खाण्याचे खेळ – आयवन क्रास्टो

खाण्याचे खेळ

  •  आयवन क्रास्टो, उमराळे

         या जगात सगळ्यात कठीण असे काही असेल तर तो आहे मनावर ठेवावा लागणारा ताबा. मग तो आपण सगळ्यांनी डोक्यावर बसविलेल्या अगदी टुकार नेत्याच्या, त्याच्या अगणित कारनाम्यासाठी कानफटीत मारायच्या इच्छेवर असो, बनवलेल्या एखाद्या आवडीच्या पदार्थाला दाद देण्यासाठी बायकोचा मुलांसमक्ष घ्याव्याशा वाटणाऱ्या मुक्याच्या इच्छेवर असो अथवा नाक्यावर उभ्या वडापावच्या गाडीवर कढत तेलातल्या वड्याचा तो पावात शिरून आपल्या पोटात पडेल या इच्छेवर असो! त्या पावात, तळलेल्या एकदोन मिरच्या, थोडी गोड, थोडी तिखट आणि जमली तर लसणाची चटणी कशी मावेल अन मावली जावी या इच्छेवर असो.

         वरील नमूद तीनांपैकी पहिल्या दोनांची गोष्ट नको कारण तो ताबा तुम्ही ठेवा अगर न ठेवा; मात्र त्यायोगे तुम्ही ताब्यात जायची शक्यता जास्त आहे कारण कानफटीत मारणे अन मुका घेणे हे अनुक्रमे हिंस्र आणि अश्लील सदरात मोडून त्यावरून तुम्ही संस्कृती भक्षक आणि लवकरच देशद्रोहीही ठराल. पण खाण्याचे काय ? त्याच्यावर ताबा का ठेवायचा ?

         विचार करा ! तुम्ही खाऊ गल्लीतून जात आहात. सकाळची वेळ आहे. तुम्ही लोकलची जंग लढून या जागेवर पोहचला आहात. तुमचे कामाचे ठिकाण आणि ही खाऊ गल्ली योगायोगाने एकाच प्रक्षेपात आहेत. म्हणजे ऑफिस वातानुकुलित आहे म्हणून बंद कुंद असते नाहीतर या खाऊ गल्लीत रांधल्या जाणाऱ्या अनेकानेक पदार्थांचा घमघमाट तुमच्यापर्यंत पोहचण्यास कोणी अडवू शकणार नाही. तर् तुम्ही लोकलने प्रवास करून पोहचला आहात. सकाळी मोघम चहा आणि मस्का खारीवर भलामण झालीय. ती खारी आणि तो चहा या खाऊगल्लीत पोहचण्यापर्यन्तच्या प्रवासात पिळवटून निघालाय. पोटात जागा आहे आणि जीभेवर लाळ जमा होऊ लागलीय, यावेळी मनावर ताबा ठेवणे आणि त्या गरीब दुकानदारांची विक्री अडवणे बरोबर आहे का ?

         तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून परतताना ही खाऊ गल्ली महत्प्रयासाने चुकवून आपल्या घरानजीकच्या नाक्यावर पोहचला आहात अन नाक्यावर उभ्या हातगाडीवर गरमागरम भज्यांची चळत ताटात मांडलेली आहे. तुम्ही त्या हातगाडी समोरूनच आपल्या घरी जाणार आहात पण तुमची काय बिशाद की ती गरम भजी तुमचा तळहात आणि बोटांना जळवून, जिभेला चाळवून पोटात विराजमान होणार नाहीत ?

         लग्नसराई आहे, चार दिवसाच्या या सोहळ्यात एका सकाळी तुमच्या घरी वाटणीस आलेल्या तळणाच्या चार रोट्या पोहचल्या आहेत. ह्या रोट्या अगडबंब आहेत. आतापर्यंत पाहिलेल्या अन खाल्लेल्या रोट्यांच्या आकाराला छेद देणाऱ्या आहेत. वाटणी घेताना तुम्ही विचारता “ह्या घरी तळल्या का ? नाही, एक रोटी रुपये १८ नगाप्रमाणे विकत घेतल्या. बाप रे ! ही काय पद्धत चालू झालीय, अशाने गरिबाकडे लग्नाचे म्हटले तर म्हैस विकावी  लागेल. पण चुलीवर चहाचे आंधण पडले आणि वाफाळता चहा समोर आला तर या कुरकुरीत तेलसुंदर रोटीला तुम्ही अव्हेरनार का ?

