रमाचा शिक्षक दिन – क्लेमेंट डिमेलो

रमाचा शिक्षक दिन

  •  क्लेमेंट डिमेलो, नंदाखाल

9082318532/9011574814

         रमा ही माझी मुलगी. सर्व जिल्ह्यात उत्तम जलतरुणपटू म्हणून नाव कमावलेली व आता इयत्ता बारावीत कला शाखेत शिकत असलेली. काही  दिवसांपूर्वीच तिने माझ्याकडे गावी जाण्याचा हट्ट केला. तसे आम्ही गणपतीच्या सुट्टीत गावी कोकणात जातोच. पण ह्यावेळेला तिच्या मनात काहीतरी बेत होता हे नक्की! पण काय ते मला कळेना! मी तिला तसे विचारलेदेखील; पण तिने मला काही सांगितले नाही. मग मी ही जास्त खोलात शिरलो नाही. ज्या दिवशी आम्ही गावी जाणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी तिने भरपूर खरेदी केली होती. ह्या वेळेला मात्र तिने खरेदीसाठी स्वत:चा पॉकेटमनी व तिला निरनिराळ्या ठिकाणी मिळालेली बक्षिसाची रक्कम वापरली होती.

         प्रवासात असताना मी न राहवून तिला विचारलेच, “रमा, काय चाललंय तूझं? इतकी खरेदी का?” तेव्हा तिने माझ्याकडे पाहत दोन शब्द उच्चारले, “गुरूदक्षिणा”  अन मग पुढे म्हणाली, “आता आणखी काही विचारू नका?” तिने विचारांचा भुंगा माझ्या डोक्यात सोडून दिला. तो आता गावी पोहचेपर्यंत माझा मेंदू पोखरणार होता हे नक्की!

         शेवटी एकदाचे गावी पोहचलो. गावच्या घरात स्थिरस्थावर झालो. मोठ्या भावाकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. तिथेही जाऊन आलो. सगळे देवाची मूर्ती आणायला जाण्यासाठी जय्यत तयारी करत होते. मी आणि रमानेही त्यात सामिल व्हायचे ठरवले. सगळे संध्याकाळी निघणार होते. तो पर्यंत दुपार हाती होती. मी घरी आल्यावर रमाने विचारले, “बाबा, आपण वाडीत जाऊ या का?” मी क्षणात होकार दिला. गावी आल्यावर मी आणि रमा पाय मोकळे करायला आमच्या वाडीत जायचो. तिथल्या आमराईत फिरायला आम्हांला आवडायचे. जाताना रमाने सोबत अनेक पिशव्या घेतल्या. तिने खरेदी केलेल्या सर्व वस्तू त्यात होत्या.

         “अगं, ह्या सर्व वस्तू का सोबत घेते आहेस?”

         “म्हादू काकांसाठी!” तिने माझा अंत न पाहता गौप्यस्फोट केला.

         वाडीत म्हादू काकांच्या झोपडीसमोर पोहचलो; तेव्हा म्हादूकाका शेतीच्या अवजारांची काहीतरी डागडुजी करत होते. आम्हां दोघांना पाहून ते उठले. त्यांनी हात जोडून नमस्कार केला. रमाने त्यांच्या पायांना स्पर्श केला, अन तिच्या हातातल्या पिशव्या माझ्याकडे देत त्या म्हादूकाकांना द्यायला सांगितल्या. मी त्या पिशव्या म्हादूला दिल्या. तिने म्हादूचे हात हातात घेऊन म्हटले, “म्हादूकाका, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” मी आणि म्हादू ताडमाड उडालो. मी गोंधळलो होतो त्याच्या कितीतरी पटीने म्हादू गोंधळला होता. अन मग रमाने आमचा गोंधळ दूर केला.

         “बाबा, म्हादूकाका माझे पहिले शिक्षक! ज्यांनी मला विहिरीत पोहायला शिकवले. तुम्हांला आठवते…? मी पोहायला शिकावे ही तुमची इच्छा होती. मला ही आवड होती. मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही शहरातल्या स्विमींगपूलवर माझी नाव नोंदणी केली. मी ही उत्साहाने तुमच्या सोबत पोहायला शिकायला निघाले. मात्र  स्विमींगपूलवरील बाकीच्या मुलांचे ते रडणे, पाण्यात उतरायला भीतीने किंचाळणे.. आणि पाण्यात टाकलेले ते ट्यूबस् पाहून मी ही घाबरले.. अन भोकांड पसरले.. स्विमींग शिकवणार्‍या त्या माणसाने माझी खूप समजूत घातली पण मी माघार घेतली… पण तुमच्या मनात मात्र होते की, मी शिकले पाहिजे….

         अन मग आपण दिवाळीच्या सुट्टीत गावी आल्यावर, तुम्ही मला वाडीत घेऊन आलात. इथल्या एका खोल विहिरीतून अनेक मुलांचा आवाज येत होता. पण त्यात भीती व रडणे नव्हते. उत्साह, आनंदाचे चित्कार होते. तुम्ही मला इथे घेऊन आलात. विहिरीत म्हादूकाका देखील पोहत होते. नवख्या मुलांना पोहायला शिकवत होते. आपण काठावरून आत डोकावत होतो. ते म्हादूकाकाने पाहिले. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक? ते विहिरींच्या पायर्‍या चढून वर आले. त्यांनी तुमची परवानगी घेतली. पण मी घोरपडीसारखी तुम्हांला चिकटुन बसली होती. म्हादूकाकाने मला प्रेमाने जवळ घेतले. मगरीच्या पाठीवर बसलेल्या माकडाची गोष्ट सांगितली. तसे तुला माझ्या पाठीवर बसायला आवडेल का? म्हणून विचारले, ती गोष्ट ऐकून मी खुदकन हसले. आणि म्हादूकाकांच्या गळ्याला मिठी मारली.

         ते मला त्या स्विमींगपूलवरच्या शिक्षकापेक्षा जवळचे वाटले. त्यांच्या गळ्याला मिठी मारून विहिरीतल्या पाण्यात त्यांच्यासोबत चार पाच गोलाकार फेर्‍या मारुन झाल्यावर मला हिंमत आली. श्यामची आई पुस्तकात वाचलेली, सुकडी कंबरेला बांधून पोहायला शिकवणारी पद्धत व गंमत प्रत्यक्षात अनुभवली व गावच्या मातीतला एक आत्मविश्वास घेऊन शहरात परतले…..”

         रमा बोलत होती. मी आणि म्हादू दिग्मुढ होऊन ऐकत होतो. शिक्षक दिनाला अद्याप वेळ होता… तोपर्यंत आम्हांला गावी थांबता येणार नव्हते; पण माझ्या रमाने मात्र एक अनोखा शिक्षकदिन आजच साजरा केला होता. माझे व म्हादूचे डोळे भरून आले होते.