवनातील सुखाचे दोन क्षण या पात्रांच्या वाट्याला यावेत असे निवेदकाला सातत्याने वाटते. पण गोष्ट सांगता सांगता जवळजवळ येणारे सुखाचे क्षण निसटत जात असल्याचा वास्तववादी अनुभव कथन केला जातो. सुखाचा शेवट व्हावा म्हणून कुठलीच कल्पना कथाकार लढवत नाही, मुळी अशा सुखाची शक्यताच या कथेतल्या माणसाच्या जीवनात नाही. ‘सात दिवसाचं मरण’ या कथासंग्रहातील पहिली कथा. पाण्यात बुडून असलेल्या माणसाचं सात दिवसाच्या मरणाचा अनुभव विलक्षण आहे. मृत झालेला माणूस आपल्याच मरणाची कथा सांगत आहे. ‘आज पाचवा दिवस. सर्वांना जास्त परिचित नसलेली नदी. काठावर माणसाची गर्दी आहे. मी पात्रात उलटा आहे. मला आटोकाट काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.’ अशी या कथेची सुरवात वाचकाला या नदीच्या पात्रात ओढून घेते. पात्रात अडकलेल्या माणसाचे, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न, घरी येणे, स्वत:चा अंत:संस्कार अनुभवणे, बायकोचा, पोरांचा शोक, दु;ख अनुभवणे तसेच या कथेतच भेटणारा दारूवर जगलेला रमेश, पाण्यात बुडालेल्या माणसाच्या प्रकरणात रामबाण उपाय असलेला काळू, आणि कथेच्या शेवटी मोठ्या मुलांचा ‘अण्णा टाटाला जाऊन आलो टाटाला….’ असा ऐकू येणारा टाहो अशा विविधांगी दृष्यातून कथा वाचताना एखादा लघुपट पाहत असल्याचा  भास सतत होत राहतो.

         कॅन्सरग्रस्त बाप आणि त्याने अगतिकतेतून केलेली आत्महत्या असा या कथेचा विषय. पण कथाकाराने सांगितलेली कथा केवळ तेवढी नाही, त्यात सात दिवसाचा मरणानुभव आहेच, पण त्या समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्तर आणि जीवनविषयक धारणा, मूल्ये यांचे दर्शन घडते. कथा सांगण्याची कुडू यांची स्वतंत्र  शैली प्रत्येक कथेत जाणवते. प्रयोगशीलतेमुळे कथा कुठेच तुटलेली, संथ झालेली नाही. उलट कथेचा प्रवाह त्यांच्याच भाषेत सांगायचे तर  कोकाट वाहणारी दृश्य मालिकेसारखा आहे. आलेल्या अनुभवाला कलात्मक रूप देण्यात विवेक कुडू शैली, भाषा, निवेदन, आशय या सर्व बाबतीत यशस्वी झाले आहेत.

         ‘चोपी’ या कथेत एक्कावन्न माणसांच्या आठ घरांपैकी एक खोप असलेल्या खोपात  राहणारा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, ‘मला एक मस्त घर हवंय’. अण्णा घर बांधायचे ठरवतो. मग घर बांधण्यासाठीचा अण्णाचा जीवघेणा संघर्ष सुरू होतो. घरासाठी पडेल ते कष्ट करायला तयार असणार्‍या अण्णांनी महिना दीड महिना राबून आठ-नऊ माड एकट्याने पाडून त्याच्या चोपी केल्या. ‘माड तोडता तोडता ते स्वतः टणक झाले’, असे निवेदक म्हणतो तेव्हा जणू अण्णांनी मारलेल्या कु-हाडीचा टणक आवाज ऐकू येतो. आता तोडलेल्या चोपी नदीने न्यायच्या असतात. चोपी नदीच्या प्रवाहात वाहून न्यायचा पाण्याच्या प्रवाहावरील थरारक खेळ सुरू होतो. वाचताना त्या चोपीबरोबर आपणही प्रवाहावर वाहत राहतो आणि एकदाचा किनारा लागावा म्हणून भरभर कथा वाचू लागतो… पण… पाण्याच्या पृष्ठभागावरील हा थरार अनुभवण्यासाठी ही कथा प्रत्यक्षच वाचायला हवी.

