मनोरमा मेधावी – समीक्षा – निशा सातपुते

मनोरमा मेधावी – समीक्षा

  •  निशा सातपुते, मुंबई

         ‘मनोरमा मेधावी’ ह्या पुस्तकाच्या लेखिका “डॉ. अनुपमा निरंजन उजगरे” ह्यांनी लेखिकेच्या मनोगतात हे स्पष्ट केले आहे की कर्तुत्ववान समाजकार्य करणार्‍या पंडिता रमाबाई ह्यांचे आयुष्य म्हणजे एक अद्भुत कांदबरी आहे असे अत्रेंना वाटले तर पहिले चरित्र प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी पंडिता रमाबाईचे चरित्र लिहिले अशा थोर मातेच्या उदरी जन्मलेल्या मनोरमाची मात्र आपल्याला माहिती फारशी नाही. त्या मनोरमा ताईचा ही परिचय आपल्याला व्हावा ह्या लेखनाचा संकल्प लेखिकेने केला. मनोरमाची कहाणी सांगताना रमाबाईविषयी ही सांगावे लागेल म्हणून रमा – मनोरमा ह्या मायलेकींनी जे कार्य त्याकाळी स्त्री नायिकांसाठी केले आपले जीवन समर्पित केले. स्त्रियांना सुशिक्षित, सुसंस्कारीत व स्वावलंबी केले, त्याची संक्षिप्त महिती या चरित्रात आहे. योग्य मोजकीच पण महत्वाची छायाचित्रे व डॉ सिसिलिया कार्व्हालो यांचा समर्पक अभिप्राय यांनी ते पुस्तक नटलेले असल्यामुळे वाचकांना आनंद देऊन जाते. शिवाय लेखिकेच्या समर्पक सुयोग्य मांडणी, तेजस्वी भाषा, भाषेची  योग्य रचना मांडणी, ओघवती लेखनशैली यामुळे वाचकांच्या मनावर योग्य प्रभाव या पुस्तकाचा पडतो. वाचकांपर्यत अज्ञान व अमूल्य कार्य पोहचविण्याचा संकल्प यशस्वी होतो.

         मनोरमाचे कार्य समजण्यासाठी रमाबाईच्या भूतकाळाचा परामर्श थोडकयात घेणे गरजेचे आहे. म्हणून थोडक्यात पण महत्वाचे. मनोरमाच्या आजोबांचे म्हणजे पंडिता रमाबाईच्या वडिलाचे नाव अनंतशास्त्री व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी २३ एप्रिल १८५८ रोजी रमाबाईचा जन्म झाला. अनंतशास्त्री विद्वान शास्त्री होते त्यांना तिच्या पत्रिकेवरून ह्या मुलीमध्ये बुध्दीचे तेज व आपल्या कर्तुत्वाने जगाला टिपवून टाकण्याचे सामर्थ्य आहे पण पराकोटीच्या दु:खाचा तिला सामना करावा लागेल हे समजले म्हणून सर्व प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तिची बुध्दी धारदार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या पत्नीला व मुलीला संस्कृत शिकविले.

         त्या काळात स्त्रियांना संस्कृत शिक्षण घेण्यास मनाई होती तेव्हा त्यांनी धाडस केल्यामुळे ‘धर्माज्ञा मोडली’ म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला. त्यांना बर्‍याच त्रासातून जावे लागले. पण कर्नाटकात त्यांनी पुराणे, महाभारत, रामायण या ग्रंथातून स्त्रियांनी संस्कृत शिकण्यात कोणतेही पाप नाही हे त्यांनी सप्रमाण पटवून दिले. काही आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गंगामुळ सोडून तीर्थाटनाला जायचे ठरविले. तेव्हा रमा ६ महिनांची होती. तिला टोपलीत ठेवून त्यांचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून ते वयाच्या २०च्या वर्षापर्यंत कलकत्ता गाठेपर्यंत रमाबाईंची भटकंती चालू होती. वयाच्या ४थ्या वर्षापासून तिच्या आईने सुरुवात केली. वयाच्या ८व्या वर्षी ‘पायोनियर’ या परदेशीय वर्तमानपत्रात रमाबाईंना प्रसिद्धी मिळाली. १८७४-७५ या वर्षात आईवडील व बहीण कृष्णा या तिघांचा मृत्यू झाला. श्रीनिवास व रमा एकमेकांच्या आधारे जगू लागली.

