कोडोलीचा नाताळ
- पौलस वाघमारे, अहमदनगर
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात कोडोली नावाचे एक मिशन स्टेशन आहे. बाजारपेठेचे गाव असल्याने येथील पंचक्रोशीत हे प्रसिद्ध आणि सुपरिचित आहे. येथील नाताळाला उपस्थित राहण्याचा योग मला आला आणि तो भव्यदिव्य नाताळ पाहून अचंबा वाटला.
नाताळच्या आदल्या दिवसापासूनच खेळणीवाले, आकाशपाळणे, रहाटगाडगी, मिठाईची दुकाने गावातील चर्चकडे जाताना दिसत होते. हे सर्व पाहुन गावातील मुले आणि माणसे यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गेल्या काही दिवसापासून महामारीचे सावट सर्वत्र पसरल्यामुळे आणि शासकीय बंदीमुळे बाजार भरलेला नव्हता. यावेळी जरा मोकळीक मिळाल्याने सर्वानी कोडोलीकडे कुच केले होते.
नाताळच्या दिवशी म्हणजे २५ तारखेला चर्च उपासनेला स्थनिक पोलीस स्टेशनचे पोलीस आणि मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. ते अतिभव्य ऐतिहासिक चर्च स्त्रीपुरूषांनी तुडुंब भरले होते. या दिवशी कधी न येणारी मंडळी देखील आवर्जुन हजर असते हा आजवरचा अनुभव. हा अनुभव चर्च प्रशासनाला ठाऊक होता. त्यानुसार चर्चला मंडळी गर्दी करणार हे ठाऊक असल्यामुळे सर्वजण सावध होते. पुरेसे मास्क चर्चने उपलब्ध करून दिले होते. ज्यांनी स्वत:चे मास्क आणले नाहीत त्यांना आवाहन करून चर्चची वडील मंडळी मास्क वाटत होते.
नाताळचे वैशिष्ठय म्हणजे त्या दिवशी जमा होणारे दान गावातील ख्रिस्तेतर लोकांची शेते चर्चपासून जवळच आहेत शेतावर जाताना चर्चला ओलांडून पुढे जावे लागते. त्यामुळे शेतीचे भरपुर उत्पन्न मिळावे. देवाने कृपादृष्टी ठेवावी या श्रद्धेने ख्रिस्तेतर लोक आपल्या शेतीतील उत्पन्न चर्चमध्ये दान म्हणून आणतात. मोठया भक्तीभावाने चर्चमध्ये आणून अर्पण करतात. यामध्ये विविध प्रकारची धान्ये, कोंबडया, अंडी, बकऱ्या, भुईमुगाच्या शेंगा, नारळ, निरनिराळी फळे अशा वस्तू चर्चमध्ये आणून ठेवतात. चर्च प्रशासन नंतर त्या त्या वस्तूंचा लिलाव करून लिलावाचे पैसे चर्च भांडारात जमा करतात. चर्च सुटल्यानंतर चर्च प्रशासनाकडून आनंदाप्रित्यर्थ मुरमुरेबताशे यांचे वाटप केले जाते. ख्रिस्त जन्माच्या आनंदाबरोबरच देवाचा प्रसाद म्हणून ते घरी नेले जाते ही विशेष उल्लेखनिय बाब आहे.
कोडोली गाव हे बाजारपेठेचे गाव असले तरीही येथे कोणत्याही देवाची जत्रा यात्रा भरत नाही. पंचक्रोशीतही या गावाला केवळ बाजारालाच लोक येतात. जत्रा किंवा यात्रेला कोणी येत नाही. परंतु कोडोली हे मिशन स्टेशन असल्याने येथील चर्च हे ऐतिहासिक आहे. गावातील लोकांची खिस्तावर श्रद्धा आहे. चर्चला खिस्ती लोकांबरोबरच अन्य लोकही चर्चला येतात. भरपूर गर्दी होते. गावातील गर्दीबरोबरच आसपासच्या गावातील आपापल्या नातेवाईकांनाही यानिमित्ताने बोलावणे पाठविले जाते. चर्चमध्ये दानार्पण दिले जाते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे पैसा स्वरूपात दिलेल्या दानासोबतच लोक आपापल्या शेतातील पीकाचा काही भाग चर्चमध्ये आणतात. यात गहू, ज्वारी, भुईमुगाच्या शेंगा, इत्यादी सह बागेतला पहिला नारळ, आंबा, इतर फळे, तसेच बकरे, कोंबडी, अंडी इत्यादी प्राणी पक्षीही चर्चमध्ये दान म्हणून आणली जातात. वेदीसमोर ठेऊन मनोभावे प्रार्थना केली जाते. ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. ती आजतागायत सुरू आहे.