​सुज्ञ लेकीचं आईस पत्र ! – अॅड. जॉन रॉड्रिग्ज

सुज्ञ लेकीचं आईस पत्र !

  •  अॅड. जॉन रॉड्रिग्ज, 9821116898

तीर्थरूप आई हिस,

आमच्या प्रगती काँ. ऑप. सोसायटीतर्फे मातृपितृ दिन साजरा झाला. लहान व तरुण मुलामुलींनी मातापित्याची महती गाईली. आईवडिलांनी केलेल्या उपकाराची परतफेड करताच येणार नाही, असे सगळ्या मुलामुलींनी निक्षून सांगितले. बरं वाटलं ऐकून… परंतु, नंतर तुझ्याविषयी माझ्या मनात असलेला राग उफाळून आला. कारण, लेकी प्रेमापोटी तू अप्रत्यक्षरीतीने तुझं संसारातील कर्तव्य बजावीत असताना, एक जबाबदार आई म्हणून मी माझ्या जीवनात (लग्नानंतर) माझं कर्तव्य कसं पार पाडावं, ही गोष्ट तू पूर्णतः विसरूनच गेलीस. त्याचा परिणाम असा झाला की, मला आता शारीरिक व मानसिक त्रास होतोय.

आज लग्न होऊन दोन वर्षे झाली असतील. आता कुठे मी स्वतःला सावरतेय, याचा अर्थ असा नव्हे की मी माझ्या चुकीचं समर्थन करते. कारण, प्रत्येक आईने आपल्या मुलीवर असे संस्कार घ​​डवावेत की तिच्या भावी जीवनात तिला होकायंत्राप्रमाणे मार्गदर्शक ठरावेत, जेणेकरून ती आपलं वैवाहिक जीवन समृद्ध करू शकेल, कारण भारतीय संस्कृतीची ती परंपरा आहे.

मी आणि दादा, तुमची दोनंच अपत्य असल्यामुळे आम्हावर तुम्ही प्रेम केले आणि मला तर तू जास्तच लाडावून ठेवलं. लहानपणी मला सकाळी लवकर उठण्याचा फार कंटाळा म्हणून मी शाळेला दांडी मारायची, बाबा रागावयाचे. परंतु, मुलगी लहान आहे म्हणून तू माझ्या सवयीवर पांघरूण घालायचीस. रात्री उशिरापर्यंत मी टिव्ही पाहत बसायची, त्यानंतर मोबाईलवर मैत्रिणीशी चॅटींग रात्री बारापर्यंत करायची. तुमची इच्छा असूनसुद्धा माझ्या हट्टी स्वभावामुळे तुम्हाला मी इतर कार्यक्रम बघू द्यायची नाही.

मला आठवतेय की मी दहावीला असताना टीव्ही समोर बसले असताना तू मला चहा आणून दिला व तो चहा माझ्या पसंतीप्रमाणे झाला नसल्यामुळे मी तुझ्याशी फार भांडले. परंतु आई म्हणून चहा कसा करायचा हे तू मला कधीही शिकवलं नाहीस. बाबा म्हणाले होते, “तिला तू फार लाडावून ठेवलंय” म्हणून तुझ्यावर रागावले, परंतु बाबांच्या या बोलण्यामुळे मी रागाने काही दिवस बाबाबरोबर अबोला धरला. कॉलेजला जाऊ लागल्यानंतर माझ्या खाण्यापिण्याच्या सवयीवरून घरात भांडणे व्हायची. परंतु शिरा, पोहे, उपमा, चपाती, भाकरी वगैरे वगैरे नाश्त्यासाठी लागणारे पदार्थ कसे बनवायचे हे आई म्हणून तू मला कधी जवळ घेऊन शिकवले नाहीस. वरण, आमटी, भाजी, मासळी, मटण वगैरे जेवणाचे पदार्थ बनवायचे शिकवणं तर बाजूलाच राहिले.

आमचा बारावीचा निरोप समारंभ होता. ट्रॅडिशनल ड्रेस घालून आम्हाला कॉलेजला बोलावलं होतं. परंतु, माझा ड्रेस धुतला नव्हता म्हणून मी तुम्हाबरोबर भांडले, परंतु माझे कपडे मीच धुवावे म्हणून तू मला कधीही आग्रह केला नाहीस, कारण मी लग्न होऊन सासरी जाणार होते आणि मला अशाप्रकारची कामे करणं भाग होतं याची जाणीव तू मला कधीच करू दिली नाहीस. तू आपली नैतिक जबाबदारी विसरलीस

एवढंच कशाला, जेवल्यानंतर माझे ताट तू धुवायचीस. एवढे लाड तू माझे केलेस. परंतु, आता सासरी सून म्हणून मला सर्वाची ताटं धुवावी लागू नयेत म्हणून मी काहीतरी निमित्त काढून टाळाटाळ करते. एक चुकीची सवय लावून तू आपल्या आईच्या कर्तव्यास चुकलीस.

