रेशीमगाठी…!!
- संगीता वाझ, वसई
नवराबायको म्हटलं की तिथे पहिली येते ती स्वामित्वाची भावना नि स्वामित्व आलं की तिथे अपेक्षा ह्या आल्याच, अपेक्षा आल्या की ओघाने अपेक्षाभंगही आलाच… नि हा अपेक्षाभंगच मग नात्यात कटुता, दुरावा आणतो. ही कटुता नात्यातील गोडवा संपवते नि मग उरतो तो निव्वळ रूक्ष व्यवहार. मारून मुटकून मुखवट्याआडून केलेला निव्वळ दिखावा, कधीही न संपणारा…
काही दिवसांपूर्वी आम्ही काही मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पा-गप्पांमध्ये विषय निघाला. घटस्फोटानंतर बायकोला alimony म्हणजे पोटगी मिळावी की मिळू नये. प्रत्येकीने आपापली मते मांडायला सुरूवात केली. एकंदरीत सूर ‘पोटगी मिळू नये’ ह्या मताकडे जरा जास्त झुकणारा होता नि गंमत म्हणजे असं मत मांडणाऱ्या साऱ्या स्त्रियाच होत्या. त्यांच्यामते एवढा घटस्फोट घेतच आहात तर मग स्वतःच्या हिमतीवर घ्या. नाहीतर मुकाट तडजोड करून लग्न/संसार टिकवा.
नेहमीप्रमाणे इथेही मी odd one out होते. मुळात लोकं घटस्फोटाला नेहमी इतकं निगेटिव्हली का घेतात तेच कळत नाही. अरे कुणासाठी तरी तो एक सुटकेचा मार्ग असू शकतो. ‘विवाह हे एक पवित्र बंधन आहे, लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात.’ वगैरे भंपक समाजमान्यतांना धरून राहताना नि लोकं काय म्हणतील / समाज काय म्हणेल या असल्या मिलियन डॉलर प्रश्नाला कुरवाळत तडजोडीच्या नावाखाली घुसमटीत आयुष्य जगण्यापेक्षा घटस्फोट हा पर्याय केव्हाही चांगलाच.
जमतच नसेल, पटतच नसेल, सहनच होत नसेल तर फारकत घेण्यात काय हरकत ? एखादं नातं जबरदस्तीने लादण्यात नि बळजबरीने ते रेटण्यात तरी काय हशील ?
मुळात प्रत्येक गोष्टीला नैतिक / अनैतिकतेचं लेबल लावून ती पापपुण्याच्या तराजूत तोलण्याची आपणा भारतीयांना सवयच आहे. मग तो शरीराचा व्यवहार असो, मनाचा व्यवहार असो किंवा मग जगण्याचा. प्रत्येक गोष्टींचं फालतू उदात्तीकरण करत असतो आपण.
तसं पाहिलं तर मुळात लग्न हा एक शुद्ध व्यवहारच आहे. (अगदी निरखून पारखून खेळलेला एक जुगारच म्हणा हवं तर.) कालांतराने जर तो व्यवहार फसला तर नुकसानभरपाई ही द्यावीच लागणार. कोणत्याही व्यवहाराचा तो एक उसूलच आहे.
आता तुम्ही म्हणाल की मग ही नुकसानभरपाई (पोटगी) नेहमी बायकोलाच का मिळावी नवऱ्याकडून. vice versa का नाही. एरवी स्त्रीपुरूष समानता, स्त्रीमुक्ती वगैरे मोठमोठ्या गप्पा हाणताच ना. मग आता घटस्फोटानंतरही स्वतः कमवा आणि खा.
तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की घटस्फोट हा अगतिकतेतून आलेला असतो. कुठलीही स्त्री (नि जेन्युईन पुरूषही) सहजासहजी या निर्णयाप्रत आलेली नसते. या निर्णयाआधी नि नंतरही तिलाच खूप काही भोगायचं असतं. येणाऱ्या मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक संकटांना एकटीने लढायचं असतं. शिक्के तिच्यावरच बसणार असतात. भले चुक असो/नको. बदनाम तीच होणार असते. पुरूष (नवरा) ह्यातून अगदी सहज निसटून काही काळाने पुन्हा बोहोल्यावर चढायला मोकळा असणारच असतो. तिच्यासाठी मात्र हे सारं तेवढं सोपं नसते. तिने केलेल्या या त्यागाची किंमत म्हणा हवं तर पण तिला पोटगी ही मिळायलाच हवी !
