जागृती निस्वार्थी चळवळ
- जॅक गोम्स
‘आई’, चुळणे, वसई. मोबाईल – 9028195888
१२ सप्टेंबर १९८८ हा दिवस चुळणे गावासाठी किंबहुना पंचक्रोशीतील गावांसाठी क्रांतिकारक दिवस ठरला, ह्या दिवशी ‘इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार’ हे ध्येय असणाऱ्या व ‘स्वतः जागृत राहून व इतरांना जागृत करणे’ हे तत्व ठेवणाऱ्या “जागृती” ह्या सेवाभावी संघटनेची निव ठेवली गेली. गेली ३४ वर्ष जागृती सेवा संस्था अखंडपणे जनहिताचे, जनजागृती, जनप्रबोधनाचे काम न थांबता करत आहे. ह्या गोष्टीचा संघटनेचा पहिला अध्यक्ष ह्या नात्याने मला रास्त अभिमान आहे. “जागृती”चा तसा इतिहासही आहे.

१९८६ साली फातिमा माता चर्चमध्ये फादर मायकल जी ह्यांची प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली. फादरांचा पिंड फक्त अध्यात्मच नव्हता तर त्याला समाज जागृतीची किनारही होती. त्या वर्षी चुळण्यात ग्रामपंचायत निवडणूक होती, फादरांचा मध्यस्थीने ती निवडणूक बिनविरोध झाली. पण गावात ज्याप्रकारे पंचायतीच्या माध्यमातून कामं व्हायला पाहीजे होती, ती होत नव्हती. विरोधी पक्ष आधीच संपल्यात जमा होता, सत्ताधारी पक्षाची मनमानी चालू होती.अशा वेळी फादरांनी दृढीकरण सांक्रामेंत घेतलेल्या १२ युवकांना एकत्र घेऊन, जागृती संघाला पुनर्जन्म दिला. त्याचे अध्यक्षपद मला दिले. ह्या अगोदर जागृती संघाची स्थापना केली होती पण कार्यकर्ते शिक्षण व करियरमध्ये गुंतल्यामुळे अगदी थोड्या अवधीतच तो बंद पडला.
मी अध्यक्ष व फादर सल्लागार पदावर रुजू झाल्यानंतर आम्ही तरुणांना संघटित करायला सुरवात केली. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर शिबीरे, पत्रके, बिहार भूकंपग्रस्तांसाठी मदत, ग्रामपंचायत व इतर सामाजिक संस्थेतील अन्यायाविरुद्ध बोर्ड लिहिणे, दरोड्यांच्या विरोधात मोर्चा हे सर्व करत असताना आमच्या चुळण्यात निनावी पत्रकाचा सुळसुळाट सुरू झाला. काही लोक, ज्यांच्यात हिंमत नव्हती ते जागृतीच्या नावाने दुसऱ्याचे नावे निनावी पत्रक काढून संघटनेला व फादरांना वेठीस धरू लागले, बदनाम करू लागले. अशात फादर मायकल जी ह्यांनी एके रविवारी जागृती सल्लागार पदाचा राजीनामा दिला. संस्थेची अवस्था त्यावेळी वादळात सापडलेल्या होडीसारखी झाली होती, तेव्हा पीटर डायगो डिसोझा ह्यांनी सल्लागारपद सांभाळले व संघटनेला आधार दिला.
हे सर्व काम करत असताना आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला, लोक हिरीरीने आमच्याकडे समस्या निवारण्यासाठी येऊ लागले व आम्ही आमच्या मर्यादा सांभाळून लोकांना मदत करत होतो. आम्ही हरित वसई, निर्भय ह्यांच्याशी जोडले गेलो. फादर मायकल जी, फादर दिब्रिटो, श्री. मार्कूस डाबरे, श्री. मनवेल तुस्कानो, कै. विलास विचारे ह्यांचे मार्गदर्शन घेत राहिलो. चुळण्यात महानगरकार श्री. निखिल वागळे, प्रा. पुष्पाताई भावे, प्रा. गोपाळ दुखंडे, संगणक तज्ञ श्री. अच्युत गोडबोले, श्री. कपिल पाटील, श्रीमती उल्का महाजन, बिशप थॉमस डाबरे, पत्रकार हेमंत देसाई, डॉ. ब्रायन पिंटो, पत्रकार श्री. निलू दामले, नामदार मोहन पाटील, फादर दिब्रिटो, फादर मायकल जी, आमदार विवेक भाऊ पंडित, श्री. मनवेल तुस्कानो, श्री मार्कूस डाबरे, प्रा. सिसिलिया कार्व्हालो, क्रिकेटपटू हेमंत वायगणकर, प्रा. डॉमाणिक लोपीस, कवी सायमन मार्टिन, लेखक संजय पवार, आमदार चंद्रशेखर प्रभू, श्री. गजानन खातू, युद्ध पत्रकार मिलींद गाडगीळ, श्री. राजू परुळेकर, श्रीमती वैशाली पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार स. गो. वर्टी सर, पी. व्ही. गोम्स, फादर सॅबी डायस, फादर वेन्सी डिमेलो, सौ. मुग्धा दाभोलकर ह्या लोकांची ह्या चौतीस वर्षात वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली.
