आयुष्याची संध्याकाळ सुखाची होण्यासाठी.. – झेविअर डिमेलो

आयुष्याची संध्याकाळ सुखाची होण्यासाठी..

  •  झेविअर डिमेलो, पापडी

         “आमच्या काळी असं नव्हतं. आम्ही काय संसार केला नाही का? की मुलं वाढवली नाहीत ? काटकसर केली. पैसे जपून वापरले कधी खिसा रिकामी असायचा, पण काही कमी पडू दिलं नाही.”

         ‘बंद करा तुमचं बोलणं. जेव्हा बघावं तेव्हा कट कट सुरु असते. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता आणि तेच ते प्रश्न परत एकदा विचारता. कंटाळा येतो ऐकून. तुमचं डोकं ठिकाणावर नसतं. शिस्तच नाही मुळी तुम्हाला.’

         वरील प्रकारचा संवाद ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुलं यांच्यात सुरु असल्याचं कधी कानावर पडतं. वयानुरुप विचारांची दरी रुंदावत चालल्याचं हे लक्षण. येथे दोघाचंही चुकत नाही. काळ, वेळ, परिस्थिती सातत्यानं बदलत असते.

         दोन पिढ्यांमधील वाढत जाणारं अंतर – जनरेशन गॅप – याचा हा दृश्य परिणाम असतो. आता तर नातवंडंही घरात असतात. ही तिसरी हुशार, टेक्नोसॅव्ही पिढी. त्यांचे आचार-विचार, वागणं-बोलणं आणखी तेज असतं. म्हणजे मम्मी-डॅडी, आजी-आजोबा यांच्यापेक्षा अलग, अधिक मॉर्डन आणि स्मार्ट. त्यामुळं ज्येष्ठांना घरात दोन वैचारिक आघाड्यांना तोंड द्यावं लागतं.

मी, माझं, मला

         ज्येष्ठांची साधारणपणे तीन गटात विभागणी करता येईल. पहिला गट ५८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींचा. म्हणजे हा वृद्धत्वातील तारुण्याचा काळ असतो. दुसरा ६५ ते ७५ हा गट वृद्धत्वामधला प्रौढत्वाचा गट. तिसरा गट ७५ ते अधिक वर्षांच्या व्यक्तींचा. हा गट असतो वृद्धत्वाचा.

         वयाची साठ वर्षे झालेल्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक म्हणून समजलं जातं. एव्हाना नोकरदार व्यक्तींची  सेवानिवृत्ती झालेली असते. त्यांचं अधिकारपद संपलेलं असतं. तसंच त्यांचं संसारातील जबाबदाऱ्याचं ओझंही थोडं कमी झालेलं असतं. त्यामुळं काहीसा मोकळेपणा आलेला असतो.

         ज्येष्ठत्व हे सल्ला द्यायचं वय. कारण ज्येष्ठांनी अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले असतात. प्रसंगी ज्येष्ठांनी सल्ला जरुर द्यावा. आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावं, पण आपला आब राखून, मर्यादेनं. मला सर्व कळतं, मी सांगेन ती पूर्व दिशा, अशी भूमिका बरी नाही. म्हणजेच ज्येष्ठत्वाचा काळ दुसऱ्यांवर आपली मतं लादण्याचा नसावा.

         कुटुंबात, समाजात वावरताना दुसऱ्यांच्या विचारांचा, भावनांचा अवमान होणार नाही याची काळजी ज्येष्ठांनी घेतलेली योग्य. सामंजस्याची, नेमस्तपणाची भूमिका घेणं हे त्यांच्या वयाला शोभण्यासारखं असतं. मी, माझा, मला अशी आत्म गौरवाची भाषा त्यांच्या तोंडी नसलेली बरी.

                 आता लागले पैलतिराला, माझे तर डोळे

                 तेल दिव्यातील संपत आले, दिन थोडे उरले

         अशा ज्येष्ठत्वाच्या काळात जीवनाचा सांजपर्वातला प्रवास सुखरुप तर व्हायला हवा, नाही का ? त्यासाठी प्रथम आपल्या मोठेपणाची झूल खुंटीला टांगवून ठेवणं श्रेयस्कर!

