​असाही एक अस्वस्थ ‘अश्वत्थामा’! –  प्रकाश कब्रे

असाही एक अस्वस्थ अश्वत्थामा!

  •  प्रकाश कब्रे, चित्रकार, बेंगळुरू (९६५७४५६६४७)

खरंतर महाभारतातला “चिरंजीव अश्वत्थामा” गुरू द्रोणाचार्यांचा एकुलता एक मुलगा तोही श्री महादेवाच्या कृपेने कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आलेला! एक महान योद्धा पण सत्य असत्य! चांगलं वाईट! योग्य अयोग्य हे नीट कळत असताना सुद्धा केवळ मैत्रीसाठी असत्याशी म्हणजेच दुर्योधनाशी  केलेला संग! त्यामुळे पांडवांच्या वंशाच्या नाशाला कारणीभूत झाल्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचे रत्न काढून घेऊन दिलेला शाप ! त्यामुळे ओघळणारी कपाळावर जखम घेऊन वणवण करत, जखमी रानोमाळी फिरणारा अस्वस्थ अश्वस्थामा !!!

असं म्हणतात अजूनही बऱ्याच जणांना अश्वत्थामाचे दर्शन होत असतं.. खूप लोकांना त्यांनी दर्शन दिलेले आहे. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. 

आणि  मलाही  असाच एक अश्वत्थामा दिसला. तोही या कलीयुगात ! विश्वास बसत नाही ना ?

खरं आहे !!! एक वसईवाला ! आगाशीचा एक सहृदयी चित्रकार ! गेली ३५ वर्षं हृदयात एक जखम घेऊन तळमळत स्वतःच स्वतःला पापाचा वाटेकरी समजून वणवण फिरतोय. 

१९६९ साली मी बांद्रा स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश केला. आणि एका निरागस मैत्री जन्माला आली. आजतागायत ५३ वर्षे लोटली तरीही ती निरागसता आजही अनुभवतोय. चुकूनसुध्दा आपल्यामुळे कधीही इतरांना त्रास होऊ नये म्हणून जपणारा ! गुरूवर तसेच परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारा ! विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम करणारा एक कलाशिक्षक !

इतरांना आपल्या ओंजळीपेक्षा जास्तीत जास्त मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच माझे वैभव असे म्हणत समाधान मानत जगणारा, माणुसकीचा वसा घेऊन चालणारा एक स्वच्छंदी “माणूस चित्रकार” म्हणजेच आमचा”फिल्पा” म्हणजेच आगाशीचा प्रसिद्ध जेष्ठ चित्रकार फिलीप व्हिक्टर डिमेलो ! 

त्या संध्याकाळी रिंग वाजली. “कब्रे, तुला कळलं का? अरे आपल्या भागवत मॅडम गेल्या !!” 

आवाजातील कंपने खूप काय सांगून गेली… आणि अचानक मला म्हणाला, “अरे खरंच, मॅडमना भेटायला कोल्हापुरात गेलो होतो. पण मॅडम कोमामध्ये असल्यामुळे काहीच बोलणं झालं नाही. पण एक गोष्ट नक्की झाली की मॅडममुळेच माझं  ३५ वर्षाचं दुःख थोडं हलकं झालं रे. आज मी खूप शांत झालोय. माझ्या पापाचं ओझं थोडं कमी झाल्यासारखं वाटतं. आता मला थोडी शांत झोप लागेल हे नक्की. अरे, मी कोल्हापूरवासीयांची क्षमा मागून थोडा शांत झालोय.! “ खरंच… तो शांत झाल्या सारखा वाटत होता.

साधारण ३५ वर्षांपूर्वी आगाशीला वसईच्या काही कलाकार मित्रमंडळींनी रंगायन नावाची संस्था चालू केली होती. त्यामध्ये  प्रामुख्याने रांगोळीची प्रदर्शन व्हायचे. प्रशिक्षित कलाकारांबरोबर काही हौशी मुलेपण रंगावली टाकायची. त्यातल्या एका शाळकरी मुलाकडे डिमेलोचे लक्ष गेले. त्याचे काम पाहून पुढे चित्रकलेचे शिक्षण घेण्याच्या सल्ला दिला. पण घरच्या परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेणे कठीण असे समजल्यावर त्याला पुढच्या कलाशिक्षणासाठी मी मदत करेन असं वचन दिलं.

आणि पुढच्या वर्षी अचानक तो मुलगा त्याच्यासमोर उभा राहिला आणि मला कुठे अ‍ॅडमिशन मिळत नाही त्यामुळे मला अ‍ॅडमिशन मिळवून द्या अशी मागणी केली. वचन दिल्याप्रमाणे त्या मुलाला घेऊन तो दादरच्या एका कला संस्थेत गेला. त्या संस्थेचे प्रिन्सिपल त्याचे खास मित्र होते. त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या मुलाबद्दल सर्व सविस्तर सांगितलं व अ‍ॅडमिशन देण्याची विनंती केली.