खरी गंमत म्हणजे १९८८ साली स्थापन झालेल्या ह्या संघटनेने १९९२ साली झालेल्या चुळणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागांपैकी सात जागा जिंकून जागृतीचा झेंडा ग्रामपंचायतवर रोवला. मी वयाच्या तिसाव्या वर्षी गावचा सरपंच झालो. आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करत असताना आमचे गाव नगरपरिषदे सामील झाले. जिथे तत्वज्ञान चालत नाही, तिथे प्रामाणिक काम चालत नाही. तिथे लागते विटॅमीन M ची गरज, ती आमच्याकडे नव्हती. सरपंच असताना मी कंझ्युमर सोसायटीचा उपाध्यक्ष होतो पण दोन टर्म झाल्यानंतर मी सोसायटीवर नवीन लोकांसाठी जागा सोडली व आमच्या जागृतीचा तो आता अलिखित नियम झाला आहे. जी व्यक्ती एखाद्या संस्थेवर निवडून गेली की ती तिथे दोन टर्म काम करते, तिसर्यांदा उभी राहत नाही. उदाहरण द्याचे तर कॅथलिक बँकेवर बर्नड डिसोझा, ख्रिस्तोफर रॉड्रीग्ज. काहिकांना आपली खुर्ची सोडवत नाही, ही लोकं स्वत:हून बाजूला झाली हे विशेष.
नगरपरीषद झाल्यानंतर काही वर्षात, चुळण्याच्या किंबहूना वसईच्या विकासाला जोरदार सुरवात झाली होती. चुळणे गाव स्टेशनजवळ होते व गावातील लोकांच्या जमिनींवर विकासकांची वक्र दृष्टी होती. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता शहराचा विकास. आम्ही विकासाच्या विरोधात तेव्हाही नव्हतो व आजही नाहीत. पण नियोजन नावाची काही चीज असते ना? त्याचा सत्ताधारी लोकांना विसर पडला आहे. कॉक्रीट जंगल म्हणजे विकास. ह्या विकासासाठी जिथे तिथे अनिर्बंध माती भराव सुरू झाले, पावसाळ्यात पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग काही ठिकाणी बंद झाले तर काही ठिकाणी अरुंद झाले. पिण्याच्या पाण्याची टाकी कधीच भरली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा, गावात पूर येऊ लागला. लोक पावसाळ्यात तीनतीन चारचार दिवस घरात बसू लागले. लोकांनी आपली राहती घरे तोडून पुन्हा नव्याने बांधायला सुरवात केली. पण पावसाळ्यात त्याचा पाय पाण्यात पडल्याशिवाय काही पर्याय नाही. विकासाच्या नावाखाली चुळणे गाव भकास करून टाकले. पावसाळ्यात पूर व चुळणे गाव हे एक घट्ट नाते तयार झाले आहे. संपूर्ण चुळणे गाव हा शेतीप्रधान गाव म्हणून ओळखला जायचा, आज पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही म्हणून संपुर्ण शेती नापीक झाली आहे. ह्यावर काही दलालांचे लक्ष गेले व त्यांनी काळ्या आईची विक्री मांडली.
महत्वाचे म्हणजे जागृतीच्या जन्मापासूनच आम्ही वसईत झालेल्या प्रत्येक आंदोलनात तनमनधनाने सहभागी झालो. मग ते सिडको आंदोलन, कोला आंदोलन, एसटी बचाव आंदोलन, गाव बचाव आंदोलन, महानगरपालिकाविरुद्ध धरणे आंदोलन, पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, पावसाळ्यात येणाऱ्या पुरासाठी धरणे आंदोलन ह्यात सहभाग दिला. आम्ही संघर्ष करत राहिलो व करत आहोत. हे सर्व करीत असताना गावच्या व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टमध्ये “श्रावणोत्सव” कला क्रीडा महोत्सव साजरा करू लागलो. पंधरा दिवस चालणाऱ्या ह्या महोत्सवात रंगकाम, सामूहिक नृत्य, समूहगान, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ह्याचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करतो. लोकांच्या करमणुकीसाठी मुंबईच्या व्यावसायिक नाटकाचे गावात आयोजन करणे. ह्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचा कार्यक्रम, संजय नार्वेकर, भरत जाधव, निर्मिती सावंत, प्रशांत दामले, सागर कारंडे, संजय खापरे अशा लोकप्रिय कलाकारांची पायधूळ गावाला लागली व लोकांना त्यांचा अभिनय पाहता आला.
हे सर्व करीत असताना महानगरपालिका, पंचायत समिती, MSEB, पोलीस खाते व इतर सरकारी यंत्रणांबरोबर गावच्या समस्यांबाबत पत्रव्यवहार करणे, चर्चा करणे. गेल्या वर्षी पुराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी, आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांच्या बरोबरही मिटींग केली.
सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्ष मजबूत असणे गरजेचे आहे. पण आजकाल विरोध नकोच, एकहाती सत्ता ह्यादृष्टीने सर्वत्र पावलं पडताना दिसत आहेत. त्यादृष्टीने आम्ही महानगरपालिका निवडणूकीत भाग घेतोय, आजपर्यंत आम्हाला यश मिळाले नाही. पण जेव्हा महानगरपालिका झाली तेव्हा चुळणे गाव हे महिला राखीव वॉर्ड म्हणून आरक्षित झाले तेव्हा सौ. किरण चेंदवणकर ह्यांना जनआंदोलनच्या तिकीटवर निवडून आणले. आज सांगायला अभिमान वाटतोय. आजच्या घडीला आमचे अनेक कार्यकर्ते वसईतील इतर संस्थांवर सुद्धा नेतृत्व करताना दिसतात. त्यात प्रामुख्याने बर्नड डिसोझा, ख्रिस्तोफर रॉड्रीग्ज, चार्लस रिबेलो, संदीप घोन्सालवीस, जार्विस गोम्स, थॉमस डाबरे, मायकल घोन्सालवीस, जो फरोझ, ब्रिस्टन घोन्सालवीस, डग्लस गोम्स, राजेश घोन्सालवीस, डॉन डिकोष्टा, सुनील फरोझ आदींचा समावेश आहे. चौतीस वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षत झालेले रूपांतर खूप आनंददायी आहे.
हे सर्व करताना पैसा पाहिजे. सर्व सोंग आणू शकतो पण पैशाचे सोंग आणू शकत नाही. हे त्रिकाल सत्य आहे. त्यासाठी आमचा प्रत्येक सभासद ECS च्या रूपाने दरमहा ३०० ते ५०० रु. वर्गणीच्या रूपाने कॅथलिक बँकेत भरतो. ह्या कामी कॅथलिक बँक, कंपॅनियन पतपेढी आम्हास जाहिरातीच्या रूपाने मदत करते. आज संस्था रजिस्टर आहे व संस्थेकडे 80G सर्टिफिकेट आहे. एकदम पारदर्शक संघटना. त्यामुळे आमच्या कुणाच्या हृदयाचे स्पंदन वाढत नाही.
आज जागृतीची तिसरी पिढी काम करते आहे, आम्ही आमच्या जागृतीच्या स्वतःच्या घराच्या प्रयत्नात आहोत. लवकर आमचे तेही स्वप्न साकार होईल अशी आशा आहे. आज मी आपल्या वसईतील कॅथलिक समाजा कडे पाहतोय तेव्हा ,आपला समाज शिक्षण, अर्थकारण ह्यामध्ये बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाला आहे. आपले तरुण खूप उच्चशिक्षित होत आहेत, पण त्यांचे लक्ष परदेशात आहे. तेही काही चुकीचे नाही.
एखादी संस्था काढणे खुप सोपं असत, पण ती टिकवणे व मोठी करणे फार कठीण आहे. एकत्र या, एकत्र बसा, ईगो ठेऊ नका, संवाद करा व प्रश्न सोडवा. त्याचप्रमाणे आपल्या जडणघडणीत चर्चचा खूप मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. इथे जर मिशनरी आले नसते तर आपली काय स्थिती असती ह्यावर चिंतन करा…
आम्ही चळवळीत भाग घेतला तेव्हा वसईमध्ये जाण आली. पूर्वीसारखे आता आंदोलने, मोर्चा, धरणे होत नाहीत. सर्वजण सुशेगात होत चालले आहेत. क्रांती झाली पाहिजे, क्रांतिकारक जन्माला आले पाहिजेत पण ते माझ्या घरात नको, दुसर्यांच्या घरात आणि ही वृत्ती वाढत चालली आहे. सर्वजण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छितात. लोक अन्यायाविरुद्ध बोलायचे कमी झाले आहेत. थोडक्यात लोक पेटून उठायचे थांबले आहेत म्हणून राजकारण्यांचे फावले आहे. पहिला फक्त चुळणा बुडत होता, आता संपूर्ण वसई बुडत आहे. उठा जागे व्हा, विचारा जाब सत्ताधारी लोकांना, गेल्या तीस वर्षात आमची सुदंर वसई तुम्ही कुठे नेवून ठेवली आहे ?
मित्रानो अजून उशीर झालेला नाही. आपल्या पुढच्या पिढीसाठी सुदंर वसई राखून ठेवायची असेल, तर वेळीच जागे व्हा. रात्र वैऱ्याची आहे. मोजक्या लाभार्थ्यांना बाजूला करून वसईच्या भविष्यासाठी एकत्र येऊ या, लढू या. जागृती ही ज्वाला आहे, मृतवत असलेल्या समाजाला जागवणारी पेटती मशाल आहे, ती अखेरपर्यत प्रकाश देत राहणार व समाजातील अंधार दूर करत राहणार.
जय जगत जय जागृती.