ए.आय.(A.I.): मानवी अस्तित्वास धोका ?
— मेलवीन डाबरे – वसईकर
आज हाकेच्या अंतरावर आणि एका क्लिकवर जग आलेलं आहे. बेसपासून ते स्पेसपर्यंत स्वयंचलित कार्ये सहज होताना दिसत आहेत. एग्रीकल्चर ते सायन्स कल्चर दिवसेंदिवस वेगाने विकसित होत आहे. टॉप-टू-बॉटम संगणक प्रणाली धावत आहे. ऑफलाइन – ऑनलाइनच्या जमान्यात यंत्रशिक्षणाच्या जोरावर मानव अधिक बुद्धिमान बनत आहे. अशा या चौफेर भडीमार करणाऱ्या टच-क्रांती युगामध्ये संगणक शास्त्रातील शाखांमध्ये आणखी एका महत्त्वाच्या शाखेची भर पडलेली आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय. (Artificial Intelligence).
ए. आय. चा वटवृक्ष
संशोधन, नियोजन, संयोजन, समस्या निराकरण, क्षमता शोधन, खेळ -मनोरंजन – मीडिया – तंत्रज्ञान – शिक्षण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, संरक्षण, विज्ञान, अभियांत्रिकी,वाहतूक, राजकारण, साहित्य, उत्पादन अशा या सर्वच क्षेत्रांमध्ये ए. आय.ची बीजे रोवून त्याचा वटवृक्ष होताना दिसत आहे.
सर्वव्यापी कृत्रिम बुद्धिमत्ता
रूढ आणि संगणकीय अशा दोन्ही प्रवाहामध्ये ए. आय. ने मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली आहे आणि या दोन्ही प्रवाहातून आता संकरित बुद्धिमत्ता देखील आकार घेत आहे. दररोज नव्याने येणारे संगणकीय विविध ॲप्स, गेम्स, टेक्स्ट – टू – स्पीच टू – फ्लॅश सॉफ्टवेअर, यंत्रमानव, मोबाईल रोबोट, अमेझॉनची अलेक्सा, एप्पलच्या सिरी, गुगल ट्रान्सलेट, चॅट बॉट्स, ॲनिमेशन ग्राफिक्स, व्हर्च्युअल रिॲलिटी, ड्रोन, स्पॉट, अल्फाझिरो या सर्वांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वव्यापी झालेली आहे.
ए.आय.आणि कार्यक्षमता
ए.आय.च्या मदतीने मानव अधिक सुजनात्मक होत आहे यात शंका नाही. कामातील अचूकता, पूर्णवेळ ए.आय.ची उपलब्धता, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत ए. आय. रोबो चा वापर, माहिती संपादन व पृथक्करणाचा मोठ्या प्रमाणातील गुंतागुंतीचा डेटा सहज हाताळणं, वेबसाईटवर उपलब्ध असलेली सर्व प्रकारची माहिती, भावनिक व प्रात्यक्षिक गोष्टींपलीकडे जाऊन घेतलेले ए.आय.चे निर्णय, कामगारांपेक्षा जलद गतीने केलेली उत्पादनक्षम कामं अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये ए.आय.च्या मदतीने मानव सृजनशील बनत आहे.
ए.आय. आणि मानवी अस्तित्व
मानवांसारखी बुद्धिमत्ता असून विचार करणारा, शिकू शकणारा, सर्व प्रकारची कामे करणारा, कोणतेही बौद्धिक कार्य करणारा, यंत्रे बनविणारा तंत्रज्ञानाचा एक संच म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहिली जाते पण याच ए.आय. मुळे मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारी बरीचशी आव्हाने समोर उभी ठाकलेली आहेत. ए. आय.च्या मदतीने मिळणार्या वैयक्तिक माहितीमुळे (बिग डेटा) पारदर्शकता आणि निष्पक्षता तसेच गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. ए. आय. च्या वापरामुळे खेळ – मनोरंजन – शिक्षण आणि मिडियाच्या दुनियेत नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. बेरोजगारी वाढत आहे. नैतिकतेला बाधा आलेली आहे. सायबर गुन्हेगारी आणि हॅकर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुन्हेगार जगत अधिक आक्रमक झालेलं आहे.
आज ए. आय. च्या मदतीने सर्व काही होत असल्यामुळे माणूस ज्ञानी बनतो आहे की अज्ञानी? स्वावलंबी बनत आहे की परावलंबी? तसेच बौद्धिक दृष्ट्या अपंग तर बनत नाही ना? असे अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले आहेत.
इतक्या सहजपणे आपल्या नकळत आपण ए. आय.ला आपल्या जीवनात स्थान दिलेलं आहे की भविष्यात ए. आय. आपली रोजची दैनंदिन कामे आपल्यापेक्षा बिनचूक आणि सफाईदारपणे करील यात दुमत नाही त्यामुळे आपले भविष्यातील जीवन कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित असेल याची मानसिक तयारी करणे अपरिहार्य आहे; कारण विचार आणि भावना समजून संवाद साधणारे तंत्रज्ञान ए. आय. आधारे तयार करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत आणि जर या प्रयत्नांना यश आले तर मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.