लोक काय म्हणतील ?
- डॉ. नेन्सी विन्सेंट डिमेलो
गास, गार्सियन नगर
कर्ज काढून एका थकलेल्या बापाने थाटामाटात मुलीचं लग्न केले. परीक्षेत नापास झालेल्या मुलाने लोकलाजेस्तव आत्महत्या केली. कर्ज काढून समाजात थाट मिरवण्यासाठी तरुणाने महागडी बाईक आणली. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत की ज्याद्वारे आपल्याला समजते की व्यक्ती स्वतः पेक्षा लोकांचा विचार अधिक करतो. ‘लोक काय म्हणतील?’ हे वाक्य हमखास सगळ्यांच विशेषतः मध्यमवर्गीय घरात ऐकायला मिळते.
बालवयात आपल्याला लोक काय विचार करतील किंवा लोक काय म्हणतील याची चिंता, भिती नसते. या वयात वागण्यावर बंधन नसते. वागणं नैसर्गिक असते. कोणताही मुखवटा परिधान करण्याची गरज वाटत नाही. काहीही करण्याची तयारी असते. काहीतरी नविन शिकण्याची ईच्छा आणि उमेद असते. पण व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतशे व्यक्तीच्या विचारांचे दमन व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू लोक आपले विचार व्यक्तीवर थोपवायला सुरुवात करतात. काळाच्या ओघात व्यक्तीचे बालपणीचे पहिले रुप कुठेतरी लुप्त होते आणि दुसरे रुप उदयाला येते जे लोकांच्या विचारानूसार तयार झालेले असते. मग व्यक्ती प्रत्येक वेळी वागताना, बोलताना एकच विचार करायला लागते, लोक काय म्हणतील? कधीकधी तर लोकांच्या काही म्हणायच्या अगोदर व्यक्ती स्वत:च लोक काय म्हणतील? हे ठरवते. मी कोण आहे, मला काय हवं आहे, मी काय बनू इच्छीतो हे सगळ विसरून लोकांच्या मतानूसार जगायला व्यक्ती सुरुवात करते. आपल्यातील ९० टक्के लोकांना यामुळे कधी जीवन जगण्यातील खरा आनंद मिळत नाही.
हिंदीत एक म्हण आहे, “सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?” मी जर असा वागलो तर लोक काय म्हणतील? मी टाकलेल्या धंद्यात यशस्वी नाही झालो तर लोक काय म्हणतील? मी इतका हुशार, माझ्याकडे एवढा प्रचंड पैसा… त्यात माझा मुलगा शिकला नाही तर, मुलगा व्यसनी निघाला तर, माझ्या मुलीने प्रेमविवाह केला तर ? अशा अनेक प्रश्नामागे एक ब्रम्हराक्षसी प्रश्न उभा असतो तो म्हणजे,”लोक काय म्हणतील?” हे तीनच शब्द माणसाला अस्वस्थ करतात. माणूस अपयशाला भीत नाही पण अपयश आल्यानंतर त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? याच विचाराने तो अस्वस्थ होतो.
तुम्ही इतके हुशार आणि मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले ? काय म्हणता तुम्ही इंजिनियर आणि मुलगा शिक्षक व्हायचं म्हणतोय ? ‘अरे आता लेकीची/लेकाची पंचविशी उलटून गेली लग्न कधी करताय? / लग्नाला कधी बोलवताय?, तुमच्या लग्नाला एक वर्ष झालं ना मग बाळाचे पेढे कधी देताय?, तुमचा घटस्फोट का झाला?, आता तुझं शिक्षण संपलं मग नोकरी केव्हा लागणार?, काय रे तुला पगार किती ? इत्यादी खोचक प्रश्न जे विचारणाऱ्याला सहज साधे वाटतात तेच प्रश्न बऱ्याचदा इतरांना खुप त्रासदायक असतात. ह्यामुळे एखाद्याच्या जीवनावर खुप विपरीत परिणामही होवू शकतो.
