प्रिय आईस…
- आशा गोन्सालवीस, मराडी, उमराळे.
प्रिय आईस,
तू पाठवलेले लोणचे मिळाले. लोणच्याची बरणी किचनमध्ये ठेवताना, तू केलेली सगळी मेहनत आठवली. परातीत लोणच्याच्या मसाल्यात कैरीच्या फोडी कालवताना तुझ्या बांगङ्यांचा झालेला किणकिणाटही ऐकू आला.
माझा हात अजून त्या बरणीपाशी रेंगाळलाय आणि मनाने तुझ्या आठवणीचे एकेक पदर उलगडायला सुरूवात केली आहे. मी आई झाल्यापासून माझे मन सतत “तू आणि माझ्यातली आई” असा पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. आणि हो, प्रत्येक वेळी तूच जिंकतेस.
बघ ना.. मुलांचा अभ्यास, प्रोजेक्ट, होमवर्क हे सर्व करताना माझी खूप ओढाताण होते. पण तू? प्रगतीपुस्तकात लाल रेषा असली म्हणजे नापास इतकंच माहित असलेली तू, आम्हा पाच भावंडाचा अभ्यास कसा ग घ्यायचीस?
अध्यात्म कोणी तुझ्याकडून शिकावे… आपल्या छोट्याशा घरात दिवसाउजेडी आम्हाला अभ्यासाला बसवून तू स्वयंपाकाला लागायची. आंघोळी आटोपल्यावर सर्वांनी एकत्र बसून रोझरी करायची. इथेही तू जिंकलीस कारण आमच्या रोझरीच्या वेळा टिव्ही, कॉम्प्युटरने घेतल्या आहेत. त्यातून वेळ मिळाला तर…
आम्ही साधी ट्रेन चुकली तरी चिडचीडी होते. तू तर संकटाचे डोंगर लिलया पार केलेस, शांत पणे. पुन्हा तू जिंकलीस…
तुझे आणि बाबांचे भांडण तर मला कधी दिसले नाही, पण मला असे प्रत्येकवेळी समजून घेणे नाही जमत, अगं इतकच काय मी जेव्हा आई झाले तेव्हा माझ्या उशाशी बसून तू विचारले, “त्रास झाला का? मी डोळयांनीच नाही बोलले, पण तुझी तर पाच बाळंतपणं झाली, तुला किती त्रास झाला असेल ?
तुझ्या हातचे लोणचे, केळीच्या पानातील पानगी, रेवळी तुझ्या नातवडांना खूप आवडते. त्यापुढे मी बनवलेला केक, पिझ्झा पुडींग फिके पडतात. पुन्हा तूच जिंकलीस…
शेवटचे सांगू, माझ्यातल्या “आई”ने पंचवीशी पार केली आहे पण तुझी “म्यॅच्युरिटी” तिच्यात नाही अजून.
तुझ्यासारखी आई मला होता येईल का ?
तुझ्यासारख्या सर्व आयांना समर्पित…