         विवेक कुडू यांच्या बहुतांश कथेत पाणी आहे. हा पाणी प्रवाही आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक कथेतील अनुभवही नवा, प्रवाही आहे. ‘मटन आणि फालूदा’ ही कथा मटण आवडणारा ‘तो’ आणि फालूदा आवडणार्‍या ‘ती’ची उत्तम आणि वेगळ्या धाटणीची प्रेमकथा आहे. ‘फोक्शाच्या नो बॉल आणि पोलार्डची अर्धी इनिंग’, ‘केमिकलची बोय आणि सारिंगा’ या कथेचं  अनुभवविश्व‌ कथेच्या शिर्षकाप्रमाणे  वेगळं आहे. ‘केमिकलची बोय आणि सारिंगा’ या कथेत लेखकापुढे असलेले महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, पर्यावरणविषयक समकालीन प्रश्न कुडू यांनी उपस्थित केले आहे. उपभोगवाद आणि चंगळवादात पर्यावरणाची झालेली हेळसांड, माणसाचे मुल रूप हरवत चालल्याची शोकांतिका. तथाकथिक भौतिक विकासाच्या नावाखाली माणूसपणाची आणि पर्यावरणाची होणारी अधोगतीची गोष्ट कुडू यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितली आहे. विशेष म्हणजे ‘बोय’ माशानी सांगितलेली ही गोष्ट वाचताना समुद्र, समुद्रातील मासे, त्यांचे विविध तपशील यामुळे या समुद्र विश्वाशी वाचक एकरूप होतो.

         निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य अनुभवत असताना अचानक एक बोय अजस्र होते. तिचा राग अनावर होतो. तिला माणसाने उभारलेल्या विघातक कंपन्यांचा चावून चावून चट्टामट्टा करायचा आहे. माणसांनी उभारलेली धुरांडी इतकी विषारी तर माणसे किती विखारी म्हणत ती माणसांना ‘मला तुम्ही खाच’ असे खुले आवाहन देते. माणसाने हव्यासापोटी निसर्गाची आपिरीमित हानी केली पण निसर्गात माणसाला नष्ट करण्याची शक्ती आहे. निसर्गाचे सौंदर्य दाखवत असताना माणसाच्याच कृत्यामुळे माणसाविरुद्ध उभे राहिलेले  निसर्गाचे  क्रौर्य ‘बोय’ माशाच्या स्वगतातून पुढे येते. कुटुंब, समाज, संस्कृती, पर्यावरण इ. आशयविषय असलेल्या विवेकाच्या गोष्टी, त्या सांगण्याच्या कल्पक योजनेमुळे कलात्मक आणि रंजक झाल्या आहेत.

विवेकच्या कथेची शीर्षकं पाहिली तर ती अनोखी आणि तितकीच कॅची आहेत. शीर्षकाप्रमाणे त्यांच्या कथेतील अनुभविश्व व्यापक आणि व्यामिश्र आहे. मानवी जीवनाविषयी आस्था आणि मानवतावादी दृष्टी यामुळे ती समाजाच्या विविध स्तरातील अनुभव कवेत घेते. या अनुभवांची विवेकने स्वतंत्र शैलीत सांगितलेली गोष्ट वाचताना कलात्मक अनुभूतीची प्रचिती येते. ही अनुभूती देणारं वातावरण आणि अनुभवाची, घटना, प्रसंगाची  दृश्य उभी करणं हे विवेकच्या शैलीचं सामर्थ्य आहे.

