कथा नकोशा झालेल्या बाळाची
- प्रा. स्टीफन आय. परेरा, संपर्क : 9850878189
रोमन सम्राटाचा मांडलिक राजा हेरोद याच्या काळात (खिस्तपूर्व ३७ ते इ.स. ४) यहुदीया प्रांतातल्या बेथलेहेम गावी येशूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही खगोल शास्त्रज्ञ जेरूसलेमला आले आणि चौकशी करू लागले की यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे, तो कोठे आहे. आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.
ही बातमी ऐकताच राजा हेरोद भयभीत झाला. त्याने लगेच सर्व याजक आणि धर्मशास्त्री यांना बोलावून खिस्त म्हटलेल्या मसीहाचा जन्म कुठे व्हायचा आहे याची चौकशी केली. तेव्हा ‘यहुदीयातील बेथलेहेम गावी’ असे उत्तर मिळाल्यावर हेरोदने त्या खगोलशास्त्रज्ञांना बोलावून बेथलेहेम गावी जाण्यास सांगितले, तेथे त्या बाळाचा शोध लागल्यावर मला येऊन सांगा म्हणजे मीही जाऊन त्या बाळाला मुजरा करीन असे हेरोदने म्हटले.
राजाच्या सांगण्यावरून ते बेथलेहेमला आले. त्यांनी येशू बाळाचे दर्शन घेतले, त्याला नमन केले आणि आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद आणि गंधरस यांचे नजराणे दिले. त्यानंतर त्यांना स्वप्नात मिळालेल्या संदेशानुसार ते दुसर्या वाटेने निघून गेले. तसेच जोसेफला मिळालेल्या संदेशानुसार तो रात्रीच उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्तला निघून गेला.
खगोलशास्त्रज्ञांनी आपल्याला फसविले असे पाहून हेरोद संतापला. त्याने बेथलेहेम व आसपासच्या भागातील दोन वर्षाखालील सर्व बालकांची कत्तल केली. (मत्तय २.१-१६) मानवजातीच्या तारणासाठी देवाचा पुत्र या भूतलावर अवतरला. पण हेरोद राजाला तो नकोसा होता, कारण यहुद्यांचे आपणच एकमेव राजे आहोत, आपल्याला दुसरा प्रतिस्पर्धी नको असे हेरोदला वाटे, म्हणून त्याने असंख्य निरपराध बालकांची कत्तल केली.
अशी ही पहिल्या शतकात घडलेली हेरोदाच्या क्रौयाची कथा सांगितली आते. त्यानंतरच्या गेल्या दोन हजार वर्षाच्या काळात हेरोदसारखे अनेक क्रूरकर्मा होऊन गेले. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर इ. स. १९३३ ते १९४३ या काळात जर्मनीत हिटलर नावाचा असाच क्रौयाचा बादशहा होऊन गेला. त्याने लाखो निरपधार लोकांना छळछावणीत डांबून आणि अन्य मार्गांनी अक्षरश: किड्यामुंग्यासारखे चिरडून मारले. त्याने केलेला मानवी संहार पाहून त्याच्यात दुष्टात्मा संचारलेला होता असेच म्हणावे लागेल.
मानवाच्या निर्मितीमध्ये देवाच्या पावन मंगल कृतीचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे मानवी जीवन पवित्र मानले जाते. जीवनाच्या आरंभापासून शेवटपर्यंत परमेश्वर हाच मानवी जीवनाचा स्वामी व प्रभू आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला निरपराधी जीवाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नाश करण्याचा अधिकार नाही (कॅथॉलिक श्रद्धाग्रंथ, कलम २२५८) याच संदर्भात प्रभू येशूने म्हटले, “खून करु नकोस आणि जो खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल.” (मत्तय ५:२१)
दुर्दैवाने आज जगभर अजाण बालकांची सर्रास कत्तल केली जात आहे. हेरोद आजही जीवंत आहे. खुद्द आईवडीलच हेरोदाची भुमिका पार पाडीत आहेत. मोठमोठे शिकलेले डॉक्टर नकोशा झालेल्या बालकांसाठी कत्तलखाने चालवित आहेत. हेरोदच्या काळात फक्त एकच दिवस बालकांची कत्तल झाली, पण आज सर्रास रात्रंदिवस शेकडो बालकांची कत्तल होत आहे. त्याकाळी हेरोदचे शिपाई बालकांची कत्तल करताना आईवडील हंबरडा फोडून शोक करीत, आज आमचे आईवडील स्वत:हून कत्तलखान्याकडे जाऊन आपल्या संमतीने पोटच्या बाळाची कत्तल करुन घेत आहेत. रडणे, हंबरडा फोडणे तर सोडाच, पण उलट गर्भपात करुन ‘सूटलो एकदाचे’ अशा अविर्भावात समाधानाने घरी जातात.
