वेग-एक नशा – कल्पना रॉड्रिग्ज

वेग-एक नशा

  •  कल्पना रॉड्रिग्ज, टेक्सास, यूएसए

“मम्मी, मम्मी, ते बघ डॅडी स्वर्गात मोटारसायकल चालवत आहेत” छोट्या हार्लीच्या त्या बोलण्याने आणि हलवल्याने सारा आपल्या तंद्रीतून बाहेर आली. तिनेही वर आकाशाकडे पाहीले आणि आपल्या लेकीला कवेत घेऊन तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. आज स्टीफनला जाऊन एक वर्षाचा कालावधी लोटला होता. दोघी मायलेकी फुलांची परडी घेऊन दफनभूमीत जिथे त्याला पुरले होते तिथे आल्या होत्या. आपल्या नाजुक हाताने हार्ली एक एक फूल त्याच्या खाचेवर ठेवत होती आणि वर आकाशाकडे बघत होती. ढगांची हालचाल किंवा विमानांचा धुर पाहीला कि लीला नेहमी तिचे डॅडी स्वर्गात मोटारसायकल चालवत आहेत असेच वाटायचे. साराने आपल्या परडीतून लाल गुलाबाचे फुल काढले. त्या गुलाबाकडे बघताच साराला तो दिवस आठवला ज्या दिवशी स्टीफनने तिला प्रथमच लाल गुलाबाचे फुल दिले होते. त्या गुलाबाप्रमाणेच तिच्या चेहर्‍यावर तेव्हा लाली पसरली होती. परडीतून निघणारे एक-एक फुल आता साराला आपल्या भुतकाळात घेऊन जात होते….

सारा सुखवस्तु कुटूंबात जन्माला आली होती. आई-वडिलांच्या संसारवेलीवर उमललेले पहिले फुल म्हणून ती खुपच लाडा-कोडात वाढत होती. साराचे वडील सैन्यात मोठ्या पदवीवर कामाला होते पण नेहमीच त्यांची कामाची ठिकाणे बदलत होती आणि सारा आणि तिची आई त्यांच्या जोडीला त्या शहरात राहायला जात होत्या. आईच्या निगराणीखाली सारा वाढत होती आणि बालपणीची सगळी सुखं तिच्या पायाशी लोळण घालत होती.

सारा, तीन वर्षांची झाली आणि तिच्या आईला दुसऱ्या बाळाची चाहुल लागली. खेळायला जोडीदार मिळणार ह्या कल्पनेनेच, सारा भारावून गेली होती. आपल्या भावडांची ती आतुरतेने वाट पाहात होती. कोणती खेळणी वादून घ्यायची, कोणते खेळ खेळायचे हे सर्व तीने आधीच ठरवून टाकले होते. यथावकाश रियाच्या रुपाने साराला बहीण मिळाली आणि सारा खुप खुश झाली. जात्याच प्रेमळ स्वभाव आणि दिलदार वृत्ती यामुळे सारा आपल्या बहीणीची चांगली काळजी घेत होती. रियाच्या बाललिलांकडे ती टक लावून पाहायची, रिया आपली छोटीशी मुठ तोंडाकडे न्यायची तेव्हा साराला कळायचे कि तीला भुक लागली आहे. रिया भोकांड पसरायची म्हणजे तिने अंथरुण ओले केले असणार ह्याची जाणीव तिला व्हायची. दोघी बहीणी वाढत होत्या आणि त्यांचे सारं करताना आईचा एकटीचा जीव मेटाकुटीला येत होता.

सारा पाच आणि रिया दोन वर्षाची झाली. आणि त्याचवेळी त्यांच्या वडीलांना परदेशी जावे लागले. संसाराचा संपूर्ण भार एकट्या आईवर आला. पण ती नेटाने आपली जबाबदारी पार पाडत होती. छोटी सारा आता मोठी झाली होती आणि तीची शाळा सुरु झाली होती. नित्यनेमाने ती शाळेत जात होती पण खरे तर तिचे ध्यान जास्त घरीच असायचे. सारखी आपल्या बहीणीचा विचार करून कधी हसायची तर मध्येच कधी रडायची. वेळ भुर्रकन निघुन जात होती.

