अडसूळ – एक दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी – एडवर्ड डिसोझा

अडसूळ – एक दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी

  •  एडवर्ड डिसोझा, वाघोली

               “कधी तुम्हाला डोंगररांगांनी आकर्षित केलं आहे का? असे वाटले का की त्या शिखरांवर चढून जाव?”

         बालपणापासून डोंगराची ओढ. कधी लांब पल्ल्याच्या सहलीसाठी जाताना बस प्रवासात खिडकीजवळची जागा न चुकवता घेत असे. खंडाळा-लोणावळा, कसारा, आंबोली असे बरेच घाट खिडकीजवळ बसल्याने पाहिलेत. त्यांचं ते आक्राळविक्राळ रूप, खोल दऱ्या, दाट जंगल सार्‍यांनी मनावर अक्षरशः गारुड केलंय. ह्या निसर्गरम्य सौंदर्याची लयलूट करताना मनाला भुरळ घालायचे ते उंच सुळके. का कोण जाणे पण सुळक्यांकडे पाहून असं वाटायचं जणूकाही ते मला आपल्याकडे खुणावत आहेत, एक आव्हान देत आहेत. डोंगर-सुळक्यांबाबतीतला एक अनामिक ओढा आजही तसाच कायम आहे. ट्रेकिंग सुरवात केल्यापासूनच्या गेल्या १०-१२ वर्षांत ४०-५० ट्रेक नक्कीच झाले असतील. प्रवासात एखादा डोंगर – सुळका दिसला की माझे डोळे त्याचं निरीक्षण करू लागतं. टोकावर जाणारी वाट शोधू लागतं.

         डोंगर पाहण्याच्या आवडीपासून ते त्या सुळक्यांवर चढण्याच्या धाडसापर्यंतचा हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील असाच आहे.

         प्रवासाला जवळ म्हणून आम्ही कुपारी ट्रेकर्स पालघर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची निवड करीत असू. जवळपास ज्ञात असलेले सर्व गड डोंगर झाले होते. ह्यातील सर्वात सुंदर, आणि १२ महिने सहज करता येणारा सोपा ट्रेक म्हणजे अशेरी गड. जेव्हा केव्हा अशेरी ट्रेकला गेलो तेव्हा तेव्हा त्याच्या विरुद्ध बाजूला पूर्वेला असलेल्या सुळक्यांची रांग नेहमी लक्ष वेधून घेत असे. एकदा फ्रँकला बोललो सुद्धा, ‘चल, आपण ह्याचा प्लॅन करूया.’ हो हो चालले होते पण प्लॅन काही होत नव्हता. दरम्यान यूट्यूबवर मुंबईतल्या एका ट्रेकरचा व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ त्या डोंगररांगेबद्दलच होता, जी रांग मनात कित्येक महिने रेंगाळत होती. त्यांनी ट्रेक सुरू केला होता, पण रस्ता न सापडल्याने त्यांना तो अर्धवट सोडावा लागला.

         गेल्यावर्षी महालक्ष्मी डोंगर ट्रेक करून घरी परतत असताना वाडा-खडकोणा जवळ आलो तेव्हा फ्रँकला बोललो, ‘चल, ह्याचा प्लॅन करूया’. फ्रँकचा ठाम आणि उत्साही प्रतिसाद, ‘नक्की करू’ आणि अखेर ह्यावर्षी अडसूळ मोहिमेचा मुहूर्त निघालाच. सहयाद्रि TTMM ट्रेकिंग ग्रुपवर एकाने अडसूळ ट्रेकचा प्लॅन पोस्टला होता, मी लगेच त्या ग्रुपला जॉइन केले आणि नंतर फ्रँकशी नक्की करून त्याला ग्रुप जॉइन करायला सांगितले. दुर्दैवाने आयोजकाने ट्रेक कॅन्सल केला पण फ्रँकशी बोलून आपण हा ट्रेक एकट्याने करूच असे ठरवले. फ्रँकनेच लोकल गाईडला शोधून काढले. ट्रेकसाठी लागणारे साहित्य नव्हतेच म्हणून फ्रँकला सांगून एक ३० ते ३५ मीटर ट्रेकिंग रोप आणला. कुपारी ट्रेकर्स ग्रुपवर ट्रेक संबंधी पोस्ट केली आणि १०-१२ ट्रेकर्स तयार झाले. दीड तासांची जंगलातील वाट पूर्ण करून आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी आलो होतो. एकदम २०-३० फुटांचा खडा चढ. दोर बांधण्यासाठी वर जायचे असल्याने मी प्रथम क्लाइंम्ब करत वर चढलो आणि दोर वर दगडाला बांधून टाकला. फ्रँकला दोर खालून खेचायला सांगितले ज्यामुळे गाठ पक्की बसली आहे ह्याची खात्री केली. मग फ्रँकने दोराला बटरफ्लाय गाठी मारल्या आणि एकेक ट्रेकर ने सुळका सर करायला सुरवात केली. “प्रत्येक शिखर चढत असताना आपण स्वतःलाही उंचावतो.” एका साध्या दोराच्या साथीने, दृढ निश्चय आणि जिद्दीच्या जोरावर आम्ही हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला.

         “अखेर, जी इच्छा बन्याच काळापासून मनात होती, ती प्रत्यक्षात पूर्ण झाली होती. हा अनुभव, त्या क्षणी अनुभवलेल्या आनंदाची, यशाची, आणि समाधानाची भावना शब्दांत पकडणं खरोखरच कठीण आहे.”

