चिंचेचे झाड
- बॅप्टिस्ट एम वाझ. दारसेंग
आगाशी-निर्मळ रोडवर एका सुंदर टुमदार बंगल्यामध्ये एक आजी आपल्या दोन मुलं व नातवंडासोबत राहत होती. आजीचे यजमान कोरोना साथीत दगावल्यामुळे आजी एकटी पडली होती. तिच्या घरासमोर एक बावखल होतं. त्या बावखलच्या कडेवर रस्त्याला लागून एक चिंचेचं डेरेदार झाड होतं. त्या झाडाच्या फांद्या सभोवार पसरल्या होत्या. त्यातल्या काही फांद्या रस्त्यावर आल्या होत्या. त्या रस्त्यावर अनेक वाटसरूची वर्दळ असे. शाळकरी मुलंही त्याच रस्त्यावरून शाळेत जात असत.
आजीची दोन्ही मुलं व सूना कामावर आणि नातवंडं शाळेत गेली की त्या भल्यामोठ्या घरात आजी एकटीच असे. मग ती ओटीवर बसत असे. जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना व शाळेत जाणाऱ्या मुलांना बघत आपला वेळ घालवत असे. दुपारच्या वेळेला काही फेरीवाले वा भंगारवाले झाडाच्या छायेखाली आराम करत असत. क्वचित प्रसंगी एखादा तहानलेला वाटसरू आजीकडे पाण्याची मागणी करत असे. आजीही मोठ्या आनंदाने त्याला पाणी आणून देत असे. त्यांच्याशी बातचीत करत असे. संध्याकाळी मुलं शाळेतून घरी परतेपर्यंत आजी ओटीवरच बसत असे. आजीसाठी हा मोठा विरंगुळा होता.
सकाळच्या प्रहरी झाडाच्या शेंड्यावर बसून कोकिळा मधुर व मंजुळ आवाजात गुंजन करत असे. तिचा तो मंजुळ आवाज ऐकून कान तृप्त होत असत. उन्हाळ्यात चिमण्या दुपारच्या प्रहरी चिवचिव करत या फांदीवरून त्या फांदीवर उडत असत व त्यांच्या चिवचिवाटाने आसमंत भारून टाकत असत. ते पाहून आजीचे डोळे तृप्त होत असत. भरपाई म्हणून आजी पाण्याने भरलेले पसरट भांडे घराच्या कंपाऊंडवर टांगून ठेवी. चिमण्या चिवचिव करत चोचीने पाणी प्राशन करीत व पुन्हा झाडावर बसत. आजीला ते पाहण्यात खूप गम्मत वाटत असे. उन्हाळ्यात ओटीवर पाण्याने भरलेले मटके ठेवी. तहानलेले वाटसरू मटक्यातले थंडगार पाणी पिऊन तृप्त होत असत. मग आजीची खबरबात घेत ते पुढे मार्गस्थ होत असत. आजीचा दिवसाचा वेळ कसा निघून जात असे हे तिलाच कळत नसे. आजी खुश होती, आनंदी होती. परंतू नियतीला आजीचे सुख पहावले नाही.
चिंचेला लागून असलेले बावखल सुमारे ७-८ गुंठ्याचे होते. त्या बावखलवर एका बिल्डरची नजर होती. बिल्डरने जमीनमालकाशी सौदा करत ते बावखल ताब्यात घेतले. आजीला बावखल विकल्याची कुणकुण लागली. ती थोडीशी चिंतातुर झाली. परंतू बिल्डर झाडाला हात लावणार नाही ह्याची तिला खात्री वाटत होती. त्यामुळे तिने चिंता झटकून टाकली. परंतू तिची खात्री अल्पजीवी ठरली.
