मी आहे सोबतीला…
- डॉ. नेन्सी विन्सेंट डिमेलो, गास, वसई
घाईघाईत गरम चहाचा कप मेरीच्या हातावर सांडला. आणि वेदनेची सणक तिच्या मस्तकापर्यंत जाऊन पोहोचली आणि मुखातून आई गss स्वर बाहेर पडला. इतक्यात तिचा पती डेव्हिड स्वयंपाक घरात आला आणि तिच्याकडे त्रासिकपणे पाहत तो पुटपुटला, “भाजलीस का, लक्ष कुठे असते तुझे ? नेहमी तुझी घाईगडबड अन् धावपळ.” मेरीने एक केविलवाणे स्मित केले. मेरीला त्यांच्याकडून आणखी वेगळ्या वागण्याची अपेक्षा नव्हती.
नामांकित बँकेत कॅशियरपदावर असलेली मेरी सालस, सद्गुणी आणि मितभाषी म्हणुन पंचक्रोशीत ओळखली जात होती. त्यामुळे एका गरीब विधवेची एकुलती एक मुलगी मेरी लवकरच घरंदाज घराण्याची सून झाली. मेरी लग्न होऊन सासरी आली, तेव्हा सासू-सासरे, दोन मोठे दिर, जावा, त्यांची चार मुले ह्यांनी भरलेले कुटुंब होते. दोन नणंदा आपल्या सुखी संसारात रममाण झाल्या होत्या. असा हा चांगला गोतावळा पाहून तिच्या आईने आपली मुलगी सुखात पडली असे म्हणत सुटकेचा श्वास सोडला.
मेरीला एवढ्या लोकांची सवय नव्हती पण हळूहळू तिने सगळं ऍडजस्ट केलं. सुरवातीला तिच्यासह जावा आणि सासू हया सर्वात घरकामाची विभागणी झाली होती. पण नवलाईचे नऊ दिवस संपले आणि मेरीच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा तिच्या दोन्ही जावानी घेतला. गोड बोलून जास्तीत जास्त घरकाम तिच्याकडून कसे करवून घेता येईल ह्याकडे त्यांचा कल झुकला. मेरीच्या स्वभावात नकार देणे, उलट बोलणे नव्हते त्यामुळे ती खाली मान घालून कामे करत असे. त्यामुळे कोणतेही काम मेरीनेच करावे असा पायंडा हळूहळू पडत गेला. तिला गृहीत धरले जाऊ लागले. तिच्या स्वभावाचे सगळीकडे कौतुक व्हायचे पण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तिची खूप दमछाक होत होती. मेरीचे वडील तिच्या बालपणीच दारूच्या व्यसनामुळे अकाली मरण पावले होते. तिच्या माहेरची गरिबी, वडिलांची व्यसनाधीनता यावरून सासू-सासरे नेहमी तिला घालूनपाडून बोलत असत. मेरी खाली मान घालून सर्व सहन करीत होती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची काहींना काही कामे सुरू असायचीच.
मेरीला स्वतःकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ मिळत नव्हता. डेव्हिडला नेहमी वाटे की सकाळी आपण घरी असेपर्यंत मेरीने थोडावेळ तरी त्याच्यासोबत बसावं, वेळ घालवावा. सगळी कामे सोडून त्याला वेळ व महत्त्व दयावे असे त्याला मनापासून वाटायचे. तो तिला विनवायचा, “बस ना ग थोडावेळ माझ्याजवळ.” पण तिचं उत्तर ठरलेले असायचे, “नाही रे, किचनमध्ये भरपूर काम पडली आहेत, मी इथे अशी बसलेली दिसले तर घरच्यांना काय वाटेल ? सॉरी ना रे, मलाही वाटत रे पण… प्लीज तू मला समजून घे ना.” तसा रागावून काहीही न खाता निमुटपणे डेव्हिड ऑफिसला निघून गेला. रोज असंच व्हायचं…. डेव्हिड घरी असायचा त्यावेळी मेरी नेहमीच किचनमध्ये असायची.