         रॉक क्लांयबिंग आणि रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी अडसूळ सुळका म्हणजे अगदी योग्य ठिकाण. या अविस्मरणीय अनुभवाचा आनंद आपल्या सहकारी ट्रेकर्सना घेता यावा यासाठी पुन्हा ट्रेकचे आयोजन करायचे ठरले तेही प्रॉपर ट्रेकिंगचं टेक्निकल साहित्य घेऊन हा ट्रेक करू असे फ्रँकशी बोलून त्याला लागणाऱ्या सामग्रीचा अंदाजे खर्च काढायला सांगितले. त्याने लगेच कोटेशन काढले. दुपारी कुपारी ट्रेकर्स ग्रुपवर सदर सामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीची पोस्ट केली, विश्वास बसणार नाही पण रात्री १०-११ वाजेपर्यंत कोटेशनपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. ह्या सहकार्‍यांमुळे एक अवर्णनीय हुरूप आनंद माझ्या आणि फ्रँक च्या मनात संचारला. दुसऱ्या दिवशी फ्रँकने जाऊन आवश्यक ते सामान खरेदी करून आणले. आता सुरू झाली होती ट्रेकची पुढील टप्प्याची योजना. कुपारी ट्रेकर्सच्या सहकाऱ्यांसोबत टेक्निकल ट्रेकची योजना आखली गेली. १३ एप्रिल २०२५ हा दिवस नक्की केला आणि तशी ग्रुपवर पोस्ट टाकली. आता फक्त त्या अनोख्या दिवसाच्या प्रतीक्षेत आम्ही होतो-जिथे प्रत्येक पाऊल नव्या शिकवणीसाठी आणि नव्या आव्हानासाठी तयार असणार!

         २५ मार्च ला फ्रॅकने कुपारी ट्रेकर्स ग्रुपवर अडसूळ सुळका ट्रेकची पोस्ट केली आणि ८-१० दिवसांत १८ जणांचा चमू तयार झाला. सर्वांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या.

         ट्रेक म्हटलं की मनात एक अनामिक हुरहूर लागून जाते. ट्रेकच्या आदल्या रात्री नीटशी झोप ही लागत नाही. असे अनुभव कित्येक वेळा आलेत. १२ एप्रिलच्या रात्रीचे प्रसंग नेहमीसारखेच होते. पहाटे ४:०० चा पहिला आणि ४:१० चा दुसरा अलार्म लावून मी रात्री १०:३० च्या सुमारास बेडवर पडलो. मागच्या ट्रेकचा रीकॅप आणि उद्याच्या नियोजनाच्या विचारांनी मनात फेर धरला होता. त्या विचारांमध्ये कधी निद्रेच्या सागरात बुडून गेलो ते कळलेसुद्धा नाही. जाग आली तेव्हा सहज मोबाईल वर टाइम चेक केले. पातेरातीचे ३.४० वाजले होते. अजून १५ मिनिटे झोप काढू असा विचार करून पडून राहिलो पण मेंदूत झोपेच्या जागी अडसूळ सुळका स्वार झाला होता. आता उठण्याशिवाय पर्याय नव्हता. सवयीप्रमाणे पाऊण लिटर पाणी पोटात ढकलून फ्रेश झालो. सॅलवीनला गुड मॉर्निंगचा मेसेज केला. ४.२५ ला तुला घेण्यासाठी येतो असे सांगून ट्रेकसाठी आवश्यक ते पाणी, चॉकलेटस कॅप, गॉगल, ट्रेकिंग पोल, ग्लुकोन डी सॅक मध्ये भरून ४.२५ ला गाडीला किक मारली.

         ठरल्यानुसार पहाटे बरोब्बर ४.४५ला मी आणि सॅलवीन उमराळ्यात सिझरच्या घरी पोहोचलो. त्याच्या कारमधून आम्ही ५.१०च्या आसपास विवा कॉलेज ह्या आमच्या ठरलेल्या मिटिंग पॉइंटला पोहोचलो. फ्रँक, आल्फ्रेड, सचिन, राहुल, रूथ आधीच पोहोचले होते. आमच्या २ कार नियोजित वेळेत पोहोचल्या होत्या. मात्र तिसरी, रोहनच्या कारला उशीर होणार होता म्हणून रोहनशी चर्चा करून मस्तान नाक्यावर चहासाठी भेटू असे ठरवून ५.२०ला, आम्ही उत्फुल्लतेने ट्रेकसाठी प्रस्थान केले.

         नियोजित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने आमचे मार्गक्रमण सुरू झाले होते, त्याची किंमत आम्हांला कशी चुकवावी लागेल. याची यत्किंचितही कल्पना कुणाला नव्हती. खानिवडे टोल पार केल्यावर ट्रॅफिक जॅमने आमच्या ट्रेकच्या वेगाला वेसण घातले. मॅपवरील ७ मिनिटांच्या ट्रॅफिकमधून आम्ही १५-२० मिनिटांनी बाहेर पडलो. ६.२०च्या आसपास आम्ही मस्तान नाक्यावर चहासाठी थांबलो. रोहन-नीलेश ह्यांच्या कार येणे बाकी असताना जमलेल्या १० जणांची अनौपचारिक ओळखदेळख आम्ही करून घेतली. मागे असलेल्या २ कार ट्रॅफिक मधून बाहेर पडल्याचे कळताच आम्ही चहाची ऑर्डर केली. चहा घेऊन थोडे फ्रेश अप होऊन आम्ही मस्तान नाक्यापासून ७-८ किमी अंतरावरील, दृष्टीक्षेपात असलेल्या आणि आमची वाट पाहत शांतपणे धुक्याआड लपलेल्या अडसूळ सुळक्याकडे निघालो.

         सकाळी ७:१५ वाजता आम्ही अडसूळच्या पायथ्याशी पोहोचलो आणि कार पार्क केल्या. सर्व सहभागी ट्रेकर्स पुन्हा एकदा एकत्र जमलो आणि एकमेकांची ओळख पुन्हा नव्याने करून घेतली. फ्रँकने सुरुवातीला कुपारी ट्रेकर्सबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्याने ट्रेकदरम्यान पालन करावयाच्या काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या, ज्या आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. “त्यानंतर फ्रँकने वर्षातील २-३ महिने हिमालयात व्यतित करणाऱ्या ज्येष्ठ ट्रेकर सतीश दादांची समूहाला ओळख करून दिली. त्यांची अनुभवसंपन्नता आमच्यासाठी प्रेरणादायी होती, आणि त्यांनी आमच्यावर चांगलाच प्रभाव पाडला.”

         क्लायंबिंग आणि रॅपलिंगचं थ्रिल आज अनुभवता येणार, या विचाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साहाची एक वेगळीच झळक दिसत होती. रोमांचाचा हा क्षण जणू प्रत्येकाचा आनंद अधिक खुलवून गेला होता. आमचा गाईड रोहन आणि अनुभवी सतिश दादा सर्वात पुढे. त्यांच्या पाठोपाठ आल्फ्रेड, त्यामागे मी, माझ्या मागे फ्रँक, आणि शेवटी गॉडफ्री अशी आमची ३-४ ट्रेकर्सची बॅच बनवण्यात आली. गटाचा हा समन्वय आणि एकत्र येणं, आम्ही उंच शिखरावर चढण्याच्या मोहिमेसाठी तयारीत असल्याची जणू झलकच होती.