मी रात्री इंटरनेटवर चॅटिंग करून रात्री उशिरा झोपत असे. त्याचा परिणाम म्हणून सकाळी अगदी उशिरा उठायची सवय लागली. म्हणून आता सून म्हणून सकाळी सात वाजता उठावे लागते, कारण सासरे मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्यांचा चहा असतो. माहेरी लवकर न उठण्याच्या सवयीमुळे आता त्रास होतो व कधी कधी सासूची नाराजी ऐकावी लागते. लेकीप्रेमामुळे तू पूर्ण आंधळी झालीस व आपल्या नैतिक कर्तव्यास चुकलीस. असं म्हणतात की शरीर हे साधन आहे आणि त्याला आपण जशी सवय लावू त्याप्रमाणे ते काम करते.

सासू आजारी असल्यामुळे कामावर जाण्याअगोदर मलाच स्वयंपाक करावा लागतो व कामावरून आल्यानंतर मलाच सगळं आवरायला लागतं. याचा मला फार त्रास होतो. कधी कधी प्रकाश व सासरे माझं जेवण चांगलं न झाल्यामुळे केवळ भुकेपोटी घश्याखाली ढकलतात. मला त्यांच्या देहबोलीवरून कळतं आणि मी मलाच अपराधी समजते. परंतु माझ्या अपराधी मनःस्थितीस तूच जबाबदार आहेस. कारण, मला जवळ घेऊन तू कधीच जेवण कसं करायचं हे शिकवलं नाहीस.

मोलकरणीच अनियमित येणं हे मला फार त्रासदायक ठरतं. तिच्या गैरहजेरीत मलाच कपडे धुवावे लागतात. सवय नसल्यामुळे मला फार त्रास होतोय.

प्रकाश व माझे सासू-सासरे स्वभावाने अगदी गरीब. माझा स्वभाव तसा फटकळ. माझ्या चुका काढल्यास मला राग येतो. परंतु, ते माझ्याच भल्याचे असते, हे आता मला कळायला लागलंय. आता मलाच माझा स्वभाव बदलण्यास फार त्रास होतो.

मला कळून चुकलंय की उत्तम गृहिणीला सगळं नव्हे, परंतु बरचसं काही यायला हवं. परंतु यातलं काहीच मला तू दिलं नाहीस.

काही वर्षापूर्वी मावशी आली होती आणि तुमचा जो संवाद चालला होता त्यात ती म्हणाली होती की ‘पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही’ परंतु माझ्यामते किनाच्यावर उभे राहून हातपाय हालवून पाण्यावर कसं तरंगत राहावं, हे सांगण्यासाठी कुणीतरी जवळ असावं लागतं. आता मी गटांगळ्या खाऊन कसाबसा किनारा गाठण्याचा प्रयत्न करतेय.

आई, अलिकडेच माझ्या मनात सुजाण पालकाविषयी आलेय की “आपल्या संस्कारातून व संगोपनातून अशा व्यक्तीची निर्मिती करावयाची, जी स्वतःच्या आयुष्यात होणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी स्वतःवर घेते. आपल्या जीवनात येणाऱ्या अपयशाचं खापर परिस्थिती किंवा वातावरणावर न फोडता स्वतःकडे घेत कर्त्याची भूमिका निभावते. परिस्थितीचा गुलाम होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून यशस्वीतेकडे वाटचाल करते.”

आई आता तू रागाने असं म्हणशील, “तुला आता शिंगं फुटली ना! बोल मला घालूनपाडून” परंतु आई, तू माझी वैरीण नाहीस, जन्मदाती आहेस. जन्मल्या क्षणापासून ममतेची नाळ तुझ्याशी जोडलेली आहे. परंतु, माझ्या दोषावर पांघरूण घालून कधीच मला जवळ घेऊन माझ्या डोळ्यात सासरची कर्तव्याचे अंजन घातलं नाहीस.

आई, हे बघ, ममतेच्या नाळेला रेशमी झालर असते. रेशीम दिसायला व हाताला मुलायम लागतं. परंतु रेशीमाची मारलेली गाठ उसवता येत नाही. कारण “संस्कार हे झाडाच्या उंच फांदीला बांधलेल्या झोक्यासारखे असतात. वार्‍याने झोका पुढे मागे होतो, पण तुटत नाही. फांदीला बांधलेला दोर किती मजबूत आहे यावर त्याचं स्थैर्य अवलंबून असते. हा दोर म्हणजे त्यांच्या मूलभूत संस्काराची बैठकच.”

माझ्या मते हे पत्र लांबतंय. परंतु, हे पात्र लिहिण्याचा प्रपंच मी एवढ्यासाठीच केला की, जेव्हा तुम्ही महिला, काही कार्यक्रमासाठी एकत्र येता, तेव्हा तू आपल्या मैत्रिणीस माझे हे परखड पत्र दाखव, जेणेकरून माझ्यावर झालेला अन्याय, त्यांच्या लेकीवर होणार नाही. कारण हल्ली घटस्फोटाची प्रकरणे दिवसागणिक वाढत चालली आहेत. आणि त्यांची बरीचशी कारणं घरगुती स्वरुपाची असतात. वणव्याची सुरुवात ही लहानशा ठिणगीतूनच होते. त्यांच्या लेकीच्या लग्नाच्या गाठी घट्ट होण्यासाठी तुझा खारीचा वाटा हा मोलाचा ठरु शकेल.

तुझी हट्टी, रुसूबाई !