मोरयाचे लाडू
- फ्रान्सिस डिमेलो, नंदाखाल
पूर्वीच्या काळी श्रावण महिना उजाडला की लोकांना जरा निवांतपणा मिळत असे. कारण तोपर्यंत बहुतेकांची भातलावणी आटोपून रिकामी झालेली बागायत जमीन नांगरून झालेली असायची. भाद्रपदात भादवडी केळींची लागवड करेपर्यंत फारसं काम नसायचं. घरातील पुरुष मंडळी अधूनमधून हातात लांब काठीची विळी घेऊन केळीच्या बनात फेरफटका मारून येत असे. कुठे एखादी केळ वाऱ्याच्या धक्याने लवंडली असेल, कुठे केळीचं एखादं लोंगरच खाली लटकलं असेल तर ते पाहायचं, तर केळीला आधारासाठी बांधलेला एखादा बांबू वाऱ्याने फिरला असेल तर तो पुन्हा व्यवस्थित बांधायचा, नाहीतर केळीला सुंभाने घट्ट गाठ देऊन ती केळ दुसऱ्या केळीला बांधायची अशी किरकोळ कामं करून येताना कोणी गावकरी दोस्त भेटला की त्यांच्यासोबत गुत्त्यावर जाऊन नवटाक पावशेर मारून हलत डुलत घरी परतायचं यापलीकडे त्यांना फारसं काम नसायचं.
घरातील बाईमंडळींनाही चांगली सवड असायची. रोजचा केरकचरा काढणे, शेणपाणी, स्वयंपाक पाणी आणि कपडालत्ते धुणे याशिवाय फारशी कामं नसत. शेतीवाडीत फारसं जावं लागत नसे. सबंध वर्षात याच महिन्यात त्यांना थोडी सवड मिळत असे. अर्थात विसावा फार नसायचा! घरातील बायका अगदी निवांत बसल्या आहेत असं आम्ही कधीच पाहिलं नाही. दुपारची जेवणं आटोपली, भांडीकुंडी करून झाली की लगेच त्यांनी काथ्या घेऊन ओटीवर त्यांच्या सुंभासाठी लोळ्या वळत बसायचं ! म्हटलं तर विश्रांती, म्हटलं तर काम !
अशाच निवांत दिवशी पाऊसही निवांतपणे पडू लागला तर मग काही बघायलाच नको. ओटीवरून कोणी खाली पाय टाकत नसे. सगळे घरी ! दुपारी बायका लोळ्या वळत बसायच्या आणि पुरुषांचा पत्त्यांचा खेळ रंगात यायचा ! अशातच कित्येकांच्या स्वयंपाकघरातून कांद्याचा घमघमाट सुटला की समजायचं, ‘आज मोरयाच्या लाडूंचा बेत आहे म्हणून !’
आपल्या कुपारी संस्कृतीमध्ये जे जे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत त्यात मोरयाच्या लाडूचा नंबर खूप वरचा आहे. त्या काळी कोणता खाद्यपदार्थ कधी करायचा याचं वेळापत्रक ठरलेलं असायचं. म्हणजे करंज्या नाताळच्या सणाला, शिंगोळ्या सेंट जॅानच्या सणात, थंडीच्या दिवसात तांदळाची भरड आणि गूळ, तीळ वगैरे घालून लाडू किंवा वड्या केल्या जायच्या, तर पावसाळ्यात मोरयाचे लाडू, तांदळाच्या पिठाच्या शेवया, उपवासकाळात तिखट धापट्या आणि शुभ शुक्रवारी खरपूस भाजलेला तिखट केक (ढेसकं) असे संपूर्ण वर्षाचे मेनू जणू ठरलेले असायचे. हो, चामटपोळ्या मात्र मनात येईल तेव्हा कधीही केल्या जात असत. तसेच नवविवाहित माहेरवाशीण सासरी जायच्या वेळी दोदाल आणि रेवाळा (रवळी) हमखास होत असत. म्हशी व्यातील त्यानुसार खरवस, दुधाचं गूळ घालून पक्वान्न तसेच कच्च्या दुधाचे शिताडू ही पक्वान्नेही होत असत. भाद्रपद महिन्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात असत.