         नितळ निळसर आकाश. डोंगराने स्वतः भोवती छानसा धुक्याचा मऊशार मफलर लपेटून घेतलेला. अडसुळच्या उत्तर पूर्वेला असलेल्या सुळक्यांच्या डोंगररांगेवर सूर्याची कोवळी किरणं सोनेरी झाली होती. त्यांनी ती डोंगररांग एव्हाना सर केली होती. ४-५ शेतजमिनींचा पसरट टप्पा पार करून केवळ ५-७ मिनिटांनी आम्ही अडसुळच्या जंगली पोटात प्रवेश केला आणि सुकलेल्या नानाविध झाडांच्या पर्णांनी आमचं आभाळ आच्छादुन गेलं. ह्या साऱ्यांत फार उकडत होतं. अवघी १०-१५ मिनिटांची पायपीट आणि अंग घामेजून गेलेलं. तरीही त्या जंगली सौंदर्याच्या साक्षीने हा थकवा आनंददायीच वाटत होता.

         पावसाळ्यात डोंगराचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेला बंधारा पार केल्यावर खड्या चढणीला सुरवात झाली. अगदी ८-१० मिनिटांत राहुल रनआउट झाला. राहुलचं आणि ट्रेकचं एक अजब नातं आहे. हा सुरवातीलाच ‘आउट’ होतो पण DRS चा वापर करून ‘बेनेफिट ऑफ डाउटचा’ फायदा घेत शेवटपर्यंत खेळात टिकून राहतो. इथे आमच्यात आणि पुढच्या २ ग्रुपमध्ये अंतर पडले. येणारा प्रत्येक क्षण आता जणू एक नवीन आव्हान आणि रोमांच घेऊन येणार होता.

         त्याला आराम मिळावा, ह्या विचाराने एकमताने मी आणि ऍसलीनने राहुलची सॅक घेतली आणि पुढे निघालो. गॉडफ्री निलेश जयश्री रूथ त्याच्या मदतीसाठी मागे थांबले. मोठ्या झाडांची सुकलेली सावली. खाली सुकलेलं कारवीचं बन, पायवाट अशी नव्हतीच. दिशाभूल होण्याची शक्यता जास्तच. थोडेसे वर गेल्यावर पुढे गेलेले दृष्टीपथात आले होते. मागे पाहिले तर मागच्या ग्रुपने चालायला सुरुवात केलेली. मी ऍसलीन आल्फ्रेड पहिल्या ग्रुपला जॉईन झालेलो. फ्रॅकने विचारलं, ‘इतका वेळ का लागला?’ त्याला हकीकत सांगितल्यावर तो खाली जाण्यासाठी उठला, परंतु मागचा ग्रुप अगदी जवळ आलाच होता म्हणून थांबला. थांबलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. टमाटर फ्रेश दिसावेत म्हणून विक्रेत्याने त्यावर पाण्याचे शितोंडे मारावेत, तसेच काहीसे सर्वांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. काहींनी विचारलं, ‘अजून किती जायचे आहे?’ तेव्हा गमतीदारपणे म्हणालो ‘आता कुठे शाळा सुरू झालीय, पहिली टेस्ट, सेमिस्टर, दुसरी टेस्ट, प्रिलीम आणि मग फायनल परिक्षा’ सर्वजण हसू लागले. आता ऊन तापायला लागलेलं आणि वारा कुठे दडून बसलेला कुणा ठाऊक. दोनचार मिनिटांच्या आरामानंतर पुन्हा उत्साहाने चढाईला सुरवात झाली.

         ‘डोंगर चढायची जिद्दच आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर मात करण्याचा आत्मविश्वास देतो.’

         उष्णतेची तीव्रता जरी प्रत्येक पावलासोबत जास्त जाणवू लागली असली तरी सर्वजण चालत होते. थांबत होते पुन्हा चालू लागत. १५-२० मिनिटांच्या अंतराने आम्हांला पहिल्या छोट्या खड्या चढाईला सामोरे जावं लागलं. सतीश दादा, गाईड रोहन आणि सचिन नवीन ट्रेकर्सना ती चढाई पार करण्यात मदत करीत होते. मी आणि रोहन सीबलला प्रत्येक टप्प्यावर मदतीचं काम करीत होतो आणि त्याचवेळी माझं सॅलविनला गाईड करणेही सुरू होतं. सर्वांची एकजूट आणि मेहनत यामुळे एकदाचा हा टप्पा पार झाला. आम्ही आता वरच्या टप्प्याकडे कूच करत होतो पण ह्या घाईगडबडीत मागे असलेल्या भारदस्त लोकांना मागचा टप्पा पार करण्यासाठी दोर आवश्यक होता ह्याचा आम्हाला विसर पडला.

         पुढचा प्रत्येक टप्पा ज्यांचा स्वतःच्या पायांवर भरवसा नव्हता त्यांच्यासाठी खडतर होता. ह्या टप्प्यावर सीबलला मदतीचा हात दिल्याशिवाय ती पुढे येत नव्हती आणि पुढे गेलेला तिचा मित्र रोहन आपल्या शैलीत तिची मजा घेत होता. या मजेशीर व गंभीर क्षणांमध्येही एक समन्वयाची भावना दिसून आली. असे ३-४ टप्पे पार केल्यावर आम्ही एकदाचे अडसूळ सुळक्याच्या क्लायंबिंग पॉईंटला पोहोचलो. सुळक्याच्या आडोश्याला सावलीत काही जण आराम करत होते. मागचे येईपर्यंत आपण रोप बांधून तयारी करून ठेवू ह्याविचाराने मी सुळका क्लायंबिंगला सुरवात केली, पण ती करताना सोबत असलेल्या नवीन ट्रेकर्सना क्लायंबिंग करता ग्रीप शोधणे, तिची पकड कशी घ्यायची, पाय रेस्ट कसे करायचे याचे प्रात्यक्षिक २-३ वेळा दाखवून मग क्लायंबिंग पूर्ण केले. वर जाऊन दोर दगडाला घट्ट बांधून खाली असलेल्याना खेचून घ्यायला सांगितले. या माझ्या प्रात्यक्षिकाने सगळ्यांचा आत्मविश्वास जणू नव्याने उंचावला.

