अडगळ – अ‍ॅन्थनी परेरा

अडगळ

  •  अ‍ॅन्थनी परेरा, नंदाखाल

पूर्वी घरात एक अडगळीची खोली किंवा एखादा अडगळीचा कोपरा असायचा. आपल्याला नको असणाऱ्या परंतु केव्हातरी उपयोगात येतील असे समजून अशा वस्तू त्या अडगळीच्या खोलीत टाकल्या जायच्या. किती तरी प्रकारच्या वस्तूंनी ती खोली भरून जायची. त्यात शेतीकामाची अवजारे, घरातली भांडीकुंडी, मुलांची खेळणी, मोडकी सायकल, जुने कपडे, फर्निचर असे नानाप्रकारचे सामान असायचे. अशा वस्तूंचा उपयोग फार कमी वेळा व्हायचा. कधी-कधी एखादी वस्तु हवी असेल ती मिळायची नाही;  परंतु नको असेल तेव्हा हात जोडून पुढे उभी असायची. म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा. या वस्तू वर्षानुवर्षे त्या खोलीत पडून असायच्या. त्या हव्याही असायच्या आणि नकोही असायच्या, परंतु नको म्हणून कोणी अशा वस्तू घराबाहेर काढीत नसत. मात्र एका अंधाऱ्या खोलीत वर्षानुवर्षे त्या धूळ खात पडून असायच्या.

​​आजही थोड्या बहुत प्रमाणात आपल्या घरात अडगळ असतेच. छोट्या बालकाला आपण सायकल आणतो. तो छोटा आहे तो पर्यत त्याचा वापर ते बालक करते. बाळ मोठे होते मग त्याला मोठी सायकल आणली जाते आणि छोटी सायकल अडगळीच्या खोलीत जाते. आता घरात छोटी मुलं कमी; परंतु सुदैवाने त्या घरात दुडूदुडू पावलांनी दुसऱ्या बालकाचे आगमन झाले म्हणून त्याला ती जुनी सायकल त्याचे ममी पप्पा थोडेच देणार! त्याच्यासाठी नवीन सायकल आणली जाते. मात्र अडगळीत ती जुनी सायकल तशीच पडून असते. ना आपण ती वापरत असतो, ना गरजवंताला देत असतो.

भांडी-कुंडी म्हणजे स्त्रियांचा जीव की प्राण. कधी ती माहेरच्यांकडून मिळालेली असतात, कधी मित्र-मैत्रिणींकडून, ती आठवण त्यांना जपून ठेवायची असते. एखादा कुकर शिट्टी खराब झाली, ते काम करीनासे झाले की नवीन कुकर खरेदी केले जाते. आणि जुने अडगळीच्या खोलीत टाकले जाते आणि अखेरपर्यंत त्याची शिट्टी कधी वाजत नाही.

अडगळ केवळ वस्तूंच्या बाबतीतच असते असे नाही. ती केव्हा केव्हा माणसांच्या बाबतीतही असते. मित्रमैत्रिणीच्या एखाद्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती अशी असते की आपोआप ती अडगळीत पडते. ती ग्रुपचा सदस्य म्हणून त्या ग्रुपमध्ये असते. बाकी चर्चा करताना, खाणं-पिणं करताना, हसता-बागडताना ती व्यक्ती इतरांपेक्षा अलिप्त राहते किंवा तिची एवढी दखलही घेतली जात नाही. हीच गोष्ट विविध देशांच्या गटांमध्येही घडते. लोकशाहीवादी देश, कम्युनिस्ट देश, विस्तारवादी देश, तटस्थ देश अशा विविध गटात जगातले सगळे देश विभागले गेले आहेत. परंतु काही देश असे असतात की ते कोणत्याच गटात नसतात, किंवा त्यांच्या मताला किंमतही दिली जात नाही, असे देश म्हणजे अडगळीत पडलेले देश आहेत असे म्हणता येईल.

आपल्या देशातील अनेक बोली भाषा, त्या भाषेतील अनेक शब्द आज अडगळीत गेले आहेत. त्यांचा वापर फारसा होत नाही. त्यामुळे ते शब्द नवीन पिढीला परिचित नाहीत. आपल्या सामवेदी भाषेचीही तीच गत आहे. मात्र अलिकडे कुपारी संस्कृती व भाषा संवर्धन समिती खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. त्यामुळे आपल्या बोली भाषेतील अनेक शब्द आजच्या तरुण पिढीच्या कानावर पडत आहेत. अनेक तरुण आता बोलताना आपल्या बोली भाषेचा वापर करीत आहेत. तरीही अजून कितीतरी शब्द आहेत की जे आज अडगळीच्या खोलीत गेले आहेत.