एके सकाळी झोपेत असताना ट्रकच्या हॉर्नचा कर्कश आवाज तिच्या कानावर पडला. ती घाईघाईने उठली. तोंड धुतले व ओटीवर आली. त्यावेळी ट्रक रस्त्यावर ओळीने उभे असलेले दिसले. मातीने भरलेले ते ट्रक बावखलात रिकामी होत होते. ते पाहून बावखल बुजवण्याचे काम चालू असल्याचे तिच्या लक्षात आले. संपूर्ण गावातील विहिरींना पाणी पुरविण्याचा तो एकमेव स्रोत बंद होणार हे बघून तिला खूप चीड आली. आजीचा संताप अनावर झाला. त्या तिरमिरीत ती एका ट्रकसमोर उभी राहिली व मोठ्याने किंचाळत बावखल बुजवून देणार नाही म्हणून ट्रक ड्रायव्हरला सांगितले. तिचा तो आवेश पाहून गावातले लोक जमा झाले. मागे उभे असलेले ट्रकचे ड्रायव्हरसुद्धा तिथे आले. त्यातल्या एकाने बिल्डरला फोन केला. तो आपल्या कारने थोड्याच वेळात घटनास्थळी हजर झाला, आजीचे म्हणणे ऐकले. गावातील लोकांनीही आजीला साथ दिली. एकंदरीत परिस्थिती पाहून बिल्डरने थोडीशी माघार घेऊन गावातील लोकांना पिण्यासाठी त्या जमिनीवर विहीर बांधून देण्याचे आश्वासन दिले. गावातील लोकांनी त्याला दुजोरा दिला. तरीही आजीचे समाधान झाले नाही. तिच्या मुलांनी तिला समजावले त्यामुळे तिचा नाईलाज झाला व ती घरात गेली. काही दिवसांनी बावखल पूर्ण बुजवलं गेलं. त्या ठिकाणी एक मोठा प्लॉट तयार झाला. तो प्लॉट पाहून बिल्डरने खुशीने तोंडातल्या तोंडात शिळ घातली. त्या जागेवर टॉवर बांधण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार ह्याची त्याला खात्री वाटू लागली.
दिवसामागून दिवस जात होते. आजीचा जीवनक्रम पूर्वीसारखाच चालू होता. त्यात प्लॉटवर गावातली मुलं खेळत होती, बागडत होती त्यामुळे आजीच्या आनंदात आणखी भर पडली. परंतु हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. एकेदिवशी बिल्डरचे कामगार आले व त्यांनी झाडाच्या फांद्या कापायला सुरुवात केली. एकेक फांद्या खाली जमिनीवर पडत होत्या. आजीला ते पाहून जणूकाही आपले एकेक अवयव निकामी होत असल्याची जाणीव होऊ लागली. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती असहाय्य झाली होती, पण हरली नव्हती. ती पुन्हा एकदा बिल्डरच्या कामागारांसमोर उभी राहिली. तिचा रुद्रावतार पाहून कामगारांनी काम थांबवले. थोड्या अवधीत तेथे बिल्डर हजर झाला. आजी व बिल्डरमध्ये खूप वादावादी झाली. शेवटी बिल्डर ‘उद्या मी पोलिसाला घेऊन येतो’ असा आजीला दम देऊन निघून गेला.
आजीला काय करावे ते कळत नव्हते. काहीही करून ते झाड वाचवायला हवे असे तिला वाटत होते. ती खूप हिरमुसली होती. संध्याकाळी मुलं कामावरून परत आल्यावर रस्त्यावर दोनचार झाडाच्या फांद्या पडलेल्या बघून व आईकडे पाहून त्यांना परिस्थितीची गंभीरता जाणवली. परंतु ते काही बोलले नाही. रात्री जेवताना आईनेच झाडाचा विषय काढून ‘मी कोणत्याही परिस्थितीत ते झाड वाचावणार’ असे सांगू लागली. मुलांनी सांगितले ‘आई तू त्या फंदात पडू नको. ते पोहचलेले लोक आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. पोलिसांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे तू त्या फंदात पडू नकोस.’