         मागे असलेले फ्रॅक निलेश जयश्री राहुल रूथ गॉडफ्री अजून काही दृष्टीस पडत नव्हते. नियोजित वेळेपेक्षा खूपच उशीर झाला होता. वेळेचा अपव्यय कमी व्हावा ह्या शुद्ध हेतूने मी खाली उभे असलेल्यांना विचारले, ‘ज्याप्रमाणे मी दाखविले होते त्याप्रमाणे चढू शकाल का?’ त्यावर सीझर तयार झाला मागोमाग स्टेरिना देखील आली. सचिनने तयारी केली होतीच की फ्रॅक आणि ग्रुप वर पोहोचले होते आणि हारनेस न लावता चढाई सुरू केल्याचे पाहून आधीच उन्हाने लालबुंद झालेला फ्रॅक अजून लाल झाला. कडाडला. अर्थातच माझ्यावर. जे स्वाभाविक होते. मी क्षणातच खाली उतरून हारनेस लावण्याच्या कामाला लागलो. त्याच वेळी, सतीश दादा बिले रोप घेऊन, मी बांधलेल्या रोपचा उपयोग करत वर गेला. त्याच्या हालचालींमध्ये एका अनुभवी ट्रेकरचा आत्मविश्वास दिसत होता. काही वेळातच त्याने बिले रोपची बांधणी पूर्ण केली. त्याच्या मदतीसाठी मी पुन्हा वर आलो होतो, रोपवर येणाऱ्या ताणाला समर्थपणे सांभाळण्यासाठी. आता सर्व तयारी पूर्ण झाली होती. फ्रॅकने प्रत्येक घटकाची बारकाईने तपासणी केली-प्रत्येक बांधणी, उपकरण, आणि सुरक्षा व्यवस्थेची खात्री केली. या काळजीपूर्वक तयारीने संपूर्ण टीममध्ये एक विश्वास, उत्साह निर्माण केला. मग, एका पाठोपाठ एक ट्रेकर्सनी चढाई सुरू केली. पहिला टप्पा गाठल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि थ्रिल स्पष्ट दिसत होतं. निसर्गाच्या कुशीत, दगडांवर पाय ठेवत, उंचीवर चढत असताना, प्रत्येक टप्प्यावर रोमांचक अनुभूतींनी प्रत्येकाला भरून टाकलं. टीमवर्क आणि धाडसाची खरी परीक्षा अशाच प्रसंगांमध्ये होते, आणि त्या दिवशी ती टीमने अगदी यशस्वीरीत्या पार पाडली.

         पायथ्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास आपल्याला आयुष्याच्या कठीण वाटांवरही यशस्वी होण्याचा धडा शिकवतो.

         प्रत्येक ट्रेकर क्लायंबिंग करताना त्यांचा हारनेस व्यवस्थित राहील आणि बिले रोप ढिला होऊ नये, याची सतीश दादा आणि मी दोघांनीही पूर्ण दक्षता घेतली. वर आलेल्या ट्रेकर्सचे हारनेस सोडून, कॅराबीनर, हेल्मेट, आणि ग्लोव्हज नीट खाली पाठवले जात होते, जेणेकरून पुढच्या ट्रेकर्ससाठी सगळं तयार असावं. AMK ट्रेकच्या अनुभवातून आलेला आत्मविश्वास रूथच्या चढाईत स्पष्ट जाणवत होता; तिने सुळका सहज सर केला. त्यानंतर AMK ट्रेकचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एमीने, तिच्या क्लायंबिंगच्या पहिल्याच अनुभवाला सुरुवात केली. मागोमाग जसिंता, जयश्री, सचिन, सॅलवीन, अॅसलीन, स्टॅनियल, रोहन, सीबल या सर्वांनीही एकेक करत उंचीवर येऊन मोहिमेला अधिक रोमांचक बनवलं. फ्रँक वर आल्यावर खाली फक्त आल्फ्रेड, राहुल, निलेश आणि गॉडफ्री बाकी होते. खाली उरलेल्या चारही जणांनी एकमेकांकडे पाहत आत्मविश्वास गोळा केला, कारण आता त्यांचा क्षण जवळ येत होता. फ्रँक वरून धीर देत प्रत्येकाला वर येण्यासाठी प्रेरित करीत होता.

         सुरवातीला आलेल्यांना वर येऊन दीड तासाहुन अधिकचा वेळ झालेला. उन्हाचे चटके खात बसून बसून कंटाळलेले. आणलेला पाणी देखील संपलेला. सर्वांच्या घशाला कोरड पडलेली. अशात सतीश दादाने नाशत्याला आणलेल्या तांदळाच्या – नाचणीच्या भाकऱ्या आणि चण्याची चविष्ट भाजी हिचाच काय तो आधार होता. मी एक भाकरी-भाजी घेतली आणि अर्धी करून फ्रँकला दिली पण त्याने खाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.

         दुपारचे १२.३० वाजून गेले होते नियोजित वेळेनुसार आम्ही रॅपलिंग सुरू करायचे होते, मात्र अजून निलेश आणि गॉडफ्री ह्यांचं क्लायंबिंग बाकी होते. ते पूर्ण झाल्याशिवाय रोपच्या गाठी सोडता येत नव्हत्या. उन्हाची झळ सहन होत नव्हती पण इलाज नव्हता. संयम हाच आमचा साथी होता. पुढच्या ५-१० मिनिटांत निलेश-गॉडफ्रीने त्यांचे क्लायंबिग पूर्ण केले. एक सामूहिक फोटो काढला, जो या जिद्द, चिकाटी धाडस, साहस आणि संयमाचा सर्वांसाठी एक अमूल्य आठवण बनला. फ्रॅकने रोपच्या बटरफ्लाय गाठी अत्यंत काळजीपूर्वक सोडून, रॅपलिंगची तयारी सुरू केली. त्या दरम्यान, सतीश दादा आणि मी खाली सुरक्षितपणे उतरून आलो. मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण होत होती, आणि प्रत्येकासाठी हा अनुभव प्रेरणादायी होता.

