कुमारी घटस्फोटीता…
- सौ. फ्लॉरी विल्यम रॉड्रिग्ज
ओरभाट, पापडी, Ph: 9764163495
नाताळच्या सणानिमित मी व माझी पत्नी समंथा आमच्या दोन्ही मुलांना घेऊन रजेसाठी मायदेशी आलो होतो. परदेशी स्थायिक झालेल्या व नोकरीनिमित्त परदेशी वस्ती करणार्या वसईकरांसाठी एका ग्रुपने नाताळच्या आठवडयात एक भव्य गेटटुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुलांना आजी-आजोबांकडे ठेवून मी व समंथा त्या सोहळ्यासाठी गेलो.
भल्या मोठ्या पटांगणावर सोहळ्यासाठी सूटबूट घातलेली पुरुषमंडळी व झगझगीत चमकणार्या गाऊनमध्ये महिलांची येजा चालू होती, परदेशी सेंटच्या सुगंधाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. लुकलुकणार्या दिव्यांच्या झगमगटामध्ये बर्याच वर्षानी भेटणारे मित्र, नातेवाईक एकमेकांना आलींगन देऊन नाताळच्या शुभेच्छा देत होते. उच्चभ्रू व्यक्तींच्या ह्या सोहळ्यामध्ये माझी नजर तीच्यावर पडली आणि तीला पाहिल्याबरोबर जमीन मला आपल्या पोटात सामावून घेईल तर बरं होईल असे मला वाटू लागलं. मी विचलीत झालो, कुठे जाऊ, कुठे लपू हेच मला कळत नव्हतं. समंथा बर्याचा वर्षानी भेटलेल्या तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्या-साठी त्यांच्या टेबलवर जाऊन बसली होती.
वॉशरूमला जातो असा बहाणा करून मी देखील माझ्या मित्रपरिवारातून सटकलो व एका अंधार्या कोपर्यात जाऊन बसलो पण तेथूनही ती मला दिसत होती. तिच्याबरोबर जो पुरुष होता तो बहुतेक तीचा नवरा असावा पण त्याच्या पेहरावावरून व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींशी बोलताना त्याच्या चेहर्याच्या हावभावावरून तो कुठल्यातरी परदेशी कंपनीत मोठ्या पोस्टवर नोकरी करीत असावा एवढं नक्की ! तिच्याबरोबर तो खुप अदबीने वागत होता. त्याला भेटायला येणार्या व्यक्तींना तो तीची फार आदराने ओळख करून देत होता. ती मात्र तीच्या सवयीप्रमाणे हळूवार स्मित करून “तुम्हाला भेटून खूप आनंद झाला” असं काहीसं पुटपुटत असावी, ज्याप्रमाणे मला ती पहिली भेटली होती अगदी तशीच….
मला आठवतं, मुंबई विद्यापीठातून डिग्री घेतल्यानंतर वेगळ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी मी परदेशी जाऊन उच्चशिक्षण घेतले. परदेशी संस्कृतीने मला भूरळ घातली. चांगली नोकरीदेखील मिळाली. आता लग्न करून येथेच स्थायिक व्हायचं असं मी ठरवलं. माझ्या आईने मला बर्याच मुली लग्नासाठी सुचवल्या पण परदेशी येऊन नोकरी करील अशा मुलीच्या मी शोधात होतो.
एक दिवस माझ्या बहिणीने एका मुलीचा फोटो व तीचं प्रोफाईल मला पाठवलं. मुलगी दिसायला सुंदर होतीच पण त्याबरोबर ती परदेशात नोकरी करायला तयारही होती व फिट होती. बहिणीकडून फोननंबर घेऊन तीला व्हिडिओ कॉल केला व तिच्यासोबत बोललो तेव्हा ती अशीच स्मित करीत, “तुम्हाला भेटून आनंद झाला” असं म्हणाली होती. त्यानंतर आम्ही ऑनलाईन चॅट करीत होतो. मी दोन वर्षानंतर ख्रिसमससाठी वसईला येणार होतो तेव्हा आल्याबरोबर कोर्ट मॅरेज व पंधरा दिवसात लग्न करून तीला माझ्याबरोबर परदेशात घेऊन यायचं असं सर्व निश्चित झालं. माझ्याकडे PR असल्यामुळे तसा कुठला अडथळा नव्हता.