पण आजी ऐकणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी आपल्या नातवाला घेऊन ती पालिकेच्या ऑफिसात पोहोचली. तिथे चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला गाठून सर्व वस्तुस्थिती त्याला कथन केली. अधिकाऱ्याने संबंधित प्रकरणाची फाईल मागवली व फाईल मधले सर्व पेपर चाळले आणि आजीकडे पाहून म्हणाले ‘बिल्डरने सर्व रीतसर परवानग्या घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करता येणार नाही.’ हे ऐकताच आजीचा पारा चढला व तिने पालिकेचे ऑफिस डोक्यावर घेतले. ‘तुम्ही सगळे खुनी आहात. एका ऋषितुल्य झाडांचा तुम्ही खून करत आहात. आकाशात विहंगम करून, भरारी घेऊन आपल्या घरट्यात परतणाऱ्या पक्षांचा तुम्ही आसरा हिरावून घेत आहात. थकल्या भागल्या कामकरी वर्गाचे विश्रामस्थान नष्ट करण्याच्या सैतानी महत्वाकांक्षेला तुम्ही खतपाणी घालत आहात. झाड कापण्याची परवानगी तुम्ही कशी काय देऊ शकता? तुम्ही पर्यावरणाचे शत्रू आहात. तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहात. तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.’
आजीचा तो अवतार पाहून अधिकाऱ्याची पाचावर धारण झाली. आजीला शांत कसे करावे हे त्याला कळेना. ‘उद्या बिल्डरला बोलावून काय तो निर्णय घेतो व तुम्हाला तसे कळवतो.’ असे सांगून त्यांनी आजीची बोळवण केली.
त्याच दिवशी दुपारी त्या अधिकाऱ्याने बिल्डरला बोलवलं. आजीने तक्रार केल्याचे सांगितले. दोघांमध्ये बंद दरवाजाआड ‘अर्थपूर्ण’ बोलणी झाली. अधिकाऱ्याने त्याला आवश्यक कागदपत्रे घेऊन पोलिसाची मदत घेण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांच्या उपस्थितीत चिंचेचे भले मोठे झाड पाडण्यात आले. झाड पडताना झालेल्या आवाजात आजीची किंकाळी विरून गेली. झाडावर पक्षांनी बांधलेली घरटे उध्वस्त झाली. त्यामुळे पक्षी इकडे तिकडे उडत होती. ती सैरभैर झाली होती. त्या पक्षांचा कलरव पाहून आजीचं काळीज तुटत होतं. तिला ते दृश्य पहावले नाही. ती आपल्या खोलीत जाऊन आक्रोश करू लागली. मुलांनी कशीबशी समजूत घालून तिला शांत केले. रात्र झाली. ती आपल्या मुलानातवंडांसोबत जेवायला बसली. पण घास तिच्या घशात उतरत नव्हता. तसेच दोनेक घास खाऊन ती उठली. मुलं, सूना व नातवंडांचा निरोप घेऊन ती आपल्या खोलीत झोपायला गेली. रात्रभर तिला झोप लागत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर ती वळत होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. आपण झाडाला वाचवू शकलो नाही ही खंत तिच्या मनाला सतावत होती. आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांना आसरा देणारे झाड पाडले गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे दुःख तिला सहन होत नव्हतं. रात्री कधीतरी तिचा डोळा लागला असावा. सकाळी पहाटे उठणारी आपली आजी आज उठली का नाही म्हणून नातू तिला पहायला गेला. त्याने आजी आजी म्हणून हाक मारली. परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्याने आपल्या वडिलांना बोलावले. त्यांनी तिला हलवून पाहिले. ती अगदी निपचित पडली होती. हात पाय थंडगार झाले होते. डोळे उघडे होते जणूकाही ते काहीतरी शोधत होते. आपली आई आपल्यातून निघून गेल्याचे मुलाच्या लक्षात आले. त्याने आपल्या हाताने तिचे उघडे डोळे मिटून टाकले व हंबरडा फोडला.
दफनभूमीकडे नेताना काही क्षणांसाठी निपचित पडलेल्या झाडापाशी आजीचे कलेवर थांबविण्यात आले. त्यावेळेला अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांचे डोळे पाणावले होते. जणू काही साश्रूनयनाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आजीला ते श्रद्धांजली वाहत होते…!