मोरयाच्या लाडूंसाठी मेहनत खूप लागत असली तरी खर्च फार येत नसे. हिरव्या मिर्च्या आणि कोथिंबीर सोडली तर काहीच विकत आणावं लागत नसे. तांदळाचे पीठ घरचं, सफेद कांदे घरीच पिकत आणि उडदाची डाळही घरचीच! हां, मेहनत बाकी भरपूर लागे !
साधारणपणे पावसाचा जोर पाहून मोरयाच्या लाडूचा बेत पक्का होत असे. शिवाय हे बायका बायकाच ठरवत असत. पुरुषांचं त्या बाबतीत काही म्हणणं नसायचं. पण एखादा कर्ता पुरुष जर “आपण आज मोरयाचे लाडू केले तर…“ असं सहज म्हणून गेला तर मग काही बघायलाच नको. बायकांच्या उत्साहाला उधाण येत असे.
नक्की केलेल्या दिवशी जेवण खाणं आणि भांडीकुंडी जरा लवकर आटोपून घरातील बायका लाडूच्या तयारीला लागत असत. सासू नाहीतर घरातील कारभारीण प्रथम काम करीत ते म्हणजे उडदाची डाळ शोधून, साफ करून भिजत घालत असे. सगळ्यात मोठं जिकिरीचं काम म्हणजे नारळ किसणे आणि कांदे चिरणे! त्यातल्या त्यात जरा अर्धवट तयार झालेले बरे दहाबारा नारळ घ्यायचे. ते सोललेले नसतील तर एखाद्या पुरुषाकडून सोलून घ्यायचे. नारळ फोडताना त्यातील गोड पाणी पिण्यासाठी अवती भोवती मुलांचं कोंडाळं जमायचं. कोणी कितीदा जरी हाकलून लावलं तरी माशा कशा पुन्हा पुन्हा येऊन तिथेच बसतात त्याचप्रमाणे जमायची पोरं ! मग सर्वांना थोडं थोडं पाणी दिलं जायचं. वर आणखी खोबऱ्याचा लहान तुकडा देऊन त्यांना कायमचं शेपाटून लावत असत. नाहीतर ती पोरं बायकांना नारळ किसूनच देत नसत. जेवढा किसला तेवढा पोरांच्या तोंडात !
मोरया लाडूंसाठी कांदा जरा बारीकच चिरावा लागतो. सगळ्याच गृहिणींना तो विळीवर हवा तसा चिरायला जमतोच असं नाही. म्हणून दोन जरा ज्येष्ठ गृहिणी ते काम स्वतःकडे घेत असत. घरात बांबूवर लटकवलेल्या कांद्याची बरी संपूर्ण माळ चिरावी लागत असे. त्यातही कुटुंब मोठं असेल तर मात्र दोन तीन माळी म्हणजे टोपलीभर कांदे लागत असत. दुसरं असं की सफेद कांदे बोंबिल वगैरे मच्छीसोबत कच्चे खाण्यासाठी आणि मोरयाच्या लाडूंसाठीच वापरले जात असत. त्यासाठी नाही वापरले तर पावसाळ्यात ते कुजून खाली गळून पडत असत. कुजलेल्या कांद्याला अशी काही दुर्गंधी सुटायची ! आई आई आय !! ती दुर्गंधी जणू आजही नाकात भरून आहे!
घरातल्या दोन दोन बायका नारळ किसायच्या कामी लागत असत. मोठी परातभर नारळ किसता किसता बिचाऱ्यांच्या पाठी भरून येत असाव्यात पण त्याचा विचार कोण करत असत? महिलांच्या बाबतीत एवढी सहानुभूती होतीच कुठे? कांदे आणि नारळाची तयारी होईपर्यंत कोणीतरी चूल पेटवलेली असे. पावसाळ्यात चूल पेटवायची म्हणजे मोठे दिव्यच! पाणी चांगलं उकळलं की त्यात तांदळाचं पीठ उकडलं जायचं. हे कामही तितकंच जिकिरीचं ! नेमकं किती पीठ घ्यायचं, पाणी किती उकळायचं , त्यात मीठ किती घालायचं हे सगळं ठरवायचं ते सासू किंवा मोठ्या सुनेनेच ! पीठ उकडून झालं की तो थंड होईपर्यंत थांबतां येत नसे. तो मळायला घ्यायचा. पिठाची मळणी जितकी जास्त तितकं लाडूचं कवट चांगलं पातळ ! पिठाची उकडन आणि मळणी चांगली झाली नाही तर लाडू फुटून जात आणि त्याचा सगळाच कालवा होत असे. किती जपावं लागायचं ना !
