एक अनोखी भेट
- सुनिता बर्नड परेरा, गास
वैशाखाची काहिली संपून निसर्ग राजाने शीतल अश्या ज्येष्ठ महिन्यात आगमन केले होते. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या कडेने घोंगावत होते. मधूनच जलाधारांचा अभिषेक होत होता. वातावरणात काहीसा गारठा साठून राहिला होता. नुकताच बारावीचा निकाल लागला होता. मुग्धा दीक्षित संपूर्ण राज्यातून विज्ञान शाखेत ९५% गुण मिळवून प्रथम आली होती. तिने पुढे कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले होते. पुण्यातील एका उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला होता. आज तिचा कॉलेजमधील पहिला दिवस होता. वर्षा ऋतूचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र शीतल आणि मंत्रमुग्ध वातावरण होते. पुण्यातील रस्ते न्हाऊन निघाले होते. पर्वत राजीने अंगाखांद्यावर हिरवाई परिधान केली होती. मेघ राजे जणू वसुंधरेला भेटण्यासाठी आतुर झाले होते. अश्या ह्या धुंद वातावरणात मुग्धा छान तयार होऊन कॉलेजला पोहचली.
नवीनच असल्यामुळे कोणाशीच तिची ओळख नव्हती. ती वर्गात जाऊन बसली, काही वेळातच वर्गात सर्व विद्यार्थी हजर झाले. प्रोफेसर वर्गात आले, ओळख परेड झाली आणि प्रत्यक्ष अध्यापनास प्रारंभ झाला. तिच्या बाजूला नेहा मूर्ती बसली होती. नेहाची आणि तिची ओळख झाली आणि मैत्रीचे ऋणानुबंध जुळले. त्या दिवसापासून नेहा आणि मुग्धा अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. दोघीही अभ्यासात खूप हुशार, स्मार्ट आणि ॲक्टिव होत्या, अर्थातच हॉस्टेलमध्ये पण एकत्र रूममेट म्हणून त्या राहू लागल्या.
मुग्धा खरं तर कोकणस्थ ब्राह्मण, रत्नागिरी जिल्ह्यात तिचे गाव होते. तिचे वडील उच्चशिक्षित होते. ते सरकारी कार्यालयात उच्चपदावर कार्यरत होते. तर आई गृहिणी होती. गावात दीक्षित परिवाराला आदर होता. मुग्धाचे आजोबा, पणजोबा, वडील संपूर्ण खानदान भिडस्त ब्राह्मण होते. पंचक्रोशीत त्यांना पूजेचा मान होता. अर्थातच जाती धर्माच्या बंधनात हे कुटुंब अडकले होते. मुग्धाला देखील ह्याच संस्कारात त्यांनी वाढवले होते. अजूनही ह्या कुटुंबावर जातीचा पगडा होता. बाहेरून आल्यावर आंघोळ करणे, सोवळेओवळे मानणे, खालच्या जातीच्या लोकांना जवळ न करणे, ह्या गोष्टी अजूनही ते मानत होते. अशा ह्या कर्मठ परिवारातील मुग्धा दीक्षित पुण्यातील कॉलेजमध्ये रमली होती.
गोरीपान, देखणी, निळसर डोळे, लांबसडक केस, गालावर पडणाऱ्या टपोऱ्या खळ्या, पातळ ओठ, हसमुख चेहरा आणि सर्वगुणसंपन्न अशी मुग्धा वर्गात सर्वांची आवडती होती. मुग्धाला लहानपणापासून गाण्याचे भयंकर वेड होते. सिनेमातील रोमँटिक गाण्यापासून ते भावगीत, लोकगीत ह्यात ती अगदी माहीर होती. स्वरबद्ध गळ्याची देणगी लाभल्यामुळे तिच्या सानिध्यात तिचे सर्व वर्गमित्र अगदी हरपून जात असत. त्या दिवशी कॉलेजमध्ये गीतगायन स्पर्धा होती. तिने त्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या दिवशी तिने सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. केसांची लांबसडक वेणी घालून त्यावर सुगंधी मोगऱ्याचा गजरा माळला होता. हलकासा मेकअप केला होता, त्यामुळे तिचे रूप अधिकच उठून दिसत होते. तिने ‘सूर तेच छेडिता…’ हे रोमँटिक गाणे गायले आणि तिच्या त्या मधुर आवाजाने परीक्षक व प्रेक्षक सर्वच मंत्र मुग्ध झाले. अर्थातच प्रथम क्रमांक तिनेच पटकावला. पण तिच्या त्या रुपावर आणि गाण्यावर एक जण मात्र अक्षरशः पागल झाला होता… विजय कांबळे… तो त्याच कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला होता. अतिशय हुशार, देखणा, काहीसा सावळा रंग, उंच आणि पिळदार शरीरयष्टी लाभलेला विजय अतिशय हुशार आणि सर्वात मिळूनमिसळून राहणारा होता. मुग्धाचे गाणे ऐकून तो तिच्या प्रेमात पडला होता.
