आलीया बदलाशी, असावे सादर !!!
- नेल्सन आल्मेडा, वंडा, ९९६०५४२१०६
साधारण २० वर्षांपूर्वी मोबाईलवरून पहिल्यांदा फोन केल्यानंतर माझ्या आईने विचारलेला “विना वायर आपला आवाज पलीकडे जातो कसा आणि समोरच्याचा आपल्याला ऐकू येतो कसा?” हा प्रश्न मला अजूनही आठवतो. हा प्रश्न आतापर्यंत आपणांपैकी अनेकांना नक्कीच पडला असेल. एकूण सांगायचा मुद्दा हा आहे की आधुनिक तंत्रज्ञानातील बदल हा आपण सर्वानीच अगदी जवळून अनुभवला आहे. आता बदल हा काही तंत्रज्ञानातच झालाय अस काही नाही. चाळिशीपुढच्या असलेल्या आमच्यासारख्या सर्व पिढ्यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध स्तरावर असे बदल पाहिले आहेत, नव्हे तर आत्मसातही केले आहेत, मग ते सामाजिक असो, धार्मिक असो, आर्थिक असो वा तांत्रिक असोत.
फक्त मानवी जीवनापूरताच नव्हे तर समस्त प्राणिमात्रांसाठी कालानुरूप बदल अपरिहार्य आहे. सृष्टीचा नियमच आहे, आलेल्या बदलांशी जुळवुन घ्या अन्यथा नष्ट व्हा. इंग्रजीत एक म्हण आहे, *”Only change is constant”*, अर्थात “बदल हाच शाश्वत आहे.”
अगदी कॉलेजला जाईपर्यंत आम्ही लहानपणी विटीदांडू, भोवरा, गोट्या, आठ्या, लगोरी असे अनेक खेळ खेळत असू. आत्ताच्या मुलांना हे खेळ तर सोडून द्या पण ह्यातील काही नावंही माहीत असतील तरी नशीब, अर्थात कारण त्यांच्या हातात आलेला मोबाईल. पूर्वी बहुतेकांच्या घरी सहज असणारे बैल, गाई, म्हशी, गाडे, रहाट, जुन्या वापरावयाच्या वस्तू आता फक्त कुपारी मेळाव्यातच दर्शनी पडतात. कालानुरूप सामाजिकच नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक पातळीवर देखील अनेक बदल झालेत, मग ते चर्चमधील असोत, वा पेहेरावात असोत, वा शिक्षण/नोकरीत असो. झालेले बदल काही वाईटच आहेत असे नव्हे, पण ते आत्मसात कसे करतो त्यावर त्याची परिणामता अवलंबून असते.
काळाच्या शर्यतीत काही बदल करून घ्यावेच लागतात. आपल्यापैकी कित्येकजण लहानपणी हलाखीच्या परिस्थितीतून आज सुखसंपन्न आयुष्य जगत आहेत, हाही बदलाचाच एक भाग. आपली कुपारी संस्कृती, पेहराव, भाषा, खाद्यपदार्थ ह्यातही एव्हाना अनेक बदल झालेत, त्यातील बऱ्याच गोष्टी कालानुरूप लुप्त पावत आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यात येणाऱ्या ४०-५० वर्षात अजूनही आमूलाग्र बदल झालेला असेल, आता तो पाहायला आपल्यातील कितीजण असतील देव जाणो. परंतु आत्ता आपण नाकारून अथवा नजरअंदाज करून त्यात होणारा बदल थांबवणे अशक्य आहे, फक्त आपण प्रयत्नाने पुढे नक्कीच ढकलू शकतो.
सध्या आपली तरुण पिढी पाश्चिमात्य देशाच्या आकर्षणात आहेत, आपली सध्याची परिस्थिती ही त्यास कारणीभूत आहेच. मुलांनी काळाच्या ओघात असणे अगदी रास्त आहे त्यामुळे नाईलाजास्तव वा स्वखुशीने आपण हा बदल स्वीकारलेला आहे. मुलांना शिक्षण/नोकरी साठी परदेशात पाठवता, काहीच वाईट नाही परंतु त्याजोडीला वेळ पडल्यास आंतरधर्मीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सून वा जावई स्वीकारण्यासही तयार असावे, म्हणजेच काय तर एका बदलाच्या जोडीस दुसरा बदल आपसूक आलाच. बरं, आता याहूनही पुढे, ही सर्व मंडळी कायम परदेशी गेली म्हटल्यावर मागे राहिलेल्या त्याच्या Mom-Dad ची म्हातारपणाची सोय काय? येणाऱ्या २०-३० वर्षात त्यावरही ‘वाढते वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक विवाह, भाड्याने दिलेला मरणोत्तर विल्हेवाट’ असे अनेक नवीन उपाय वा बदल आले तर आश्चर्य वाटावयास नको आणि ते नाईलाजास्तव स्वीकारावे देखील लागतील.
असो, काही बदल कटू असतात काही गोड. काही आपसूक स्वेच्छेने स्वीकारले जातात तर काही नाईलाजास्तव. काही बदल आयुष्य घडवतात तर काही बिघडवतात. काही डोळ्यांदेखत अगदी सहज घडत जातात तर काहींच्या बळी आपण कधी पडलो ह्याचे भानही रहात नाही. अगदी आपल्या जन्मापासून ते बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हाही एक बदलच आहे आणि मृत्यू हा त्या बदलाचा शेवट आहे, नाही का?
संगणक, स्मार्ट फोन, व्हाट्सअप्प आपण अगदी सहज स्वीकारलात ना, त्याप्रमाणे यापुढेही येणाऱ्या प्रत्येक बदलास आपण सदैव सामोरे असले पाहिजे. त्यातल्या चांगल्या बदलाची फळे चाखून चोखून खावीत आणि उर्वरित आयुष्य मजेत घालवावे, हाच काय तो बदलत्या जीवनाचा मंत्र असेल.