एकच आस आणि ध्यास… वाचनसंस्कृती संवर्धंनाचा

  •  जॉन गोन्सालविस, उमराळे, वसई.

“Books are the windows through which the Soul looks out.”

आजही ज्ञानाचे प्रत्यक्ष आदानप्रदान मौखिक स्वरूपापासून डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहचलेले आहे. बदलत्या आधुनिक युगात बदलल्या आधुनिक जीवन शैलीमुळे सानापासून थोरापर्यंत, ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वांच्याच हातात पुस्तकाच्या जागी मोबाईलसारखे स्मार्टफोन आले आहेत. मात्र मोबाईलमुळे घटकाभराची करमणूक होईल परंतु पुस्तके हीच जीवनाला आकार देणारी शिदोरी आहे. जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत.

अम्बर्टो इको म्हणतात, “पुस्तकाचा शोध हा चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या ‘मूलभूत’ शोधांपैकी एक आहे. अशा शोधात पुढे बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले, तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते.” पुस्तकाचं स्वरूप बदलले काळानुसार.. कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ऑडियो-विडियो बुक, ईबुक, किंडल आले पण त्यातली “वाचन करणे’ ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा आहे तोवर पुस्तकाला मरण नाही. नील गायमन या लेखकाने म्हणूनच “A Book is a dream you hold in your hand” अशा तरल शब्दांत भावना व्यक्त केलेली आहे.

सुमारे दीडशे वर्षोंपूर्वी मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या ‘निबंधमाला’ मध्ये वाचन ही ६४ कलांपैकी एक कला आहे असे नमूद केले आहे. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी किमान काही परिश्रम घ्यावेच लागतात, स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागते, त्यासाठी वेळ द्यावा लागतो तसेच साधनेही उपलब्ध करून द्यावी लागतात. वाचनासाठी विचार करता पुस्तके उपलब्ध करून द्यावी लागतात. केवळ साधने उपलब्ध करून भागत नाही, तर त्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन द्यावे लागते, मार्गदर्शन करावे लागते. वाचन हा केवळ छंद नव्हे; तर तो एक संस्कार आहे. वाचन संस्कार, वाचन संस्कृती जोपासना व वाचन संस्कृती संवर्धनासाठी सरकारी पातळीवरून अनेक स्वयंसेवी संस्था, वाचनालये विविध उपक्रम राबवत असतात या संदर्भात काही व्यक्तींनी त्यासाठी आपल्या आयुष्याच्या समिधा केलेली अनेक उदाहरणे दिसून येतात. वाचन संस्कार पेरणी, वाचन संस्कृती जोपासना व वाचन संस्कृती संवर्धन हेच आपल्या जीवनाचे जीवितकर्तव्य मानणार्‍या काही प्रातिनिधिक व्यक्तींची उदाहरणे सांगता येतील.

सायकलवरील ग्रंथालय

सायकल या दुचाकीवर ग्रंथालय चालवणारे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सर्वोदयी कार्यकर्ते म्हणजे जीवन इंगळे. ग्रामीण भागात वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारी पुस्तकप्रेमी व्यक्ती. २००८ पासून त्यांनी सायकलवर फिरते ग्रंथालय सुरू केले. यामागची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेले योगदान व त्यांचे मार्गदर्शन हेच होते. प्रथम ते गावागावात अंगणवाडी, शाळेशाळेत गेले. सायकलवरील पुस्तके बघून लोकांचे कुतूहल जागृत झाले. लोक चौकशी करू लागले. त्यांनी नाममात्र एक रुपया सभासद शुल्क घेऊन लोकांना ग्रंथालयाचे सभासद करून घेतले. हळूहळू आसपासच्या गावागावांत माहिती पसरली. पुस्तके आपल्या सवडीने वाचायची. पुस्तक फाटले, हरवले तरीही चालेल पण पुस्तक वाचा या अटीवर पुस्तके गावागावांत पोहचली.

वाचनाची पेरणी

गेली दहा वर्षे रोज किमान दोन ते तीन तास व सुट्टीच्या दिवशी जेवळा वेळ मिळेल तेवढा वाचन चळवळीसाठी काम करणारे बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळेतील शिक्षक, श्री. लक्ष्मण जगताप व खडकी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या सौ. विदया जगताप ह्या पती-पत्नींचे कार्य नजरेआड करता येणार नाही. जवळजवळ सातशेपेक्षा जास्त शाळेत जाऊन बालगोपाळांवर वाचन संस्कृतींचा संस्कार रुजवत आहेत. वाचन संस्काराची पेरणी करीत आहेत.

