वसईच्या बोलीभाषा – विजय परेरा

वसईच्या बोलीभाषा

  •  विजय परेरा (D.D),

सांडोर, वसई. – 8007780313

         ‘ग्रीअरसन’ या पाश्चात्य भाषा वैज्ञानिकाने महाराष्ट्रातील बोलीसंदर्भात अभ्यास करून बोलीभूगोलाचा निकष लावला व बोली बोलल्या जाणान्या प्रदेशाच्या सीमा निश्चीत केल्या. हा सर्व अभ्यास त्यांनी ‘लॅग्वेस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात निष्कर्षसह मांडलेला आहे.

         उत्तर कोकणाच्या संदर्भात त्यांनी ठाणे व मुंबई येथील बोलीभाषांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तात्कालीन ठाणे जिल्हा व आत्ताचा नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा येथे विविध बोलीभाषा याबाबत प्रामुख्याने ‘डोंगराळ भागात बोलली जाणारी’ आणि सपाट मुलखात बोलली जाणारी असे दोन भेद होतात.

         महाराष्ट्रात खानदेशी, वन्हाडी, पुणेरी, चित्पावनी अशा अनेक बोली आहेत पण या सर्व निरनिराळ्या बोलींना सामावून घेणारी प्रमाणभाषा महाराष्ट्रात आहे. अलिकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

बोलीच्या निर्मितीची कारणे

         काळ आणि स्थळ यानुसार तसेच जिवनाच्या गरजेनुसार बोलीभाषेत परीवर्तन होते. सामाजिक जिवनात चालीरीती, समजूती आणि रूढी नाहीशा होतात पण भाषा हे साधन कायम टिकून आहे. याचाच अर्थ माणसाच्या किंवा माणसांनी बनवलेल्या समाजाच्या जिवनासाठी व एकूणच मानवी अस्तीत्वासाठी भाषा ही अत्यावश्यक गोष्ट आहे. भाषेच्या अंगी एक लवचीकपणा असतो आणि मुख्य म्हणजे परिवर्तन होत रहाण्याची क्षमता असते. या मुख्य व अंगभूत वैशिष्ट्यांमुळे भाषेमध्ये बोली निर्माण होतात.

वसई तालुका तसेच पालघर येथील बोली

१. वसईची पानमाळी बोली

         पानमाळी बोली ही वसई, आगाशी, सफाळे, केळवे माहिम, पालघर, डहाणू, चिंचणी तारापूर व बोर्डी या भागात बोलली जाते. पानमाळी समाज हा विशेषतः फुलांची शेती व विडयासाठी नागवेलीची पाने या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.

पानमाळी बोलीतील काही शब्द व प्रमाणभाषेत अर्थ-

१) नावळ-वरात                      २) कंही-कशी                ३) वहरा-वर्षी

४) जकल्या – सर्व                   ५) हणवार-सणासुदी       ६) हांगुन – सांगून

७) धीई-दिवस                        ८) रेली – राहिली           ९) हांगाशी-सांगायची

१०) बालटेर – बाळंतपण          ११) हाऊ- सासू             १२) ओव-सून

१३) ढोपे – गुढगे                     १४) आख्खी -संपूर्ण

‘पानमाळी’ बोलीत लहान लहान स्वरांचा अंतर्भाव आढळून येतो.

२. सामवेदी समाजाची ‘कादोडी’ बोली

         वसईतील एक विशिष्ट संस्कृती नालासोपारे ते विरार या भागात दिसून येते. या समाजाला ‘कुपारी’ समाज असेही संबोधीले जाते. इतिहासातील नोंदीनुसार सहाव्या शतकापासून मुळ सामवेदी ब्राम्हण समाज या परिसरात वास्तव्यास आहे.

         ‘कादोडी’ बोलीभाषेत मराठीत ज्या शब्दामागे ‘ला’ हा प्रत्यय येतो तेथे ‘ला’ या ऐवजी ‘दो’ हा प्रत्यय जोडला जातो.

उदाहरणार्थ: कशाला- कादो, कुणाला- कुणादो, मला- मादो. ‘दो’ हा प्रत्यय या बोलीभाषेत येत असतो या भाषेला ‘कादोडी’ बोलीभाषा म्हटले जाते.

