एक निरपराधी प्रेषित – मायकल लोपीस

एक निरपराधी प्रेषित

तुम्हाला ठाऊक होतं की एक दिवस

आपल्याला नक्कीच अटक होईल

तरीही तुम्ही त्या गरिबांच्या बाजूने

लढत राहिलात

का…? कशासाठी…?

कोण लागत होते ते तुमचे….?

पण तुम्हा प्रेषितांचं ना इथेच चुकतं

‘करशील जे गरिबांसाठी’….!

म्हणून तुम्ही दीन दलीतांची बाजू घेताना

भ्रष्टाचाराविरोधी लढता, आंदोलन करता

तुम्हाला झग्यामध्ये लपता येत नाही

की देवळाच्या चार भिंतीत जगता ही येत

नाही…

त्यामुळे झालंय काय…

खिस्ताला क्रुसावर खिळले गेलं

महात्मा गांधींना गोळया घातल्या गेल्या

स्टेन ला तर त्यांच्या कोवळया मुलांसकट

जीवंत जाळलं गेलं

पण ह्यांचं कुणी वाकडं करू शकलं नाही

कारण सत्ता ह्यांच्याच हातात…

ह्यांना वाटतं सूर्य ह्यांच्या बापाचा

म्हणून सगळं काही सूर्य प्रकाशा स्पष्ट

असतांना सुध्दा

त्यांनी तुमच्यावर बिनबुडाचे आरोप लावले

तुम्हांला अंधाऱ्या कोठडीत डांबलं…

तुमच्या वयाची पर्वा न करता

तुमचे औषधोपचार बंद केले

ज्यांना तुम्ही हातात पेन धरायला शिकवलं

त्याच हातांनी तुम्हाला बेड्या ठोकतांना

ह्यांना लाज कशी वाटली नाही…?

कुत्र्या-मांजरांच्या पिलांना वेंगेत घेऊन

निजणार्‍या तुमच्या मुलांना शिक्षणाचे

धडे दिले कुणी…!

ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…!

पण लक्षात ठेवा

त्याने तुम्हाला साताच्या सत्तर वेळा माफ

केलं असेल

नियती कुणालाही माफ करीत नाही

तुम्ही जे पेराल तेच उगवेल…

  •  मायकल लोपीस, माणिकपूर