गप्पा सुरू असतानाच तिथं त्या संस्थेचा प्युन मुलांच्या अ‍ॅडमिशनची लिस्ट लावण्यासाठी जात होता. तिथली अ‍ॅडमिशनची लिस्ट पुर्ण झाली होती. सरांनी त्याला थांबून त्याच्याकडून लिस्ट घेतली आणि त्यातील एक नाव कट करून या नवीन मुलाचं नाव टाकून लिस्ट बोर्डवर लावली. त्या मुलाचं त्या संस्थेमध्ये अ‍ॅडमिशन झाले. 

त्या मुलाचे अ‍ॅडमिशन करून त्याला आर्थिक मदत केली आणि गरज पडल्यावर पुन्हा मदत करण्याचे आश्वासन दिलं, नीट अभ्यास कर आणि तुझ्या आईवडिलांचे नाव आणि आपल्या गावाचं नाव उज्वल कर असा आशीर्वाद देऊन डिमेलोने त्याचा निरोप घेतला.

पण घरी जाताना डिमेलोच्या मनात एक टोचणी लागून राहिलीच. आपल्यामुळे एका मुलाचे नुकसान तर नाही ना झाले ? कारण कुठल्यातरी मुलाचे नाव कट करून आपल्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळाले आहे. त्यामुळे त्या मुलांचं काय ? आपण त्याच्यावर अन्याय केला का?

आपण चांगले केले की वाईट ? या विचाराने खूप अस्वस्थ झाला. नीट झोप येईना. जेवणाकडेही नीट लक्ष लागेना. शेवटी आपल्या नवऱ्याची ही घालमेल सौच्या लक्षात आली तिने कारण विचारलं आणि त्याला समजावलं की तुम्ही काही कोणाचं वाईट केलं नाही की कोणाचं नुकसान नाही केलं तर एका मुलाचं भलेच केलेले आहे. तो यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. त्यामुळे आपण कोणाचं वाईट केलंय हे मनातून काढून टाका. असे समजावल्यानंतर नंतर तो थोडा शांत झाला.

पण त्याचे काय ? हे  डोक्यातून गेलंच नाही !!! 

आणि काही दिवसांनी रेल्वे स्टेशनवर तो दिसला. खांद्यावर फुलांची टोकरी घेऊन धावत जात असताना त्याने त्याला थांबवले आणि विचारले, ‘अरे, तू इथे काय करतोय ? कॉलेजला गेला नाहीस ? अभ्यास कसा चाललाय ?’ आणि त्याचं उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो हसत हसत म्हणाला “नाही सर, तीन महिन्यानंतर मी कॉलेज सोडलं. आता दादरला फुले विकायला जातो.”

आणि इथेच आमचा “अश्वत्थामा” कोसळला. तळपायाची आग मस्तकात गेली. तो रडला, ओरडला, ‘अरे, तू हे काय केलंस ? तुझ्यासाठी मी एकाचा बळी घेतला आहे. एका मुलाचे करिअर बरबाद केले आहे. तुझ्यासाठी इतके दिवस मी पापाचे ओझं खांद्यावर घेऊन वाहत आहे…

खरंतर त्याला त्या मुलाचा खूप राग आला होता. वाटत होतं की त्याला चांगला थोबडावं, मारावा पण त्यांने तसं काहीही केलं नाही. त्याला शिव्या घालाव्यात असे पण वाटले नाही.

हसत चाललेला त्या मुलाला पहात तो शांत असाच कितीतरी वेळ हतबल होऊन स्तब्ध उभाच राहिला.

आणि तसाच तो ट्रेन पकडून दादरला उतरला आणि त्या इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपॉल मित्राला भेटला. माफी मागितली. आणि ज्याचं नाव लिस्ट मधून कट केले होते, त्याची चौकशी सुरू केली. त्याला फक्त एवढंच कळालं की तो मुलगा कोल्हापूरचा होता.  असलेल्या अपुऱ्या पत्त्यावर चौकशी सुरू केली. पण त्या मुलाचा काहीच पत्ता लागला नाही. 

शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण….

आणि त्याची झोप उडाली. मनाने पार कोलमडून गेला. त्याच्या  हृदयात कोल्हापूर हे नाव कोरले गेले. आणि जवळपास ३५ वर्षांनी मॅडमना भेटण्यासाठी कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे दळवी आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये लेक्चर देण्याची संधी मिळाली. आणि चर्चमध्ये जशी पापाची कबुली देतात, कन्फेशन देतात त्याप्रमाणे त्यांनी समोर असलेल्या मुलांच्या समोर नकळत घडलेल्या पापाची कबुली देऊन नतमस्तक होऊन कोल्हापूरवासीयांची क्षमा मागितली… 

खरंतर द्वापारयुगात एक अश्वत्थामा जाणीवपूर्वक केलेल्या पापाची कपाळावर जखम घेऊन तळमळत फिरतोय. तसाच या कलीयुगात हा सुद्धा एक अश्वत्थामाच गेली ३५ वर्षं तळमळत फिरतोय केलेल्या अपात्र दानाची झळ सोसत…