         भाऊ श्रीनिवास मिळेल ते काम करत असे. अत्यंत हलाखीचे जीवन जगताना सुद्धा त्यांनी कोणापुढे हात पसरला नाही. कपडे नाही, अन्न नाही. पण क्रूर जगाला त्यांचीदया आली नाही. देवदर्शन, फसवणूक, धर्ममातंडाकडून होणारा छळ यामुळ आपल्या धर्माच्या बाबतीत त्यांचा विरस झाला. झेलम नदीच्या काठी मुक्काम करताना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून दोघेही स्वत:ला वाळूच्या खड्ड्यात गळ्यापर्यंत पुरून घेत. त्या थंडीचा परिणाम म्हणून रमाबाईच्या एका कानाला बहिरेपणा आला. ह्याच बहिरेपणामुळे परदेशात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. ४००० मैलांची पायपिट करून दोघांनी कलकत्ता गाठले. इथे त्या भावंडांच्या विद्वतेची कदर करण्यात आली. कलकत्त्यात सिनेत हॉल मध्ये विदुषी म्हणून रमाबाईंचा सत्कार करण्यात आला व त्यांना ‘पंडिता’ व सरस्वती’ या पदव्या प्रदान करण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्या पंडिता रमाबाई या नावाने ओळखल्या जातात.

         ब्राम्हण विद्वान ठाकुर यांच्या विवाहाच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली नाही. आपल्या भावाची हलाखीच्या परिस्थितीमुळे ढासळलेली तब्बेत यामुळे आपल्या लग्नाचा बेट रहित केला. बिपिन बिहारी यांचा लग्नाचा प्रस्ताव भावाची समंती असेल तर असे उत्तर दिले. दुर्दैवाने १८८० मध्य श्रीनिवासचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्या एकट्याच राहिल्या एकट्या तरुण स्त्रीला राहणे कठीण म्हणू त्यांनी बिपिन बिहारी यांचा प्रस्ताव मान्य केला. बिपिन बिहारी निम्न जातीतले. रमाबाई ब्राम्हण. ब्राम्हण स्त्रीने इतर कुळातील पुरुषाशी लग्न करू नये असे संगितले जात. त्या समाजाविरुद्ध, धर्माविरुद्ध जाऊन बंड पुकारून त्यांनी विवाह केला. त्यांचा विवाह १३ जून १८८० रोजी बंकापुर कोर्टात झाला. कारण दोघेही धर्म मानत नव्हते. दोघेही सुसंस्कृत, सुविद्य व विद्वान होते. बिपिन बिहारी हे मेधावी  कुळातले. विवाह प्रसंगी रमाबाई २२ वर्षाच्या होत्या. दोघांचाही संसार सुखाने चालू होता. कारण त्याकाळी स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याची मानसिकता असलेल्या समाजामध्ये बिपिन बिहारी अपवाद होते. रमाबाई त्यांना बी. बी. असे म्हणत. बिपिन बिहारींच्या ग्रंथसंग्रहात ‘नवा करार’ त्यांच्या वाचनात आला. ख्रिस्ती धर्माविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे बिपिन बाबूंनी आपला मित्र अॅलन ह्याला घरी बोलावले. परंतु अॅलनने दिलेल्या महितीमुळे रमाबाईचा कल ख्रिस्ती धर्माकडे झुकून आहे हे पाहून त्यांनी मित्राची शिकवणी ताबडतोब बंद केली.