तीने चर्चमध्ये जाऊन व मी ऑनलाईन लग्नाचा फॉर्म भरला. पत्रिका छापून आल्या. चर्चमध्ये लग्नाचा पहिला बॅंड (चिठ्ठी) वाचणार होता, त्याच्या दोन दिवस आधी मी वसईला आलो. आमच्या दोघांची पहिली भेट झाली. दोघंही एकमेकांना शोभून दिसत होतो. रविवारी पहिला बॅंड वाचला. नातेवाईकांना, मित्रमंडळींना लग्नाची आमंत्रणे केली. तिची मोठी बहीण, आत्या व मामेबहिणींनी येऊन आमचं लग्नाचं कपाट भरलं. माझ्या बहीणींनी गाणी वगैरे बोलून त्यांचं आदरातिथ्य केलं. परदेशी स्थायिक व्हायला मिळणार म्हणून ती खूप खूष होती. परदेशातील जीवन शैलीविषयी मला खूप काही विचारत होती. स्वप्रांचे इमले रचले जात होते. पहिला बॅंड वाचल्यानंतरच्या आठवडयात आम्ही ठरल्याप्रमाणे रजिस्टर मॅरेज केलं, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी दोन्ही कुटुंबं संध्याकाळी माझ्या घरी एकत्र बसलो होतो. सर्वजण खूपच आनंदात होतो. त्यावेळी तिच्या वडिलांनी बोलता बोलता सहज सांगितलं “माझ्या एकुलत्या एक मुलाचा घटस्फोट झाला आहे हे आपणास माहितच आहे. लग्न झाल्यानंतर माझी सून आमच्याबरोबर फक्त पंधरा दिवसच राहिली होती. नंतर माहेरी गेल्यावर तीने कुठल्याही प्रकारचे भांडण-तंटा नसताना आमच्या कुटुंबातील चौघावर FIR नोंदवली होती. त्यांचा घटस्फोट झाला पण ती FIR तशीच राहिली आहे, म्हणून हिला कदाचित परदेशी जाण्यासाठी तात्पुरती परमिशन मिळेल. मात्र माझे वकील म्हणाले, दोन-तीन महिन्यात आमच्यावरील केस बरखास्त झाली की ती कायमची तुमच्याबरोबर परदेशी स्थायिक होईल”
मी तिच्या वडिलांना तेथेच म्हणालो, “एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला आतापर्यंत का सांगितली नाही? तुमची मुलगी गेले चार महीने माइयाशी ऑनलाइन बोलते, तीने देखील मला हे सांगितलं नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे. मला आता पूढ़े जायचंच नाही. मी हे नातं येथेच मोडतो, तुम्ही जाऊ शकता.”
त्यांनी माझी खूप मनधरणी केली. माझ्या मुलीचा ह्यामध्ये काही दोष नाही, आता तर तुमचं रजिस्टर मॅरेज झालं आहे. आता हे लग्न तुटलं तर ती कुमारी घटस्फोटीता होईल. परत कोण करील तीच्याशी लग्न? आधीच तिच्या भावाच्या घटस्फोटामुळे समाजात आमची अप्रतिष्ठा झाली आहे. आत्ता ह्या वयात एवढा मोठा आघात मी नाही पचवू शकत हो! कृपया हे लग्न मोडू नका. आमंत्रण गेली आहेत, कपाट भरलंय, लग्नाच्या रिसेप्शनची सर्व बुकिंग झाली आहे. आम्ही पार कोलमडून जाऊ, आमची मुलीची बाजू आहे. प्लीज समजून घ्या…. एकट्या पडलेल्या बापाचा जीव पोरीसाठी तुटत असलेला मला दिसत होता पण समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेला मी रागाने पेटून उठलो होतो.