गायन स्पर्धा संपून एक आठवडा लोटला होता. मुग्धा लायब्ररीमधून हॉस्टेलकडे जात होती, इतक्यात विजय समोरून आला. मुग्धाची ओढणी अडकली, तिचा तोल गेला, त्याच क्षणी विजयने तिला आपल्या बाहुपाशात सावरले, नजरानजर झाली आणि ‘दो दिल मिल गये’!!! तिच्या निळसर डोळ्यात विजय कायमचा जायबंदी झाला तर त्याच्या राकट स्पर्शाने तीही घायाळ झाली. झाले… प्रेमाचे बीज रोवले गेले, त्या बीजाला हळूहळू अंकुर फुटू लागले. नजरेचा खेळ सुरू झाला, मग शब्दाची झालर लागली, प्रेमपत्र सुरू झाले आणि शब्दातून भावना व्यक्त होऊ लागल्या. भेटीची एक अनामिक हुरहुर, आस लागली. दोघेही एकांतात भेटू लागले. कधी बागेत, कधी पर्वतीवर, कधी सदाशिव पेठेत तर कधी तुळशीबागेत. त्यांचे प्रेम फुलू लागले.
विजय मूळचा नगरचा! तो देखील खूप हुशार होता, बारावीला पहिला क्रमांक मिळवून त्यानेसुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले होते. दोघांचेही सूर जुळले होते. एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यांच्या प्रेमाची एकमेव साक्षीदार होती ती म्हणजे नेहा… मुग्धाची जीवाभावाची मैत्रीण ! नेहा त्या दोघांनाही भेटण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत असे. भेटीची जागा, वेळ ह्याची माहिती देत असे. जणू ती दोघांची पोस्टमन होती. मुग्धा आणि विजय ह्यांचे प्रेम फुलत होते. दोघांनाही जगाचे भान नव्हते. ते प्रेमात आकंठ बुडालेले होते.
प्रेमाचा सुगंध दूरवर पसरला होता. कॉलेजमध्ये सर्वांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. कॉलेजने इंडस्ट्रिअल विजिट आयोजित केली होती. शिमला येथे दहा दिवसाची कॅम्प होती. मुग्धा आणि विजय त्यांचा ग्रुप शिमला येथे कॅम्प साठी आले होते. डिसेंबर महिन्याची बोचरी थंडी, शिमल्याच्या डोंगर माथ्यावर बर्फाचे आवरण आणि गार वाऱ्यासोबत प्रेमाची गुजगोष्टी करणाऱ्या पक्ष्याची किलबिलाट.. ह्या मंदधुंद वातावरणात त्यांची प्रेमाची कळी फुलत होती. विजयचा राकट स्पर्धा मुग्धाला भुरळ घालत होता. तर तिच्या गालावरील खळीत विजय हरवला होता. त्या रात्री पूनवेचे पांढरे शुभ्र चांदणे पडले होते. जेवणे आटोपून सर्वजण आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र विजय आणि मुग्धा टेरेसवर चांदणे न्याहाळत एकमेकांच्या बाहुपाशात होते. विजय तिच्या लांबसडक केसातून आपली बोटे फिरवत होता. मधूनच तिच्या गालावर चुंबनाचा वर्षाव करत होता. चंद्राचा शीतल प्रकाश तिच्या गोऱ्यापान देहावर पडला होता. तिचा गोरा रंग अधिकच उजळून निघाला होता. तर त्याची पिळदार शरीरयष्टी मन मोहून टाकत होती. प्रणय चाळे सुरु असतानाच दोघेही एकमेकांच्या मिठीत साखरेसारखे विरघळले. वस्त्रांचे बंधन झुगारून दिले आणि ’दो जिस्म मगर एक जान‘ ह्या उक्तीप्रमाणे एकदेह झाले. आकाशातून चंद्र मंदस्मित करत होता, तर तारका आनंदाने नाचत होत्या. बर्फातून येणारा गार वारा प्रणय गीत म्हणत होता. आणि विजय मुग्धा प्रेमात बेभान झाले होते. ती मिलनाची रात्र त्यांच्या साठी अत्तराची कुपी होती. त्या रात्रीतील सर्व आठवणी त्यांनी मनाच्या कप्प्यात साठवून ते आपापल्या घरी परतले.
