एक प्रथितयश उद्योजक – जॉन गोन्सालविस

एक प्रथितयश उद्योजक

  •  जॉन गोन्सालविस, उमराळे
             मो. – ९९६०६५९२८५

          तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. आपल्या वयाच्या पंचवीस-सव्वीसाव्या वर्षी सरकारी नोकरी सोडून गोबरगॅस प्रकल्पाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा म्हणून तो हरहुन्नरी युवक या बाबतीत मत आजमावण्यासाठी आपल्या आजोळच्या आजोबां-कडे म्हणजे आपल्या आईच्या वडिलांकडे गेला. तेव्हा आजोबांनी आपल्या नातवाला समजावण्याचा सुरात सांगितले, “अरे, या गोबरगॅसमध्ये तुला काय मिळणार? सुखासुखीची सरकारी नोकरी सोडू नकोस. पुढेमागे तू गॅझेटेड ऑफिसर होशील !” आजोबांचे ते नित्यपठडीतले विचार ऐकून आपल्या मनातील विचारांना जो मुरड घालेल तो युवक कुठला ! तोच धागा पकडून तो युवक आपल्या वडिलांकडे गेला. त्याचे वडील व्यापारी प्रवृत्तीचे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व होते. ते त्या युवकाला म्हणाले, “बिनधास्तपणे तू नोकरी सोड. धंदा कर. तुझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्याकडे रात्याचे भात आहे. वालाच्या शेंगांची भाजी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी तुझे पोट भरू शकेन.”

          नोकरी करत-करत आपली बीएससी पदवी संपादन केलेला तो युवक एकटाच सटरफटर नव्हता. त्यावेळी त्या युवकाचे लग्नही  झाले होते. मुंबईतल्या खादी ग्रामो-द्योग केंद्रीय संस्थेतील बायोगॅस संशोधन केंद्रामध्ये ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ पदावर तो युवक कार्यरत होता. त्या युवकाने आपल्या वडिलांनी दिलेला वरील सल्ला प्रमाणभूत मानून सुरक्षित कवचातली केंद्र सरकारच्या सहा वर्षांच्या नोकरीला रामराम ठोकला. आणि गोबरगॅस-हरित ऊर्जेमध्ये भवितव्य घडविण्याचा चाकोरी-बाह्य मार्ग निवडला.

          अगम्य उत्साह असलेला, मोठी दूरदृष्टी असलेला, दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला, संशोधन मनोवृत्ती धारण केलेला, लाथ मारीन तेथून आपल्या कल्पकतेने पाणी काढणारा हा युवक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेला वसईच्या नंदाखालच्या नंदनवनातील वटार-जेलाडी गावातील प्रथितयश उद्योजक म्हणजे श्री. बावतीस‌ ब्रिटो ऊर्फ बी. जे.!

          श्री. बाववीस ब्रिटो यांचा जन्म‌ ३० ऑक्टोबर १९४९ रोजी झाला. वडिलांचे नाव‌ जॉन चिमा दिब्रिटो आणि आईचे नाव उमा. त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहेत. त्याकाळातील एकत्र‌ कुटुंबाच्या रीतिरिवाजानुसार चाळीस-पन्नास जनांच्या गोतावळ्यात ते लहानाचे मोठे झाले. काबाडकष्ट‌ करणार्‍या शेतकरी कुटुंबात जन्म. बावतीस यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ जोसेफ हायस्कूल, नंदाखाल येथे झाले. एप्रिल १९६७ च्या एसएससी परीक्षेत संपूर्ण शाळेतून‌ ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शाळेच्या बोर्डावर त्यांचे नाव झळकले. उपजत हुशार व्यक्तिमत्त्व. शाळेत असल्यापासून मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. इयत्ता आठवी ते इयत्ता अकरावी पर्यंत मराठी विषयात शाळेतील गुणांचा उच्चांक त्यांनी कधीही सोडला नाही. त्याकाळी त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याची आत्मकथा’ हा निबंध मराठी विषय शिकविणार्‍या अभ्यंकर सरांना इतका आवडला की त्यांनी तो निबंध मुंबई येथील‌ मालाडच्या उत्कर्ष मंदिर या नामवंत मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचून दाखवला होता.