         तळपती भर दुपार. डोंगरावरील दगडांनी जणू तव्याचे स्वरूप धारण केलेलं. उन्हाच्या तीक्ष्ण बाणांचा मारा अंगावर झेलत प्रत्येकजण त्या उष्णतेशी झुंजत होता.

         सुरुवातीला डॉ. रूथ, सीझर, आणि स्टेरिनाने धाडसी रॅपलिंग करत खाली येण्यास सुरुवात केली. त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या हालचालीत दिसून येत होता. खाली आल्यानंतर रूथने सर्वांसाठी सँडविच तयार करायला सुरवात केली. मदतीला स्टेरिना आली होतीच. नंतर रॅपलिंगसाठी जयश्रीची वेळ आली. तिच्या म्हणण्यानुसार तिला रॅपलिंगचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. पण तिच्या प्रत्येक अचूक हालचाली, अगदी नियंत्रित आणि आत्मविश्वासपूर्ण, पाहून कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही की हा तिचा पहिल्यांदा रॅपलिंगचा अनुभव होता. मागोमाग सीबल, अॅसलीन, आणि एमी रॅपलिंग करत खाली आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ते क्षण अधिक धाडसी वाटत होते. रॅपलिंगच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना माझ्याकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शनाने त्यांचा रॅपलिंगच्या आत्मविश्वासाला अधिक बळ मिळालं. एमीनंतर जसींता रॅपलिंगसाठी सज्ज झाली.

         रॅपलिंग करत खाली उतरणाऱ्या जसिंताला खाली उभा राहून गाईड करीत असतानाच, सुळक्याच्या उत्तरेला आडोशाला सावलीत गप्पा मारत बसलेल्या रूथ, जयश्री, सीबल आणि स्टेरिना अचानक धावत आल्या. मागोमाग सतीश दादा. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. “माश्या .. मधमाश्या ..! ” कुणीतरी ओरडले. क्षणांत वातावरण बदलले.

         “आ … ममा … आ … ममा .. ममा .. ई .. ई … जोरात किंचाळण्याचा आवाज.” एकच गोंधळ उडालेला. काहीच कळत नव्हते. फक्त किंकाळ्या …. मी हातातला दोर सोडून गर्रकन मागे वळलो. व्हिडिओ शूट करीत असलेल्या सीझरने तोंडावर नेकबॅड लपेटला होता आणि जोराने ओरडत होता. स्टेरिनाने घाबरून त्याच्या दोन्ही पायांत आश्रय घेतला होता. पुढे बसलेल्या जयश्रीच्या पाठीवर केसांत २५-३० मधमाश्या चिकटल्या होत्या. हातात ग्लोव्हज असल्याने मला त्या झटकून टाकता आल्या. सर्वजण ह्या अनपेक्षित हल्ल्याने घाबरून गेले होते. “सर्वजण शांत रहा! कुठलीही हालचाल करू नका .. पॅनिक होऊ नका! त्या काहीच करणार नाहीत’ असे मी ओरडून सांगत होतो. पण किंकाळ्या काही केल्या थांबत नव्हत्या. त्या आवाजाने हृदय पिळवटून जात होते. मी रूथला सांगत होतो, ‘रूथ, ओरडू नका शांत रहा. जी ओरडते आहे तिला शांत करा.’ पण नाहीच. ओरडणे सुरूच होते. त्याक्षणी मान वर करून आजूबाजूला पाहिले तर रूथ पुढे डोके कव्हर करून पिंडासणात बसली होती. तिच्या बाजूला सीबल. दोघेही शांत. मग कोण किंचाळते आहे ..? डोळ्यांसमोर जसं आलं तसं मी मागे पाहिलं. “शिट एमी!” त्या क्षणी लक्षात आलं की, एमी आणि अॅसलिन – लहान मुलं-दरीच्या कडेला एकटी होती. मागे पाहिले सतीशदादा हातातील टॉवेल ने माश्यांना पळविण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्यांचा सहकारी वसंताला, ‘वसंत ठीक आहेस ना, वर येऊ नको खाली जा’ असे सांगत होते. परिस्थिति जितकी धोकादायक तितकीच आव्हानात्मक देखील .. लहान मुले आणि दरी ह्या विचारानेच मनात धडकी भरली आणि कुठलाही विचार न करता त्यां दोघांकडे धावलो. त्यांना सुरक्षितपणे सर्वजण बसले होते तिथे आणलं. एक मोठा धोका टळला होता. सीझर हातातील छोटा रुमाल गोलगोल फिरवत होता, ज्यामुळे माश्या काही प्रमाणात कमी झाल्या.

         ह्या ५-१० मिनिटांच्या गडबडीत जसिंता रॅपलिंगच्या दोराला लटकत होती .. फ्रँकने बिले रोपचं नियंत्रण बिलकुल ढळू न देता तिला पकडून ठेवलेलं. अजूनही माश्या घोंघावत होत्या. अजूनही तणावपूर्ण वातावरण होतं. “आहात तसेच पडून रहा, शांत रहा, हालचाल करू नका” माझ्या सूचना देणे सुरूच होते. उठून मी जसिंताला खाली उतरवून घेतले .. मदतीला सतीश दादा देखील आले. जसिंताला माश्यांचा बराच डंख बसला होता. हारनेस मधून सुटका होताच जसिंताने एमिला गच्च मिठीत घेतले. आईचं हृदय ते प्रेमाने ओथंबून वाहणारं.

         संकटं ही नेहमीच आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाहीत, ती आपल्यातील धैर्य, संयम सहकार्य आणि जिद्द जागवण्यासाठी येतात.”