         तुम्ही लग्नाला पोहोचलात ! अगणित पदार्थांची रेलचेल टेबलावर आरासी-सारखी मांडली आहे. सगळे पदार्थ तुम्हाला आवताण देतायेत या हिशेबाने तुम्ही ताटात घेता आणि अन्न नासाडू नये या हिशेबाने ताटातले फस्तही करता. ताट धुणाराही अचंबित की पाहुण्याने काही खाल्ले की नाही! त्याला धुण्यास मेहनत होत नाही आणि तुम्हालाही दिलेला आहेर सार्थकी लागल्याचे सुख लाभते. तुमच्यासारखे असे दिलेल्या आहेराला जागले तर यजमानचे दिवाळे निघण्यास त्याच्या घरी दुसऱ्या लग्नाची गरज नाही !

         आणि मग तुम्ही सांगता की तुमचे वजन वाढलेय. हा साक्षात्कार बरीच वर्षे खाऊ गल्ली रिचवून, लग्ने गाजवून, अरबट चरबटाची मजा घेऊन झालेला असतो. तुम्हाला दोन मजल्याचे जिने चढताना धाप लागते, पोट दुचाकीच्या पेट्रोल टाकीवरून घरंगळू लागते, तुमानीचा तंबू व्हायची वेळ येते, हाड हा प्रकार तुमच्या कोणत्याच प्रत्यंगातून जाणवत नाही. तुमची हनुवटी आणि मान एकजीव होतात, बुटांची दोरी बांधताना तुमच्या डोळ्यांसमोर तारे चमकतात, कमोडची रुंदी तुमच्या बुडास पुरत नाही, सोफ्याच्या गादीवर तुम्ही नेहमी बसणाऱ्या एका ठिकाणी खड्डा पडतो. तुमची अर्धांगिनी तुमच्या घोरण्यापायी सकाळी उठण्याचा गजर लावीत नाही. लोकल-मधल्या खरेतर चार सिटांतल्या दोन सिटांवर तुम्ही मावत नाही, तिसराच कसा बसा बसलाय अन उभा चौथा तुम्हास दूषणे देतोय पण तुम्ही सावरून बसता आणि लागलेल्या डुलकीत खाऊगल्लीची स्वप्ने बघता.

         बस झाले ! आपल्याला डाएटची गरज आहे, डाएट करू या ! तुम्ही शोधू लागता, मोबाईलला डोळे लावता, मग तत्सम रील्स तुमच्या मागेच लागतात, तुम्ही ऐकता, हजार पद्धती तुमच्यासमोर आहेत आणि त्या एकजात अघोरी आहेत असा तुमचा समज होतो. तुम्ही ठरवता, कस्टमाइज काहीतरी जमेल तर करू या. गेल्या हजार वर्षात कोणी केले नसतील अशा हजार कस्टमाइज डाएट तुम्ही अंगिकारण्याचा प्रयत्न करता.

         तुम्ही सकाळी न्याहारी वगळता. तुम्ही ती वगळता अन ऑफिसाच्या बाजूला खाऊ गल्लीत पोहचता. कसे होणार पुढे !

         तुम्ही दुपारच्या जेवणात फळे खाता. खाता म्हणजे ओरपता पण तेवढे खाणे तुम्हास पुरत नाही. त्याचा परिणाम कि काय तुमचा पारा ऑफिसच्या थंड वातावरणात चढू लागतो. तुमचा आतापर्यंत चांगला वागणारा साहेब तुमच्या डोक्यात जातो, तुमची टीम तुमच्याशी फटकून वागते. तुम्हास जाणीव होते की हा कमी खाण्याचा आणि परिणामी भुकेचा परिणाम आहे. तुम्हास पटते की सकाळी अन दुपारी जेवण व्यवस्थित घ्यावे अन रात्रीचे बघावे! तुम्ही ते व्यवस्थित घेण्याची व्यवस्था करता. तुम्ही रात्री जेवण बंद करता अगर सूप घेऊन सांगता करता. उकडलेले खाता, पण त्या नंतर तुम्ही रात्री झोपण्यावेळेस देणाऱ्या जांभया तुमच्या बायकोस मोजाव्या लागतात. तुम्हास चांगली झोप येत नाही, झोपेत खाण्याविषयी बरळता, घास घेतल्यासारखे, चावा मारल्यासारखे आवाज तुमच्या तोंडातून निघू लागतात. बायको म्हणते बस्स झाले. तुम्ही हतबल होता, तुमच्या खवय्येपणाचे, खादुगिरीची तुम्हास लाज वाटू लागते.