रियाही शाळेत जाऊ लागली पण त्यांच्या वडीलांचे परदेशी वास्तव्य वाढले होते. देशाने त्यांच्यावर एक गुप्त कामगिरी सोपवली होती आणि जोपर्यंत हो काम पूर्ण होत नव्हते तोपर्यंत त्यांना मायदेशी येणे कठीण होते. सारा आठ वर्षाची झाली आणि एक दिवस शाळेत असताना डोके दुखत आहे असे सांगून रडू लागली “घरी जायचेय, माझ्या आईला बोलवा” असे विनवू लागली. शिक्षकांना वाटले कि हिला अभ्यासाचा कंटाळा, म्हणून ही नाटकं करते आणि त्यांनी तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले.

घरी पोहचल्याबरोबर साराने आपल्या आईला सर्व सांगितले, भूकेमुळे असेल किंवा तू उन्हात खेळट असते म्हणुन असेल, असे सांगून तीच्या आईने तिला जेवायला वाढले आणि नंतर हलक्या हाताने तिच्या डोक्याला मालीश केले. थोड्याच वेळात सारा आपली डोकेदुखी विसरली आणि रियाबरोबर खेळू लागली.

साराला अभ्यासापेक्षा इतर गोष्टींचा भारी नाद. पोहणे, चित्र काढणे, खेळणे इत्यादी कलागुणांमध्ये तीचा हात कुणी धरू शकत नव्हते. वर्गापेक्षा वर्गाबाहेर तिचे मन रमायचे. तिची वृत्ती थोडीशी बेफिकीर असल्यासारखी बनली. उडाणटप्पू मुलामुलींच्या संगतीत तिला खुप आनंद मिळत होता. शाळा बुडवण्यासारखे पराक्रमही करत होती. असता असता ती सहावीत पोहचली आणि तिच्या डोकेदुखीने परत मान वर काढली.

वरचेवर होणाऱ्या त्रासाने आता तीही वैतागली. आईच्या लक्षात आले कि काहीतरी गडबड आहे. तिने साराला डॉक्टरकडे नेले. सांगित‌ल्याप्रमाणे वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि आलेल्या अनुमानाने जणू सर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. छोट्या साराला रक्ताच्या कॅन्सरने आपल्या विळख्यात ओढले होते. तिच्या आईला काहीच सुचत नव्हते. काय झाले आहे, हे समजण्याइतपत सारा आणि रियाचंही वय नव्हतं. साराच्या वडिलांनी कौटुंबिक कारणाखाली आपल्या नोकरीतून रजा घेतली आणि आपल्या घराकडे धाव घेतली. साराच्या आईवडीलांनी एकमेकांना धीर दिला आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून साराच्या औषधोपचाराला सुरुवात केली.

निरनिराळ्या चाचण्या, एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये धाव, वेगवेगळी औषधे, इंजेक्शने.” ‘देवा, इवलासा तो जीव, काय काय सहन करणार?” साराची आई नेहमी डोळ्यात पाणी काढायची पण जात्याच हिंम्मतवान असलेल्या साराने धीर नाही सोडला, ती आपल्या आजाराशी झुंजत राहीली. मृत्यूशय्येवर असताना ती आपली शाळा, मित्र मैत्रिणी, रिया यांची आठवण काढत राहायची. मध्येच हसायची तर कधीतरी रडायची. तिच्याकडे पाहून सारेच दुःखी व्हायचे पण तीच धीर देवून सांगायची, “मी पुर्णपणे बरी होईन” जवळजवळ तीन-चार वर्षाच्या कालावधीत निरनिराळ्या औषधोपचारांनी सारा आपल्या आजारातून मुक्त झाली. ज्या दिवशी डॉक्टरांनी ती पुर्णपणे कॅन्सरमुक्त झाली आहे असा रिपोर्ट दिला त्यादिवशी केक कापून तिच्या कुटूंबीयानी तिचा पुर्नजन्म साजरा केला. या आजारपणामध्ये सारा आपल्या शाळेला मुकली होती, पण इतर कलागुणांनी तीला सोबत केली होती.

साराची शाळा परत चालू झाली. छोटी रिया अभ्यासात खुप हुशार होती, पण साराने जेमतेम आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणाला रामराम ठोकला. शॉपींग मॉल, ब्युटी सलून, रेस्टॉरंट अश्या वेगवेगळ्या ठिकाणी ती नोकरी करत राहीली.