         एका अनामिक भीतीचं वलय अडसूळ सुळक्यावर दाटून आलं होतं. वातावरणात एक अंधुक घाबरलेपण जाणवत होतं. ‘राहुल! राहुल! ठीक आहेस का? रूथने आपल्या सहचाराला साद घातली. तिच्या आवाजात काळजीच आवर्त दाटलं होतं. “फ्रँक! ऑल ओके ..? तिचा पुढचा प्रश्न .. “डॉक्टर मला चक्कर येतेय” ह्या प्रतिसादाने पायाखालची जमीन हादरली. ‘कुणीतरी पाणी द्या’ गॉडफ्री ने आवाज दिला. पाण्याची शोधाशोध, पाणी नव्हतंच’. स्टेरिनाने ‘मामा! मामा! नीट पकडून बस. मागे दगडाचा आधार घे’ असे फ्रँकला सांगितले. ‘माझ्या बॅगेत एक बॉटल आहे’ राहुलने सांगता बरोबर रूथने त्याच्या बॅगमधून बॉटल काढली. त्यात फक्त ३००-४०० मिलि पाणी होतं. ते घेऊन मी भराभर वर गेलो. फ्रँकच्या चेहऱ्याकडे पाहून धस्स झालं. किती डंख. डोळे, कान, कपाळ, हात, अजून कुठे माहित नव्हतं. त्याचा आवाज जड झालेला. डोळे झोपू लागलेले. त्याला पाणी पाजले. शरीरात रूतलेल्या नांग्या काढू लागलो. गॉडफ्री त्याला धीर देत होता. मी आणलेल्या पाण्यामधून गॉडफ्री, नीलेश, राहुल, सॅल्विन घोटभर पानी प्यायले. पाणी संपले. फ्रँकला स्थिर होण्यासाठी अजून वेळ लागणार होता. तो आम्ही त्याला दिला. ‘फ्रँक! तू फक्त हारनेसला गाठी मार, गॉडफ्री बिले रोप पकडून बाकीच्यांना हळूहळू खाली सोडा’ अशी सूचना करून मी खाली उतरलो. नीलेश रॅपलिंगसाठी सज्ज झालेला.

         खाली उतरून आल्यावर पहिल्या ग्रुपला विनंती केली की तुम्ही आता थांबू नका, तुम्ही एकेक करून हळूहळू खाली उतरा. खाली जंगलात गेल्यावर ऊन जाणवणार नाही. आराम करता येईल. सतीश दादाने संमती दर्शविली पण कुणीच तयार होईना. माइ्या वारंवार विनंतीनंतरही वातावरणात एक प्रकारची अनिश्चितता होती. “पिण्यासाठी पाणी नाही, खायलाही नाही. अशा परिस्थितीत इथे थांबणं अशक्य आहे,” मी स्पष्टपणे सांगत होतो. शेवटी रूथ जयश्री आणि सीबल ह्यांनी थांबण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सतीश दादा, सीझर, स्टेरिना, स्टॅनियल, अॅसलीन, जसींता आणि एमी ह्या पहिल्या ग्रुपने खाली उतरण्यास सुरवात केली. अचानक ब्रेक लागलेली आमची मोहीम पुढे सरकू लागलेली. वातावरण हलकं होऊ लागलेलं.

         दरम्यान नीलेश रॅपलिंग करून आलेला. उतरल्यावर त्याने अंग टाकले .. त्याच्या कपाळावर केसांत खुपश्या प्रमाणात डंख मारण्यात आले होते. जयश्री रूथ सीबल ह्यांनी नांग्या काढायला सुरवात केली. हळूहळू डोळे बंद करून नीलेश निशब्द निश्चल पडून राहिला. सचिन रॅपलिंग करून खाली आला. ‘रूथ! माझ्या बॅगेत अॅलेग्रा टॅब्लेट आहे, ती आणि पाणी वर पाठव’. राहुलचीवरून हाळी कानावर आली. पण राहुलची बॅग गायब होती. खाली गेलेल्या पहिल्या ग्रुपमधील कुणीतरी चुकीने राहूलची बॅग बरोबर नेली होती. दरम्यान रूथ ने खाली गेलेल्या ग्रुपशी कॉन्टॅक्ट करून राहुलच्या बॅगची चौकशी केली, त्यांना ती रस्त्यात मध्ये सोडून पुढे जा असे सांगण्यात आले. बॅग आणण्यासाठी खाली एकट्याने जाणे आव्हानात्मक असले तरी गरजेचे होते. मी विचार केला होता पण सुळक्यावर फ्रॅक आणि खाली निलेश गपगार. काही बिकट प्रसंग उन्भवला तर ..? सुरक्षिततेच्या दृष्टीने मी वरच थांबण्याचे ठरवून. खाली आलेल्या रोहन आणि रूथ ह्यांना खाली जाण्यासाठी सांगितले. सामंजस्य आणि गटाची ऊर्जा वाढवण्यासाठी हा क्षण महत्त्वाचा होता.

         सॅलविन रॅपलिंगसाठी सज्ज झालाच होता की मधमाश्यांचा दुसरा हमला केला. मात्र ह्यावेळी त्याची तीव्रता कमी होती. सॅलवीन च्या पायांवर बऱ्याच माश्या बसलेल्या दिसत होत्या त्याला वर स्वतः ला सांभाळून बसण्यास सांगितले. ५ मिनिटांनी माश्या निघून गेल्यावर तो रॅपलिंग करीत उतरला. पाठोपाठ सचिन मग राहुल एकामागोमाग एक संयमाने आणि आत्मविश्वासाने उतरत गेले. प्रत्येक पावलागणिक अनुभवाची कसोटी, आत्मविश्वास अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनवत होती. पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याची व्यवस्था करण्यासाठी राहुल आणि सचिन न थांबता पुढे निघाले. आल्फ्रेड मागोमाग गॉडफ्री रॅपलिंग करीत उतरले. आम्ही खाली असलेल्या, हेल्मेट, ग्लोव्हज, हारनेस, कॅरेबिनर ह्या सामानाची जमवाजमव-बांधाबांध करू लागलो होतो. ह्या तंद्रीत फ्रॅकला रॅपलिंग करण्यासाठी बिले रोपच्या सपोर्टची गरज असल्याचे मी विसरून गेलो. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत फ्रॅक कॅरेबिनरच्या मदतीने उतरून येत असल्याचे पाहिले. हा क्षण एक महत्वाची चूक ठरू शकला असता. ज्यापद्धतीने फ्रॅक उतरत होता ते पाहून तो काही प्रमाणात रिकव्हर झाला आहे ह्या विश्वासाने मनाची समजूत घालून, सुरक्षा समानाची बांधाबांध-पॅकिंग सुरू केली. फ्रँकला ऊर्जा मिळावी म्हणून त्या साठी ठेवलेलं सँडविच त्याला खाण्यासाठी दिले. थोडा वेळ आराम केल्यावर आम्ही सर्वांनी एकमेकांच्या साथीने, चिकाटीने आणि उत्साहाने डोंगर उतरायला सुरवात केली. खाली उतरल्यावर मस्तान नाक्यावरून पाणी घेऊन ये, बेस ला पोहोचला की मला कॉल कर, मी खाली येतो पाणी घेण्यासाठी असे सीझरला सांगितले होते त्याने तसा होकार दिला होता पण त्याचा काही संपर्क झालाच नाही.