एकदा का सगळी पूर्वतयारी झाली की सासूने किंवा थोरल्या जाऊने चिमूटभर पुरण तोंडात टाकून मीठ, मिर्ची बरोबर आहे अशी बोटानेच ओकेची खूण केली की सगळ्या लाडू बनवायच्या कामाला लागत असत. कोणी पिठाची कवटं करीत तर कोणी त्यात पुरण भरून लाडूला मोदकाचा छान आकार देण्याचं काम करीत. अनेक लहानमोठे हात यात गुंतलेले असल्यामुळे लाडूंचा आकारही लहानमोठा होत असे. पण ते चालत असे.
एका भट्टीचे लाडू तयार होईपर्यंत ते उकडण्यासाठी चुलीवरील विशिष्ट भांड्यात पाणी उकळलेले असायचे. त्याच्यावर एक विशिष्ट आकाराचं भांडं ठेवलं जाई त्याला कुबड्डर म्हणतात. त्यात कथलाच्या ताटात लाडू व्यवस्थित रचायचे आणि त्याला छान उकड काढली जायची. उकडून ते खाली उतरेपर्यंत पुरुषमंडळी आणि मुलं एकदोनदा तरी स्वयंपाकघरात चक्कर मारून अंदाज घेत असत.
केळीची हिरवीगार पानं आधीच आणलेली असायची. चटईवर केळीची मोठी पानं ठेवून त्यावर उकडलेले मोरायाचे लाडू एकदाचे पडले की पुरुष आणि पोरांची त्यावर उडी पडत असे. प्रत्येकाने एकेक लाडू जरी उचलला तरी म्हणता म्हणता सगळे लाडू संपून दुसऱ्या भट्टीची वाट पाहत पुरुष मुलांची स्वयंपाक घरात झुंबड उडायची.
पुढच्या तासाभरात लाडूंची मोठी रास पडायची! कोणी चार चार तर कोणी सहा सहा लाडू गपागप मट्ट करून टाकत असत. पुरुषमुलांचे मनसोक्त खाऊन झाले की मग बायका एक एक दोन दोन लाडू खाऊन समाधान मानत असत. तेवढ्यात चहा व्हायचा. मोरयाचे लाडू म्हणजेच मोदक आणि चहाचं छान सूत जमायचं. पण काहींना मात्र ॲसिडिटी होत असल्यामुळे ते चहाच्या भानगडीत पडत नसत. मोदक आणि चहाचा कार्यक्रम आटोपला की घरातली कारभारीण बशीत नाहीतर केळीच्या पानात दोन दोन चार चार मोदक घालून मुलांना शेजारी पाजारी पाठवायची. तसेच सगळ्या बायकांना दोन चार मोदक घेण्याची मुभा देत असे. सगळ्यांनी हवे तेवढे उचलून घेतले की केळीच्या पानावर फुटलेले मोदक तेवढे निराश्रीतासारखे पडून राहायचे. कच्चा कांदा असल्यामुळे मोरयाचे लाडू फार काळ टिकत नसत. शिवाय त्या काळी कुठलं आलं फ्रिज ब्रिज? म्हणून संध्याकाळपर्यंत लाडूंची विल्हेवाट लावणं भाग असे. रात्र पडेपर्यंत मोरयाच्या लाडूचा वार्षिक कार्यक्रम समाप्त होत असे.
बिचाऱ्या महिलावर्गासाठी भांड्याची ही मोठी रास पडलेली असायची. पण “वा! छान लाडू जमले आहेत!“ एवढ्या कौतुकाच्या दोन शब्दापुढे त्यांना भांडीकुंडीचं काम अगदीच क्षुल्लक वाटत असे. दुसरं असं की त्या रात्री स्वयंपाक नसायचा ! तेवढीच बायकांना आणि चुलीला सुट्टी! आम्हा मुलांना उकडीचे गोडगोड मोदक खूप आवडायचे म्हणून शेवटचं एक भांड भरून उकडीचे मोदक केले जायचे. आम्ही मुलं सगळे फस्त करून टाकत असू.