कादोडी बोलीभाषेतील काही शब्द व प्रमाणभाषेत अर्थ-

१) तन्सीन-तिथून            २) अकलवंती-ज्ञानी, हुशार        ३) दोय-मुलगी

४) लय – तिथे                ५) आंगा- अहो                       ६) सोदोन-शोधून

३. वाडवळ समाजाची ‘वाडवळी बोली’

         वाडवळी बोलीभाषेवर गुजराती भाषेचा पगडा दिसून येतो. तात्कालीन राज्यकर्ते राजे प्रताप बिंब यांनी सुमारे हजार वर्षांपूर्वी (११४०) गुजरात व राजस्थान येथून काही कुळे वसईला आणल्याची नोंद ‘महिकावतीची बखर’ यामध्ये आहे. त्यामुळे या बोलीमध्ये शब्दरचना गुजराती भाषेसारखी असली तरी हेल हा कोकणी असतो.

या समाजावर पोर्तुगिज भाषेचा प्रभावही आढळून येतो. वाडवळी बोलीत काही पोर्तुगिज शब्द वापरले जातात.

उदा. १) खमिस-शर्ट, २) पिरीस-बशी, ३) बेसॉव-आशिर्वाद, ४) पिरीसाव-मिरवणूक

काही गुजराती शब्द या वाडवळी बोलीत आढळून येतात.

उदा. १) पोते – स्वतः               २) देवळ-मंदिर               ३) हवारी- लवकर

४) डोकरा – म्हातारा                ५) निअरला – घसरला     ६) उकंदी – कांदा

७) भरमसाठ-पुष्कळ               ८) ढेसक् – कंबर.

४. “ईष्ट इंडियन” बोली

         ‘ईष्ट इंडियन’ बोली धर्माने खिस्ती असलेला मात्र मुंबईच्या रेल्वे व डॉक येथील ईष्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखालील कामगार वर्गाची भाषा असा होतो.

         मराठी, पोर्तुगिज, इंग्रजी या तिनही भाषांचा संमिश्र वापरामुळे ‘ईष्ट इंडियन’ बोलीभाषा आजही मुंबईच्या वांद्रे, सांताक्रूज, माझगाव, जुहू, मढ, गोराई, इर्ला, भाईंदर या भागात बोलली जाते. वसईला पापडी, पाली, गिरीज, आगाशी, माणिकपूर येथील काही भागात या भाषेचा वापर होतो.

         या बोलीला लिपी नसल्यामुळे लिखित स्वरुपात साहित्य उपलब्ध नसले तरी काव्यरुपात ध्वनिमुद्रित साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

काही शब्द :- १) आथरी-चटई, २) आगोठ- पावसाळा ३)बंदेर-पताका ४) बुशकोट- शर्ट, ५) बुराख-भोक, ६) बेगीन- लवकर, ७) बोची – चुंबन

५. पांचाळ समाजाची ‘पांचाळी’ बोली.

         पांचाळ समाज जी भाषा बोलतो त्या पांचाळी भाषेवर गुजराती भाषेचा पगडा मोठया प्रमाणावर आढळून येतो. शेतकर्‍यांची अवजारे बनवणारे, लोहार, सुतारव अलिकडे डायमेकर म्हणून या पांचाळ समाजाची ओळख आहे.

पांचाळी बोलीतील शब्द-

१) मयनो- महिना २) अव्यो-आला ३) घरमा- घरात, ४) तमनू-तुला,

५) ग्यो-गेला, ६) थय्यो- होणे, ७) आणवतो-आणायचे.

६. ‘कोळी’ बोलीभाषा

         वसईत व पालघर परिसरात कोळी समाजाची भाषा व कोळी गीते प्रसिद्ध आहेत. या भाषेत ‘ड’ ऐवजी ‘र’ वापरात येतो. उदा. कोंबडी – कोंबरी, होडी – होरी, शीड – शिर, या बोलीभाषेत गीतांचा मोठा साठा उपलब्ध असल्यामुळे कोळी बोली समृद्ध बोली भाषा म्हणून ओळखली जाते.