         तुमची कंबर एव्हाना कमऱ्यात रूपांतरित झालेली असते, शर्टाची बटणे त्रिकाळ व्हिव्हळत असतात. कंबरेच्या तुमानीस बांधणाऱ्या पट्ट्याची छिद्रे एकेक इंच पुढे सरकत जातात.

         काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊन तुम्ही जागे होता आणि जागृतही. काहीतरी केलेच पाहिजे. डायेटीशनकडे जाऊ या ! हा हमखास उपाय ! या एका विचाराने तुम्ही उर्जित होता, मन त्या विचारात रमू लागते, स्वप्नात तुम्हाला तुम्ही स्लिम झाल्याचे दिसू लागते. प्रौढ झालेल्या वयावर जवानी आल्याचे तुम्हास भासू लागते, बायकोची नजर जरा जास्तच धास्तावल्याची तुम्हास जाणीव होते.

         तुम्ही हिय्या करून डायेटिशियनकडे जाता. काय माहित, हा व्यवसाय बायकांकडेच जास्त वर्गीत असतो म्हणजे पुन्हा आपल्या वजनाचे धिंडवडे निघणार! त्या सर्वप्रथम तुम्हाला वजन काट्यावर उभ्या करतात. वजनकाटा मालकिणीच्या जणू मनातलेच वजन दाखवतो. त्याचा लंबक एवढा कलतो की पुढे जागा असती तर काट्याबाहेर आला असता. डाएटिशियनही डोळे विस्फारते. एव्हाना तिला ह्याची सवय व्हायला हवी होती पण तिच्या डोळ्यांत या आणखी एका जाड्याला काय करू याची झाक दिसते.

         ती प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर देत जाता प्रत्येक प्रश्न काळजाला तिळतिळ तोडत जातो. उत्तर जिभेवाटे, तोंडातुन बाहेर येण्यास महत्प्रयास लागतात. इथे उत्तरे प्रामाणिकपणे द्यावी लागतात नाहीतर रोग भलताच आणि उपाय भलताच. आणि हो ! इथे द्यावी लागणारी फीची वसुलीही व्हायला हवी.

         तुम्ही घरी येता. एक लांब लचक यादी बायकोच्या हाती देता. ती बिचारी कपाळाला हात मारते कारण या डाएटपायी तिचे मरण आलेले असते. सकाळी तिच्या कामाची जंत्री वाढते. कुटुंबासाठी वेगळे आणि तुमच्यासाठी वेगळे प्रकार करता करता तिच्या नाकी नऊ येतात. तुम्ही यामुळे धास्तावता पण खरी धास्ती हा डाएट प्लान आपल्यापासून पलायन तर करणार नाही ना याची असते.

         तुम्ही विचार करता कि लोक एवढे खातात तरी आटोक्यात राहतात. तुम्ही कित्येक जणांची खावटी लग्नाच्या पंगतीत पहिली असते. टेबलावर बुफे पद्धतीने सजावट केलेले पदार्थ जेव्हा यांच्या ताटात जमू लागतात म्हणजे चमचा हा चमची वाटू लागते एवढे त्याने ओढले जाते. ताटात डोंगर उभा राहतो. ते किंचाळते. अरे ! आता तरी बस कर. आणि हे महाशय ताटात अजून कुठे जागा आहे का ते शोधत असतात. एक डोळा दुसऱ्याच्या ताटावर पण असतो त्या ताटात काही पदार्थ घ्यावयास सांगू या का ? अशी आशाळभूत नजर ठेवत हे ताटाला हातावर सांभाळत खुर्च्यांच्या गर्दीतून एखादी खुर्ची शोधतात. अजून एखादी खुर्ची समोर ठेऊन त्यावर ताट ठेवूता येईल का ? आणि आपण पाहतो हा माणूस तरीही शिडशिडीत अंगांचा आहे. नक्की एवढे खाऊन घालतो कुठे ?

