एक अविस्मरणीय अनुभव –  जॅक गोम्स

एक अविस्मरणीय अनुभव

  •  जॅक गोम्स, ‘आई’, चुळणे, वसई.

फोन – 9028195888

         सकाळपासून पावसाची रीपरीप चालू झाली. विजा चमकत होत्या. वसईचा एवढ्या वर्षात जो विकास झाला आहे त्यामुळे वसई पून्हा बुडणार तर नाही ना? अशी शंका मनात येत होती. आम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी ब्रिटीश एअरवेजचे सकाळी ९.३० वाजताचे विमान पकडायचे होते. त्यामुळे आम्हाला विमानतळावर जाण्याची घाई होती. प्रथमतः प्रवासासाठी गुगल दीड तास दाखवत होतं. एवढ्यात मुलीचा फोन आला व तिने विमान पाऊण तास लेट आहे असे सांगितले. आमची तयारी सुरू असताना जावयांचा फोन आला, त्यांनी सांगितले, “डॅडा, ट्रॅफिक जॅम आहे, लवकर निघा.” आम्ही घरून निघालो, खड्ड्यातील रस्त्यामुळे गाड्या सावकाश चालल्या होत्या, तरी आम्ही सात वाजता टर्मिनल २ वर पोहोचलो. विमान आता अर्धा तास उशिराने उडणार असा संदेश मिळाला. आमचे चेकइन, इमिग्रेशन आटोपून आम्ही गेट वर बसलो होतो. विमानाचा कुठे अतापता नव्हता. शेवटी ९ वाजता विमान आले, त्याची सर्व स्वच्छता करणे, बॅगा भरणे व ज्वलन भरल्यानंतर त्यांनी बोर्डिंग सुरू केलं. शेवटी साडेनऊचे ब्रिटिश एअरवेजचं विमान दुपारी साडे अकरा नंतर रवाना झालं.

         दुपारी चार वाजून अठरा मिनिटांनी विमान लंडन शहरातील हित्रो विमानतळावर उतरले. विमानातून उतरून पुढचे विमान पकडणे अशक्य होते. आम्हास विमानतळावरील कर्मचार्‍याने सांगितले, “तुमचे पुढचे विमान तुम्हाला मिळणार नाही, कारण हित्रो विमानतळ मोठं आहे व इथून टर्मिनल तीनवर जायला जवळजवळ अर्धा तास लागतो तरी तुम्ही प्रयत्न करू शकता.” आम्ही धावत जाऊन टर्मिनल तीनवर जाणारी बस पकडायला गेलो तर ती चार मिनिटाने येईल असे समजले. जेव्हा आम्ही टर्मिनलवर पोहचलो तेव्हा आम्हास सांगितले गेले की तुमच्या विमानाचे दरवाजे बंद झाले आहेत. आता तुम्ही ब्रिटिश एअरवेजच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

         आम्ही त्या कार्यालयाकडे गेलो तेव्हा विमान चुकलेले बरेचशे प्रवाशी रांगेत उभे होते व रांग काही हलत नव्हती. जेव्हा आमचा नंबर लागला तेव्हा तेथील महिला कर्मचार्‍याने आमचे म्हणणे ऐकून घेतले व आम्हास सांगितले, “तुम्हाला वेगासला जायला कोणतेच विमान नाही, तुम्ही आजची रात्र इथेच काढा व उद्याच्या विमानाने पुढे जा.” लेक व जावई आमच्याशी सतत संपर्कात होते व मार्गदर्शन करत होते. कोचने कितीही धडे दिले तरी मैदानावर खेळाडूला आपले कसब दाखवावे लागते ना? असा बाका प्रसंग प्रथमच आम्हास आला होता. त्यात त्या गोर्‍यांचं इंग्रजी, वेस्ट इंडिज गोलंदाजाप्रमाणे आमच्या डोक्यावरून केव्हा केव्हा बाऊन्स होऊन जायचं. तीने शेवटी दुसऱ्या दिवसाचे वेगासला जाणाऱ्या पाचच्या विमानाचे बोर्डिंग पास, हॉटेलसाठी, बससाठी, जेवण आणि नाश्त्यासाठी पत्रे दिली आणि ‘डावा घ्या, उजवा घ्या’ असे सांगत हॉटेलचा पत्ता दिला.

         काही वर्षांपूर्वी आम्ही स्कुटरवरून पडलो होतो व आमच्या अर्धांगिनीच्या कमरेच्या माकडहाडाला त्रास झाला होता. तेव्हापासून आम्ही व्हीलचेअरचा आधार घेतो. त्या सहाय्यकास मी विनंती केली, तो आपल्या गोव्याचा होता, त्याच नाव येल्टन, गोव्याचे बरेच लोक ब्रिटिश विमानतळावर भेटले. त्याने आम्हास थोड्या अंतरावर सोडले, तिथून दुसरा काळा सहायक मिळाला, त्याने अर्ध्या रस्त्यात सोडले. आम्हाला बस काही मिळाली नाही, आम्ही टॅक्सी करून हॉटेलवर पोहचलो.

         आमच्या विमानतळावरील बरेच विमानचुके अगोदरच हॉटेलच्या लॉबीमध्ये पोहोचून रांगेत उभे होते. आमचा नंबर लागला, हॉटेल मर्क्यूरी, फोर स्टार हॉटेल होतं. कपड्याचा एक जोड केबीन बॅगेमध्ये ठेवायची सवय कामी आली. अंघोळ करून जेवण केलं व उद्याचा संपुर्ण दिवस काय करायचे ह्या विचारात झोपून गेलो. पण झोप काही लागली नाही. मुलीने व जावयाचे सांगितले, २४ तासाचा व्हीजा घ्या व लंडन फिरून या. जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर उतरलो तेव्हा इमिग्रेशनवाल्यांनी २४ तासाचा व्हीजा काही न सांगता दिला होता.

         लंडनमध्ये असलेल्या काही भारतीय मित्रांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण कुणाशी संपर्क होऊ शकला नाही. इथे रात्री अकरापर्यत सूर्यप्रकाश होता व सकाळी चार वाजता सूर्यप्रकाश दिसत होता. इथला सूर्य मे-जून महिन्यात कमी झोपतो, असे समजले.

         पहाटे ४.३० वाजता उठलो कारण आपल्या व ह्यांच्या वेळेमध्ये साडेचार तासाचा फरक आहे. प्रातर्विधी आटोपून प्रभातफेरीसाठी बाहेर पडलो. रिसप्शनवर हॉटेलचे मॅनेजर भेटले, त्यांनी गुड मॉर्निंग केले, त्यांच्याकडे चौकशी करून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. अर्धा तास भ्रमंती केली. छोटी छोटी साचेबद्ध घरं. पूर्ण नियोजन करून उभं केलेलं शहरं. ऐतिहासिक शहर.

         हॉटेलवर परतल्यावर भुपेंद्र सिंग नावाचा पंजाबी टॅक्सी चालक भेटला. त्याच्याशी बातचीत केली, लंडन पाहण्याची मनीषा व्यक्त केली. तो तयार झाला. विमान चुकल्यामुळे कुढत बसायचे की मिळालेल्या संधीचं सोनं करायचं हे प्रत्येकानी ठरवायचं.

         मस्तपैकी भरपूर नाश्ता केला व सकाळी ८.३० वाजता आमची लंडन भ्रमंती चालू झाली. भुपेंद्र सिंग त्याच्या बॉलिवूड ते हॉलिवूड मैत्रीचे किस्से सांगत होता. आज शनिवार आहे म्हणून ट्रॅफिक कमी आहे, नाहीतर सेंट्रल लंडन जायला दीड तास तरी लागतो, असे त्याच्या बोलण्यावरून समजले. खूप वर्षाची इच्छा होती, क्रिकेटची पंढरी ज्याला संबोधलं जाते असे लॉर्ड्स मैदान. जिथं भारताने १९८३ साली वेस्ट इडिजला हरवून  कपिल देव ह्यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप पटकावला, जिथे नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती, जिथे वेंगसरकरांनी तीन शतके मारली होती व जगातील मोठमोठ्या खेळाडूंच्या पदस्पर्शानं पावन झालेलं लॉर्ड्स मैदान पाहायचं होतं आणि काय संयोग बघा… आजही भारताने रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली T20 चा वर्ल्ड कप जिंकला. मैदान बाहेरून व आत डोकावून जेवढ पाहता येईल ते पाहिलं. जिथे ग्रँहम गुच ह्यांच्या त्रिशतकांचा ठळक 333 हा आकडा लिहला आहे. लोकांना त्या दिवशी मैदान पाहणे बंद होतं.