मी लहान असताना या लाडूंचं मोरांशी काही नातं आहे का हे पडताळून पाहत असे. पण जरा मोठा झाल्यावर आजूबाजूच्या गावात प्रसादाच्या आशेने गणपती दर्शनाला जात असे तेव्हा गणरायाच्या हातावर मोदक पाहिले, ‘गणपती बाप्पा मोरया‘ हे शब्द कानावर पडले तेव्हा लक्षात आलं की हे मोराचे लाडू नव्हेत तर बाप्पामोरयाचे म्हणजे गणपती बाप्पांचे आवडते मोदक होय ! आपल्या पूर्वजांना उकडीचे मोदक परवडणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी पर्याय म्हणून हे तिखट मोदक शोधून काढले असावेत. ‘वेळ तसा खेळ‘ हेच खरं !
या मोरयाच्या मोदकासोबत माझी एक आठवण जोडली गेली आहे. ती सांगितल्याशिवाय हे मोरयाचे लाडू पुराण संपणार नाही.
७ की ८ ॲागस्ट १९६४ चा तो दिवस होता. बहुदा शुक्रवार होता त्या दिवशी! गटारी अमावस्या होती. सकाळपासून पावसाळी वातावरण होतं पण पाऊस फारसा जोरदार नव्हता. आम्ही तर छत्री न घेताच शाळेत गेलो होतो. त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढत वाढत गेला. चांगला पावसाचा दिवस आहे असं समजून आई काकीने वगैरे मोरयाच्या लाडूचा घाट घातला होता. सगळ्या बायका स्वयंपाकघरात मोदकाच्या तयारीत इतक्या गुंतल्या होत्या की बाहेर वादळी वाऱ्याने कधी थैमान घातलं त्यांना कळलंच नाही. साधंसुधं वादळ नाही तर चक्री वादळ, तेही अत्यंत वेगवान! पाऊस आणि वाऱ्याची जणू स्पर्धाच लागली होती. दुपारनंतर तर वादळाचा वेग भलताच वाढला. केळीच्या बागा धडाधड आडव्या होऊ लागल्या. अर्धवट तयार झालेली लोंगरी पाठीवर घेऊन केळी भुईसपाट झाल्या. जणू झोपलेल्या आईच्या पाठीवर बाळं पहुडली होती ! सगळीकडे पाणीच पाणी! तलावे भरून पाण्याचे लोंढे गावातून वाहू लागले. पंचक्रोशीत केळीचं एक झाड शिल्लक राहिलं नाही. लोकांचं उपजीविकेचं एकमेव साधन जमीनदोस्त झालं होतं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पसरलं होतं.
शाळा लवकर सोडल्या होत्या पण कंबरभर पाण्यातून मुलं घरांपर्यंत पोहोचणार कशी? पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर घरातील पुरुषमंडळी हातात छत्र्या घेऊन शाळेकडे धावली. वाडीत जायची कोणाचीच हिंमत राहिली नव्हती इतकी अवकळा पसरली होती.
आमच्या घरातील बायकांची अवस्था मोठी बिकट झाली होती. मोरयाच्या लाडूंचा पसारा बेवारशासारखा तसाच पडून होता. कोणीच त्यांच्या मुडमध्ये नव्हतं. शाळेतून आलेल्या आम्हा मुलांच्या हातावर आमच्या काकीने गुपचुप एकेक लाडू ठेवून तो गुपचूप खायला सांगितलं. आमचं लक्ष पुन्हा पुन्हा तिकडे जात होतं पण… घरात सुतकी वातावरण होतं. बायकांनी सगळा पसारा हळूच आवरला आणि गोठ्यात गुरांच्या स्वाधीन केला. संध्याकाळी सारं शांत शांत झालं होतं. कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं. मोरयाच्या लाडूचा बेत करणाऱ्या आई काकींच्या चेहऱ्यावरील अपराधी भाव आजही मला दिसत असल्याचा भास होतो. घरात जेव्हा केव्हा मोरयाच्या लाडूंचा बेत होतो तेव्हा एकसष्ठ वर्षांपूर्वीचा तो भयाण वादळी दिवस आठवल्याशिवाय राहत नाही.