हे सर्व करत असताना साराला मोटरसायकल चालवण्याचा शौक जडला आणि तीने मोटारसायकल. स्वारांचा क्लब जॉईन केला. वेगवेगळ्या दौर्‍यावर हे मोटरसायकलस्वार जायचे आणि सारा ही त्यात सहभागी व्हायची. आपले काम सांभाळून ती आपले सारे शौकही पूर्ण करायची. साराचं आता लग्नाचं वय झालं होतं पण तिला हवा तसा जोडीदार अजून तिच्या नजरेत नव्हता. घरूनही तिच्यावर दबाव नव्हता त्यामुळे सारा आपल्या योग्य राजकुमाराच्या प्रतीक्षेत होती.

एक दिवस साराने आपला छोटा मोटारसायकल स्वारांचा सब सोडून मोठा क्लब जॉईन केला आणि तिथे तिची ओळख स्टीफनशी झाली. पहिल्याच भेटीत दोघांच्याही हृदयात प्रेमाच्या तारा छेडल्या गेल्या पण औपचारीक ओळख करुन दोघांनी एकमेकांची रजा घेतली. लवकरच त्यांच्या भेटी वाढू लागल्या, दोघांनाही एकमेकांच्या सहवासात अपार आनंद मिळत होता त्यांच्या मैत्रीची वीण घट्ट होत होती. कधीकधी सारा विचार करायची, हाच असेल का तो ज्याच्यासाठी मी ताटकळत आहे? ज्याच्या जोडीला मला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे! ते माझ्या मनात आहे, तेच असेल का त्याच्याही मनात? आपण, विचारायच का त्याला? पण मग पुढल्या क्षणी तिला वाटायचं, जर त्याच्या मनात तसे काही नसेल तर उगाच मैत्रीतही बाधा यायची त्यापेक्षा थोडे दिवस अजून थांबू या.

येथे स्टीफनची परिस्थितीसुद्धा काहीशी तशीच होती. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. सर्वत्र त्याला साराच दिसत होती. तिचा आवाज त्याच्या कानात नेहमी सप्तसुरांसारखा गुंजत राहायचा. त्याला काहीही सुचत नव्हते ते काही नाही. काय व्हायचं ते होईल पण येत्या शनिवारी जेव्हा आपण साराला भेटणार आहोत तेव्हा तिला विचारायचे आणि सांगुन टाकायचे की माझे तिच्यावर किती प्रेम आहे… असा मनाशी निर्धार करून स्टीफन त्या दिवसाची वाट पाहू लागला.

ठरल्याप्रमाणे त्या शनिवारी सर्व मोटारसायकल स्वार आपल्या नेहमीच्या ठिकाणी एकत्र जमले. आठवड्याच्या शेवटी हे सर्वजण एक लांबचा पल्ला एकत्र गाठत असत आणि परत भेटायचे आश्वासन देऊन परत फिरत असत. परतीच्या प्रवासात नेहमी पुढे असणारा स्टीफन त्यादिवशी आपल्या गाडीचा वेग कमी करून मागे रेंगाळत होता. त्याच्या मित्रांच्या ते लक्षात आले आणि एक-एक करून सर्व पुढे निघून गेले. साराला माहीत होते कि तो तिच्याचसाठी मागे राहीला आहे. एक निवांत ठिकाण पाहुन तिने आपली गाडी बाजुला लावली. त्यानेही क्षणाचा विलंब न लावता साराचे अनुकरण केले. “मला तुला काही सांगायचे आहे” हे वाक्य दोघांच्याही तोंडून एकाचवेळी बाहेर पडले. स्टीफनने आपल्या कोटाच्या खिशात हात घात‌ला आणि जपून ठेवलेले ते लाल गुलाबाचे फुल बाहेर काढ‌ले. ते गुलाबपुष्प साराला देत तो बोलला “माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायला मला आवडेल, तु माझ्याबरोबर लग्न करशील का?” एका दमात तो हे सर्व बोलून गेला. आपल्या हद‌यावरचं मणभर ओझे कमी झाल्यासारखे त्याला वाटले. आता प्रतीक्षा होती ती साराच्या उत्तराची, आपल्या डोळ्याच्या कोपर्‍यातून त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला, साराचे गाल त्या लाल गुलाबासारखे झाले होते. तिच्या चेहर्‍यावर एक आगळेच तेज पसरले होते.

डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूना तिने वाट मोकळी करून दिली आणि ती पुटपुटली, “मलाही तेच सांगायचे होते.” एकमेकांचे हात हाती घेऊन त्यांनी बराच वेळ आपल्या भविष्याची स्वप्ने रंगविली आणि तेव्हापासून त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

एक वर्षाच्या कालावधीत दोघांचेही कुटूंब एकत्र आले आणि त्यांच्या लग्नाची बोलणी पक्की झाली. एकमेकांना अनुरूप असेच ते दोघे होते. लग्नमंडपात स्टीफन साराला आपल्या “हार्ली डेव्हिडसन” ह्या मोटारसायकलवर घेऊन आला. ती मोटारसायकल त्यांच्या ओळखीची, मैत्रीची, प्रेमाची आणि आता लग्नगाठीची साक्षीदार बनली होती. दोघांनाही मोटरसायकल चालवण्याचा शौक असल्याने ते खुप वेळा आपला प्रवास कार ऐवजी मोटरसायकलनेच करायचे. सर्व काही व्यवस्थित होते पण स्टीफनला वेगाची नशा होती हातात गाडी घेतली की तो वेगाच्याही पुढे पळत असल्यासारखा करायचा. नातेवाईक, मित्रपरिवार आणि अधूनमधून साराही त्याला उपदेशाचे डोस देत होती. पण तो ऐकून न ऐकल्यासारखे करत होता. लग्नाला सहा-सात महीने झाले आणि साराला बाळ होण्याची चाहूल लागली. त्या दिवशी दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला, मुलगी झाली तर ‘हार्ली’ आणि मुलगा झाला तर ‘डेव्हीड’ असे नामकरण करण्याचेही त्यांचे ठरले.

स्टीफन आता साराची खुप काळजी होत होता. एक चांगला पत्नी आणि आदर्श पिता बनण्याचा प्रयत्न करत होता. साराचे औषधोपचार चालु होते. सहा महीने व्यवस्थित भरले आणि एक दिवस साराच्या ओटीपोटात खुप दुखू लागले. स्टीफन तिला घेऊन दवाखान्यात धावला, दोघांचेही नातलग गोळा झाले. निदान करुन डॉक्टर बोलले की तिच्या गर्भाशयाची पिशवी फाटली आहे आणि तातडीने शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढावे लागेल. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी आधीच सांगितले, स्टीफन थरथरू लागला, रडू लागला पण पुढच्याच क्षणी साराला धीर द्यायला हवा हे त्याच्या लक्षात आले. पुन्हा एकदा साराचा हात हाती घेत तो बोलला, “माझ्या लाल गुलाबाच्या फुला, तुला आणि आपल्या बाळाला काहीच होणार नाही”

कागदोपचाराची प्रक्रिया पार पाडून सारावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी पूर्ण झाली. थोड्याच वेळाने बाहेर येऊन डॉक्टर बोलले, “मुलगी झालीय आणि दोघेही सुखरूप आहेत.”

‘माय हार्ली’ असे बोलून स्टीपनने त्यांना बघण्याची परवानगी मागितली पण हार्लीचे आगमन तीन महीने अगोदर झाल्याने तिला तीन महीने अतिदक्षता विभागात अतिनिगराणीखाली ठेवावे लागणार होते.

येथूनच स्टीफनच्या पिता होण्याची परीक्षा सुरु झाली. काचेच्या पेटीन कापसाच्या गोळ्यामध्ये वेगवेगळ्या नळ्या त्या छोट्याश्या जीवाच्या अंगाला लावलेल्या पाहुन कधीकधी स्टीफन हतबल होत होता. आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेण्यासाठी, तिला स्पर्श करण्यासाठी त्याचे मन आतूर झाले होते पण तिला कसलेही इनफ़ेक्शन होऊ नये म्हणून ते तिच्यापासून दूर राहत होते. न चुकता तीन महीने सारा आणि स्टीफन दोघेही आपल्या लेकीच्या सहवासाचा दुरून अनुभव घेण्यासाठी दवाखान्यात येत राहीले.

तीन महीन्याच्या कलावधीत छोट्याश्या हार्लीने डॉक्टरांच्या अथक परीश्रमाने, सर्वांच्या प्रार्थनेने आणि आपल्या मम्मी-डॅडीच्या प्रेमाने बाळसं धरायला सुरुवात केली. साडेतीन महीने दवाखान्यात राहून ती आता घरी यायला तयार झाली होती. तिच्या घरी येण्याची आणि स्वागताची जंगी तयारी केली होती. तिला जेव्हा घरी आणले तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. साराप्रमाणेच हार्लीचाही पुनर्जन्म झाला होता. हार्ली दिवसेंदिवस वाढत होती, खट्याळ होत होती पण आपल्या बाललिलांनी सर्वांना मोहवतही होती.

