मी एक स्वप्न पाहिलं!
(डॉ. राजेंद्र भारूड)
- बॅन्सन कोरीया, नंदाखाल
धुळे जिल्ह्यातील सामोटे नावाचं एक गाव. गावाच्या भिलारीतील भिल्लांची वस्तीचं एक ठिकाण. अविकसित म्हणून वेगळे पडलेले असे ठिकाण. उत्पन्नाचं साधन काय तर बाजूच्या गावात वा परराज्यात म्हणजेच गुजरातला अथवा मध्यप्रदेशात रोजंदारीत कामावर जायचं किंवा मोहाची फुलं गोळा करून त्याची दारु गाळून विक्री करायची. जे काही मिळेल त्यावर गुजराण करायची. दोन वेळचा घास मिळाला तर देवाचे आभार मानायचे नाहीतर देवा तुलाच आमची काळजी म्हणत अर्धपोटी झोपून जायचं.
अशा वातावरणात एक मुलगा संध्याकाळी आपला अभ्यास करीत असतो. घरात अठरा विश्वे दारिद्र्य, वीजेचा तर पत्ताच नाही, आई दारू बनवून विकण्याचा धंदा करीत असते. एका गिऱ्हाईकानं त्या पोराला थोडं चकणा म्हणून बाजूच्या दुकानातून चणे-कुरमुरे आणायला सांगितले. घरातून वा पूर्ण खानदानातून शाळेत जाणारा हा पोरगा पहिलाच. अभ्यासात हुशार. आपल्या अभ्यासात पुर्णतः तल्लीन झालेला हा पोरगा हा ना करता करता उठला व चकणा घेऊन आला, पुन्हा अभ्यासात गुंतून गेला. एवढ्यात दुसऱ्या एका गिऱ्हाईकाने ह्या पोराला उठविलं व पुन्हा चकणा आणण्यास सांगितले. आपल्या परीक्षेचं कारण देत पोरगा चकणा आणण्यासाठी नकार देत रडू लागला. तोच गिऱ्हाईक म्हणाला, “भिल्लाचं पोर तू, शिकून काय तू डॉक्टर कलेक्टर होणार आहेस का? तूला बी हाच धंदा करायचा आहे”
आपल्या पोराचं रडणं ऐकून त्या मुलाची आई बाहेर आली. गिऱ्हाईकाचं वाक्य त्या मायलेकराला खूप लागलं. आपल्या लेकाला वेंगेत घेत ती माय म्हणाली, “माझं बी लेकरू डॉक्टर कलेक्टर होईल.” हे वाक्य बोलताना त्या आईला डॉक्टर म्हणजे काय असते हे माहित होतं. पण कलेक्टर म्हणजे काय हे नक्कीच माहित नव्हतं.
‘भिल्लाचं पोर तू, शिकून काय तू डॉक्टर कलेक्टर होणार काय?’ हे वाक्य ठरलं त्या पोराचं जीवन बदलून टाकणारं रहस्य. आपल्या गरीबीमुळे अपमानित झालेल्या ह्या मुलाने पुढे आपल्या कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर आपल्या गरिबीला झुकवलं. हा पोरगा त्या वाक्याप्रमाणे, अगदी ते वाक्य तो जगला आणि खरंही करून दाखवलं. गावात चौथीपर्यंत शिक्षण घेऊन नवोदय विद्यालयात पाचवी ते बारावी पर्यन्त शिक्षण घेतलं.
चांगले गुण प्राप्त करून मुंबईतील नामवंत अशा जी. एस. वैदयकिय महाविद्यालयातून M.B.B.S. ची पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेत (IPS) मध्ये निवडून आला. लगेच पुढील वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवडला गेला.
डॉ. राजेंद्र कमलाबाई भारूड असे त्या पोराचे नाव. नंदूरबार जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी. आईच्या गर्भात असताना वडिलांचे निधन झालेले होते. घरच्या परिस्थितीमुळे गर्भपाताचा सल्ला राजेंद्रच्या आईला तेव्हा देण्यात आला होता म्हणजेच गर्भात असतानाच संघर्षाचं बाळकडू तो प्यायला होता. संघर्षाला बळ दिले ते आईने आणि मावशीने. भावाने आणि बहिणीने त्याचे हात अजून बळकट केले. आजी व आजोबा पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. हाती काय होतं तर फक्त आणि फक्त मेहनत करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती. सगळं काही एकट्यालाच करायचं होतं कारण सांगणारं तसंही घरात कुणीही नव्हतंच मुळी!
खान्देशातील अविकसीत समाजातील एका झोपडीतून सुरू झालेला हा प्रवास सध्या नंदूरबारच्या जिल्हाधिकारी दालनात स्थिरावला आहे. ही वाट तुडवताना आलेले अनुभव, गरिबीमुळे झालेला अपमान ह्या पुस्तकात नक्कीच वाचावयास मिळेल परंतु त्यात कुठेही मोठेपणा नाही की प्रौढीपणाचा लवलेशही नाही. पुस्तक वाचताना आपले डोळे नक्कीच पाणावतील.
आत्मविश्वास, प्रचंड मेहनत व जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ह्या त्रिसुत्रीवर, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेला पोरगा आपल्या आयुष्यात कोठे जाऊ शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे दोनशे पानांपेक्षाही कमी असलेला हा स्फुर्तीग्रंथ आपणासही जिवंत स्वप्न पाहण्याचे व ते पूर्ण करण्याचे बळ नक्कीच देईल.
ए.पी.जे. अब्दूल कलाम साहेब सांगतात त्याप्रमाणे “झोपताना आपण पाहतो ते स्वप्न नव्हे तर जी गोष्ट आपणास झोपू देत नाही ते खरं स्वप्न असते.” आपणही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यास आपणास हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक राहील. तरी हे पुस्तक नक्कीच वाचा व संग्रही असू दया.