आरोग्यं धनसंपदा

         वय वाढत जातं तसे विविध शारीरिक आजार आणि दुखणी निर्माण होणं साहजिकच असतं. दृष्टिदोष, श्रवणदोष, विकलांगता, विस्मरण, ताणतणाव, कंपवात असे आजार वळचणीला येऊन थांबलेले असताना हृदयविकार, मधुमेह, कॅन्सरसारखे मोठे आजार (पाहुणे) कधी शरीरात प्रवेश करतात, हे कळतही नाही.

         अर्थात, प्रत्येकाची जीवनशैली भिन्न असल्यानं व्यक्तिनिहाय शारीरिक क्षमता कमी जास्त असतात आणि आजारही. ज्यांना कोणताही आजार नाही असा माणूस शोधून (औषधालाही !) सापडणार नाही. म्हणून ‘पदरी पडलं नि पवित्र झालं’ या न्यायानं जे आपल्या आयुष्याच्या झोळीत पडतं त्याचा स्वीकार तर करावाच लागतो.

         कविवर्य बा. भ. बोरकर यांनी सार्थपणे म्हटलेलं आहे-

                 ‘असेल काळा हाती मरणं

                 परी अपुल्या हाती जगण’

         म्हणजे जगायचा अधिकार आपल्याकडे असतो, मरायचा नाही. माणसानं कसं जगायचं हे सांगण्यासाठी कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात,

                 ‘सांगा, कसं जगायचं ?

                 कण्हत कण्हत की गाणं म्हणत

                 तुम्हीच ठरवा !

                 पेला अर्धा सरला आहे

                 असं सुद्धा म्हणता येतं

                 पेला अर्धा भरला आहे

                 असं सुद्धा म्हणता येतं

                 सरला आहे म्हणायचं की

                 भरला आहे म्हणायचं

                 तुम्हीच ठरवा !

         चांगलं आरोग्य लाभणं हा नशिबाचा भाग असतो. तरीही ‘जे काही लाभलं भाग्य आम्हा’ त्याला रडतखडत का असेना, न्याय देणं हे आपण करु शकतो.

         उतार वयात परिस्थितीशी जुळवून घेणं, पुरेशा व्यायाम करणं, कामात व्यस्त राहणं, सामाजिक कार्यात सहभाग घेणं या चार गोष्टी ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात.

         ज्येष्ठांसाठी चालणं हा साधा सोपा व नैसर्गिक व्यायाम आहे. हाडांच्या बळकटीसाठी तर तो आवश्यक आहे. प्रत्येकानं रोज प्रकृतीनुसार किमान अर्धा तास चालणं आवश्यक आहे. आज कौटुंबिक, सामाजिक वातावरण कमालीचं तणावग्रस्त व गढूळ बनलेलं आहे. ज्येष्ठांना या वातावरणाशी समायोजन करता आलं पाहिजे.

         घरात लहान-मोठी कामं बरीच असतात. त्यापैकी जी कामं करता येतील ती ज्येष्ठांनी जरुर करावीत. (कांदे सोलण्याचे काम देखील ! मात्र स्टूलवर चढून पंखे वगैरे पुसायचं काम ज्येष्ठांच नसतं!)

         प्रत्येक व्यक्ती समाजाचं काही देणं लागत असते. म्हणून समाजकार्य आवश्यक करावं. चर्च कार्यात सहभाग घेणं ही गोष्टदेखील तितकीच महत्त्वाची आहे. सीमित आहार, पुरेसं पाणी पिणं, पुरेशी विश्रांती, रुटीन चेक अप या गोष्टींकडे ज्येष्ठांचं लक्ष असावं.

         आरोग्य चांगलं असणं, चांगलं ठेवणं हे संपत्तीसमान आहे.

मन करारे प्रसन्न …

         महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४७ लाख आहे. एका पहाणी अहवालानुसार त्यातील ७१  टक्के नागरिक कोणत्या ना कोणत्या तरी मानसिक आजारानं त्रस्त आहेत. नैराश्य, भीती, किंवा स्मृतिभ्रंश अशा विकारांचं प्रमाण त्यांच्यात जास्त आहे. त्याचे परिणाम ज्येष्ठांच्या वागण्या बोलण्यात दिसून येतात. एका बाजूला त्यांच्या स्वास्थाकडे लक्ष दिलं जात असताना त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे दुर्लक्ष होत असतं.