स्टीफन आता आपल्या कुटूंबासाठी जास्त मेहनत करु लागला. एक चांगले घर बनवायचे स्वप्न तो उराशी बाळगून होता. संध्याकाळी थकूनभागून आल्यानंतर आपल्या प्रेमळ पत्नीच्या आणि लाडक्या लेकीच्या सहवासात त्याचा थकवा क्षणात दुर होत होता. यथावकाश सारानेही आपल्या कामाला सुरुवात केली. स्टीफनचे कुटूंब दुसऱ्या शहरात असल्याने साराची आई पूर्ण दिवस हार्लीची काळजी घेत होती. एक वर्षाच्या आत हार्ली चालूबोलू लागली. तिचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला.

साराचा संसार तिला हवा होता तसाच चालला होता. लाडकी लेक, प्रेमळ पती, आधार द्यायला स्वतःचे कुटूंब, कधी-कधी तिला स्वतःलाच हेवा वाटायचा.

हार्लीमुळे तिच्या मोटारसायकल वार्‍या कमी झाल्या होत्या पण स्टीफन नित्यनेमाने नविन ठिकाणे शोधत होता आणि आपल्या क्लबबरोबर एकेक ठिकाणे मोटारसायकलवर जाऊन पादाक्रांत करत होता. अजूनही वेगाची नशा त्याच्यात होती. जशीकाही ती त्याच्या रक्तातच भिनली होती. माझे गाडीवर नियंत्रण असते असे सांगून तो उपदेशाचे डोस उडवून लावत होता.

हार्ली आता तीन वर्षाची झाली. स्टीफन ३३ आणि सारा ३०. आपले कुटुंब वाढवायचे, हार्लीला सोबत व्हावी म्हणून दुसऱ्या बाळाची तयारी करायची असे त्यांनी ठरवले. स्वतःचं एक स्वतंत्र घर असावे म्हणून ते दोघेही जमेल तेवढी मेहनत करत होते. सर्व काही सुरळीत चालले होते आणि त्यांचे त्रिकोणी कुटूंब मजेत जीवन जगत होते.

जुलै २०२१मध्ये  स्टीफनच्या क्लबने ऑगस्टच्या पहील्या शुक्रवारी परत एकदा दुरची मोटारसायकल वारी करण्याचे ठरविले. यावेळेला ते शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बाहेर राहणार होते. कर्ताधर‌ता आणि निर्णय घेणारा अर्थातच स्टीफन होता कारण तो त्या गटाचा प्रमुख होता. साराने आणि घरच्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने कुणाचे ऐकले नाही. शनिवारी परत आल्यावर तुला आणि हार्नीला घेऊन मी रविवारी एक दिवसाची पिकनीक करेन असे सांगून ६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी स्टीफनने आपली मोटारसायकल चालू केली, “बाय राणी, लवकर भेटू” असे साराला बोलून त्याने छोट्या हार्लीचा मुका घेतला, “लव्ह यु डेंडी” असे बोलून हार्लीने हात हालवून त्याला निरोप दिला. क्षणात पाठमोरी आकृती दिसेनाशी झाली सारा घरात शिरली. घरकाम आटोपून तिने हार्लीला आपल्या आईकडे सोडले आणि ती आपल्या कामावर निघून गेली. दुपारी एक वाजता जेवणाच्या वेळी तिला स्टीफनचा फोन आला. दोघेही एकमेकांशी बोलले आणि आता जेवणानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघू असे त्याने साराला सांगितले. तो मार्ग नागमोडी वळणांचा असल्याने साराने त्याला काळजी घेण्यास बजावले. ठीक आहे असे बोलून स्टीफनने फोन ठेवला.