हळूहळू दिवस अन् वर्षे सरू लागली. मेरीच्या दोन्ही दिरांनी आलिशान बंगले बांधून ह्या जुन्या घराचे व नात्यांचे पाश तोडले. सासू सासरे कोठे राहणार ? कुणाकडे राहणार ? त्यांची जबाबदारी कोण घेणार ? ह्याबाबत कोठे चर्चा नाही की सवाल नाही. कारण मेरी आहेच ना…? पण मेरीचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. कारण सर्वांनी आधीच ठरवले होते की मेरी आहेच ना आईबाबांची सेवा करायला. अशाप्रकारे सासु सासऱ्यांची जबाबदारी न मागता मेरीवर येऊन पडली. दरम्यान मेरीच्या पदरी दोन छोट्यांची जबाबदारी वाढली होती. सुरवातीला दोन वर्षे सासूची मदत झाली. परंतु अचानक सासूला असाध्य आजाराने ग्रासले. तिची औषधे, पथ्य पाणी, सेवाशुश्रुषा हयात ती अधिक गुंतली. दोन वर्षाच्या संघर्षानंतर सासूबाई त्यांना सोडून गेल्या.
सासूच्या निधनानंतर वर्षभरातच सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका बसला. वर्षभरात ते जरा सावरले घरातल्या घरात ते हिंडू फिरू लागले. परंतु दुर्दैवाने परत एकदा दोन वर्षांनी त्यांना अर्धांगवायूचा झटका बसला आणि यावेळी मात्र त्यांनी अंथरूणच धरले. या बाबीला आज तीन वर्षे पूर्ण झाली. हया कालावधीत तिची आई तिला सोडुन देवाघरी गेली, विधवा एकाकी आईची सेवाही तिला नीट करता आली नाही ह्याची खंत तिला कुरतडत होती. अलीकडे मेरी खुपच दमायची. नर्स ठेवणे वा नोकरी सोडणे हे दोन्ही पर्याय तिला परवडणारे नव्हते. घरंदाज घराणे असले तरी तिजोरीत मात्र खडखडाट होता. डेव्हिडची नामांकित कंपनी बंद झाल्यामुळे तो आता एका छोट्या फॅक्टरीत कामाला जात होता.
बँकेत कॅशियरचा जॉब असल्यामुळे मेरीला सतत सावध जागृत राहून काम करावे लागे त्यामुळे रोज तिला प्रचंड बौध्दीक थकवा येई. घरी आल्यावर तिचे पाय पहिले वळत ते तिच्या सासर्याच्या खोलीकडे. त्यांची विचारपूस करून ती त्यांच्या खोलीतील पसारा नीट करी. त्यांचे डायपर बदलणे. रूममधील भांडी आवरणे, रुमची नियमित स्वच्छता करणे, त्यांचे पथ्यपाणी सांभाळणे अशी नानाविविध कामे रांगेत हात जोडून उभी असत. सुट्टी म्हणजे आराम असे इतरांचे समीकरण असले तरी मेरीसाठी सुट्टी म्हणजे दुप्पट काम असे समीकरण बनले होते. सकाळी सकाळी सासऱ्यांना चहानाश्ता लागे. त्यामुळे सुट्टी असली तरी भल्या पहाटे मेरीच्या किचनमध्ये लगबग दिसे.
कुठे बाहेर जाणं नाही की पै पाहुणे नाहीत. डेव्हिडने आता तिला फिरायला बाहेर येतेस का हे विचारणे देखील सोडुन दिले होते. जर बाहेर फिरायला गेले तर तिथे तिचे लक्ष लागत नसे. लवकरात लवकर घरी परतण्यासाठी ती घाई करी आणि त्यामुळे भांडण निर्माण होई. तिच्या जीवाला निवांतपणा ठावूक नव्हता. नवऱ्याची व मुलांची तगमग तिला कळत होती. पण ती तरी काय करणार. कर्तव्य चांगले करते म्हणून कोणी शाबासकी देत नव्हते. पण हयगय झाली तर मात्र तिची चांगली कानउघडणी करण्यात जावा, दिर आणि नणंदा कसूर करीत नसत. नणंदा आल्या की वेगवेगळे सल्ले देत तोंडाचा पट्टा सुरू करीत “रोज सकाळी वेळेवर नाश्ता दे, रात्री हलके जेवण सूप वा ज्यूस दे. दुपारी ज्वारी-बाजरीची भाकरी दे.” इत्यादी इत्यादी. तर मोठा दिर आला की त्याच्या वेगळे बोलणे सुरू होत असे, “हे बघ मेरी, बाबांना जे हवं ते खायला दे. पथ्यपाणी बाजूला राहू दे. आता ते किती काळ आपल्यामध्ये राहणार आहेत.” ऐकावे तरी कोणाचे ?