         ईस्टरच्या आदल्या रात्री १६ एप्रिल १८९१ रमाबाईंनी कन्येला, मनोरमाला जन्मदिला. स्त्री-पुरुष भेद, मुलगी परक्याचं धन अशा काळात पित्याला कन्यारत्न झाले याचा आनंद झाला होता. मनाला आनंद देणारी म्हणून तिचे मनोरमा असे ठेवण्यात आले. वडिलांनी तीच्या नावाची नोंद आपल्या दरीत करून ठेवली होती ती मनोरमाने आयुष्यभर जपली. पण त्यांच्या सुखाला ग्रहण लागले. एन्फ्लुएंझा आला, लहान मनोरमा कडे पाहणारे कुणीच नव्हते. बिपिन बाबू कोर्टकचेरीच्या कामात. तरी जसे जमेल तसे घरी लक्ष देणारे. पण आई उचलून घेत नाही, पोट भरत नाही म्हणून मनोरमा चिडचिड करत रडत होती. शिवाय बिपिन बाबूंनाही खाण्याचे हाल होत. त्यांना भूक आवरत नसे. भूकेपोटी त्यांनी एकदा सगळे फूटाणे खाल्ले म्हणून त्यांचे पोट प्रचंड दुखू लागले. उलट्याही होऊ लागल्या. आजारी रमाबाई अंथरुणाला खिळून होत्या. रात्र कशी बशी पार पडली. डॉक्टरांनी बिपिन बाबूना एशियाटिक कॉलरा झाला असे निदान केले. त्या दुखण्यातच ४ फेब्रुवारी १८८२ रोजी वयाच्या २४ व्या वर्षी बिपिन बाबू मरण पावले. दहा महिन्याच्या मनोरमेला पोरके करून रमाबाईना दोन वर्षात विधवा करून गेले. रमाबाईच्या नशिबात संसार सूख नव्हतेच.

         महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी रमाबाईना स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्रात बोलावले. १८८२ मार्च मध्ये रमाबाई सिलचर सोडून महाराष्ट्रात आल्या. मनोरमाबाईंचाही प्रवास सुरू झाला. त्या पूणे येथे आल्या. भारतीय स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्त्री डॉक्टर होण्यासाठी लंडनमध्ये परिक्षा देण्यासाठी व पदवी मिळविण्यासाठी मनोरमा व आनंदीबाई भगत यांच्या समवेत होत्या. रमाबाई जेव्हा परदेश प्रवासाला निघाल्या तेव्हा तिचे वय अवघे २ वर्षाचे होते. परदेश प्रवास करणारी ती पहिली भारतीय बालिका असेल. १७ मे १८८३ रोजी ते सर्व इंग्लडला पोहचले. तेथे त्या वॉल्टेज गावातोल सेंट मेरी वर्जिन होम या मठात अॅग्ंलिकन सिस्टर जेरल्डिन व मिस फुलर यांच्या बरोबर राहताना त्या दोघींचा तिचा खुप लळा लागला. जेरल्डिन तिची आजी झाली व शेवट पर्यत त्यांनी हे नाते निभावले. पुण्यात राहताना फादर गोरेनी रमाबाईच्या शंकाचे निरसन केलेच होते. शिवाय सिस्टर जेरल्डिन यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाईनी खिस्ती धर्माचा अभ्यास केला. स्वधर्मीयांकडून आई वडिलांच्या मृत्यु प्रसंगी मिळालेली लाजिरवाणी व निष्ठूर वागणक यामुळे हिंदू धर्मावरील त्यांचा विश्वास उड़ाला होता. याच परिस्थीतीने त्याच्या एका कानाला बहिरेपणा आल्यामूळे त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होऊ शकल्या नाहीट. १९ सप्टेंबर १९८३ रोजी रमाबाई व मनोरमा यांचा बाप्तिस्मा झाला.

