आम्ही अल्पसंख्यांक !!

  •  वेन्सी डिमेलो, शिरपूर

भारतात ख्रिस्ती लोक हे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. केवळ २% आहेत. तरी देशातील शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सहकारी सेवेची मूख्य सुत्रे, क्षेत्रे नि केंद्रे ते व्यापून आहेत. देशाला सेवा देत आहेत. तरीही मूळ भारतीय प्रवाहापासून अनेक क्षेत्रांत बरेच अंतर ते दूर आहेत. त्यात राजकीय नेतृत्व प्रामुख्याने दुर्लक्षित आहे.

“रंगात मिसळूनी रंग. रंग माझा मात्र वेगळा.” अस्मिता, संस्कृती, धर्म, पेहराव, रीतीरिवाज, पूजा, उपासना सारे पाश्चात्य घाटणीचे. मात्र मूळ भारतीय संस्कृतीतील संस्कृती पेहराव नि  रीतीरिवाज पहावयाचे झाल्यास महाराष्ट्रात नगर, वसई, आदिवासी भागात तसे ख्रिस्ती दिसतात. तरीही त्यांची निष्ठा पाश्चातच !! अशी टीका होते. हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

साथी जॉर्ज फर्नांडिस सारखे अपवादात्मक काही ख्रिस्ती भूमीपूत्र सोडले तर भारतीय राजकारणात ठसा उमटवील असा भारत मान्य ख्रिस्ती नेता नाही. आणि केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात मान्य असलेले मदर तेरेसा सारखे सर्वस्पर्शी सेवानेतृत्व नाही. “धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे” असे देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असलेले आणि “तुका निर्मित सेतुवरूनी आलो ख्रिस्त चरणी” माझा धर्म ख्रिस्ती असला तरी माझी संस्कृती भारतीय आहे. पाश्चात्य नाही. असे मानणारे  नारायण वामन टिळक म्हणूनच महाराष्ट्राने द्रष्टे कवी म्हणून स्वीकारले. अशी आदर्श अल्पसंख्याकांची नेतृत्व नजरे समोर असूनही…

आपण ख्रिस्ती लोक भारतात अल्पसंख्याक म्हणून गणले जात आहोत. आणि आपणही स्वतःला तसे मानतो. तरीही देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊनही मानाने जगता येते असा प्रघात अनेक विविध ख्रिस्ती नेतृत्वाने दिला आहे. त्यामुळे ख्रिस्ती जनतेने ‘अल्पसंख्याक’ असा उगाच बाऊ करण्याचे कारण नाही. स्वतःला हिणवून घेण्याचे कारण नाही. इथे गरज व्यापक विचारांचे बनण्याची आहे. इथे गरज धर्मापलीकडचा धर्म जगण्याची आहे. धर्म गर्व अभिनिवेश सोडून मानवी समाजात मिसळण्याची आहे.

देशाच्या प्रवाहात सामील न होता सतत स्वत:स अल्पसंख्याक समजून बहुसंख्याकांच्या छायेखाली वागण्याची सवय परिस्थितीच्या दडपणामुळे आपणाला लागली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रांगणात स्वयंप्रेरणेने पुढाकार घेण्याची प्रवृत्ती आपणामध्ये बाणलेली नाही.

सतत आपण स्वत:ला खुरडलेलेच समजत आलो आहोत. बहुसंख्याकांचा अनुनय करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे व त्यांच्यात आणि आपल्यात कर्मठ धार्मिक तफावत असल्यामुळे कोणत्याही खडतर कार्याची धुरा स्वीकारताना त्यांच्या संपूर्ण पाठिंब्याची व सहकार्याची शाश्वती आपणास वाटत नाही व म्हणूनच आत्मविश्वासाने उगाच न्युनगंड बाळगून कोणतेही महान कार्य हाती घेणे दुरापास्त होते. ह्याचाच परिणाम मानसशास्त्रीय भाषेत बोलावयाचे म्हणजे आपल्याठायी ‘हीनगंड’ निर्माण होतो. योग्य गुण असूनही बाह्य परिस्थितीच्या दडपणामुळे त्या गुणांना योग्य वाव मिळत नाही. व त्यामुळे अंगच्या उपजत नेतृत्वाचे मात्र खच्चीकरण होते. 