जेवणानंतर सारा परत आपल्या कामात मग्न झाली. दुपारी साडेतीनच्या दरम्यान तिचा मोबाईल परत वाजला. अनोळखी नंबर होता, उचलू की नको ह्या संभ्रमात असतानाचा तिने बटण दाबले आणि “हॅलो कोण बोललय ? असे विचारले, समोरच्या व्यक्तीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते पण साराला कळत होते कि पलीकडे असणाऱ्या व्यक्तीला काहीतरी बोलायचे आहे, तिने परत एकदा विचारले, समोरुन आवाज आला “वहिनी, मी स्टीफनचा मित्र, स्टीफनला जबरदस्त अपघात झाला आहे आणि तो आता या जगात नाही राहीला” एका दमात समोरची व्यक्ती हे बोलून गेली, पण येथे साराच्या हदयाचे तुकडे तुकडे झाले, तिला भोवळ आली आणि ती खाली पडली, तिच्या सहकार्‍यांनी तिला सावरले. प्रसंगाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले,  त्यांनी साराच्या घरी फोन लावला आणि तिच्या वडीलांना बोलावुन घेतले कारण त्या परिस्थितीत कार चालवणं तिच्यासाठी धोकादायक होते.

सारा आणि तिचे वडील स्टीफनला ज्या हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले होते तिथे पोहचले, सर्व सोपस्कार पार पाडून त्याचे प्रेत शवागारात ठेवण्यात आले कारण कायद्यानुसार अपघात कसा झाला? चुक कुणाची’ हे सर्व कळेपर्यंत त्यांचा अंत्यविधी होऊ शकत नव्हता.

दोन दिवसांनी सारे रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाले. दुपारचे जेवण आटोपून थोड्याश्या विश्रांतीनंतर स्टीफनने आपल्या साथीदारांसह परत प्रवासाला सुरुवात केली होती. पुढचा रस्ता धोकादायक असल्याने सांभाळून जाण्याचे सर्व एकमेकांना सांगत होते आणि तेवढ्यात स्टार्ट बोलून स्टीफनने आपल्या गाडीला किक मारली.

क्षणार्धात तो दिसेनासा झाला. मृत्युच्या जबड्यात आगमन करतोय असेच सर्वांना वाटले स्टीफनची गाडी अतिशय वेगात होती. त्याला त्या वेगाने बेभान केले होते. वळणावळणावरून तो निरनिराळ्या युक्या वापरुन पुढे पळत होता. पण कितीही म्हटले तरी ते यंत्र. पुढे एका वळणावर त्याला आपल्या वेगावर नियंत्रण करता आले नाही आणि काही समजायच्या आत तो आपल्या गाडीवरुन दुर फेकला गेला आणि समोरुन येणाऱ्या कारवर आदळला. त्याची गाडी वळणावरुन घसरली होती आणि त्या अपघाताने स्टीफन जागीच गतप्राण झाला होता. पंधरावीस मिनीटांच्या कालावधीत एकेक करत बाकीचे त्याचे मित्र तिथे पोहचले होते.

“वेग” – या वेगाच्या नशेने एका बालिकेचे पितृछत्र हरवले, एका राणीचा संसार अर्ध्यावर मोडला, सासू-सासरे आपल्या मुलासारख्या जावयाला मुकले आणि स्टीफनची आई पुत्रवियोगाने कासावीस झाली.

दोष देण्यासाठी आज स्टीफन या जगात नाही. जगात, प्रथम कॅन्सरचा विळखा, मग जीवावर बेतलेले बाळंतपण आणि आता अर्ध्यावर मोडलेला संसार, साराच्या जागी दुसरी कुणी असती तर कधीच कोलमडुन पडली असती. पण मोठ्या हिम्मतीने साराने स्वतःला साव‌रले आहे. आपल्या लाडक्या लेकीमाठी ती जगत आहे. हार्लीच्या रुपाने स्टीफन आजूबाजूला असल्याची जाणीव तिला होत असते.

स्टीफनला असलेल्या वेगाच्या नशेने त्याचा घात केला हे साराला पक्के ठाऊक आहे. जी परिस्थिती तिच्यावर ओढवली ती अजून कुणावर येऊ नये म्हणून आता ती स्टीफनचे उदाहरण देत जनजागृती करत आहे. कधीच न पोहचण्यापेक्षा ऊशीराने पोहचा असे ती सर्वांना सांगत असते. वाटेत भेटणाऱ्या मोटारसायकलस्वारांना ती पत्रके वाटतं असते त्यावरचे ब्रीदवाक्य आहे “वेगावर ठेवा नियंत्रण, मृत्युला नका देऊ निमंत्रण”

स्टीफनच्या खाचेवर शेवटचं फुल ठेऊन व बाजूला एका फलकावर एक पत्रक चिकटवून साराने हार्लीचा डात पकडला व डोळ्यातील आसवांना लपवत घरचा रस्ता धरला.