सासरे मेल्यावर संपत्तीच्या वाटणीत चांगला हिस्सा मोठ्यांना मिळणार होता. किंबहुना जास्तीतजास्त हिस्सा मिळवण्यासाठी कसोशीने प्रत्येक जण प्रयत्न करणार होते यात मेरीला तसूभरही शंका नव्हती. मात्र बाबांच्या आजारपणाचे ओझे त्यांना क्षणभरही नको होते. “बाबा आणि आमच्याकडे…?” अंगावर एखादी पाल पडावी तसे ते प्रत्येकजण हा विचारही झटकून देत होते. या सर्व बाबींचा परिणाम तिच्या शरीरावर व मनावर होत होता. तिची प्रचंड प्रमाणात ओढाताण होत होती. शरीराने ती खंगत चालली होती.
रात्री थकलेल्या अवस्थेत सोफ्यात बसल्यावर रोझरी करताना मेरी येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेकडे पाहत मनात म्हणू लागली, “हे माझ्या प्रभू… तु भारी क्रूस वाहिलास. गेथसेमनी बागेत तुला रक्ताचा घाम आला. तू जसा स्वर्गीय पित्याच्या इच्छेने क्रूस स्वीकारला तसा मीही माझा क्रूस स्वीकारला आहे. कालवरी डोंगरापर्यंतच्या त्या वेदनादायी प्रवासात तुझ्या खांद्यावरील क्रूस जेव्हा तुझ्या कृपेचे सहाय्य मिळताच सिमोन सिरेनिकर याने आपल्या खांद्यावर घेतला. तेव्हा त्या अत्यंत वेदनेच्या अवस्थेतही तुला थोडे फार सुखद, हलके वाटले असेल ना ? हा क्रूस माझ्यापासून दूर कर असं मी कधीच सांगणार नाही. मी माझा क्रूस नाकारत नाही. पण मानव असल्यामुळे मी कधी कधी दुर्बल होते. मीही तुझ्यासारखी क्रूसाखाली पडते, अगतिक होते. हे प्रभो, मला मदत कर. माझी उमेद संपली आहे. हा क्रूस मी किती काळ वाहायचा आहे. माझे शरीर क्षीण झाले आहे. माझे जीवन असेच संपणार का ? स्वर्गीय पित्याने तुझ्यासाठी सिमोन सिरेनिकर पाठवला ना ? हे पित्या, कधी मला सिमोन सिरेनिकर भेटेल का ?”
मेरीची नजर आल्तारावरील येशुच्या नजरेला भिडली. येशु मंद स्मित करीत म्हणाला, “मेरी, तू क्षणभर मदत करणाऱ्या सिमोनच्या प्रतीक्षेत का आहेस ? मी तर तुझ्यासोबत सतत आहे. तूझ्या बँकेतील कामात, प्रवासात, घरकामात सगळीकडे मी तुझ्या सोबत असतो. सर्व वाईटापासून, अनिष्टापासून, दृष्ट प्रवृत्तीपासून मी तुझे सतत संरक्षण करतो. कितीतरी वेळा तूझी सर्व ओझी मी आपल्या खांद्यावर घेत असतो. तरी तुझा क्रूस तुला घेऊन चालावे लागेल कारण तूला स्वर्गात नेण्याचे ते योग्य साधन आहे. मेरी, भिऊ नकोस. ऊठ, उचल तुझा क्रूस. तुझी ताकत, तुझे सामर्थ्य बनून मी तुझ्या सोबत चालतो आहे .”