         मनोरमानेही कायम मनो हेच नाव वापरले. सिस्टर जेरल्डिन यांनी त्यांना प्रभूची प्रार्थना, १० आज्ञा, स्तोत्रे, येशूची शिकवण, प्रार्थना करणे. बायबल वाचणे, संडेस्कूलला जाणे शिकवले. व मनोरमाबाई ते आवडीने करत. सर्व लाड करतात म्हणून आपली मुलगी वाया जाणार नाही याकडे आई रमाबाईचे लक्ष होते. चांगले वळण शिस्त अशी तिची ओळख व्हावी म्हणून त्या तिला जाणिवपूर्वक घडवत होत्या. तेथे रमाबाई ‘चेल्टनहम लेडीज कॉलेज’मध्ये संस्कृत शिकवत होत्या व स्वत: इंग्रजी शिकत होत्या. आपल्याला मिळणार्‍या मानधनातच त्या आपल्या सर्व खर्च भागवत होत्या. कारण त्याची साधी राहणी. भारतीय पोशाखातच त्या वावरत होत्या. दोन पांढरी पातळे कोपर्‍यापर्यत ब्लाऊज या साध्या राहणीमानाचा मनोरमावर प्रभाव पडला. तिने कधीच कुठल्याही महागडया गोष्टीसाठी हट्ट केला नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी हेच ध्येय ठेऊन त्या त्या आयुष्यभर चालत राहील्या. १८८६ मध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभास त्या इंग्लडहून अमेरीकेत गेल्या. भारतातील एक स्त्री पहिली डॉक्टर होते ह्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. त्यावेळी मनोरमा ५ वर्षाच्या होत्या. पण मनोरमाचे मन अमेरीकेत लागेना. ओळखीचे कोणी नाही, लाड करणारे कुणी नाही म्हणून रमाबाईनी मनोरमाला एकटीला पाठवले.

         मनोरमा परत आली. त्या सर्व संन्यासीना खुप आनंद झाला. कारण त्या आईप्रमाणे तिच्यावर प्रेम करत. व त्यांनी प्रेमाने तिचे संगोपनही केले. मनोरमासाठी सिस्टर व इतर मुलांना तिच्या बरोबर खेळायला बोलवत. समुद्रावर फिरायला मनोरंजन करायला नेत. त्यामूळे तिही इतरांबरोबर मिळून मिसळून वागे. मनोची वृत्ती आनंदीत होती. दुसर्‍याला आनंद देणे तिला आवडत असे. आजीबाईनी तिला आईचा विसर कधी पडू दिला नाही. दर आठवडयाला त्या तिच्याकडून आईसाठी पत्र लिहून घेत. खोटे बोलू नये असे तिला शिकवले होते. तिच्या खोटया बोलण्याने आजीला दुख झाले हे पाहुन तिला खूप वाईट वाटले. ती मनाने खूपच हळवी होती. आपल्या बाहूल्यांना सुध्दा ती खोटे बोलू नये अशी शिकवण देत असते.

         भारतात आल्यावर मनोरमाची काळजी घेण्याचे काम त्यांनी आपली आवडती विद्यार्थिनी शारदा सदन मधील गोदू हिच्यावर सोपविली. त्य कामाच्या बदल्यात तिच्या वडिलांचा वार्षिक ५० रू. मोबदला दिला. गोदू व मनोची छान मैत्री जुळली. आपल्या आईचा अधिक सहवास मनोला लाभला नाही. मनोला चांगले शिक्षण लाभावे म्हणून शारदा सदनच्या बाजूला असलेल्या शाळेत घातले. येथे मनोला एलिझाबेथ सोर्बन कोर्निलिस नावाची मैत्रिण मिळाली. या शाळेत पालक मुलांना महिन्यातून एकदाच भेटू शकत. मनो बरोबर रमाबाई सगळया मुलींसाठी खाऊ आणत. इंग्लडमध्ये झालेले शिक्षण आणि भारतातील शिक्षण यामध्ये बराच मोठा फरक तिला जाणवला म्हणून ती पुन्हा इंग्लडला शिक्षणासाठी गेली. मनोरमाचे वास्तव्य व शिक्षण बालपणापासून इंग्लड अमेरीकेत अधिक आहे. म्हणून तिच्या शिक्षणाचा पाया परदेशातच भरून झाला. त्या फ्रेंच व इंग्रजी उत्तम बोलू शकत होत्या. दूर असूनही दोघीच्या नात्यात कधी अंतर पडले नाही. म्हणून जगातील सर्वात प्रिय व्यक्ति तिच्यासाठी आईच होती.

