सर्कस
- पॅट्रीक कोरीया, फ्लॉरिडा, यूएसए
कॉलेजात असताना बरोबर दिलीप छत्रे नावाचा एक पोरगा फार चांगला मित्र झाला होता. मी केमीकलला व तो इलेक्ट्रीकला होता पण पहीली काही वर्षे सामायिक असल्याने व एकाच हॅास्टेलमध्ये असल्यामुळे मित्र झालो होतो. साधारण २० वर्षे अगोदर तो एका अपघातात देवाघरी गेला. तो कोल्हापूरच्या करूंदवाड गावी राहात असे. ते माझ्या आठवणीत राहीले आहे कारण तो ‘घरी पाठवलेली पत्रे फार उशीरा मिळतात’ म्हणून अधून मधून त्रासीक स्वरात बोलत असे.
त्यावेळी केलेल्या चौकशीत असे आढळून आले होते की कुरूंदवाड पासून साधारण २०० कि. मी. वर कुर्डूवाडी म्हणून एका गाव सोलापूरजवळ आहे. दोन नावातील साम्यामुळे पोष्टमनची गफलत होवून एका गावची पत्रे दुसऱ्या गावाकडे जावून परत येत व म्हणून पत्रे उशीरा पोहचत. अहमदाबाद व अहमदनगर मधे अहमद घोटाळा घालतो तसे झाले. ‘कुरूंदवाड काय भिकार गाव आहे’ म्हणून मी त्याची फिरकी घेत असे. त्यावर “मी कोकणस्थ आहे. माझ्या बरोबर पंगा घेवू नकोस. महागात पडेल.” असे बोलून तो एक कथा सांगत असे. ती कुरूंदवाडच्या एका छत्रेची कथा होती. ह्या छत्रेचे त्या छत्रेशी काही नाते होते की नाही ते ठाऊक नाही. ती कथा मी अलीकडे थोडी शोधाशोध केली तेव्हा सत्य असल्याचे माझ्या लक्षात आले.
१८७९ मध्ये ज्युसेप्पे चियारीनी हा रॉयल इटालियन सर्कस घेवून भारतात आला होता. डिसेंबरच्या सुमारास तो मुंबईत शो करायचा. त्याचे सर्व शो सुरू होण्यापूर्वी, तो प्रेक्षकांना सांगायचा की भारतात त्याच्या इतकी चांगली सर्कस नाही आणि लवकर तशी विकसितही होणार नाही. त्या व्यतिरिक्त तो अशी शेखी मिरवायचा की ‘जो कोणी सहा महिन्यांच्या आत त्याच्या शोची पुनरावृत्ती करू शकेल त्याला तो एक हजार रूपये आणि एक घोडा भेट म्हणून देईल.’ अमिताभ बच्चन सारखे “है कोई माय का लाल?” सारखा प्रसंग होई. तेव्हाचे एक हजार रूपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.
त्या नाताळच्या दिवशी कुरंदवाडचे संस्थानिक (राजे) बाळासाहेब पटवर्धन प्रेक्षकांत होते व त्या बरोबर विष्णूपंत छत्रे (हे त्यांच्या घोड्यांची देखरेख करणारे) होते. ह्या विष्णूपंतांना हे उघड दिलेले चॅलेंज बघून चेव आला व रिंगणात उडी घेवून बोलला. “मला सहा महिन्याची गरज नाही. मला फक्त तीन महिने द्या. मी हे करून दाखवतो पण मी हे कुरूंदवाडला करून दाखवीन आणि मला जर हे जमले नाही तर मी एक हजार रूपये व एका ऐवजी दहा घोडे देईन”
या नंतर २० मार्च १८८० ला म्हणजे ३ महीन्या अगोदरच कुरूंदवाडला राजवाड्यासमोर त्याने सर्कसचे प्रयोग ठेवले व चियारीनीला आमंत्रण पाठवले. चियारीनी तेव्हा कोलकत्यास शो करायला गेला होता. तो आला नाही कारण त्याच्याकडे त्याच्या गावी परत जायला देखील पैसे शिल्लक राहीले नव्हते. त्या उलट छत्रेनेच त्याचे बरेचसे सामान विकत घेवून, एका वर्षाच्या आत हिंदुस्थानातली पहिली सर्कस “द ग्रेट इंडीयन सर्कस” चालू केली.
माझ्या मित्राच्या बोलण्यात म्हणजे “कोकणस्था बरोबर पंगा घेवू नकोस” खरेच तथ्य होते म्हणायचे!
अधिक चौकशी करता असे समजते कि शास्त्रीय संगीतवाले छत्रे ते हेच. ग्वाल्हेरला जावून उस्ताद हाडू अली खान कडे त्यांनी हिंदुस्थानी गायकी शिकून घेतली. नंतर त्यांनी सर्कस भावाकडे सोपवून इंदोरला निघून गेले कारण त्यांची उस्ताद रहेमत खानशी फार जवळीक होती व तिथेच १९०५ च्या फेब्रुवारीत देवाघरी मधुमेहाने गेले.