उपरनिर्दिष्ट विवंचनातील न्युनगंडाचा  तथ्यांश जरी तुर्तास आपण ग्राह्य धरला तरी एक गोष्ट आपणाला डोळ्याआड करता येणार नाही. खरा नेता, मेंढपाळ जाती, धर्म, समाज, वर्ग, वर्ण ख्रिस्तादि, बापूजी आदींच्या सारखा धर्म, जाती आदींच्या बंधनापलीकडचा असतो. त्यांच्या अंगभूत गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा होतो. इतरांवर छाप पाडणारे व्यक्तीमत्व. सर्व समाजात मिसळण्याची किमया, कला. निरनिराळ्या विषयांचा व्यासंग, समाजसेवेचे व्यसन, विनम्रता,निस्वार्थीपणा, कळकळ, विनम्र वृती इत्यादी शिदोरी त्यांच्या पदरी असली तर त्याला आपोआप चार लोकांत मान मिळतो. त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकारही होतो.

जे अखंड समाजात मिसळत नाहीत आणि आपला समाज तेवढाच गृहीत धरतात. ते खूप संकोचित विचार करतात. आपण धार्मिक अल्पसंख्याक असू पण माझ्या देशाचे नागरिक म्हणून अल्पसंख्याक कसे? 

म्हणूनच समाजाचा संकोचित विचार करणाऱ्यांचे, आपल्याच अल्पसंख्याक न्युनगंडाचा मनात विचार करणारे यावर काहींचे म्हणणे असे आहे की आमच्या अल्पसंख्याक समाजाची मनोवृत्तीच अशी की आमचे नेतृत्व कबूल करावयास आमचे लोक तयार नाहीत. निःस्पृह नेतृत्वासाठी ‘आमचे तुमचे’ असे रडत राव घोंगडे, रडगाणे चालत नाही. तर ‘सर्वच माझे’ असाच खुला विचार हवा. ते खरे नेतृत्व.

तात्पर्य अल्पसंख्याक जनतेच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक झाल्याशिवाय व अल्पसंख्याक तरूणांच्या वर्तणुकीत समूळ बदल झाल्याखेरीज, आणि सर्वसमावेशक झाल्याशिवाय आपल्या कथीत अल्पसंख्याक समाजातून प्रभावी नेतृत्व लाभणे कठीण आहे…

अल्पसंख्याकांचे नेतृत्व, राखीव जागांतून नेतृत्व, ओबीसी नेतृत्व, आदिवासी नेतृत्व, सेड्यूलकास्ट नेतृत्व, महिला नेतृत्व असे न रहाता, संवैध्यानिक, संविधान सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण होण्याची, करण्याची आज गरज आहे.

जगातील अल्पसंख्यांक गणलेला ज्यू यहुदी आणि पारशी समाज कधीही न्यूनगंड न बाळगता आज जगात अनेकविध कार्यात सक्रीय आहे. विद्या, विज्ञान नि व्यापारात जगाचे नेतृत्व करीत आहे.

शेक्सपिअर, टॉलस्टॉय, किंवा कालिदास, ज्ञानदेव ह्यांना आपण म्हणत नाही की ते ख्रिस्ती, हिंदू साहित्यिक आहेत. त्यांना आपण वैश्विक म्हणतो. बुद्ध, ख्रिस्त, गांधी ह्यांचीही शिकवण विश्व व्यापणारी आहे. ‘चार्ली चॅप्लिन’ जसा सर्व जगाला निखळ हसविणारा आहे तशीच आमची ‘श्यामची आई’ जगातील सर्व माताभगिनींच्या वात्सल्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. 

अल्पसंख्यांक असा न्युनगंड न बाळगता आणि बहुसंख्याक असा अहंगंड न मनात आणता सर्वसमावेशक जगावे. आपले कला गुण नेतृत्व सादर करावे. ते मोठ्या मनाने स्वीकारावे हाच जगण्यातील मोठा व्यवहार आहे. आनंद आहे….

नाही अल्पसंख्याक नाही बहुसंख्यांक!! भेद नुरे!!

मी एक मानव आहे….

नव्या  मनुंतील नव्या दमाचा

शूर शिपाई आहे.

ब्राह्मण नाही हिंदूही नाही.

न मी एक पंथाचा.

मळ्यात माझ्या कुंपण पडणे…

कुपातील मी नच मंडूक…

शांतीचे साम्राज्य स्थापू…

बघत काळ जो आहे.

प्रेषित त्याचा

नव्या दमाचा शूर शिपाई आहे.  

                 …केशवसुत.