पूर्वीच्या काळी लोक अशिक्षित होते, त्यांना दहा-बारा मुले व्हायची. आताची सुशिक्षित पिढी कुटुंबाचे नियोजन करु लागली. नियोजन चांगले असले तरी ते सुशिक्षितांना शोभेल असे असावे. काही वर्षांपूर्वी तीनपेक्षा जास्त मुले होऊ नयेत अशी अलिखित शिकवण दिली गेली, नंतर काही काळाने ‘हम दो हमारे दो’ असा घोष दिला गेला. लवकरच तो मागे पडून ‘हम दो हमारा एक’ असे म्हणण्यात मोठेपणा समजला जाऊ लागला. त्याच्या पुढची पायरी मात्र भयंकर होती ती म्हणजे DINK संस्कृतीची. DINK संस्कृती म्हणजे Double Income No Kid. दोघंही पतीपत्नी नोकरी करीत असल्याने मूलबाळ होऊ न देणे हीच ती डिंक संस्कृती.
शिवाय काही स्त्रियांना असे वाटते की बाळंतपणामुळे आणि नवजात बाळाने स्तनपान केल्यामुळे आपले सौंदर्य बिघडते, म्हणून त्या गर्भपात करून मोकळ्या होतात. त्यावेळी त्यांना विसर पडतो की, ‘मुलांना जन्म देणे आणि शिक्षण देणे तसेच पती-पत्नीच्या कल्याणासाठी विवाह या कृपासंस्काराची स्थापना करण्यात आली आहे.’ (श्रद्धाग्रंथ कलम १६०१)
गर्भपात म्हणजे काय ?
वैद्यकीय शास्त्रानुसार ‘An Abortion is a process to end a pregnancy.’ OR ‘A medical operation that ends a pregnancy at any early stage.’ म्हणजेच मूल होण्याआधीच गर्भारपण संपुष्टात आणण्याची कृती म्हणजे गर्भपात.
गर्भपात करण्याचे प्रकार :
‘The Womb as a Tomb’ या नावाने Alert या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात गर्भपात करण्याचे पुढील प्रकार दिले आहेत.
१) Suction Aspiration : बाळाच्या शरीराचे गर्भाशयातच बारीक तुकडे करून एका शोषनलिकेतून ते तुकडे भांड्यात शोषून बाहेर काढले जातात. पहिल्या बारा आठवड्यात सर्वसाधारणपणे हीच पद्धती वापरली जाते.
२) Dilation and Curettage (D & C) : या पध्दतीत एका स्टीलच्या सुरीने बाळाचे तुकडे करुन गर्भवेष्टन खरवडून काढतात. असे गर्भाशय पूर्ण रिकामे करीपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो.
३) Dilation and Evacuation (D & E) : या प्रकारात स्टीलच्या सुरीऐवजी चिमटा वापरतात. जास्त दिवस झालेल्या बाळाची हाडे मजबूत झालेली असल्याने ती हाडे चिमट्याने पकडून अडकित्त्यात सुपारी फोडतात त्याप्रमाणे फोडून तोडून शरीराचे तुकडे बाहेर काढले जातात.