          एसएससी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगले होते. मात्र इंटर सायन्समध्ये प्रथम श्रेणी मिळवता न आल्यामुळे त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग पावले. शिक्षण आणि नोकरी दोन्ही एकत्र करून त्यांनी हळूहळू प्रगती केली. १मे १९७९ रोजी स्वतःचा बायोगॅस प्रकल्पाचा कारखाना सुरू केला. खादी ग्रामोद्योग संस्थेचा अनुभव, अभ्यासू वृत्ती, विषयातील प्रावीण्य, भगिरथ श्रम करण्याची प्रवृत्ती आणि संशोधनात्मक मनोवृत्ती त्यामुळे आपल्या विषयात त्यांनी नैपुण्य मिळविले. वसई, पालघर, वाडा, भिवंडी, शहापूर, अलिबाग, कोकण, धुळे या ठिकाणी जोरदार दौरे‌ काढून वातावरण निर्मिती केली. लोकांचा विश्वास संपादन‌ करून हजारो गोबर-गॅस सयंत्रे उभी केली. आर्थिक सुबत्ता आल्यावर १९८१ मध्ये आपला कारखाना सत्पाळा येथील प्रशस्त जागेमध्ये हलवला.

          हरित ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभे करीत असताना त्यांचे अध्ययन-संशोधन आणि नवनिर्मितीचे कार्य अखंडित सुरू होते. त्यातच त्यांनी केलेल्या एका प्रकल्प उभारणीत एका तथाकथित शास्त्रज्ञाने ब्रिटो यांचे तंत्रज्ञान स्वतःच्या नावावर प्रकाशित केले. तरी ते नाउमेद झाले नाहीत.  ‘की तरु कापिता फुटे आणिक भराने.’ या वृत्तीने त्यांनी आपले अध्ययन आणि संशोधन कार्य अधिक जोमाने सुरू केले. परंपरागत बायोगॅस सयंत्राच्या उभारणीसाठी बहुमूल्य वेळ जात असे. प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी सुमारे आठ-दहा दिवसांचा कालावधी जायचा. एकूण दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. यावर मात करण्यासाठी त्यांनी फायबर ग्लास ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अनेक आराखडे तयार केले. रात्रंदिवस अनेक‌ प्रयोग करून एका आराखड्याची निवड केली व त्यानुसार डिझायनिंग करून‌ बायोगॅस प्लांटची बांधणी पूर्ण केली. त्यातूनच त्यांनी ‘नॅनो बायोगॅस’ प्लांटची निर्मिती केली. एका दिवसात या प्लांटची उभारणी होते. अशा प्रकारचे पाचशे-सहाशे प्लांट त्यांनी कार्यान्वित केले आहेत.

          श्री. ब्रिटो यांनी बायोगॅस प्लांटच्या क्षेत्रात क्रांती केली. १९८१ साली वसई-धानीव गावात भारतातील पहिल्या सामुदायिक बायोगॅस प्रकल्प उभारला त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री. ब्रिटो एनर्जी कंपनीद्वारे बायोगॅस व सौरऊर्जा संबंधी उपकरणे आणि साधने तयार करून खेड्यापाड्यांत बायोगॅसची व्याप्ती वाढविली. १९८३-८४ मध्ये त्यांच्या कार्यशाळेमध्ये कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणजे टांझानिया, मलेशिया, झिम्बाब्वे आणि मॉरेशियस या देशांतील उमेदवारांना बायोगॅस मधील प्रशिक्षण देण्यात आले. आजपर्यंत त्यांनी अनेक‌ प्रकल्प उभारले आहेत. उदा. जलपर्णीवर आधारित बायोगॅस प्रकल्प मुंबई आयआयटी येथे उभारला. विखे पाटील साखर कारखाना, अहमदनगर येथे प्रेसमढ म्हणजे ऊसाची प्रथम गाळणी केल्यानंतर राहिलेल्या गाळ्यावर आधारित मोठा प्रकल्प उभारला. सांगली येथील चितळे डेअरी येथे वीजनिर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प याचाही उल्लेख करावा लागेल.