शिक्षण घेत असलेल्या मुलांना तर ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न हमखास ठरलेला असतो आणि एखाद्या मुलाने त्याचा प्लॅन सांगितला तर काही महाभाग त्याने ठरवलेले कसे चुकीचे आहे हे त्याला ठासून सांगण्याचा प्रयत्न करतात. कोणी काय कपडे घालायचे इथपासून कोणी काय व्हॉटसअप स्टेटस, स्टोरी ठेवली आहे ह्या विषयी चर्चा करून त्या व्यक्तीविषयी विधाने सहज केली जातात. आपल्या जीवनात स्वतःच्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, मतांपेक्षा ‘लोक काय म्हणतील?’ लोकांना काय वाटेल ? याचा आपण पदोपदी विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो. ह्यामुळे बऱ्याच वेळेला आपण आपल्या स्वतःवर ,आपल्या प्रियजणांवर अन्याय करत असतो.
‘कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना.’ लोकांचं काय, दोन्ही बाजूने नावे ठेवतात. जरा विचार करा की, तुम्ही तुमच्या मुलांचे खूप लाड करीत असाल तर लोक म्हणतात की, इतके नका लाड करू, मुले डोक्यावर चढतील आणि जर आपण लोकांचे म्हणणे मानून जर मुलांना रागावण्यास सुरुवात केली तर हेच लोक म्हणतात की, बघा कसे पालक आहेत, मुलांना समजून घेत नाहीत, त्यांच्यावर जराही प्रेम करत नाहीत. तुम्ही जर तुमच्या पत्नीवर खूप प्रेम करत असाल तर लोक म्हणतात की, हा बायकोच्या खूप अधीन गेला आहे आणि जर तिच्याकडे लक्ष दिले नाही तर हेच लोक म्हणतात की, बघा ही मुलगी आपले घर सोडून याच्या मागे आली आहे आणि हा तिची जराही काळजी घेत नाही. आपण एखादे काम करित असताना बरेच लोक आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देवून प्रोत्साहन देतात. तर काही लोक हे नकारात्मक विचार व्यक्त करणारे असतात. आपण मात्र नकारात्मक बोलणार्यांचा गंभीरतेने विचार करतो आणि आपला उत्साह न जाणो कुठे निघून जातो. ज्या व्यक्तींनी लोक काय म्हणतील ? याचा कधीच विचार केला नाही, आपल्यातील बालपण जिवंत ठेवले किंवा आपल्या मतावर ठाम राहिले त्यांनी इतिहास घडविण्याचे काम केले आहे.
काळ बदलला की, लोकांची मते ही बदलत असतात. लोकही प्रत्येक परिस्थितीत बोलत असतात. लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपण आपले काम करीत राहिले पाहिजे. फार जुनी म्हण आहे कि “ऐकावे जणांचे पण करावे मनाचे” या म्हणीप्रमाणे आपण कोणतेही काम विचारपूर्वक केले पाहिजे. लोकांच्या विचारांचा विचार न करता आपण आपल्या विचाराचा विचार करावा, पण तो विचारही आपल्या व इतरांच्या हिताचा असला पाहिजे. शेवटी बोलणारे हे ‘लोकं’ कोण असतात ? कुठून येतात?… ही लोक म्हणजे तुम्ही आम्हीच असतो ना…? लोकं काय म्हणतील हा प्रश्न मरेपर्यंत माणसाचा पिच्छा सोडत नाही आणि मेल्यावरही बरेच क्रियाकर्म मुलं आणि नातेवाईक निव्वळ ह्या प्रश्नाच्या भीतीने करतात. या धकाधकीच्या जीवनात ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेसुद्धा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात. म्हणूनच हे असे विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नं पोहोचणं हेच फायदेशीर आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. पुढची पिढी ही आपला साचेबद्ध, मर्यादित समाज ओलांडून जागतिक पातळीवरील विविध समाजाचे भाग बनले आहेत. त्यामुळे समाजव्यवस्था वा लोक काय म्हणतील ? ह्या श्रुंखला पार गळून पडल्या आहेत असे म्हणावे लागेल.