         मनो जेव्हा परत आली तेव्हा तिला मराठी भाषा चांगली अवगत व्हावी म्हणून बळवंत कुलकर्णी या खिस्ती शिक्षकाची नेमणूक केली. रमाबाईनी मनोला नाजूकपणे वाढवले नाही ती मनाने खंबीर आणि कणखर व्हावी याची त्यांनी काळजी घेतली. शारदा सदन संस्थेसाठी अमेरीकेतून फंड त्या गोळा करत. तर भारतातील स्त्रियांना विधवांना सुशिक्षण मिळावे त्यांनी आपले आयुष्य परोपकार व लोकोपयोगी कामे करावीत. येथे कुठलेही धार्मिक शिक्षण दिले जात नव्हते. कुठलेही धर्मकृत्ये येथे केले जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचा पैसा फक्त संस्थेसाठी शिक्षणकार्यासाठी खर्च होईल याची दक्षता घेतली. मनोरमा १८ वर्षाची होईपर्यत तिच्या शिक्षणासाठीचा खर्च करण्यास एका स्त्रीने रमाबाईना विनंती केली. तो त्यांनी मान्य केली. मनोरमा हुशार तिच्या कडून रमाबाईना अपेक्षा होती म्हणून रमाबाई मॅट्रिक झाल्यावर तिला पुढचे शिक्षण घेण्यासाठी तिला अमेरीकेत पाठवले. अमेरिकेत मनो शिक्षण घेत असताना पंडिता रमाबाईनी आजारपणामूळे तिला पुण्यात बोलावून घेतले. तेव्हा शारदा सदन पुण्यात होते. शारदा सदनची जबाबदारी मनोवर सोपवली. तेव्हा त्या फक्त १९ वर्षाची होती. पुढे शारदा सदनची मुख्यध्यापिका म्हणन मनोरमाचे प्रशासनीय कामगिरी केली. पुढे स्थलांतर केल्यानंतर ही शिक्षणसंस्था चालविण्यासाठी आपले बीए पर्यतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

         खेडेगाव ते पुणे प्रवासासाठी मनोरमा घोडेस्वारी करीत पण रोज हे शक्य नसल्यामूळे त्य स्वःताच्या गाडीतून प्रवास करू लागल्या. याचवेळी मनोरमाने टिचर ट्रेनिगचाही कोर्स पूर्ण केला. प्रकृतीच्या कारणामूळे त्यांना M.A. चा अभ्यास पूर्ण करता आला नाही. आपल्या जवळच्यासाठी त्या मनोच होत्या. पण इतरांसाठी मनोरमा मुलांना मनोरमा आपली थोरली बहिण तार्ड वाटे. रमाबाई प्रमाणे मनोरमासुध्दा स्वतातली साधी साडी वापरत. परदेशातून आल्या तरी त्या साडीच वापरत. अत्यंत साधी राहणी हातात काचेची सुध्दा बागंडी नाही. आपल्या देशाविषयी अपार प्रेम आदर व अभिमान होता. तो लहान पणापासून शाहणी व समजदार मुलगी होती. वयाच्या मानाने अधिक समज भारतातील सगळया अंध अपंग विधवा परिस्थितीच्या गरीब अशा स्त्रियांना त्यांनी बहिणच मानले. तळमळीने कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यामूळे सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात २१ वर्ष त्यांनी कार्य केले. मुक्तीच्या मुली इंग्लड अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा देशात जाऊन विशेष शिक्षण घेत. ५ छापखाण्याचे काम जेऊबाई करत. स्त्रियांना वाव मिळाला तर तो काम करू शकेल. हे रमाबाई व मनोरमा यांनी दाखवून दिले. मुक्तीचे कुंपन सुशोभित करणे बिया पेरणे रोपटे लावणे त्यांना पाणी घालणे देखभाल करणे यासाठी मनोरमा लहानांना प्रोत्साहन देत असत.

         मनोरमाचे व्यक्तीमत्व साधे पण आकर्षक होते. वडिलाप्रमाणे सावळा रंग त्यांना मिळाला होता. अंगपीडानेही त्या नाजुक नव्हत्या. उंच धिप्पाट थोडे दौलत चालणे, कुरळे केस, संस्थेत त्याचा दराराही होता. बालवयापासून प्रवासाला सुरूवात झाली. शिक्षणाच्या निमित्ताने प्रार्थना मंडळ स्थापण करणे ब्रेल लिपीचे शिक्षण कधी देणग्या गोळा करण्याच्या निमित्ताने देशा परदेशात त्यांना प्रवास करावा लागे. बुध्दी संपन्न असूनही त्या विनम्र होत्य इथल्य विधवांसाठी त्यांनी तळमळीने कार्य केले. केडगावला शैक्षणिक विभाग पत्रव्यवहार हिशोबाचे खाते रमाबार्डने मनोरमावर सोपविले. विधवांची मैत्रिण पंडिता रमाबाई, त्या स्वःताही विधवांची मैत्रीण झाल्या. मुक्तीचा कारभार गुलबर्गा इथली शाळा ह्यात त्या जीव ओतून काम करत होत्या.

