ख्रिस्ती साहित्य संमेलने – काही गोड, काही कडू  – कामिल पारखे

ख्रिस्ती साहित्य संमेलने – काही गोड, काही कडू 

  •  कामिल पारखे

मोबाईल – ९९२२४१९२७४

camilparkhe@gmail.com

         मुंबईत १९१५ साली भरलेल्या नवव्या मराठी साहित्य संमेलनात ‘खिस्ती लोकांनी भाग घेतला पाहिजे’ असा आग्रह रेव्ह. टिळकांनी धरला होता. “आम्हांला एक लहानसे सुंदरसे तळे किंवा सरोवर बनायचे नाही” असे प्रतिपादन रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी त्याच संमेलनात केले होते. त्या पाठोपाठ कवि टिळक नाट्यसंमेलनाचे अध्यक्षसुद्धा झाले. टिळकांच्या अशा आग्रही प्रतिपादनामुळे महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा विचार टिळकांच्या कवितेचे संपादक रेव्ह. भास्करराव उजगरे यांच्या मनात किमान दहा वर्षे तरी आला नाही असे सुनील आढाव यांनी ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा’या पुस्तकात लिहिले आहे.

         टिळकांच्या निधनानंतर काही वर्षांनी पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले. त्यानंतर आजतागायत सव्वीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १९९२ पासून दहा मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने झालेली आहेत.

         अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात तुलनात्मकरित्या पाहू गेल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

         मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे, आठ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या संत मुक्ताबाईंपासून ही स्त्रीसाहित्याची परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र सहाच स्त्रियांना मिळाला आहे. कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (कऱ्हाड), शांता शेळके (आळंदी ), विजया राजाध्यक्ष (इंदूर) आणि अरुणा ढेरे (यवतमाळ २०१९) आणि आताच्या संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर या त्या सहा महिला संमेलनाध्यक्ष.

         याउलट केवळ पस्तीस संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा महिला संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत, यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या.

         आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी काही संमेलनाध्यक्ष एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊ-बहीण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य इत्यादी.

         पुण्याच्या फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विद्याभवन हायस्कुलचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो होते तर मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक रोझरी चर्चचे फादर गॅब्रिएल डिसोझा होते. अहिल्यानगर येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे होते.  त्याचप्रमाणे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष बिशप पॉल दुपारे (नागपूर), श्रीरामपूरच्या दहाव्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके होते. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे, हेच यातून दिसून येते.

         मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे.

         पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, मालवणच्या निरंजन उजगरे अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे उदघाटक त्यावेळचे शिवसेनेचे स्थानिक आमदार नारायण राणे होते. समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. जालना येथील १९९३च्या दुसऱ्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे मुख्य वक्ते समाजवादी नेते, माजी मंत्री भाई वैद्य होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात साहित्यिक वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.

         वादविवाद, आरोपप्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ‘ख्रिस्ती साहित्य’ या शब्दाची व्याख्या, येशू ख्रिस्ताला विद्रोही संबोधने योग्य आहे का, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसावा आकडा आहे. तसे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्याबाबत म्हणता येणार नाही. इथे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणाऱ्या साहित्यिकांचे प्रमाण भरपूर आहे. या दोन्ही प्रवाहांमध्ये कडेकोट अभेद्य भिंती कधीही राहिल्या नाहीत.

         विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले य. दि. फडके नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तसेच नव्वदच्या दशकात ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो २०२० साली अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. याचप्रमाणे सत्तरच्या दशकात दोन मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवणारे सत्यवान नामदेव सूर्यवंशी हे नव्वदच्या दशकात दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले.

         याउलट दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आधी अध्यक्ष झालेल्या ग्रामीण साहित्यिक देवदत्त हुसळे यांची नंतर मराठी ख्रिस्ती साहित्य संमलेनाचे अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याचप्रमाणे रामकुंवर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे १९८१ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले डॉ. एस. के. हळबे दशकानंतर त्याच शहरात अरविंद निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचेसुद्धा स्वागताध्यक्ष होते.

         संमेलनाध्यक्ष निवड पद्धत, संमेलनांसंबंधी विविध वाद याबाबत मुख्य प्रवाहाच एक छोटासा प्रवाह असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन याबाबतीत काय म्हणून मागे राहिल? मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत आहे, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात.