प्रथम ज्या गावात, ज्या भागात हे दांपत्य जातात तिथे अगोदर मुले, मोठी माणसे यांच्या समोर जाऊन त्यांना जीवनात वाचन किनी महत्वाचे आहे, यावर भरभरून बोलतात. सोबत आणलेली पुस्तके लोकांना वाटतात. मग त्याच भागात दारोदारी पुस्तके मागतात. लोक छान प्रतिसाद देतात. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके कशी पोहचवायची यासाठी या दोघांनी ध्यास घेतलेला आहे. जमेल तेथे जाऊन पुस्तके वाटतात. शाळांमध्ये जाऊन व्याख्यान देतात. गावकट्ट्यावर बसलेल्या माणसांना पुस्तके वाटतात. वाचनाचे महत्व अधोरेखित करतात.

विनया चल ग्रंथालय

घरपोच आणि कोणत्याही ठिकाणी पुस्तके मिळावी यासाठी पुण्यातील महाळुंगे येथील विनया डोईफोडे यांनी अत्यंत अल्पदरात ‘विनया चल ग्रंथालय’ सुरू केले आहे. विनया डोईफोडे यांनी भारती विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केलेली असून एन.जी.ओ. मध्ये बारा वर्षे नोकरी केली. त्यानंतर काहीतरी वेगळे करावे या त्यांच्या मनातल्या ऊर्मीने उचल खाल्ली. त्यामुळे त्यांनी सात वर्षापूर्वी फिरल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून रिक्षाने घरपोच पुस्तके दयायला सुरुवात केली.

पुस्तकांसाठी माफक रक्कम आकारली जाते. पुस्तके महिन्याभरात परत करावी लागतात. वारानुसार ही पुस्तके वाचकांना विविध भागात उपलब्ध केली जातात. सोमवार औंध, मंगळवार बाणेर, बुधवार बालेवाडी, गुरुवार भूगाव आणि रविवारी सातारा रस्त्यावरील भारती वि‌द्यापीठ या विकाणी पुस्तके उपलब्ध केली जातात. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी घरात लहान मूल असेल, तर पाच पुस्तकांवर एक पुस्तक मुलांसाठी दिले जाते.

रिक्षात फिरते वाचनालय

         वाचकांपर्यंत नेण्यासाठी पुण्यातील एका रिक्षाचालकाने चक्क आपल्या रिक्षातच वाचनालय सुरू केले आहे. या रिक्षाचालकाचे नाव आहे प्रशांत कांबळे. कांबळे हे पिंपळे निलख येथील रहिवासी आहेत. गेल्या चार-पाच वर्षापासून ते रिक्षा चालवतात. प्रशांत कांबळे हे मूळचे नाट्यकलाकार आहेत. विविध प्रायोगिक नाटकांत त्यांनी काम केले आहे. मात्र कोरोना काळात नाट्य व्यवसायाला खीळ बसली. नाईलाजाने उपजीविकेसाठी त्यांना रिक्षा व्यवसायाकडे वळावे लागले. संकटातून त्यांना संधी मिळाली.  त्या संधीचे त्यांनी सोने केले.

कोरोना काळात रिक्षाद्वारे घरपोच भाजी पोचवण्याचा व्यवसाय ते करत होते. फावल्या वेळात रिक्षात बसून ते पुस्तक वाचत असत. त्याचवेळी ही पुस्तके रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांनाही वाचायला नक्कीच आवडतील, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी रिक्षातच त्यांनी एक छोटेसे लाकडी कपाट तयार केले. एकावेळी या कपाटात चाळीस ते पन्नास पुस्तके ते ठेवतात. या रिक्षात स्वामी विवेकानंद यांचे ज्ञानयोग’, क्रिकेटवीर सुनील गावसकर यांचे ‘आयडॉल्स’, आचार्य अत्रे यांचे ‘अत्रेटोला’, शिवराज गोर्ले यांचे ‘नग आणि नमुने’, बाबा आमटे यांचे ‘ज्वाला आणि फुले’ आदि पुस्तके यात पाहायला मिळतात. रिक्षामध्ये त्यांनी मराठी भाषेतली पुस्तकेच ठेवलेली आहेत. कारण आजच्या तरुणाईच्या बोलण्यातून मराठी भाषा अस्तंगत होत आहे, असे दिसून येते. त्यामुळे तरुणांना वाचनाची गोडी लावण्यासह मराठी भाषेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, हा त्यांचा प्रांजळ उद्‌देश आहे.

रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी हवे ते पुस्तक निवडावे आणि वाचावे, अशी ही कल्पना आहे. प्रवाशांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुस्तकांच्या सोबतीने त्यांनी रिक्षातील आपला प्रवास अधिक सुखदायी आणि ज्ञानवर्धक केला.

ग्रंथविश्व

सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा येशील व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले श्री. राकेश औदुंबर गायकवाड ह्या वाचनवेडया अवलियाने आपले घरचं ;ग्रंथविश्व’ बनवून गेली २१ वर्षे वाचन चळवळ निरंतर सुरू ठेवली आहे. राकेश गायकवाड यांच्या भगिनी सविता व भाऊजी प्रा. संजय सातपुते यांचे २००० मध्ये अपघाती निधन झाले. वाचनावर नितांतपणे प्रेम असणाऱ्या बहीण व भाऊजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गायकवाड सरांनी २००२ या वर्षी ‘ग्रंथविश्व’ या वाचनयज्ञास सुरुवात केली.

राकेश गायकवाड यांनी कल्पकतेने बनविलेली ‘ग्रंथविश्व’ ही इमारत पाहताक्षणी वाचकांचे लक्ष वेधून घेते. इमारतीच्या बिम, पिलरची यांची पुस्तकाप्रमाणे रचना, त्यावर विविध पुस्तकांची नावे, वाचन संस्कृतीची ओळख करून देणारे प्रवेशद्वार खास तयार करून घेतलेले आहे, या ‘ग्रंथविश्वा’मध्ये सोळा हजार पुस्तके, पन्नासहून अधिक मासिके व साप्ताहिके दररोज नियमित येणारे सोळा वृत्तपत्रे व बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन याव्यतिरिक्त परदेशी व भारतीय नाणी, पोस्टाची तिकिटे यांचा संग्रह वाखाणण्याजोगा आहे.

याशिवाय शाळकरी मुले वाचनाकडे वळावीत यासाठी दत्तक शाळा योजना, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा, वर्षभर विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम याठिकाणी राबविले जातात. वाचनप्रेमी गायकवाड सर हे आपल्या ‘स्वर्गीय संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय’ माध्यमातून वाचन संस्कृती जपण्याचे महान कार्य करीत आहेत.

ग्रंथसखा

महाराष्ट्र राज्य शासनाचा दोन लाख रूपयांचा ‘ग्रंथसखा’ पुरस्कार मिळालेले बदलापूरचे ग्रंथप्रेमी श्री. श्याम जोशी सरांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कल्याणच्या छत्रपती शिवाजी मंडळाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. त्यांचा वडिलांच्या निधनानंतर जोशी सरांना वडिलांकडून दहा हजार पुस्तके मिळाली. त्याच पुस्तकांतून त्यांनी बदलापूरात ‘ग्रंथसखा’ लायब्ररीची सुरुवात केली. वाचन आणि वाचनालयाची संस्कृती जपण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले आहे. यासाठी त्यांनी स्वत:चा प्रोव्हिडेंट फंडही वापरला इतकंच काय, बदलापूरातील स्वत:चा बंगलाही विकला. हे करताना राज्यभरातील अनेक लेखकांनीही त्यांना पुस्तकरूपी भेट देत त्यांच्या मोहिमेला हातभार लावला. बदलापुरातील ग्रंथसखा वाचनालयाचा सांभाळ करताना त्यांनी बदलापुरात स्वायत्त मराठी विद्यापीठ स्थापन केले असून त्यातून मराठी भाषा इतिहास व संस्कृती संशोधनाचे एक व्यासपीठ उभारले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेखक जोडले. बदलापुरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या यशस्वी भवनातील वाचनालयात त्यांनी तब्बल एक लाख पुस्तके दिली आहेत. याशिवाय श्याम जोशी यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टचे वाचनालय उभारण्यासाठी, अंबरनाथ नगरपालीकेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या लायब्ररीसाठी यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.