         त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्या आजारी पडू लागल्या. वेळ कमी उरला आहे. तो अत्यंत मोलाचा आहे. प्रभुसाठी कार्य करायचे आहे. असे त्यांनी लिहिले. आपले आयुष्य संपत आल्याची जाणीव त्यांना झाली असावी. ‘प्रेअर बेल’ हे अर्थपूर्ण नाव देऊन मासिक काढण्याची कल्पना त्यांचीच. त्यामध्ये संजीवनीसाठी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी केली. जानेवारीपासून जून १९५० पर्यंत प्रार्थना चालू होत्या व त्यावेळेस पहाटे ३.३० वाजता पवित्र आत्मा तेथे अवतरला, याची जाणीव झाली. १९०५ मध्ये संजीवनास देवाला बोलवण्याने शुभवृतप्रसार कामातही मनोरमा ताईंनी पुढाकार घेतला. २९ व ३० जून १९०६ ह्या दिवशी पवित्र आत्मा मुक्तीमध्ये उतरला. स्त्रिया अन्य भाषेत बोलू लागल्या. त्याचा परिणाम सर्व उत्कटतेने भक्ती करू लागले. सकाळी मुक्तीच्या देवालयात मनोरमाताई पियानो वाजवत असत. शारदा सदनची धुरा समर्थपणे पेलताना विधवा पीडितांचा शोध घेणे, त्यांची व्यवस्था लावणे तसेच खेड्यापाड्यातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू केल्या. कामाची व्यग्रता, मुलींसाथी केलेले उपवास यामुळे त्यांची प्रकृती अशक्त झाली.आईसाठी अत्यंत निष्ठेने, शुद्ध आचरणाने आपले जीवित कार्य करून तिला समाधान देऊन गेल्या.  ज्या पियानोवर त्या गाणी वाजवत तो आजही मुक्तीच्या चर्चमध्ये वाजवला जातो. परदेशात वाढून सुद्धा आपल्या देशातल्या गोरगरीब, पीडितांविषयी व देशाविषयी आपलेपणा होता.

         हात्याच्या बोटावर मोजण्या इतक्या त्यांच्या मैत्रिणी होत्या. १) गोदू जोशी, २) मिसेस पॉल, ३) नर्मदा देशपांडे, ४) मिस मिनी अब्राम्स, ५) मिस एडमंड, ६) कृष्णाबाई गद्रे. त्यांच्या आयुष्य आलेल्या स्त्रिया. – सि. जेरल्डिन (आजी), २) मिसेस शेवंतीबाई, ३) मिसेस निकम्ते, ४) सुंदराबाई पवार ५) मिसेस बोकर. आपल्या मुलीचे फार कौतुक कधी त्यांनी केले नाही. त्याचप्रमाणे काही पुरुष सहकारी व समकालिक सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्या जीवनात येऊन गेल्या.      

         दीपशिखा मालवली. :- मनोरमा ताईंची प्रकृती ढासळत होती. प्रथम थकवा, मग श्वासाचा, दम्याचा त्रास सुरू झाला, संधिवाताचा त्रास, हिवताप भरला. अशक्तपणा खूप वाढला. शेवटी डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचे सुचविले म्हणू त्या हवापालटासाठी कोडाईकनाल येथे पॉल अप्पास्वामीकडे गेल्या. तेथे त्या आपण आजारी आहोत हे विसरून गेल्या. पायी चालून निसर्गाचा आनंद लुटला. पण अतिश्रमाने त्यांना दम लागू लागला म्हणून डॉक्टरांनी हृदयविकाराचे निदान केले.म्हणून त्यांना मिरजेच्या वानलेस मिशनरी हॉस्पिटलमध्ये हलविले. मिरजेत त्यांना जरा बारे वाटू लागल्याबरोबर त्या केडगावास येऊन पुन्हा कामास लागल्या. आपल्या वेदना, त्रास कधी कोणालाच जाणवू दिला नाही. हसत खेळत राहून. पण शेवटी त्यांना फारच त्रास होऊ लागला. म्हणून परत मिरजेला हलविण्याचे ठरविले.

