आत्मविश्वास
- इग्नेशियस डायस, भुईगाव
प्रचंड आत्मविश्वास असलेली माणसे मला का आवडत नसतील? उदाहरणार्थ मोदी, जावेद अख्तर, अंजना ओम कश्यप, सचिन पिळगांवकर, रोहित शर्मा. रोहित शर्मा मध्ये काय प्रचंड आत्मविश्वास होता यार! त्याच्या चेहेर्यावर तो लख्खपणे उठून दिसत होता. फोनवर तो ज्या पद्धतीने बोलत होता त्याच्यातूनदेखील ते दिसत होतं.
मॉलमधल्या या सरकत्या पायर्या उतरताना सुरूवातीला माझी जाम फाटायची. एकदा म्हणजे दहा वर्षांपूर्वी मी आणि माझी बायको बिग बाजारला गेलो होतो. कांदीवलीत. तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर आणि माझ्या बायकोवरदेखील हा सरकता जिना चढायची पाळी आली होती. दोघांचीपण जाम फाटली होती. पण त्यातल्यात्यात मी नवरा असल्यामुळे मला तसं चेहर्यावर दाखवता येत नव्हतं. सोबत बायको नसती तर मी घाबरलोय असं चेहर्यावर दाखवायला मला काही अडचण आली नसती पण त्यावेळी सोबत बायको होती त्यामुळे तिचा नवरा घाबरट आहे अशी तिची कोणी अवहेलना करायला नको म्हणून मी चेहर्यावर आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न केला होता हे आता मला स्पष्ट आठवते. आता हा समोरचा सरकता जिना उतरताना मला बिलकूल भीती वाटत नाहीये. आता सवय झालीये.
उलट डोक्यात आणखी काही विचार म्हणजे रोहित शर्माच्या आत्मविश्वासाबद्दल विचार सुरू असताना मी सहजपणे जीने उतरतोय. त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी बिगबाजारमध्ये खरेदी करताना लोकांचा खरेदी करण्याचा आत्मविश्वास बघून देखील मी अचंबित झालो होतो. त्यामानाने मी आणि माझ्या बायकोने खूपच बिचकत बिचकत खरेदी केली होती. म्हणजे मी तिला एक साडी घेवून दिली होती 500 रुपयाची तर तिला केवढा आनंद झाला होता आतल्या आत. पण आतल्या आतच. तो आनंद चेहर्यावर दाखवायची सोय नव्हती. कारण खरेदीविषयी आत्मविश्वास असलेले इतर लोक तर दीड दोन हजारच्या साड्या खरेदी करूनदेखील त्यांच्या चेहर्यावर सहजभाव दिसून येत होते. म्हणजे त्यांना दीड-दोन हजारच्या एवढ्या महागड्या साड्या खरेदी करूनदेखील अजिबात आनंद झालेला त्यांच्या चेहर्यावर दिसून येत नव्हता. त्यामुळे पाचशे रूपयाच्या साडीबद्दल आनंद होवूनदेखील तो चेहर्यावर येवू देण्याची अजिबात सोय नव्हती.
हा एवढा आत्मविश्वास लोकांमध्ये येतो कुठून? खरेदी करण्याचा आत्मविशास, जगाचं सगळं ज्ञान आपल्यालाच आहे असा आत्मविश्वास. भाषणबाजीचा आत्मविश्वास, टीविवर अँन्कर बनून डीबेट कंडक्ट करण्याचा आत्मविश्वास, सरकता जिना चढण्या-उतरण्याचा आत्मविश्वास, टीव्हीवरील शोवर महागुरू बनण्याचा आत्मविश्वास. रोहित शर्माला कसला आत्मविश्वास आहे? माहीत नाही पण साल्यामध्ये काहीतरी विशेष होतं. दोन-तीन लाखाचा लॉस झाला पण हे सांगताना त्याच्या चेहेर्यावरची रेषासुद्धा हलली नाही. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्यातपण आत्मविश्वास आला पाहिजे. आपल्यात आत्मविश्वासाची प्रचंड कमी आहे.
आपल्यात आत्मविश्वासाची प्रचंड कमी आहे, हे निदान होईस्तोवर मी सरकता जिना उतरून सिटी मॉलच्या गेटमधून कधी बाहेर आलो कळलंदेखील नाही. आता पुन्हा बस पकडून डीयन्नगर. मेट्रोमधून अंधेरी. लोकलमधून वसई. आणि मग ऑफिस. सिटीमॉल च्या समोर असलेल्या बस स्टॉपपर्यन्त गेलो.