४) Salt Poisoning : या प्रकारात आटवून घट्ट केलेले मीठ गर्भाशयात भरतात. सुमारे दोन तासांनी त्या मीठामुळे तयार झालेल्या विषामुळे बाळ मृत्यूमुखी पडते. तशा मृतावस्थेत बाळाला जन्म दिला जातो.
५) Hysterotomy : या प्रकारात ऑपरेशन करून बाळाला आईच्या उदरातून उचलले जाते व त्याच्या मानेभोवती दोरी आवळली जाते. काही वेळातच बाळाची धडपड बंद होते. यामध्ये आणखी एक निघृण (अमेरिकन) प्रकार म्हणजे ‘पार्शियल बर्थ अबॉरशन’. या प्रकारात बाळाला चिमट्याने घट्ट पकडून बाहेर काढतात, गर्भाशयाबाहेर त्याचे डोके दिसताच मानेवरून त्याच्या डोक्यातील मेंदूला सुरी मारताच बाळ मान टाकते.
अशा या सर्व प्रकारच्या गर्भपातांना खून नाही म्हणायचे तर काय म्हणणार? वास्तविक पाहता गर्भसंभवाच्या पहिल्या क्षणापासूनच मानवी जीवनाला सुरुवात होते. तेव्हापासूनच त्या अर्भकाला जीवन जगण्याचा हक्क मिळतो. गर्भपात करताना हाच त्याचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जातो. गर्भाशयातील बालकाचा हा हक्क त्याच्या मातेलाही हिरावून घेता येत नाही. अगदी पहिल्या शतकापासून ख्रिस्तसभेने गर्भपात हे गंभीर स्वरुपाचे पाप मानलेले आहे. ख्रिस्तमंडळाची ती शिकवण आतापर्यंत बदललेली नाही आणि पुढे बदलणारही नाही. गर्भपात हे पापच ठरविलेले आहे (श्रद्धाग्रंथ कलम २२७० ते २२७३)
गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून जीवनाला खरी सुरुवात होते हे सत्य बर्याच शास्त्रज्ञांनी आणि जागतिक संघटनांनी मान्य केले आहे. मानवी हक्कांबाबत जिनेव्हा येथे भरलेली महासभा, जागतिक डॉक्टरांची महासभा तसेच युनायटेड नेशन्सच्या चार्टस ऑन चिल्ड्रन या सर्वांनी वरील सत्यावर शिक्कामोर्तब केले आहे. इतकेच नव्हे तर जगातल्या जवळजवळ सर्वच धर्मांनी वरील सत्य स्वीकारले असून गर्भपाताचा निषेध केला आहे.
ख्रिस्ती धर्मकायदा (Cannon Law) कलम १३९८ नुसार गर्भपात करणारी व्यक्ती धर्मबहिष्कृत होते असे पुढील शब्दांत स्पष्ट केलेले आहे. “A person who actually procures abortion incurs a latae sententiae excommunication. (Canon Law New 1398, Old 2350)
यासंबंधीचे प्रबोधन चर्चमधून तसेच चर्चप्रणित निरनिराळ्या प्रसार माध्यमातून वेळोवेळी व्हायला हवे. आज जगभर झाडे वाचवा, कुत्री वाचवा, साप वाचवा, अमुक प्राणी वाचवा, तमुक पक्षी वाचवा अशा चळवळी सुरू केल्या जातात पण ‘बालकं वाचवा’ अशी जीवन संरक्षण (Prolife movement) चळवळ चालविणारे फारच थोडे दिसतात व त्यांना इतरांचा प्रतिसादही फार अल्प प्रमाणात मिळतो हीच शोकान्तिका आहे.
या वर्षीच्या ख्रिस्तजयंतीच्या निमित्ताने आपण प्रार्थना करू या, “हे बाळ येशू, तुझ्या जन्माच्यावेळी हेरोद राजाने बेथलेहेममधील बालकांची कत्तल केली, आज जगभर गर्भपाताद्वारे दररोज असंख्य बालकांची कत्तल केली जात आहे. आम्ही या गंभीर पापापासून परावृत्त व्हावे म्हणून तू आम्हाला कृपा व समजूतदारपणा दे.”