         जशी खडी चढाई अगदी तसाच खडा उतार. एक अनपेक्षित लढाई संपली होती पण दुसऱ्या अधिक जोखमीच्या लढाईला सामोरे जायचे होते. ती लढाई म्हणजे मधमाश्यांच्या डंखांनी कोमेजून गेलेले फ्रँक-निलेश, सॅलविन सिबल जयश्री ह्यांना सुरक्षित खाली उतरवायची. फ्रँक-निलेशच्या चेहऱ्यावरील वेदना, थकलेलं शरीर. ह्या दोघांच्या काळजीपोटी जयश्री सिबल हयांचं हादरलेलं मन सांभाळत मोहिमेचा आत्मा जीवंत ठेवायचा होता. संकटकाळी एकमेकांसाठी उभे राहण्याची जिद्द, संयम राखत प्रत्येकाला सुरक्षित नेण्याची जबाबदारी आता माझी गॉडफ्रि आणि आल्फ्रेडची होती.

         फ्रँक उसणे अवसान आणून काही झालेच नाही असे भासवित इतरांना प्रोत्साहित करीत असला तरी त्याची चालच सारं बोलत होती. हळूहळू आम्ही एकमेकांना आधार देत खाली येऊ लागलो. पाण्याची तीव्र गरज होती पण आम्ही हतबल होतो. सुळक्यानंतर लागणारे ३-४ आव्हानात्मक उतार आम्ही पार केले. पुढचा प्रवास हा सुके गवत त्याखाली दगड मिश्रित माती असा निसरडा होता. मी सॅल्विन आणि सिबल ह्यांना आधार देत पुढे चालू लागलो. मागे जयश्री निलेश गॉडफ्री फ्रँक आणि शेवटी आल्फ्रेड आणि गाईड रोहन असा क्रम होता. फ्रँक आणि निलेश टप्प्याटप्प्यांवर थांबत होते त्यांच्या मदतीला जयश्री आणि गॉडफ्री त्यांना धीर आणि आधारासाठी थांबत असत. आल्फ्रेडच्या पाठीवर बिले रोप हारनेस आणि इतर साहित्याचे वजन असल्याने तो पुढे झाला. जणू तो मोहिमेचा वाहकच. निसरड्या वाटेवरून आमचे हळूहळू उतरणे सुरू होते. एकदाचे जंगलात आल्यावर आम्ही सर्वच विश्रांतीसाठी थांबलो. मंद वारा आणि झाडांची सावली जणू निसर्गाने आम्हां सर्वांना कवेत घेतलं.

         थोडा वेळ विश्रांती करून चालायला सुरवात केली खरी पण काही अंतर उतरलो होतोच तोच फ्रँकने एका पडलेल्या झाडाचा आधार घेत आपले अंग टाकून दिले. चेहऱ्यावर एक प्रकारची शून्यता. काहीच सुचत नव्हतं. जयश्री आणि गॉडफ्री त्याच्या हातापायाला घासून आराम देण्याचे काम करीत होते. पाण्याची गरज होती पण ते नव्हतेच. आमचा गाईड हे सर्व पाहत होता. मी आता आल्फ्रेडला म्हटले आपण भराभर खाली जाऊन कुठूनतरी पानी आणूया. आम्ही आमचा उतरण्याचा वेग वाढवला. पाठीवरील वजनामुळे आल्फ्रेड दमला आणि थांबला. मी माझा वेग कमी होऊ न देता उतरत होतो. बन्यापैकी खाली आल्यावर एका सपाट जागी एक माणूस येताना दिसला, त्याच्या हातात पाणी होते. माझ्या आशा पल्लवित झाल्या आणि धावत त्याला गाठले आणि धक्काच बसला. तो रोहित होता. (आमच्या आधीच्या अडसूळ ट्रेकचा गाईड. तब्येत बरी नसल्याने त्याने रोहनला पाठवले होते.) रोहनने त्याला पाणी घेऊन येण्यासाठी सांगितल्याचे बोलला आणि तो ४ लीटर पाणी घेऊन आला होता. काय ती माणुसकी. कित्येक महिने पाण्याविना असलेल्या कोरड्या जमिनीवर पाणी पडल्याने त्याचा मागमूसही दिसत नाही तशीच काहीशी अवस्था रोहितने आणलेल्या पाण्याच्या 2 बाटल्या पाहून माझी आणि नंतर इतरांची झाली. त्याच्या हातातील २ लीटरची एक बाटली घेऊन घटाघटा पाव लीटरभर पाणी पोटात ढकललं. रोहितला तिथेच थांबायला सांगून भरलेली बाटली घेऊन मी त्वरित वर जायला सुरवात केली. मध्ये सॅल्विन-सिबल-आल्फ्रेड भेटले त्यांना अर्धा लीटर पाणी देऊन उरलेले पाणी घेऊन वर असलेल्या टीमकडे धावलो. पाणी पिऊन थोडी तरतरी आली. फ्रँकने मसलपेन ची गोळी घेतली त्यामुळे त्याला बरे वाटू लागले. इतक्यात रूथचा फोन आला की पार्किंग जवळ पाण्याच्या काही बाटल्या ठेवल्या आहेत. त्या आणण्यासाठी मी पुन्हा वेगाने खाली उतरण्यास सुरवात केली. पार्किंग कडे येऊन जो पाणी होता त्यातली एक बॉटल मी संपवून टाकली. उरलेल्या १००ml च्या २ बॉटल घेऊन मी पुन्हा चढाईला सुरवात केली.