          बायोगॅस मधील त्यांची घोडदौड सुरू असताना त्यांनी १९९०पासून सौरऊर्जा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. प्रचंड अध्ययन-संशोधन करून, वैज्ञानिक दृष्टी वापरून स्वतःचे ‘ब्रिटो मॉडेल’ विकसित केले. हे मॉडेल लार्सन अॅण्ड टुब्रो (चेंबूर), क्रॉम्पटन ग्रिव्हज, जेएनपीटी, बी.के. बिर्ला, गोदरेज फूड, सन अॅण्ड सॅण्ड, भाभा अणुसंशोधन केंद्र, चेंबूर आदी मान्यवर संस्थेंनी स्वीकारून सौरऊर्जा प्रकल्प राबविले. ठाणे महानगरपालिकेच्या प्रकल्पासाठी परदेशी तंत्रज्ञान वापरले असते, तर दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च आला असता, परंतु ब्रिटो यांनी सुमारे पन्नास लाख रुपयांत या प्रकल्पाचे काम‌ पूर्ण केले आहे. याशिवाय अमेरिकेतही डुकराच्या विष्ठेपासून उभारलेल्या एका बायोगॅस प्रकल्पासाठी त्यांनी सल्ला दिला आहे. तेथेही त्यांनी दोन-तीन वेळा भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे. देशांतील नव्हे; तर परदेशांतील प्रतिनिधिंनी त्यांच्या कार्यशाळेला आणि बायोगॅस प्रकल्पांना भेटी दिलेल्या आहेत. अनेक मोठमोठे मान्यवर अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर त्यांच्या संपर्कात आले. अनेक सेमिनारमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. ते स्वतः डॉक्टर झाले नाहीत; पण अनेक डॉक्टरेट लोक त्यांच्या सान्निध्यात आले. मुंबईतील आयआयटी मधील एका विद्यार्थ्याने जलपर्णी आधारित बायोगॅस प्रकल्प ह्या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली आहे, त्यांचे ब्रिटो मार्गदर्शक होते. बायोगॅस, सौरऊर्जा यात पर्यावरणपूरक केलेल्या महान‌ कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारने ‘उद्योगरत्न’ आणि ‘नॅशनल अवॉर्ड’ दिलेला आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचा ‘डहाणूकर अवॉर्ड’ आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महाऊर्जा अवॉर्ड’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

          संत तुकाराम महाराज म्हणतात, ’जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारे वेच करी!!’ या उक्तीनुसार श्री. ब्रिटो यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. अनेक सेवाभावी संस्था आणि व्यक्ती यांना मदतीचा हात दिलेला आहे. आकाशात उंच भरारी घेऊनही त्यांचे पाय सदैव जमिनीवरच आहेत हेच त्यांचे वैशिष्ट आहे. सप्ताळा-राजोडी येथील ज्ञानदीप मंडळ संचालित  सेंट जोसेफ कनिष्ठ महाविद्यालयाचे  चेअरमन म्हणून चार वर्षे धुरा वाहिलेली आहे. त्या समयी त्यांनी कॉलेजच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वंकष विविध नवोन्मेष सर्जनशील उपक्रम राबवून कॉलेजची प्रगती केली. महाविद्यालयास नवीन दिशा देण्याचे भरीव कार्य त्यांनी केले. त्यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत विद्यार्थी संख्या १८४६ इतकी झाली होती. आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. त्यांच्या  चेअरमन काळात कॉलेज आर्थिक बचतीचा उच्चांक (सरप्लस ३३.५० टक्के) गाठला गेला. संत मदर तेरेसा ह्यांची नंदाखाल येथे ६ एप्रिल १९८६ रोजी भेटीच्या वेळी मदर यांना पुष्पहार घालण्याची संधी ब्रिटो यांना मिळाली होती. हा आपल्या जीवनातील अमृतानुभव म्हणून ते नमूद करतात.
          श्री. ब्रिटो हे उत्तम लेखकही आहेत. आपल्या बायोगॅस आणि सौरऊर्जा या क्षेत्रांतील अनुभवांचा धांडोळा त्यांनी आपल्या “nano britto biogas” या इंग्रजी पुस्तकात घेतलेला आहे. आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांनी आत्मपर असे ‘माझी जीवन गाथा : काही काजवे – काही काजळी’ पुस्तक लिहिले‌ आहे. या मराठी पुस्तकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर २०२४ रोजी फा. रेमंड रुमाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

          आपल्या उद्योगव्यवसायाची घडी सुव्यवस्थित बसविल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुले ऑस्कर आणि डॉलिव्हर यांना व्यवसायात सामावून घेतले. इतकेच नव्हे; वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊन आता दोन्ही चिरंजीव वडिलांचा व्यवसाय समर्थपणे प्रगतीपथावर नेत आहेत. या सर्वांच्या मागे त्यांची पत्नी सौ. कोशाव ब्रिटो सावली सारख्या सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. कोरोना काळानंतर  ब्रिटो यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही त्यावर त्यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर मात करून फिनिक्स‌ पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभे राहिले आहेत.

          श्री. ब्रिटो हे यशस्वी उद्योजक जरी असले तरी ते एक कर्तव्यदक्ष पती, कुटुंबवत्सल पिता, लडिवाळ आजोबा, जिंदा दिल दोस्त आणि सामाजिक बांधिलकी इमानेइतबारे जपणारे एक समाजधुरीण!त्यांचा जा जीवनपट आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभासारखा दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे.