संघर्ष न संपणारा
(मॅकेन्झी डाबरे)
- मुलाखतकार – इग्नेशियस डायस
१. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करत आहात. ही प्रेरणा कशी मिळाली?
आपल्या वसईला संघर्षाचा इतिहास आहे. हा संघर्षाचा वारसा आपल्याला आपोआपच मिळालेला आहे. आपल्या वसईकरांच्या DNA मध्येच चळवळ आहे असं म्हटल्यास ती अतिश्योक्ती ठरणार नाही, इतकी चळवळ आपल्यात भिनलेली आहेच. माझी जडणघडणदेखील याच परंपरेत झाली. अगदी लहानपणापासूनच मी वसईतल्या चळवळी बघत आलेलो आहे. शालेय जीवन संपवून कॉलेज जीवनात प्रवेश करताना आजूबाजूला वसईचे पर्यावरण वाचावे यासाठी संघर्ष सुरू होता. हरित वसई संरक्षण समिती द्वारे पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, वसई वाचवा अशा घोषणा देत आंदोलन उभे राहत होते. या साऱ्याचा परिणाम मनावर खोलवर होत त्यातून समाजकार्याची आवड निर्माण झाली. पुढे मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य कॉलेजमध्ये शिकताना खऱ्या अर्थाने समाजकार्याची ओळख झाली. दलीत, आदिवासी, अल्पसंख्य आदी प्रश्र्नसोबत पर्यावरण, रोजगार आदी बाबत व्यापक माहिती, शिक्षण सोबत प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
मात्र ग्रासरूट लेवलला कामाचा अनुभव मला ‘युवा’ या जगप्रसिद्ध संस्थेत काम करत असताना मिळाला. मुंबईतील कॉलेज शिक्षण संपत असताना गोर गरीब वंचित जनतेसाठी कार्य करणारी शहीद नवलिन कुमार याचा खून झाला. त्याचे कार्य पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्यासाठी “युवा” सस्थेद्वारे माझी नियुक्ती झाली. वसईतल्या माझ्या कामाची ती सुरुवात होती. तेथून वंचित घटकांसाठी कार्य करीत असताना माझी वसईसोबत नाळ जुळली ती कायम राहिली. वसईतील जमीन माफिया विरोधात “दहशतवाद विरोधी कृती समिती” बनवून वसईतील कार्यकर्त्यांना सोबत लढणे, सिडको हटाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग, एस.टी. बचाव आंदोलन त्यानंतर गाव बचाव आंदोलन, वसईतील पाणथळ जमीन व तीवर वाचावे यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका, वसईतील पर्यावरण वाचावे यासाठी पर्यावरण संवर्धन समिती द्वारे लढा. आदी द्वारे कधी रस्त्यावरील लढाई, कधी जेलमध्ये जाणे, कधी आमरण उपोषण, कधी धरणे आंदोलन याद्वारे हरित वसई वाचावी यासाठी सतत संघर्ष करीत राहिलो. “युवा” या आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला असल्याने आदरणीय मेधाताई पाटकर, शक्तिमान घोष, शरद राव, स्वामी अग्निवेश, विवेकभाऊ पंडित, अरुणा रॉय, मिनार पिंपळे आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळाली त्यातूनच सामाजिक कार्याची दिशा व ध्येय तयार झाले.
२. तुमच्या सामाजिक कार्यांचे स्वरूप काय आहे? तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे? समाजात बदलाची दिशा नेमकी कशी असायला हवी, असे तुम्हाला वाटते?
आज माझ्याजवळ सामाजिक क्षेत्राची पदवी, एम. ए, एनजीओ व्यवस्थापन, कामगार व्यवस्थापन, मानवी हक्क व विकास आधी विविध पदव्या असून या शिक्षणाचा वापर मी माझ्या कामात करतो.
आज मी देशातील एक मोठी संघटना असलेल्या NHF या युनियनचा राष्ट्रीय महासचिव आहे जी देशातील २८ राज्यातील १४३ शहरात अगदी मणिपूर, अरूणाचल ते जम्मू, केरळ ते पंजाब आदी ठिकाणी कार्यरत आहे. असंघटित कामगारासोबत महाराष्ट्रभर कार्य करणाऱ्या कामगार एकता युनियनचा मी अध्यक्ष आहे. APMDD, फिलिपाईन्स (Asian People’s Movement for Dept and development) या आंतरराष्ट्रीय संघटनेशी मी भारताचा प्रतिनिधी म्हणून जोडलेलो आहे. या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत आशियातील नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपीन्स, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बाली आदी देशात जावून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे.
भारतात बेरोजगारी तसेच असंघटित कामगार याचे प्रश्न खूप व्यापक आहेत, त्यासाठी काम करण्याची खूप धडपड सुरू आहे. त्यानुसार कामगारासाठी धोरण तयार करण्याची संधी मला अनेकदा मिळाली आहे. मला आनंद आहे की FDI (Forgian direct investment) वर २००९ साली केंद्र सरकारचे धोरण ठरविताना भारताच्या संसदेमध्ये संसदीय समितीसमोर मत मांडण्याची संधी देशातील फक्त २० जणांना मिळाली होती व त्यात माझी निवड झाली होती. ‘२०१४ फेरीवाला कायदा’ असो किंवा केंद्र शासनाची लॉकडाऊन मध्ये प्रसिध्दी झालेली ‘PMSvanidhi योजना’ (ती सर्व राज्यात पोहचविण्यासाठी माझी झालेली निवड) आदी योजना बनविण्यापासून ते त्या प्रत्यक्ष राबविण्यापर्यंत माझे योगदान देता आले याचा मला फार आनंद आणि अभिमान आहे. मागील २० वर्षे देशातील शेकडो शहरात मी युनियन, कामगार संघटना वाढविण्यास मी फिरलो त्यामुळे आज देशातील २० लाख कामगाराचे नेतृत्व करीत असलेल्या संघटनेचा महासचिव पदापर्यंत मी पोहचू शकलो.
समाजपरिवर्तन ही एका रात्रीत घडून येणारी बाब नाही तशीच ती एकाच दिशेने होत जाणारी एकरेशीय प्रक्रियादेखील नाही. ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक वेगवेगळे घटक या प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे समाजपरिवर्तनाची दिशा ठरवताना आपल्याला समग्र भान ठेवावे लागते. सध्याचं राजकारण, देशाची आर्थिक धोरणे, भांडवलशाहीचं बदलतं स्वरूप, पर्यावरणबदल, तंत्रज्ञानात होत असलेले बदल, आणि ह्या सर्वांचा सर्वसामन्यांच्या जीवनावर कळत-नकळत होणारा परिणाम हयाविषयी समाज कार्यकर्त्याने सतत जागृत राहून भान ठेवले पाहिजे. समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणार्या कार्यकर्त्याने हे लक्षात घ्यायला हवं की आज आपण जे काही काम करतोय ते एक आंब्याचं झाड लावण्यासारखं आहे. त्या झाडाला फळं येण्यासाठी कदाचित वीस-पंचवीस वर्षाचा कालावधी लागणार आहे, त्या झाडाच्या सावलीचा लाभ आपल्याला मिळणार नाहीये, तो आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली त्यामुळे आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ताठ मानेने जगत आहोत. मी सामाजिक क्षेत्रात काम करताना या गोष्टीचे सतत भान ठेवतो. सक्षम आणि सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असले पाहिजे. मी माझं काम त्या दिशेने करत आलो आहे.
३. सार्वजनिक क्षेत्रात वावरताना अनेकदा लोकांच्या टिकेचा धनी व्हावे लागते. तुम्हालादेखील असा अनुभव आलाय का? त्याला तुम्ही कसे तोंड दिले? समाजाकडून कधीकधी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशावेळी तुम्ही काय करता? तुम्हाला काम करताना निराशेचा अनुभव येतो का? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता?
तंत्रज्ञानाच्या घोड्यावर बसून जी समाजमाध्यमांची नवी संवाद-व्यवस्था आता निर्माण झाली आहे ती फार घातक आहे असे मला वाटते. त्यामुळे घरी बसल्याबसल्या मोबाइलवर समाजकार्याची खाज भागवणारे नवी समाजसेवकांची पिढी आता निर्माण होत असलेली आपण बघत आहोत. या समाजमाध्यमात जो जोरात, त्याची कार्यकर्ता व विचारवंत म्हणून जास्त ओळख बनत आहे. सामाजिक माध्यमात हिरो बनण्याच्या आणि बनवण्याच्या नादात खरा कार्यकर्ता, खरी चळवळ मात्र लोकांपुढे येत नाही.
याचे एक छोटे उदाहरण मी आपणास देवू इच्छितो. मी स्वतः युवा या आंतरराष्ट्रीय संस्थेचा सल्लागार असल्याने मार्च २०२० मध्ये जसा लॉकडाउन तसे वसईतील गरीब मजुरांची अवस्था पाहून मी युवा संस्थेला मदतीची मागणी केली. युवा संस्थाद्वारे तब्बल ८० टन धान्य तसेच १ टन फराळ मिळाले जे आम्ही समाज सेवा मंडळ, निर्मळ द्वारे हॉल उपलब्ध झाल्याने किलबिल संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तब्बल १०,४३५ कुटुंबांना वाटली ज्याची पूर्ण यादी उपलब्ध आहे. या सर्व कामाचा एकही फोटो काढला नाही किंवा प्रसिध्दी केली नाही. आधीच परिस्थतीमुळे दीन-लाचार बनलेल्या कुटुंबाचे फोटो काढून प्रसिध्दी मिळविणे खरंतर किळसवाणा प्रकार ठरला असता. कोकण पूरग्रस्तांना मदत केली पण त्याची भडक जाहिरात करणे टाळले. आपण समाज सेवा आपल्या समाधानासाठी केली पाहिजे प्रसिध्दीसाठी नाही. पण, आजच्या आभासी जगात समाजसेवा कमी व प्रसिद्धीचा डंका एकदम जोरात अशी परिस्थिती आहे.
वसई वगळता आपणास दुसरा गाव नाही त्यामुळे येथील पर्यावरण वाचले पाहिजे यासाठी आम्ही लढत आहोत. कोळंबी प्रकल्प, पाणथळ जागा वाचाव्यात यासाठी मी व श्री. फ्रान्सिस डिसोझा येथे मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलो. तेथे जनहित याचिका टाकली ज्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील किनारपट्टीला संरक्षण लाभले. २०१६ ते २०२१ असे चार वेळा सदर कोळंबी प्रकल्पावर कारवाई झाली. कोळंबी प्रकल्प पडत नव्हते तेव्हा पैसे खातात असे आरोप, आज पडतात तरी पैसे खाल्याचे आरोप. हे आरोप करणारे प्रत्यक्ष कधी समोर येत नाहीत किंवा तशी त्याच्यात हिंमत नसते. आज वसईतील इतर समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्टच्या नावाखाली जी वेश्या प्रवृत्ती फोफावत आहे ती भुईगावात नाही. हे यश कोणाचे? टीका करणे व टीकेला बळी पडणे सोपे असते परंतु आम्ही लढत असताना, उच्च न्यायालयात याचिका करताना हजारो रुपये गेले, समीर वर्तक सोबत आम्ही तीन वेळा आमरण उपोषण केले ते कोणासाठी? पाणी, भूमिगत वीज, पूर व्यवस्थापन हे सर्व कोणासाठी? आम्ही आंदोलन, उपोषण करीत असताना यांपैकी एकही टीकाकार साथ देण्यास आला नाही, ना कधी आर्थिक मदत केली, ना स्वतः कधी एखादी तक्रार स्वतःच्या नावाने दाखल केली. आज आम्ही लढतो, उद्या आम्ही नाही लढलो तर आम्हाला काय फरक पडणार? पण विचार करा आजच समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांमुळे गावाचे जगणे कठीण झाले आहे. उद्या रिसॉर्ट संस्कृती फोफावली तर काय करणार? असेच आरोप करीत राहिले, साथ नाही दिली तर कोण लढणार? निर्मळ, गास, गिरिजडोंगरी परप्रांतीयांनी भरली आहे. उद्या आम्ही आमचे कुटुंब व माझे काम भले असे पाहिले तर इतका प्रचंड गुरचरण जागा असलेल्या आपल्या वसईला कोण वाली आहे?
गावातील कार्यकर्ते आरोप, साथ नसणे यामुळे शांत झाले तर २५ लाख लोकसंख्या झालेल्या वसईत आपला टिकाव लागेल का? खूप वेळेला नैराश्य येते, खूप वेळेला वाटते की मी राष्ट्रीय पातळीवर कार्य करतो कशाला गावातील पर्यावरण, परप्रांतीय मुद्द्यावर मी लढू किंवा वेळ देवू? त्यात घरातून खूप दडपण असते. पण, दुसरीकडे वाटते की वसई वगळता आपल्याला दुसरा गाव नाही. किमान आपल्या शेवटचा श्वासपर्यंत वसई हरित राहावी, आपले वसईकर सुखात असावे यासाठी संघर्ष अटळ आहे. टीका करणाऱ्या व खोट्या टीकेला बळी पडणाऱ्या ४-५ लोकांसाठी हजारो भुईगावकर व वसईकर यांचे प्रेम – आदर जास्त महत्वाचे आहे व तोच अजून कार्य करण्यास प्रेरणा देत असतो.
४. सामाजिक क्षेत्रात काम करताना बऱ्याचदा आपल्या खाजगी आयुष्यात त्याग सहन करावा लागतो. ती एकप्रकारची तारेवरची कसरत असते. तरीसुद्धा तुम्ही नेटाने सामाजिक काम करत राहता. हा कुटूंब आणि समाज, सामाजिक आणि खाजगी या दोहोंचा तोल कसा सांभाळता? तो सांभाळताना काय अडचणी येतात? त्यांवर कशी मात करता?