         जाताना सॅल्विन-सिबल-आल्फ्रेड रस्ता भरकटून दुसऱ्या रस्त्याने हायवेवर चालताना दिसले. त्यांना पार्किंग कुठे आहे हे सांगण्यासाठी मी त्यांच्या दिशेने वळलो. त्यांना रस्ता दाखवून मी फिरणार इतक्यात रोहनची फोर्च्युनर आमच्या बाजूला थांबली. आतमध्ये रूथ आणि राहुलही होते. खाली उतरून पहिलाच प्रश्न, “फ्रँक कसा आहे?”. मी त्यांना हकीकत सांगितली आणि रोहनला विनंती केली की शेतं संपतात तिथपर्यंत कार घेऊन येऊ शकतोस का ..? फ्रँक आणि निलेशला घेण्यासाठी’, त्याने क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. मित्रत्वाचा एक सुंदर झरा त्या उत्तरात होता. मग मी त्यांनी आणलेले पाणी-कोल्डड्रिंक घेऊन वर जाण्यासाठी निघालो तर रूथ आणि राहुल ही मागोमाग येऊ लागले. ‘तुम्ही नका येऊ, आराम करा, मी जातो’ असे सांगून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला पण ते काळजीपोटी हळूहळू मागे येतच राहिले.

         एव्हाना सूर्य अशेरीच्या डोंगरामागे लपायला लागलेला. त्याच्या सोनेरी किरणांनी जंगलाला अलवार झळाळी आलेली. पण ते सौंदर्य डोळ्यांत साठविण्याइतका निवांतपणा नव्हता. घाई करणे महत्त्वाचे होते. एकुनच झालेल्या धावपळीचा परिमाण आता मला जाणवू लागला होता. पायात क्रेम्प्स येऊ लागलेले. पाय झटकत मी वर जात होतो. एका टप्प्यावर मी फ्रँक आणि गॉडफ्री यांना गाठले. त्यांना हातातील पाणी आणि कोल्डड्रिंक दिले. फ्रँक आधीपेक्षा खूपच फ्रेश दिसत होता. निलेश आणि जयश्री बरेच मागे होते आणि रोहन त्यांच्यासोबत. एक मोठा ओहोळ पार करून मी वर गेलो आणि ते तिघे नजरेस पडले.

         त्यांना पाणी आणि कोल्डड्रिंक दिले. जयश्री म्हणाली. ‘तुम्ही जा पुढे, आम्ही येतो’ पण मी नकार दिला. त्याक्षणी पुढे जाण्यापेक्षा त्यांच्या सोबत थांबणे महत्त्वाचे वाटलं. आतापर्यंत निलेश ठीक आहे अशी माझी समज होतो, पण निलेशला त्रास होऊ लागलेला. त्याच्या हालचाली मंदावू लागलेल्या. कडक उन्हाचा मारा, मधमाश्यांचा डंख, शरीरातील पाण्याची घटलेली पातळी- या सगळ्यांचा परिणाम आता दिसू लागलेला. त्यात लुज मोशन सुरू झाल्यामुळे त्याचा विकनेस वाढू लागलेला. चेहऱ्यावर थकवा. चालण्याच त्राण संपलेलं. अगदी थोडे चालल्यावर ‘थोडा वेळ थांब,’ असे तो आता विनंती करू लागला होता. अंधार आता जंगलाला कवेत घेण्यासाठी सज्ज झालेला. त्याआधी पार्किंगपर्यंत पोहोचायचं होते. निलेशला धीर-आधार देत आम्ही चालत होतो. ओहोळ पार केल्यावर मी रोहनला पुढे जाण्यास सांगितले. आता शेवटचा ओहोळ पार केल्यावर सपाट शेतं येणार होती, जिथून रोहनच्या गाडीत निलेशला नेता आले असते. माझे त्याला चियरअप करणे सुरूच होते. पण आम्ही शेवटच्या ओहोळाशी आलो आणि निलेश खाली बसला. झोप अनावर झाल्यावर जशी डोळ्यांची हालचाल होत असते तसे निलेशचे सुरू होते. जयश्री निलेशच्या स्थानिक डॉक्टर मित्राशी मेडिकल हेल्प मिळते का याची विचारपूस करण्यात व्यस्त होती. मी त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे शितोंडे मारत होतो. त्याच्या डोक्यावर हातातील थंड पाणी हळूहळू टाकत त्याला फ्रेश करायचा प्रयत्न सुरू होता आणि अचानक निलेश जमिनीवर झोपला. हळू आवाजात काही सांगू पाहत होता. त्याने डोळे बंद केले. कदाचित त्याला चक्कर आली होती. अंधार होत आला होता. हातात अगदी थोडा पाणी शिल्लक होता. लगेच सचिन आणि आल्फ्रेडला फोन केला आमचे लोकेशन सांगून लवकर पाणी घेऊन येण्यासाठी सांगितले. मी त्याच्या चेहऱ्यावर असलेला पाणी शिंपडत होतो .. पाचच मिनिटांनी मला एक धक्काच बसला कारण गॉडफ्रीचा मुलगा अॅस्लीन ज्याला मधमाश्यांचा खुप डंख बसला होता तोच निलेश करता पाणी घेऊन समोर आला होता. मागोमाग आल्फ्रेड. रोहनची फोर्च्युनर ओहोळाच्या दुसऱ्या अंगाला अगदी वर आलेली दिसली. जोडीला गॉडफ्री रूथ राहुलही होते. निलेशच्या चेहऱ्यावर अंगावरून थंड पाणी टाकून त्याला उठवले. आधार देऊन ओहोळ पार केला आणि रोहनच्या गाडीत बसवले. मी आणि इतर पार्किंगकडे मार्गस्थ झालो. शरीर थकलेलं पण एक मानसिक समाधान होतं. सर्वजण सुखरूप खाली उतरले होते. अंधारात गड्प होऊ लागलेल्या अडसूळच्या पायथ्याशी एक प्रकाश उगवला होता- साथीचा, धैर्याचा आणि माणुसकीचा.

         पार्किंगजवळ आलो तर सर्वजण हसत खेळत आणि दुपारच्या घटनेवर चर्चा करत होते. सतीशदादाने सर्वांसाठी गरमागरम कॉफी आणि नाश्ता आणला होता. त्याचा आस्वाद घेतला. निलेशला थोडा आराम आला होता पण त्याला ट्रीटमेंटची गरज होती त्यासाठी वसईला न थांबता मुंबईला जाण्याचा पर्याय आम्ही एकमताने घेतला. सतीशदादा, रोहन आणि रोहितचे विशेष आभार मानून आम्ही ७ वाजता घरच्या रस्त्याला लागलो.

         हा प्रवास फक्त जंगलातून नव्हता- तो माणसांच्या मनातून होता. संकट, थकवा आणि काळजी ह्यांच्या छायेतुन एकमेकांना आधार देत पुढे जाण्याची ही कहाणी होती.