माझ्या हृदयाला पाझर फुटला नाही, मी माझ्या मतावर ठाम राहिलो. घटस्फोटासाठी सहा महिन्याचा अवधी होता त्यामध्ये तडजोड होईल ह्या आशेवर ती वाट पाहत असावी पण मी कधी मागे फिरुन पाहिले नाही, दोन वर्षानंतर आमचा रीतसर घटस्फोट झाला. शाळेपासून माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारी समंथा हे सर्व ऐकून होती. तीने मला लग्नासाठी विचारलं. पर्यायी विचार न करता मी तिला होकार दिला. आम्ही लग्न केलं, कधीही मागे वळून न पहाता मी माझ्या संसारात स्वत:ला गुंतवून टाकलं, आम्हाला दोन मुलं झाली. कटू आठवणींचा तो कप्पा मी कायमचा बंद करून टाकला होता. तिचं पुढे काय झालं असेल, काय नाही हे देखिल जाणून घेण्याचे कष्ट घेतले नाहीत पण आज अचानक ती माझ्या समोर आली व मनाच्या खोल कप्प्यात बूजवलेल्या आठवणींचं दार जणू सोसाट्याच्या वार्याने खाडकन उघडावं त्याप्रमाणे तो कप्पा उघडला आणि त्यातून नको असलेल्या आठवणींचा लोंढा ओसंडून वाहणार्या धरणाप्रमाणे वाहू लागला…
तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हळुवार थाप मारली, मी चमकून मागे पाहिलं तर माझा जीवाभावाचा मित्र ऑल्वीन उभा होता. त्याला माझा सर्व पूर्वइतिहास माहित होता. मला म्हणाला, “पाहिलं का ती सुद्धा आली आहे. मी तुला बोललो नाही पण तीचं माइया बॉसबरोबर लग्न झालं आहे. तो उत्तर वसईतला आहे. काही वर्षापूर्वी त्याचाही घटस्फोट झाला होता. तिची मैत्रीण आमच्याच ऑफिसमध्ये काम करते. तिच्यामार्फत ह्या दोघांची ओळख झाली. हिच्याविषयी सर्व कळल्यानंतर तिच्या आजारी वडिलांना भेटून त्यांनी तिचा हात मागितला. बरीच वर्ष लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या तीने बापाच्या आग्रहास्तव त्याच्या विश्वासाला हुंकार दिला व आज ती परदेशात एका मोठ्या कंपनीच्या CEOची पत्नी आहे. तुझ्याबरोबर लग्न तुटल्यानंतर तीने फायनान्समध्ये MBA केले व पूढे PHD करून आता ती आमच्याच कंपनीसाठी काम करते. तो तीला जीवापाड जपतो व सांगतो, “योग्य माणसाशी लग्न झालं की त्याच्याकडून मिळणारं प्रेम आपणास परिपूर्ण बनवते. तीचं प्रेम व समजूतदारपणा आपल्याला आनंदात जगायला शिकवतो.”
ऑल्वीनचं बोलणं ऐकृन मला मेल्याहून मेल्यासारखं झालं, मनापासून तिची क्षमा मागायची खूप इच्छा होती, पण ते आता शक्य नव्हतं कारण काही चूका दूरूस्त करता येतात पण काही दुरुस्तीपलिकडच्या असतात, त्या नाही दुरूस्त करता येत ! त्यामुळे मी मनोमन परमेश्वराची क्षमा मागितली व तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली. तेवढ्यात समंथाचा “निघू या” असा फोन आला. ती जीवनात स्थिरस्थावर झाली आहे त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देत मी मित्राचा निरोप घेतला. व जाता जाता असहाय्य नजरेने तिच्याकडे कटाक्ष टाकून मनोमन तिला नाताळच्या शूभेच्छा दिल्या…