आंघोळ
- एमेल आल्मेडा, 9270416123
स्नान, आंघोळ हा अनेकांसाठी आवडीचा आणि काहींसाठी कंटाळवाणा विषय असतो. मी कोणत्या गटात येतो हे जाहिररीत्या सांगणे तसे लाजिरवाणे असले तरी मी दिवसातून सकाळ संध्याकाळ दोन वेळा आंघोळ करतो हे मात्र खरे. गार पाण्याने आंघोळ करुन मस्तपैकी ताजेतवाने व्हावे किंवा कढत पाण्याने आंघोळ करुन सगळा शीण घालवावा ही ज्याची त्याची आवड.
थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांविषयी मला फार अप्रूप आणि अभिमान आहे. सांज सकाळ तीन त्रिकाळ वर्षातील सर्व ऋतूत ही मंडळी थंड पाण्याने स्नान करतात. मलाही थंड पाण्याने आंघोळ करणे आवडले असते परंतु प्रयत्न करूनही ते जमत नाही किंबहुना हिंमत होत नाही.
मला गरम कढत पाण्याने आंघोळ करणे खूप आवडते. बादलीभर गरम पाणी शरीरावरून घातले की मन आणि शरीर कसे तरतरुन येते. वर्षभर नेहमी गरम पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मी घरात सौर बंब, गॅस गिझर आणि इलेक्ट्रिक हिटर सर्व व्यवस्था केली आहे तरीही वर्षात विशेषतः पावसाळ्यात चार दोन प्रसंग असे येतात त्यावेळी हे सगळे पर्याय कुचकामी ठरतात अशावेळी गॅस शेगडीवर पाणी तापवून आंघोळ करावी लागते.
मागे एकदा मी एका प्रबोधनात्मक शिबिरास गेलो होतो. वक्ते एक नावाजलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक होते. आपल्या भाषणात ते सकाळच्या थंड पाण्याच्या आंघोळीचे महत्व विशद करत होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने माणसात सचेतना येते. आपण सगळे जिवंत आहोत म्हणून आपण सगळ्यांनी थंड पाण्याने आंघोळ करावी असे ते सांगत होते. मयत झाल्यानंतर शेवटची आंघोळ ही गरम पाण्याने केली जाते. तुम्ही जिवंत आहेत की मुडदा हे तुम्हीच ठरवा. त्यांच्या ह्या वाक्यामुळे माझा हिरमोड झाला होता. परंतू नेपोलियन बोनापार्ट ह्यांच्या आत्मचरित्रात मी वाचले होते की नेपोलियनला गरम पाण्याने आंघोळ करणे फार आवडत असे. आमच्या दोघातील हे साधर्म्य लक्षात घेऊन मीही नेपोलियनप्रमाणे शूर आहे असा मी माझ्या स्वतःच्या मनाचा समाज केला आणि मुडदा चेतना थिअरीच्या न्यूनगंडातून बाहेर पडलो.
तसे आम्ही शेतकरी. लहानपणी जेव्हा गॅसचे आगमन व्हायचे होते त्या काळातल्या ह्या आठवणी. शाळेत जाऊन आल्यानंतर संध्याकाळी शेतातून घरी येणाऱ्या मोठ्या माणसांसाठी पाणी तापवून ठेवण्याची जबाबदारी आम्हा मुलांवर असे. लाकूडफाटा, काड्याकुड्या ह्याची व्यवस्था प्रत्येकाच्या घरी करुन ठेवलेली असे. त्याकाळी प्रत्येकाच्या घरी दूधदूभते असे. त्यामुळे गाईम्हशीच्या शेणांपासून गोवऱ्यादेखील थापल्या जायच्या. परसदारी दगडांची किंवा विटांची चूल असे. त्यावर पाणी गरम करण्यासाठी मोठा हंडा किवा तपेली असे. चूल धडकली आणि आग धगधगली की मग त्या आगीत चिंचोके, काजूच्या आठ्या, आंब्याचे बाठे, कोंबडीचे अंडे भाजून खाण्यातील मज्जा अधूनमधून आम्ही मुले घेत असू.
आता बंद बाथरूममध्ये शॅम्पू आणि शॉवरजेल लावून कितीही आंघोळी केल्या तरी त्याकाळच्या त्या उघडीवरच्या बिनसाबणाच्या आंघोळीला तोड नाही.
लहानपणापासूनच अधुनमधून आंघोळीचा मला कंटाळा यायचा. आताही ती सवय मध्येच डोकं वर काढते. आपल्यातील बेशिस्त बालक जिवंत असल्याचा निर्वाळा देत मग मी एखाद दिवस आंघोळ टाळतो. ह्या दुर्गुणाचा मला फायदाच होतो इलेक्शन ड्युटीवर गेल्यावर तिथेच वस्तीला राहावे लागले. प्रत्येक ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था होतेच असे नाही अशावेळी आंघोळीची गोळी घेण्याची सवय मदतीला धावून येते.
आमच्या ख्रिस्ती धर्मात ‘कन्फेशन’ हा एक पाप निवेदनाचा प्रकार आहे. आपल्या जीवनातील सर्व चुका, अपराध, प्रमाद, पाप, मोह ह्यांचे क्षालन व्हावे म्हणून जाऊन धर्मगुरुकडे त्याची कबुली द्यायची, प्रायचित्त घ्यायचे आणि परत नवे व्हायचे. मन शुद्धिकरणाचा हा प्रकार निश्चित लाभदायक आहे पण आता आम्ही त्याचा योग्यरित्या वापर करत नाही ही वेगळी गोष्ट आहे.
प्रत्येकजण स्वतःचे तत्वज्ञान जगत असतो. मी माझी स्वतःची जीवनपद्धती विकसित केली आहे. रोज बायको, मुलं, मित्र, सहकारी ह्यांच्यापैकी कोणाला आपल्या मनातील द्वंद्व सांगावे. आपले कन्फेशन करुन घ्यावे.
आता एका नवीन प्रकारच्या आंघोळीची मला सवय लागली आहे, मनाची आंघोळ! वाचनाने मनाचे शुद्धीकरण होते असे मी माझे स्वतःचे मत करून घेतले आहे. वाचन, लेखन, संगीत, वादन, खेळ, हौस, मज्जा हे सगळे मानसिक आंघोळीचेच प्रकार आहेत.
जीवनात कितीही गोंधळ असला तरी एक आंघोळ दिवाळीच्या अभ्यंग स्नानासारखे तुम्हाला नवीन करतील हे निश्चित.
आणि हो पार्टी करुन आलात, हॅंग ओव्हर असेल तर थंडगार पाण्याचा शॉवर घ्यावा, लगेच उतरते सगळी मस्ती. असे लोक म्हणतात, आपल्याला तर सवय नाही.