खाकी वर्दीची धडपड

मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात कार्यरत असलेले महेश गुरव मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या दादपूर गावचे. पदवीधर असलेले गुरव २०१०च्या स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दाखल झाले. सुरुवातीची तीन वर्षे गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये सेवा बजावल्यानंतर २०१४ मध्ये त्यांची मुंबईत नेमणूक करण्यात आली. त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासून वाचनाची आवड होती. पोलिस दलाने दाखल झाल्यानंतर त्यांनी ही आवड स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांमध्येही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. मंत्रालय सुरक्षा विभागात नेमणुकीला असलेला त्यांच्या पत्नी प्रमिला यांनादेखील वाचनाची आवड आहे. दोघांनी चारशेपेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आपल्या घरातील छोटेखानी पुस्तक पेढीत तयार केला आहे.

२०१९मध्ये त्यांच्या आईचे कॅन्सरच्या रोगाने निधन झाले तेव्हापासून आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ्य  ज्या ठिकाणी संधि मिळते त्या ठिकाणी ते अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप करतात, गावपातळीवरील धार्मिक कार्यक्रम असो वा कार्यक्रम व मित्र परिवाराचे वाढदिवस असोत, प्रत्येक ठिकाणी पारंपारिक स्वरूपात वस्तू रूपात, पैशा रूपात आहेर देण्याऐवजी ते पुस्तकच भेट देतात. तीन वर्षापूर्वी गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांना गुरव दांपत्त्यांनी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करुन दिलेली आहेत. तर गेल्या वर्षी त्यांच्या मूळ दादपुर गावी आपल्या घराची वास्तूशांती होती, त्याप्रसंगी आलेल्या आपल्या मित्र परिवार व आप्तेष्टे यांना त्यांनी शंभर पुस्तके पुस्तके भेट म्हणून दिली. वाचन संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी वर्दीतील अधिकारी दांपत्य करत असलेल्या धडपडीला एक कडक सॅल्युट ठोकावासा वाटतो.

ग्रंथदान चळवळ

शहरे, निमशहरे, तालुक्याची ठिकाणे या स्थानी बहुधा वाचनालये असतात परंतु अति दुर्गम भागातल्या गावांमध्ये इच्छा असूनही लोक पुस्तके आणि वाचनाच्या आनंदापासून वंचित राहतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे, वारजे माळवाडी येथील ‘सद्गुरू सेवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या कल्पनेतून ‘गाव तिथे वाचनालय’ आणि ‘शाळा तिथे ग्रंथालय’ हा उपक्रम सुरु केलेला आहे. ग्रंथप्रेमी, अभ्यासक, संशोधक यांच्याकडून वाचून झालेली पुस्तके दानरूपाने गोळा करायची आणि ती अशा दुर्गम भागात लोकांना वाचण्यासाठी मोफत द्यायची असा हा उपक्रम आहे. आज त्यांनी पुणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना जिल्ह्यात  ग्रंथालये सुरु केली आहेत.

सचिन म्हसे हे मूळचे पुण्याचे असून, त्यांनी पुणे विद्यापीठावून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून ‘सद्गुरु सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था सूरू केली. जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन व मृत्यूदिन म्हणजे २३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिना’चे औचित्य साधून त्यांनी ग्रामीण भागातील विना अनुदानित व अल्प ग्रंथसंख्या असलेल्या सार्वजनिक वाचनालयांना पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. वाचन चळवळ ग्रामीण भागातही पोहचावी हा यामागील हेतू आहे.

पुण्यासह अनेक शहरांमध्ये त्यांनी यासाठी पुस्तकप्रेमींना साकडं घातलं. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. पुण्यात अवघ्या १३ दिवसांत २०० पुणेकरांनी तब्बल आठ हजार पुस्तके दान केली. त्यापैकी पाच हजार ग्रंथ वेगवेगळ्या दुर्गम भागातल्या वाचनालयांना भेट देण्यात आले. ज्यांनी आयुष्यात कधीच पुस्तके हातात घेतली नव्हती असे लोक आता वाचक होत आहेत. आजपर्यंत या उपक्रमाअंतर्गत वाचनालय आणि शालेय ग्रंथालय मिळून ४६८ ठिकाणी हे ग्रंथदान केलेले आहे. पुस्तकदानाचा हा महायज्ञ येत्या काळात महाराष्ट्रातील अधिकाधिक गावांत-खेड्यांत पोचवण्याचा ‘सद्गुरू सेवा प्रतिष्ठान’ चा मानस आहे.