         म्हणजे खाण्याचा आणि तुमानीच्या घेराचा काहीच संबंध नाही. मी अशी घरे ऐकलीयेत जी पाच लिटरचा खाद्यतेलाचा डबा एक दीड महिन्यात खाली करतात म्हणजे या घरातील लोकांना घाण्याला पिळले तर तेलाचा पाट वाहील पण त्या घरात जाडेपणाची किंवा हृदयाच्या चलबिचलीची कोणतीच वार्ता नसते.

         म्हणजे खात्या पित्या घराला दोष द्यावा की नियतीने दिलेल्या सर्व पचवून मेद साठवणाऱ्या पोटाला. पण तुम्ही डाएट प्लॅन मनाचा हिय्या करून सुरु ठेवता. सकाळी प्लॅन नुसार, दुपारी प्लॅन नुसार, रात्री प्लॅन नुसार. तुम्ही कमालच करता. डॉक्टर डोस देतात तशी बायको जेवण वाढते आणि तुम्ही घाणेंद्रिय, रुची केंद्र तूर्तास बंद करून ते पोटात ढकलता.

         शनिवार रात्र तुमच्यासाठी वैऱ्याची असते. मित्रांबरोबर वीकएन्ड निमित्ताने आत्म्यासाठी एखाद दोन पेले रिचवायची तयारी असायची अन ही तयारी आणि त्याजबरोबर पुढ्यात ठेवलेले चकणा नामक पदार्थाचे काय करायचे ? पण तुम्ही तेही अव्हेरू लागता. सॅलड, उकडलेले  चणे आणिक असे काही उकडलेले तुम्ही एन्जॉय करू लागता. हे सगळे जमतेय याचे तुम्हास अप्रूप वाटते आणि तुमच्या अर्धांगिनीस नवल!

         ऑफिसमध्ये कोण्या निमित्ताने येणारे गोडधोड तुम्ही साभार परत करता. नाक्यावरच्या वडापाववाल्याची तुम्हाला आता घृणा येते. हा किती तेल वापरतो आणि तेच तेच तेल वापरतो याचा तुम्हाला राग येऊ लागतो. घरी तळलेल्या बांगड्याऐवजी त्याचे कालवण ताटात रुजू होते, तुमची खावटी कमी होते.

         तुमची आई मात्र याने दुखी होते, तिला वाटते सुनबाईने ही सगळी नाटके तुमच्या भोवती बसवली आहेत. एखाद्या दिवशी वेळ बघून ती तुमच्यासाठी अगदी तेलसुंदर पक्वान्न बनवून आणते पण तिला तुम्ही समजावता आणि त्या पक्वांनाच्या बाजूलाही जात नाही. पत्नीने मात्र हात टेकलेले असतात हे सर्व निस्तरता निस्तरता ; पण तुमचे कमी होणारे आकारमान पाहून तिलाही हुरूप येतो. संपूर्ण घर डाएटमय होऊन जाते.

         तुम्हाला अगदी हलके हलके वाटू लागते, गालफाटे आटोक्यात येतात. नवीन तुमानीसाठी बायको मागे टुमणे लावते. जवळचे मित्र सांगू लागतात अरे जवान दिसतोस अगदी. खूप जवळचे मित्र बोलू लागतात आजार नाही ना रे ! एकदा साखर चेक करून घे पण माझे मला माहित मी या दिवसात घरातली किती साखर वाचवली ते !

         पण घरचे आता बोलू लागलेयेत, बस झाले डाएट. खायला चालू कर रे तुझे ते अरबट चरबट! नाही… पण आता हे तुमच्या अंगवळणी पडलेय. तुम्ही पोटावरून बुटावर बघू शकता, खाली मांडी घालून बसू शकता.

         पण कधीतरी, जाड जुड समोश्याची, तेलात बुडालेल्या खिम्याची, कळीदार लाडूंची, भरलेल्या बांगडा फ्रायची, बटर चिकन बरोबर गार्लिक नानची आठवण येते. मन द्विधेत पोहोचण्या अगोदरच स्वतःवर ताबा मिळवते अशी साठा उत्तराची कहाणी आता पर्यंत तरी सफल दिसते.