कुटुंबाचा तुमच्यावर प्रेम व विश्वास असला की तुम्ही अर्धी लढाई जिंकली असे समजा. सामाजिक कार्य करायचे म्हणजे कुटुंबाला फार वेळ देणे अशक्य. त्यात मी २००६ पासून सातत्याने महिन्यातील २० दिवस देश-विदेशात फिरत असतो. घरी असलो की कायम सामाजिक कामासाठी बाहेर त्यामुळे घरात कधी कधी तणावाची परिस्थिती निर्माण होते. कधी नातेवाईक कडे जाता न येणे, कधी लग्नाला न जाता येणे आदी कारणांमुळे समस्या येतात. कुटुंबासोबत गुणात्मक वेळ देता येत नाही. त्यामुळे वर्षातून किमान २-३ वेळा कुटुंबासोबत देशभर फिरायला जातो. एखादा पूर्ण दिवस फक्त नातेवाईक भेट, एखादा पूर्ण दिवस शॉपिंग, बाहेर जेवण आदिंद्वारे मेळ घालीत असतो. लॉकडाऊन मुळे कुटुंबातील धान्य, साहित्य वाटप मध्ये सर्वांचा हातभार लाभल्याने तीही कसर भरून निघाली.
५. वसईची राजकीय / सामाजिक पार्श्वभूमी ही फार गुंतागुंतीची आहे. चळवळीचा मोठा इतिहास वसईला लाभला आहे मात्र त्याचा राजकीय लाभ उठवण्यात इथल्या चळवळी फार उपयुक्त ठरल्या नाहीत असं दुर्दैवाने दिसते. तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते म्हणून या पार्श्वभूमीकडे कसे पाहता? आजही चळवळींच्या माध्यमातून राजकीय बदल शक्य आहे असे आपणांस वाटते का? एकूणच तुमच्या दृष्टिकोनातून वसईच्या सामाजिक राजकीय चळवळींचं विश्लेषण तुम्ही कसं कराल?
वसईतील सर्व चळवळीचा इतिहास पाहिला तर आपणास दिसेल की
१. नेतृत्व कोण करणार?
२. नेत्याभोवती संघटना – चळवळ गुंतून राहिली.
३. आपण कशासाठी लढतो याचे चळवळीला भान न राहता प्रसिध्दीच्या हव्यासास नेते बळी पडले.
४. एका समाजाचे योगदान तर दुसरा गप्प, मग चळवळ टिकणार कशी?
५. राजकारण हा सर्व संघटना, चळवळ याचं भाग असतो, ते न समजता चळवळीतील कार्यकर्त्यांनीनी एकमेकांना मागे खेचण्यात धन्यता मानली.
या व अशा पद्धतीने प्रसिध्दी व नेतृत्व या वादात वसईतील प्रत्येक चळवळ डोंगराएवढी वर जावून तेवढ्याच जोरात खाली आपटली. चळवळ संपली त्यावर ना चिंतन ना चर्चा. त्यामुळे आज समाजात चळवळीबाबत नैराश्य आहे. वसईत पुढील काही काळ चळवळ उभी राहील व त्यातून राजकीय नेतृत्व तयार होईल याची सुतराम शक्यता नाही. त्यात नव्या पिढीला विदेशी जाण्याचे स्वप्न पडत असल्याने चळवळ इतिहासजमा होणार हे वास्तव आहे.
६. तरूणांसाठी काय संदेश द्याल?
वसईतील तरुण आज विविध समाज माध्यमे, संघटना, पक्ष, करियर यामध्ये विखुरलेला आहे. आज सर्व जाती समाजाचा खरा भूमिपुत्र वसईकर बाहेरील लोकाचे नेतृत्व खांद्यावर घेवून नाचत आहे.
वसईची आजची लोकसंख्या आज २५ लाख आहे. एमएमआरडीए आराखड्यानुसार २०४० साली ती ५० लाख असणार. आपल्या सर्व भूमिपुत्रांची लोकसंख्या आज २.५० लाख आहे. कुटुंब नियोजन, परदेशी जाणे यामुळे २०४० साली ती २ लाख असेल. आजच थोडा पश्चिम पट्टा वगळता वसई वरील आपले नियंत्रण संपले आहे. यापुढील २० वर्षात वसई आपली नसेल, त्यामुळे आता जाती, पक्ष, समाज यापेक्षा वसई व वसईकर तसेच येथील निसर्ग, भूमिपुत्र वाचवा यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. आपले विचार कोणतेही असतील, आपला पक्ष कोणताही असेल, आपली संघटना कोणतीही असेल परंतु वसईकर ही आपली ओळख आपण कायम ठेवली पाहिजे.