नाताळनिमित्त होणार्‍या कुपारी महोत्सवामुळे अनेक खाद्यपदार्थ व त्यांची नावे तरुण पिढीला ज्ञात झाली आहेत., रेवाळा, दॉदाल, वरकुट, फुहू, ढॅस्का, सामट्यो, धापट्यो, पालंगो, पानमोड्यो, हिंगोळ्यो, करज्यो, मॉराय लाडू, भंडीपिठाय लाडू, खपश्यो, सान्ने, तळणायो रोट्यो, उंबरे, बुंबला आटवान, मुकुटीई पिडी, आळूवडी, वदडी पायासूप, मुंडी सूप, दोद्याई कणेरी असे कितीतरी पदार्थ आणि शब्द काळाच्या ओघात अडगळीत गेले आहेट. हे फक्त खाद्यपदार्थाबाबतचे शब्द आहेत. बाकी कपडेलत्ते, दागिने, भांडीकुंडी, शेती-अवजारे, चालीरिती इ. बाबतचे हजारो शब्द आज अडगळीत गेले आहेत, आणि जे शब्द आपल्याला कधीच माहीत नव्हते असे शब्द व ते पदार्थ आपल्याला खूप परिचित झाले आहेत, नव्हे त्यांनी आपल्या किचनचा आणि तरुणाईचा ताबा घेतला आहे.

काही वर्षांपूर्वी नाताळ केक हा पदार्थ आपल्याकडे नव्हताच, तो अलिकडच्या काही वर्षात आला त्याशिवाय पिझ्झा, बर्गर, शोरमा, रोल्स,  मोमोज, हॅम, सॉसेजेस अशा अनेक पदार्थांनी आपल्या तरुण पिढीचा आणि आपल्या किचनचा ताबा घेतला आहे.

अडगळीत टाकलेल्या वस्तू कधी-कधी आपल्या कामात येतात तसे अडगळीत गेलेले हे पदार्थ कधी-कधी आपल्या किचन मध्ये करायला काय हरकत आहे ? अशाने त्या पदार्थाची चव तरुण पिढीला कळेल आणि त्या शब्दांची ओळखही त्यांना होईल. त्यामुळे ते शब्द आणि ते पदार्थ मृत होणार नाहीत.

अलिकडे अडगळ ज्येष्ठांचीही झाली आहे. ती नकोशी असतात आणि हवीशी असतात. बर्‍याच वेळा ती नकोशी होतात मग अशी माणसं अडगळीत टाकली जातात. वृद्धाश्रम ही एक अडगळीची खोलीच म्हणायची का ? आजकाल वृद्धाश्रमांना फार सुंदर सुंदर नावे दिलेली असतात. पण लोक आपल्या घरातील अडगळच त्या ठिकाणी आणून सोडतात ना ! काही समाजात लोकांचे काही प्रश्न असतात, काही अडचणी असतात म्हणून त्यांच्यासाठी वृद्धाश्रम एक सोयीची जागा असू शकते. पण तेथे राहणार्‍या वृद्धांना तसे वाटत असेल का ? अजुनही आपल्या समाजात वृद्धाश्रम ही संकल्पना आली नाही हे आपल्या वृद्ध लोकांचे भाग्य आहे. पण पुष्कळदा ते घरात‌ल्या घरात अडगळीत पडलेले असतात, अडगळीची खोली केवळ जुन्या वस्तूंसाठीच असते असे नाही. वस्तू असो की व्यक्ती जोपर्यंत त्याची उपयुक्तता आहे, समाजाला फायदा आहे तोपर्यंत त्यांना मागणी असते. मानसन्मान असतो, एक मानाचे स्थान असते. पण एकदा का उपयुक्तता संपली की व्यक्ती किंवा वस्तू अडगळीच्या खोलीत जाते. म्हणून माणसांनी विशेषतः ज्येष्ठांनी आपली उपयुक्तता नेहमी सिद्ध करीत राहिले पाहिजे. आपले ज्ञान, अनुभव, आपला वेळ समाजासाठी व आपल्या कुटुंबासाठी दिला तर  कुटुंबाला आपली अडगळ होणार नाही. पण आज जर कुटुंबाला आपली अडगळ वाटत असेल तर आपण गेल्यानंतर कुठल्या स्वरूपात आपण मागे राहणार हा मोठा प्रश्न आहे. पुढील कविता किती बोलकी आहे ते बघा.

माझ्या घरात

आज मी आहे

उद्या मी नसेन

एक मिणमिणता दिवा असेल

दहा दिवसांनी तो दिवा विझेल

त्या जागी माझा एक फोटो असेल

लाकडी चौकट

कोरीव नक्षीकाम

हसरा फोटो

काही दिवसांनी

माझ्या लटकलेल्या फोटोवर

साचलेली धूळ असेल

किंवा त्या फोटोची पातळ काच

वेडीवाकडी तडकलेली असेल

काही वर्षांनी

माझा हसरा फोटो

भिंतीवरच्या छिद्रातून

खिळ्यासकट निखळलेला असेल

आणि मग त्यानंतर

पिढ्यान पिढ्या

माझ्याच घरात

माझ्या नावाचं

फक्त उरलेलं एक छिद्र असेल

आणि फोटो अडगळीच्या खोलीत.

आपलं रूपांतर असे छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला मिळालेल्या श्वासाचं रुपांतर आपण उत्सवात करायला हवे नाहीतर जिवंत असताना अडगळ आणि मरणानंतरही अडगळ हे निश्चित.