         त्या मिरजेस जाण्यास निघाल्या तेव्हा आईच्या रमाबाईच्या खोलीत गेल्या. त्यांनी गुडघे टेकून लेकीसाठी प्रार्थना केली. पण शेवटी म्हणाल्या, “हे प्रभू, तुझी इच्छा. तुला हवे ते कर.” मुक्तीच्या मुलींचा शेवटचा निरोप घेऊन त्या निघाल्या. पुणे स्टेशनवर त्यांना भेटण्यास, निरोप देण्यास पुष्कळ मंडळी आली. ते पाहून तिला बरे वाटले. त्यांनी 91 स्तोत्र वाचले. ‘तू माझा आश्रय, तू माझा मार्ग, तू माझा देव, मी तुजवर भाव ठेवितो. मनोरमा ताईसाठी स्टेशनवर त्यांनी एकत्र प्रार्थना केली. म्हणून त्यांना दिलासा मिळाला. हॉस्पिटलमध्ये आपल्यासमोर मृत्यू उभा आहे हे त्यांना समजले. पण हातातली पुष्कळशी कामे पूर्ण झाली होती. बाकीची कृष्णाबाई आणि गोदूवर सोपवलेली होती. त्या वेळेस मनोरमा ताईंनी डॉक्टर व आपल्या सोबतच्या मंडळींना निक्षून बजावले. “माझे प्रेत केडगावला आईकडे नेऊ नये. आपल्या मृत्युचे तिला दु:ख होऊ नये, ती खचू नये हीच प्रार्थना त्यांनी देवाकडे केली. या धीरोदत्त स्वभावाला शतश: दंडवत.

         डॉक्टरांनी तिचा डोळा लागू देवू नका असे निक्षून बजावले. म्हणून सोबतीच्या मुलींबरोबर त्या भक्तिगीते गात होत्या. क्षीण आवाज होत असताना मुलगी ताईंची आवडती भक्तिगीते गाऊ लागल्या. ‘प्रिय प्रभूच्या हाती सूरक्षित मी, माझ्या जीवा विश्रांती होईल नेहमी’ ‘दिव्य तेज प्रकाशित स्थळ, अहा त्या सुस्थळी पार नाहीच हो विश्रामा, तेथे सुदिनी भेट होई प्रियांची आम्हा.’ मनोरमा ताईंनी अखेरचे शब्द उच्चारले, “प्रभो बोलावत आहे, मी जाते. माझ्या आईला, मुलींना सांभाळा.” स्त्री कल्याणाचे व्रत घेऊन अविरत कष्ट करत आपले आयुष्य व्यतीत करून अखेर ईहलोकीचा प्रवास त्यांनी संपवून प्रभूच्या विसाव्यात गेल्या. तो दिवस ‘२४ जुलै १९२१’ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा दफनविधी मिरजेलाच करण्यात आला.

         अशा ह्या मायलेकींचे कार्य ख्रिस्ती समाजामध्ये तरी परिचित असावे म्हणून लेखिकेने जिवापाड श्रम करून अनेक ठिकाणी जाऊन संशोधन करून ‘मनोरमा मेधावी’ हे पुस्तक लिहून या पुत्रीचे कार्य, महाराष्ट्राच्या लेकीचे कार्य आपणासमोर आणले. इतरांनी ते दुर्लक्षित केले तरी किमान आपण मराठी महाराष्ट्रीय ख्रिस्ती म्हणून याची दखल प्रत्येक वाचकांनी घ्यावीयासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आपण ते पुस्तक वाचून किमान त्यांच्या अमूल्य कार्याची महती जाणून घ्यावी. आदर करावा. पुस्तक संग्रही अमूल्य ठेवा म्हणून करावा व त्याप्रमाणे आचरण करावे. हीच खरी मनोरमा ताईंना श्रद्धांजली.