लांब केसांची राजकन्या – मॅक्लिना रिबेलो

लांब केसांची राजकन्या

  • मॅक्लिना रिबेलो, चौकाळा

         तिची ओळख गावात तिच्या लांबसडक केसांमुळेच होती. गव्हाळ वर्णासोबत त्या लांब केसांनी तिचं सौंदर्य अधिकच खुलवलं होतं. जो कोणी तिला पहायचा, त्याचं लक्ष तिच्या कमरेपर्यंत पोहोचणाऱ्या सरळ, रेशमी केसांकडे वेधलं जायचं. ती नेहमी साधी वेणी बांधायची, कधीच फुलं माळायची नाही. तिच्या केसांबद्दल अनेकांना हेवा वाटायचा, पण त्याचवेळी मनात विचार यायचा—काय उपयोग या सौंदर्याचा? कारण जन्मतःच तिला हृदयविकाराचा आजार होता. या आजारामुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि ती गेली ३५ वर्षे आपल्या विधवा आईसोबत राहत होती. ती कमावत नव्हती, पण ताटात वाढलेलं जेवण समाधानाने खायची, सांगितलेलं काम शांतपणे करायची. तिने कधीच कुणावर आवाज चढवला नाही, कुणाशी भांडण केलं नाही. तिचा हसरा चेहरा आणि बोलके डोळे सगळ्यांना आवडायचे.

         तिच्या आईसाठी मात्र एकच काम आव्हानात्मक होतं, मुलीचे केस धुणं… ती आपल्या आईलाच केस धुण्यासाठी सांगायची. कुठलाही शॅम्पू किंवा कंडिशनर न वापरता, केवळ भिजवलेल्या शिकेकाईने केसांना मसाज करायची, तास-दोन तास तसंच ठेवायची आणि मग गरम पाण्याने धुवायची. तिच्या लांबसडक केसांचं रहस्य हेच होतं. आईलाही आपल्या मुलीच्या केसांचा अभिमान होता. कुठलीही तक्रार न करता, मुलीच्या केसांची काळजी घ्यायची. दोघींचं नातं अतूट होतं. त्या झोपाळ्यावर बसून बालपणीच्या आठवणींमध्ये रमायच्या, भविष्याची स्वप्नं रंगवायच्या. म्हातारी ८० वर्षाची होती, पण माझ्या लेकीचं माझ्याशिवाय कसं होईल या विचाराने ती तग धरून होती.

         भर पावसाची रात्र.. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. आकाशात वीज कडाडली. अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या धक्क्याने तिच्या शरीराची निम्मी बाजू कायमची निष्क्रिय झाली. उजवा हात, उजवा पाय काम करेनासे झाले. शरीराने जरी ती जिवंत होती, तरी मनाने मात्र कोलमडली. जगण्याची उमेद सुटली. ‘काय फायदा या शरीराचा? काय फायदा या जगण्याचा? कुणासाठी जगावं? आणि जगलोच तर त्यांना आपलं सगळं करावं लागणार.’ या विचारांनी ती ग्रासली गेली. पण मृत्यू सहजासहजी येत नाही, तो येणार तेव्हाच.

         आई अजूनही काटक होती. लेकीची सगळी कामं तीच करायची. डोळ्यातले अश्रू पदराने पुसत, ‘देव सगळं नीट करेल. तू पुन्हा चालशील, फिरशील,’ असं सांगून मुलीची समजूत काढायची. तिचं धुणं, खाणं, पिणं सगळं आईच करत होती. पण एकच गोष्ट तिला जड जात होती, मुलीचे केस. ‘बघ, आता माझ्याहून होत नाही तुझं. मीही म्हातारी, आजारी. मला नीट दिसत नाही. त्यात तुझ्या केसांचे लाड करणं आता शक्य होत नाही,’ असं ती म्हणायची.

         मुलगी म्हणाली, ‘आई, एक वेळ मला खायला-प्यायला नाही दिलंस तरी चालेल. माझी रोजची अंघोळ नाही केलीस तरी चालेल. पण माझे केस रोज विंचर, तेल लाव, वेणी बांध. तेवढंच काही आहे माझ्याकडे.’