भैय्या, डीयन्नगर स्टेशन तक कौनसा बस जाएगा.
305. अभी आयेगा. ईसी स्टॉपपे.
बसमधून जावूया का? की चालत जावूया? चालत एक पंधरा वीस मिनिटे लागतात. बसने दहा रुपये होतील.
असा विचार सुरू असतानाच मी डीयन्नगरच्या दिशेने चालायला सुरुवात देखील केली.
फेसबुकवर लिहिण्याबाबतदेखील लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. रोज… जवळपास रोज काहीनाकाही लिहितंच असतात लोक. कसं सुचतं यांना? सुचलेलं लिहावं कसं वाटतं? लिहिलेलं आता फेसबुकवर टाकुया असा विचार करण्याची हिम्मत यांच्यात येते कुठून? आणि ते टाकतातसुद्धा! रोहित शर्माला काय कोटेशन पाठवायचं? महिनाभर कॅम्पेन चालवायचिये म्हणजे पाचेकलाख कोट करू. चारसाडेचारमध्ये डन झालं तरी चालेल. बर्याच दिवसांनी एक मोठं काम समोर आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीत मिळवायचंच. रोहित शर्मा तसा चांगला माणूस दिसतोय. फ्रूटसॅलड खावूया का? वीस रुपये होतील. जावूदे बाहेरचं काही खायला नको. अँटो थॉमस सांगायचा पैसा किदर कर्चा करोगे ये आपको पातं ओना चाइये. तबी आपके पास पैसा आ सकता है. आउर पैसा कर्चा करनेकं इम्मत करो. पैसा कर्चा करोगे, पैसा आयेगा. नई करोगे, वो क्यु आयेगा? पण मी पैसे खूप जपून वापरतो. कारण राजेश टागोर सांगतो आज तूम पैसा सम्हालोगे, कल पैसा तुमको सम्हालेगा… आज तूम पैसा सम्हालोगे, कल पैसा तुमको सम्हालेगा… आज तुम पैसा उडाओगे… आज… तुम पैसा उडाओगे, कल पैसा तुमको उडाएगा. कधीकधी माझा खूप गोंधळ होतो. अँटो थॉमसचं ऐकायचं की राजेश टागोरचं? दोघंदेखील खूप महत्वाचं काहीतरी सांगत असतात. दोघांमध्येही मला भरपूर आत्मविश्वास दिसून येतो.
हा आत्मविश्वास कसा कमवायचा? आत्मविश्वास कमवायचं खास ट्रेनिंग कुठे मिळत असेल का? मोदीमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला? अंजना ओम कश्यप मध्ये? सचिन पिळगावकर, जावेद अख्तर, रोहित शर्मा या सर्वांमध्ये कुठून आला एवढा आत्मविश्वास? आत्मविश्वास या विषयावर आपण सखोल संशोधन करूया का? संशोधनात समोर आलेले फाईण्डींग्ज मग कुठेतरी भाषण देवून लोकांसमोर मांडायचे. लोक खूप कौतुक करतील. त्यांना आपलं संशोधन आवडेल. टाळ्यांचा कडकडाट.
आत्मविश्वास हा न्यूनगंडाचाच एक आविष्कार आहे. ज्यांच्या मनात काहीएक न्यूनगंड आहे त्यांनाच सतत आत्मविश्वासाने भरून राहण्याची गरज असते. आपल्या आतील न्यूनगंड लपवण्यासाठी ते आत्मविश्वासाचा मुखवटा पांघरतात. हे रस्त्याच्या मधोमध खड्डे करणं कधी थांबेल? जेव्हा बघावं तेव्हा कूठे ना कुठे रस्ते खोदलेलेच! रोहित शर्मा प्रचंड महत्वाकांक्षी दिसून येत होता. आत्मविश्वास चेहर्यावर येण्यासाठी आपल्यात महत्वाकांक्षा असणेदेखील गरजेचे आहे. काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा. मोठं होण्याची महत्वाकांक्षा. श्रीमंत होण्याची, यशस्वी होण्याची, परीक्षेत पास होण्याची, प्रसिद्ध पावण्याची, प्रतिष्ठेची, मानसन्मानाची, मोठमोठी टेंडरं, कोटेशनं पास करून घेण्याची, सर्व प्रकारच्या भौतिक सुखाची काहीनाकाही महत्वाकांक्षा असल्याशिवाय चेहेर्यावर आत्मविश्वासाची गरजच काय? आपल्यात कसली महत्वाकांक्षा आहे? आपण लेखक आहोत आणि व्यावसायिक. पण आपण आपली ओळख करून देताना काय करून देतो? तर लेखक. आपल्या व्यवसायाविषयी आपण फारसे बोलत नाही. एखाद्या ठिकाणाहून बिझनेस मिळण्याची शक्यता असेल तर गोष्ट वेगळी नाहीतर आपण व्यवसायाविषयी फार बोलत नाही. मग आपली महत्वाकांक्षा काय? आपल्याला मोठा लेखक व्हायचय? की मोठा उद्योजक? कधीकधी वाटतं मोठा उद्योजक. म्हणजे इथल्या चारबंगला एरियात हे जे समोर लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट दिसतेय तिथे आपलं एक आलीशान ऑफिस असावं. आपल्या ऑफिसमध्ये एक चाळीस पन्नास जणांचा स्टाफ असावा. आपण दिवस रात्र तिथे मेहनत करून आणि मेहनत करवून घेवून हळूहळू मिलिओनेर, किंवा बिलिओनेर बनावं.