         आलटूनपालटून कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष या अलिखित संकेताचे मध्यंतरी काहीकाळ इमानेइतबारे पालन करण्यात आलेले नाही. नाशिक येथील संमेलनाध्यक्ष सिसिलिया कार्व्हालो या कॅथोलिक साहित्यिकाने भूषवल्यानंतर अहिल्यानगर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रोटेस्टंट पंथीय देवदत्त हुसळे झाले. त्यानंतर लागोपाठ झालेल्या दोन साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – अनुपमा निरंजन उजगरे आणि सुभाष पाटील – हे दोघेही प्रोटेस्टंटच होते.

         त्याआधीसुद्धा असाच प्रकार एकदा झाला होता. कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यानंतर प्रोटेस्टंट निरंजन उजगरे संमेलनाध्यक्ष झाले, त्यांच्यानंतर लागोपाठ दुसरे प्रोटेस्टंट सुधीर देवीप्रसाद शर्मा संमेलनाध्यक्ष झाले होते.

         आलटूनपालटून कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष या पायंड्यातून वास्तवात अजाणता आणखी एक वेगळाच अलिखित संकेत निर्माण झालेला असतो. तो म्हणजे कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसई उर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत. आतापर्यंत होऊन गेलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक साहित्यिकाची निवड झालेली नाही. 

         मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत एकही पुस्तक नव्हते असे अनेकदा झाले आहे. याचे कारण म्हणजे निवडणुकीशी निगडित असलेले हितसंबंधींचे राजकारण, संमेलनाध्यक्षपद आलटूनपालटून आपापसांत वाटून घेण्यासाठी ख्रिस्ती साहित्य परिषदेत सक्रिय असणाऱ्या व्यक्तींनी वेळोवेळी केलेली हातमिळवणी.

         याच कारणास्तव पात्र असलेले अनेक व्यक्तींनी निवडणुकीच्या फडातून सपशेल माघार घेतली आहे. याचा फायदा साहित्यिक योगदानाच्या निकषावर अपात्र असलेल्या व्यक्ती संमेलनाध्यक्षपदी आरूढ झालेल्या दिसतात. रमण रणदिवे, जोसेफ तुस्कानो, फ्रान्सिस कोरिया आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे या संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.

         मराठी ख्रिस्ती साहित्यविश्वात अनेक वर्षांपासून सातत्याने लिहित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागांतल्या बार्देसकर मंडळींचा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत आजपर्यंत पुरेसा सहभाग झालेला नाही.  त्याचप्रमाणे कोकणातील सिंधुदुर्ग, मालवण आणि वेन्गुर्ला परिसरातील मोठ्या संख्येने असलेला आणि मूळचा गोवन असलेला  ख्रिस्ती समाज आजही या साहित्यिक चळवळीपासून लांब राहिलेला आहे.  

         मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने अनेकदा ठराविक काळानंतर होत नसल्याने या संमेलनांचा हा प्रवाह अधूनमधून डबके, सरोवर होते कि काय अशी शंका येते. गेली अनेक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने दरवर्षी भरवली जातात, तसे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे नाही. सन १९२७ नंतर वेगाने लागोपाठ चार साहित्य संमेलने झाली, त्यानंतर पन्नासच्या दशकात पुन्हा तीन संमेलने एक वर्षांच्या अंतराने झाली. मात्र  पुन्हा १९७२ सालापर्यंत या आघाडीवर एकदम सामसूम होती. सुरुवातीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर पन्नाशीच्या दशकात ख्रिस्ती साहित्य संमेलने दरवर्षी लागोपाठ आयोजित केली जायची. आता ही परंपरा खंडित झाली आहे. सोलापूर येथे झालेल्या २०१४ साली झालेल्या संमेलनानंतर पुढचे संमेलन तब्बल नऊ वर्षानंतर २०२२ साली घेण्यात आले. 

         याआधीचे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन पौलस वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे २०२२ साली झाले होते, त्यानंतर तीन वर्षे साहित्य संमेलने झालीच नाही. आता नाशिक येथे २०२६च्या वर्षारंभात सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताविसावे साहित्य संमेलन होत आहे. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे यजमानत्व स्विकारण्यात राज्यातील विविध शहरांतील साहित्यप्रेमी, हौशी कार्यकर्ते आणि संस्था हिरीरीने पुढे येत असतात.  त्याशिवाय साहित्य संमेलनाध्यक्ष होण्यास अनेक जण रांगेत असतात. या संमेलनांचे डबके किंवा सरोवर होऊ नये यादृष्टीने नियमीतपणे दरवर्षी साहित्य संमेलने घेणे आवश्यक आहे. मराठी ख्रिस्ती साहित्य विश्वात त्यामुळे चैतन्य निर्माण होईल. मात्र दरवर्षी ही साहित्य संमेलने भरवण्यात मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे पदाधिकारी नाखूष असतात हे योग्य नाही.