         नंतर आम्ही निघालो ज्या राणीच्या नावाने संपूर्ण इंग्रजांची मान आदराने खाली जाते, ज्या किल्ल्यावरून जागतिक निर्णय घेतले गेले होते, त्या बर्घिंघम पॅलेसला भेट दिली, मनसोक्त फोटो काढले. त्या फोटो काढण्याच्या नादात एक तरुण व तरुणी आमच्याशी जवळीक साधू पाहत होते, त्यांनी माझ्या नकळत माझ्या बॅगेला हात लावला. आमच्या अर्धागिनींच्या नजरेतून व त्यांच्या हालचालीवरून आम्हाला त्यांचा संशय आला, आम्ही त्यांच्याकडे पाहू लागलो तितपर्यत ते माना खाली घालून पतली गलीसे भाग गये.

         नंतर आम्ही हुजूर व मजूर पक्षाच्या नेत्यांच्या संवादाने भारलेल्या, जागतिक राजकारणाचे माहेरघर असलेल्या व जागतिक यश अपयशात कारणीभूत ठरलेल्या पार्लमेंटमध्ये ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य केव्हा मावळत नाही अशा ब्रिटीश पार्लमेंटला भेट दिली. भारतीय वंशाची व्यक्ती आज पंतप्रधान आहे व काल परवा रोहीत सेनेने सेमी फायनलला पराजित केले. हे सूर्य मावळत चालल्याचे जिवंत उदाहरण. बाजूलाच राजघराण्याचं भव्य दिव्य चर्च आहे, त्याला भेट दिली. तेथून आय लंडन पाहायला गेलो. वाटेत मॅडम तूसॉ संग्रहालय, जिथे जगातील सेलेब्रिटीजचे व्हॅक्सचे पुतळे उभारले आहेत ते बाहेरून पाहिलं. नंतर आमची सवारी लंडन ब्रिज इज फॉल्लिंग डाउन – लंडन ब्रिज पाहायला गेली. ते पाहता पाहता दुपारचे बारा केव्हा झाले ते समजले नाही. ट्रॅफिक असल्याने हित्रो विमानतळावर जायला गुगलची मॅडम दीड सांगत होती, कालचा आमची चुक नसताना विमान चुकलंच.. अनुभव ताजा होता. आमच्या हिने सांगितले, आता बस झाले. मग तिथून आम्ही काढता पाय घेतला व आमची कार विमानतळाच्या दिशेने धावू लागली. बरोबर दीड वाजता आम्ही आमच्या जीवाचं लंडन करून परतलो.

         विमान चुकल्याचा मनस्ताप डोक्यातून जात नव्हता पण अपघाताने का होईना आम्ही लंडन पाहून घेतलं. कारण मे महिन्यात आम्ही युरोपला गेलो होतो पण मुद्दाम लंडनला जाण्याचे टाळले होते. २३ दिवसाची सहल खूप मोठी होती. आम्ही कमी (१८) दिवसाची सहल बुक केली, वास्तविक त्यामुळे केव्हा तरी लंडन पाहून घेऊ, ते एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते. निर्मितीपेक्षा निर्मात्याची स्तुती करणे महत्वाचे आहे, ह्या जगातील सर्व जीवजंतूंचा निर्माता जो प्रभू परमेश्वर आहे, ज्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पानही हलत नाही,  त्याच्या आशीर्वादाने व आमच्या प्रयत्नाने लंडन भ्रमंती शक्य झाली

         अशा प्रकारे मिळालेल्या संधीचं सोनं करत, जो होता है वह अच्छे के लिये होता है, जो होगा वो भी अच्छे के लिये होगा असे बोलत ब्रिटिश एअरवेजच्या कार्यालयाकडे वळालो. तेथील अधिकार्‍याला आमची कहाणी सांगितली, त्यांनी संपूर्ण सहकार्य केले व व्हीलचेअरच्या सहाय्याने आमची गेटपर्यत जायची सोय केली. दुसऱ्या दिवशी वेगासला पोहचलो. इमिग्रेशन व कस्टम क्लिअर करून उतरलो तर आमची नात व लेक स्वागतासाठी गेटवर उभे होते, त्यांच्याबरोबर रात्री ९.३० वाजता आम्ही आमच्या हेंडरसन येथील घरी पोहचलो.