सालं पण मग लिखानाचं काय? ते तर होतेच. लिखाण करण्यासाठी मला ठरवावंदेखील लागत नाही. आपोआप मी लिहायला लागतो. लिहिलंच पाहिजे असं वाटायला लागतं आणि आपण लिहायला लागतो. कधी कधी मेहिंनोंमहिने आपण काहीच न लिहिता जगू शकतो. लिहिण्याविषयी काहीही प्रेडीक्ट करता येणे निव्वळ अवघड आहे. लिहिणे ही गोष्ट महत्वाकांक्षेच्या कक्षेत येत नसावी काय? लेखक बनणे ही गोष्ट निखालसपने महत्वाकांक्षेतून येते. पण प्रत्यक्ष लिहिणे ही महत्वाकांक्षेतून येणारी गोष्ट नव्हे. उगाच चालत निघालो. बसने आलो असतो तर एव्हाना आपण मेट्रोमध्ये असतो. जावूदे आता विचार करून काही फायदा नाही. आपण जवळपास पोचलोच आहोत डियन्नगरला. लिफ्टमधून वर जावूया की जिन्याने? अनेक लोक लिफ्ट मधून जातात. काहीजन जीने चढतात. जीने चढून जाणार्यामध्ये आत्मविश्वास जास्त आहे की लिफ्ट मधून जाणार्यामध्ये? लिफ्टसाठी रांगेत उभं राहावं लागणार. त्यापेक्षा जीने चढून जावूया. साला चार पायर्या चढलो नाही तरी धाप लागते. आपण म्हातारे झालो का? पस्तीशि ओलांडली म्हणजे उतरणीचा काळ सुरू झाला का? योगा करत होतो तेव्हा एवढं थकायला होत नव्हतं. पुन्हा योगा सुरू करायचा का? योगा करून आपलं शरीर फूल लवचिक करायचं. रामदेवबाबासारखं. मघाशी आपण रामदेवबाबाचा विचार केला नाही पण रामदेवबाबामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. योगा केल्याने आपल्यात कदाचित आत्मविश्वास येवू शकतो.
सुब्रमन्यम सरांच्या डोळ्यात काय तेज दिसून येत होतं. केवळ योगामुळेच हे शक्य आहे. योगा करायचा तर सुब्रमन्यम सरांसारखाच! छे! झाटभर पायर्या चढलो नाय चढलो तर एवढी धाप. आणि फुल्ल घामाघूम! घाम पुसायची सोय नाही. नाहीतर अख्खा रुमाल ओला होतो. आता इथे कॉईन टाकला की तो घरंगळत परत येईल तो घ्यायचा आणि मध्ये जायचं. परत येईल ना कॉईन? अडकला तर काय करायचं? आला. अडकला नाही. आजवर कधीच अडकला नाही. तरी प्रत्येक वेळी आपल्या मनात ही भीती निर्माण होतेच. कदाचित सर्वांच्याच मनात हे येत असेल का? पण कोणीच आपल्या चेहर्यावर भीती दाखवत नाही. उलट प्रत्येकाच्या चेहर्यावर आत्मविश्वास दिसून येतो. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला माणुसचं मेट्रोने प्रवास करतो. मी मेट्रोने प्रवास करतो. माझ्यात आत्मविश्वास असावा.
(सध्याच्या लिखाणातून, हे लेखकाच्या आगामी कादंबरीतील एक प्रकरण आहे.)