         आपल्या देशाच्या संस्कृतीत ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाचे आधारवड म्हणून मानले गेले आहेत. पण आज सामाजिक मूल्ये व जीवन संस्कृतीमुळं ज्येष्ठांकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे. त्रिकोणी – चौकोनी कुटुंबाची प्रथा प्रचलित होत आहे.

         काही ठिकाणी आई-वडील आणि मुले वेगळी राहत असल्याचं दिसत आहे. न्यायालयात उभयंतामधील वाद पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी ज्येष्ठांना घराबाहेर काढण्याची काहींची मजल जाते, असे वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून समजते.

         सर्वच घरांमधील कौटुंबिक जीवन शांत, स्थिर असेलच असं नाही. वाद, विसंवादाचे प्रसंग काही वेळा घडतात. परिणामतः ज्येष्ठांची मनं दुखावली जातात. त्यांच्यात एकटे पणाची भावना वाढीस लागते, त्याच्यातून नैराश येतं.

         संवाद हा एकटे पणावर मात करणारा एक उत्तम मार्ग आहे. ज्येष्ठांनी व्यक्त व्हावं, बोलावं, गप्पागोष्टी  कराव्यात. त्यामुळं त्यांच्यातील ऊर्जा वाढते. आणखी एक म्हणजे ज्येष्ठांनी स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. आवडीनुसार त्यांनी वाचन करावं, संगीत ऐकावं, बागकाम करावं, धार्मिक, सामाजिक कार्यात आपला वेळ व्यतीत करावा. घरातील नातवंडांना आपला वेळ द्यावा. मन प्रसन्न असलं तर आजार काबूत राहतात. जीवनातील ताण-तणाव कमी होतात. संत श्रेष्ठ तुकारामांनी म्हटलेलं आहे – मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!

काळजी घ्या

         गेल्या काही वर्षात देशातील नागरिकांचं आयुर्मान वाढलं आहे. खाण्यापिण्याच्या आणि औषधांच्या बाबतीत ज्येष्ठ सजग बनत आहेत. आयुष्याची संध्याकाळ सुखाची व्हावी असं त्यांना वाटणं ही निश्चितच चांगली बाब म्हणावी लागेल.

         तरीही काही बाबतीत त्यांनी काळजी घेणं जरुरीचं आहे. त्याच्यातील पहिली गोष्ट म्हणजे पाय घसरुन पडणं. घरात, बाथरुममध्येही ज्येष्ठ पाय घसरुन पडतात. बाथरुममध्ये ग्रॅब बार बसवल्यास आणि अँटिस्लीप मेंट टाकल्यास हाता-पायांना आधार मिळतो, पडण्याचा धोका कमी होतो.

         रात्री टॉयलेटला जाताना घाई गडबडीत जाऊ नये. उठावं, थोडा वेळ बसावं आणि दिवा लावून जावं. अंधारात धडपडण्याची, पडण्याची शक्यता जास्त असते.

         बहुतांशी ज्येष्ठ रोज गोळ्या घेत असतात. पण विस्मरणामुळं काही वेळा गोळ्या ध्यायला विसरतात किंवा दोन वेळा गोळ्या घेतात. म्हणून आठवड्याच्या गोळ्या वेगळ्या काढून ठेवल्यास त्यामुळं गोळ्या घेतल्याचा अगर न घेतल्याचा अंदाज येऊ शकतो.

         ज्येष्ठांनी बाहेर-जाताना आपलं ओळखपत्र आपल्या सोबत ठेवावं. आपलं नाव, पत्ता आणि संपर्क नंबर त्यामध्ये असावेत. आपल्या रक्तगटाची नोंद देखील तेथे असावी.

         आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं ही ज्येष्ठासाठी एक जमेची बाब आहे. केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीझन्स सेव्हिंग स्किम’ हो योजना आहे. या योजनेंर्तगत ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. सर्वाधिक व्याज देणारी ही एकमेव आणि सुरक्षित योजना आहे.

         लेखाचा शेवट महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या ब्रीदवाक्यानं करावासा वाटतो-

                 ‘जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका !

                 हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा!’