दुसरी गोष्ट… ती कितीही उच्चशिक्षित असली, कमावती असली तरी तिचं earning हे नेहमीच secondary असते. लग्नानंतर तिचं मुख्य कार्यक्षेत्र हे घर-संसार, मातृत्व, मुलांचं संगोपन हेच होऊन बसते. त्यामुळे पुरूष जितका career-oriented होतो तितकं इच्छा असूनही तिला होता येत नाही. कधीतरी नोकरीला मग ब्रेक लागतो, कधीतरी मुलांसाठी तडजोड करावी लागते नि मग अनिच्छेने नोकरीत धरसोडपणा येतो. अशावेळी तिची ती कमाई तिच्या भविष्यकालीन तरतूदींसाठी sufficient नसते… त्यामुळे तिला पोटगी ही मिळायलाच हवी !
तिसरा नि महत्वाचा मुद्दा म्हणजे… घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी, त्यांचं संगोपन हे आईकडेच जाते (छोटी असतील तर कायद्याने नि समज आलेली असतील तर स्वेच्छेने ती आईजवळ राहणेच पसंत करतात) अशावेळी बाप या नात्याने मुलांच्या संगोपनाची भविष्यकालीन जबाबदारी त्याने उचलायलाच हवी.
बाकी मला इथे घटस्फोटाचं glorification वगैरे अजिबात करायचं नाहीय् पण फक्त एवढंच सांगायचं की मुळात तडजोड करून लग्न टिकवण्याचा केलेला हा प्रयत्न खरंच यशस्वी होतो का ? तडजोडीनंतर ती/तो आपल्या संसारात पुढे खरंच सुखी, आनंदी होतात का की निव्वळ समाजाच्या, नातेवाईकांच्या भीतीपोटी. दबावापोटी असतो हा निर्णय. कारण केलेली तडजोड ही घुसमट वाढवणारी नसावी. तडजोडीनंतरचं वैवाहिक जीवन फार आनंदी नसलं तरी निदान ‘सुसह्य’ असावं. अन्यथा त्या तडजोडीलाही काहीच अर्थ नसतो. नपेक्षा मग ‘घटस्फोट’ हे better option ठरेल.
बाकी आपल्या भारतीय समाजाने तसंही विवाहसंस्थेला प्रमाणाबाहेर महत्व देऊन ठेवलंय. पण पावित्र्याच्या वेष्टनात गुंडाळून त्याचं कितीही स्तोम माजवलं तरीही तो असतो फक्त नि फक्त एक शुद्ध व्यवहार.
लग्न झालं… नवराबायकोच्या नात्याचा शिक्का बसला म्हणजे आता त्या दोघात प्रेम निर्माण झालंच पाहिजे किंवा मग ते तसं होणारच अशी अपेक्षा म्हणजे तद्दन वेडेपणा.
तसंही जगात कुणीही कुणासाठी जन्माला वगैरे आलेलं नसतं, पण तुम्ही त्या ‘कुणा’ला तरी तुमच्यासाठी जगायला मात्र निश्चित लावू शकता. पती-पत्नीचं नातं हे इतर नात्यांसारखं नैसर्गिक नसतं तर ते एक (बनवून) जमवलेलं/निवडलेलं नातं असतं नि विवाह टिकवण्यासाठी हे निवडलेलं नातं निभावणं ही पण एक कलाच असते. अशा या नात्यातील कर्तव्ये पार पाडणे म्हणजे केवळ शारिरीक, भौतिक गरजा पूर्ण करणे नसून प्रसंगी आपल्या जोडीदाराला हवा तो मानसिक आधार देणे. त्याची/तिची भावनिक निकड ओळखून ती भागवणे हेही अंतर्भूत आहे पण आपण नेमके इथेच कमी पडतो. ‘नाती’ ही फक्त मिरवण्यासाठी नसावीत तर ती जगणं सुसह्य करणारी, जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी असावीत.