पण नियतीने वेगळाच डाव मांडला होता. मुग्धा विजय ह्यांच्या प्रेमवेलीला अंकुर फुटला होता. विजयने मुग्धाला एक अनोखी भेट दिली होती. मुग्धा प्रेग्नंट होती. विजयच्या बाळाची ती आई होणार होती. तिला ह्या गोष्टीची कुणकुण लागली आणि ती अंतर्बाह्य हादरली. तिने विजयच्या कानावर ही गोष्ट घातली, विजयने तिला आधार दिला आणि आपण लग्न करू असा सल्ला दिला. पण… मुग्धाच्या घरी ही गोष्ट कळली आणि तिच्या कर्मठ परिवाराने तिला सक्त विरोध केला. विजय परजातीचा, आपल्या पेक्षा हलक्या जातीचा, त्यामुळे तिची कानउघडणी केली गेली. माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी आखलेल्या जातीच्या चौकटीत त्यांचे प्रेमसंबंध अडकले आणि प्रेमाला कायमचा पूर्णविराम लागला. मुगधाच्या वडिलांनी तिच्या उदरात वाढणाऱ्या विजयच्या अंशाला कायमचे नष्ट करायचे ठरवले, पण वेळ निघून गेली होती. त्यामुळे बाळ जन्मता क्षणी त्याचा नायनाट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुग्धाचे कॉलेज सुटले. ती घरात बंदिस्त झाली. विजयने तिच्या वडिलांकडे खूप विनवण्या केल्या, पण त्याला भेटू दिले नाही. विजयची परीक्षा संपली, त्याने घवघवीत यश संपादन केले. येथे मुग्धाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. निळसर डोळ्याचे ते गोंडस बाळ अगदी निष्पाप पणे पाळण्यात पहुडले होते. तिच्या वडिलांनी त्या बाळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला बाहेर नेले, मुग्धाने हंबरडा फोडला,पण तिच्या वडिलांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. वॉर्डबॉयकडे पैसे देऊन त्या बाळाला त्याच्याकडे सुपूर्त केले आणि कायमची कटकट मिटवली.
ह्या घटनेला २२ वर्ष लोटली होती. मुग्धाने बी.एड. करून एका शाळेत ती शिक्षिकेची नोकरी करत होती. भूतकाळ विस्मृतीत गेला होता. तिने आयुष्यभर लग्न न करण्याचा निश्चय केला होता. अगदी शांतपणे ती पुण्यातील एका शाळेत नोकरी करत होती. एका छोट्याश्या घरात एकटीच राहत होती. अगदी शांतपणे आयुष्य कंठत होती. विजय तिचा भूतकाळ झाला होता… आणि अचानक तिच्या फेसबुकवर विजय कांबळे ह्याची फ्रेंडशिप रिक्वेस्ट दिसली, ती काहीशी हादरली. तिने अनेक वेळा त्याची प्रोफाइल चेक केली. तिची खात्री झाली, हा तोच आहे, माझा भूतकाळ…
नेहमीप्रमाणे ती शाळेतून परतली होती, सर्व आवरून ती वॉकिंगसाठी बाहेर पडत असताना बेल वाजली, तिने दार उघडले, समोर विजय… त्याला बघताक्षणी तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. विजयने तिला सावरले आणि दोघेही घरात गेले. काही क्षण शांततेत गेले. संवादाशिवाय असणारी मुक भाषा त्यांची सखी झाली. मग औपचारिक गप्पा झाल्या. तिला भूतकाळ आठवला, बाळाच्या आठवणीने ती अगदी व्याकूळ झाली. तिने विजयची क्षमा मागितली, बाळाला वाचवू न शकल्याची अपराधीपणाची घोर भावना तिच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होती. क्षणात विजय जवळ आला, तिला मिठीत घेतले आणि आपले बाळ, आपल्या प्रेमाची खूण जिवंत असल्याचे सांगितले, क्षणभर ती वेड्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिली, त्याने संचितला बोलावले, त्या २२ वर्षाच्या तरुणाकडे मुग्धा भान हरपून पाहतच राहिली. तेच राजबिंड रूप, निळसर डोळे, गोरापान रंग, ६ फूट उंची… तिने संचितला घट्ट मिठी मारली. प्रश्नार्थक नजरेने तिने विजयकडे पाहिले, तेव्हा विजयने सांगितले की, वॉर्डबॉयकडून त्याने संचितला घेऊन कायमस्वरुपी अमेरीकेत स्थायिक होण्याचे ठरवले. तिथे चांगली नोकरी करून संचितला त्याने शिकवले, आईवडील दोघांचे प्रेम देऊन त्याचे पालनपोषण केले. आयुष्यभर अविवाहित राहून फक्त तुझ्यावरच प्रेम केले.
मुग्धाला गहिवरून आले. आज तिची तपस्या सफल झाली होती. तिघेही एकमेकांच्या मिठीत शिरले… आणि आनंद अश्रू मुक्तपणे ओसंडून वाहू लागले…. मुग्धाला आज एक अनोखी भेट मिळाली होती.