एकूण दहा कथांच्या या मालिकेत अनेक पात्र आपल्या भेटतात. कष्ट करून साधं जीवन जगू पाहणारी पण जगता न येणारी ही माणसे आहेत. अशी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला आपल्याला सतत दिसत असतात. पण त्यांच्या जगण्याची आणि उद्ध्वस्त होण्याची बातमी होत नाही. त्यांच्या जीवनाची एक तर वाफ होते किंवा गपगुमान ती पाण्यात विरघळून जातात. त्यांच्या काळजात सलाईनसारखी ठिबकणारी काळजी सतत ठिबकत असते. ही काळजी आणि सततची अनिश्चितता वागवत ही माणसे वावरत असतात. सात दिवसाचं मरण अनुभवणारा, सलीचं वजनी वशिंड मनात वागवणारी कॅन्सरग्रस्त बाप, अपयशाची वेदना पचवणारा, देहमनातून अगतिक झालेला अण्णा, शहरात राहायला गेलेल्या आपल्या मुलाचा संसार सुखाचा नाही हे पाहून व्हिवळणारा, अवकाळी पावसानं आपलं संपूर्ण शेत पाण्यात जाताना पाहून  मूकपणाच्या थंड दलदलीत रुतून बसलेला भीमा, कुर्‍हाडीचा जोरदार वार करून डुक्कर मारणारा आणि त्याच कुर्‍हाडीने स्वत:च्या मानेवरील वेदनादायी गाढ कापून मृत्यू स्वीकारणारा मुळया, फंदात अडकलेला धनेश, प्रेमाचं घरटं विस्कटू नये म्हणून सीएचबीची शिक्षा भोगत, प्राध्यापक भरतीची वाट पाहत ‘ती’ ला जपणारा चेतन, सर्व काही हरवून दिशाहीन, वैफल्यग्रस्त झालेला घननीळ, स्वप्नं विस्कटलेली, थकलेली सरू अशी अनेक माणसे कुडुंच्या कथेत भेटतात. ही भेटलेली माणसे स्मृतिपटलावर कोरली जातात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे काही समान धागे घेऊन वावरत असतात. पण आपल्याला त्यांची गोष्ट माहीत नसते. विवेकला ती गोष्ट दिसते, गोष्ट सांगता सांगता विवेकला त्यांची भाषाही दिसते, या कथेतील माणसाची स्वगतं, स्वप्ने, संवाद, त्यांच्या आठवणी त्या त्यांच्या बोली भाषेत उमटू लागतात.

         पालघर जिल्हातील पालघर, वाडा, मोखाडा, जव्हार या भागात बोलल्या जाणार्‍या आगरी, कोळी, वारली भाषेत कथेतील वेगेवेगळी पात्रे बोलतात. निवेदकाच्या ओघवत्या शैलीत या भाषांचा उस्फूर्तपणा, ओघवतेपणा, पात्रागणिक येणारा तुटकपणा एकजीव झाला आहे. व्यक्तिरेखांची प्रादेशिक वैशिष्टये या भाषेतून अधिक तीव्रतेने प्रकट झाली आहेत. अवशेंड, ओपन्या करणे, कपराट, कोसकीड, गावरी, दोयेदशी, तुम धरणे, गुंडी वाळून झोपणे असे अनेक बोलीभाषेतील शब्द प्रादेशिक वैशिष्टये अधोरेखित करीत पात्राची अगतिकता, पराभव, दुबळेपणा अधिक ठळक करतात. ‘भीमा अबोल होण्याअगोदरचे दिवस या कथेतला रमेश म्हणतो, “पाचक वरसा पैले याजून गलका लावला. आख्खा घर ते मांडवाचे मागे खपला. फुला भारी आल्ती मांडवाला. पन उपेग काय… गलक्याला भाव किती तं… दोन रुपये… गावन वाटून वाटून किती वाटणार… असास हिक्काडला मांडव…” किंवा दारूच्या बांगड्या या कथेतील सरू आपल्या नवर्‍याला म्हणते, माना शिश्याची बांगडी तरी करून देशील का? तो म्हणायचा, ‘देईन ग माजे खापरे! मी आयुष्यभर खापरात शिसंच वितळवलं. तुला माझ्यासारखा नवरा मिळाला खापर्‍या नशिबाचा.’ असे बोलीभाषेतील अनेक संवाद आशयाला अधिक प्रवाही करतात.

         कथेच्या शेवटी कथासंग्रहात आलेल्या बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील बोलीभाषेतील शब्द सहजरित्या कथेत अवतरले आहेत. आशय आणि भाषा या दोन्ही अर्थाने विवेक कुडू यांनी मराठी कथेला फार महत्त्वाचे योगदान दिले आहे.   

चार चपटे मासे । विवेक वसंत कुडू
कथासंग्रह । शब्द पब्लिकेशन
पाने : १५६ । किंमत : ₹ २५०