         म्हातारी मनातल्या मनात विचार करायची, ‘ही अशी आजारी आणि त्यात इतकी हट्टी. हिची कशी समजूत काढू? मला किती त्रास होतो या केसांचा. काहीतरी करायलाच हवं.’

         त्या रात्री, आईने मुलीचे केस हातात घेतले. थंडगार हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. केसांना छान तेल लावलं, फणीने गुंता काढला आणि रोजच्या सवयीप्रमाणे लांबसडक वेणी बांधली. आईच्या थंडगार हातांनी मुलीला कधी झोप लागली, तिला कळलंच नाही. म्हातारीने हातातील कात्री घट्ट पकडली, डोळे घट्ट बंद केले, अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि लांबसडक वेणी छाटून टाकली.

‘आई, काय करतेस तू? माझ्या केसांना का हिसका देतेस?’ मुलगी ओरडली.

‘बघ राणी, आता मला नीट दिसत नाही. तुझं काम करताना मी फार थकून जाते. तुझ्या केसांचे लाड करणं आता शक्य नाही. त्यांचा गुंता काढून, तेल लावून, वेणी बांधणं माझ्या म्हातारीकडून जमत नाही. आणि काय फायदा या केसांचा? तुझं हे शरीर अर्धवट काम करतं. केसांचा मेळा तर तुला त्रासच देतो. म्हणून मी ते छाटून टाकले आहेत. आता हे एका पिशवीत बांधते आणि दूर फेकून देते.’

         ‘आई, माझ्या केसांसारखंच तुला माझाही एकदा त्रास होईल. तुला मीही नकोशी होईन. मग असंच माझा गळा छाटशील का? पंखाविना पक्षी कसा उडेल? फांद्याविना झाड कसं शोभेल? मला न विचारता तू इतका धाडसी निर्णय घेतलास. या केसांच्या प्रेमामुळेच तर मी जगत होते. तेच माझ्याकडे होतं, जे माझं होतं, जे मला मनापासून आवडत होतं. तेही तू माझ्याकडून घेतलंस, मला न विचारता. असो, तू म्हणतेस तेच खरं. काय फायदा या केसांचा मला.’

         त्या रात्री दोघी रडल्या. बाहेर पाऊस पडत होता. काही दिवसांनी मुलीने या जगाचा निरोप घेतला. शरीराने जरी ती अपंग होती, तरी मनाने ती मुक्त झाली. म्हातारी एकटी पडली. ‘आता जगू कुणासाठी? मुलीची सेवा करण्यासाठी आयुष्य मागितलं होतं. तीही देवाने हातून घेतली.

         तिच्या जाण्यानंतर काही दिवसांतच म्हातारीने अंथरूण पकडलं. काळाच्या ओघात तीही आपल्या लेकीकडे निघून गेली. तिच्या जाण्याने घर सुन्न झालं. जसं घर रिकामं झालं, तसंच एकेक करून दूरदूरचे नातेवाईक येऊ लागले, काय मिळतंय, काय उरलंय, हे पाहण्यासाठी. विधवा, एकटी बाई, तिच्या घरी काय मिळेल, हीच चर्चा.

         कपाट उघडण्यात आलं. व्यवस्थित घड्या घातलेले जुने कपडे, जुन्या वस्तू, एका कोपऱ्यात एक छोटीशी पिशवी ठेवलेली दिसली. ‘काही संपत्ती तर नसेल ना? कदाचित थोडेफार दागदागिने किंवा पैसे?’ नातेवाईकांच्या नजरा पिशवीवर खिळल्या. सावधपणे ती उघडली गेली. आत काही नव्हतं, ना दागदागिने, ना नोटा, फक्त एक सुंदर, काळीभोर, लांब, रेशमी वेणी.

         त्या केसांची वेणी… जी कधीकाळी एका मुलीचं स्वप्न होतं, तिचं अस्तित्व होतं, तिचं एकमेव अभिमानाचं, प्रेमाचं दागिनं होतं.

         पिशवीतली ती वेणी खूप काही सांगून गेली, एक कथा, एक नातं, एक प्रेम, एक वेदना… आणि दोन जीवांचं संपलेलं आयुष्य.