चळवळ
- जोसेफ तुस्कानो, बोरीवली
मोर्चा आटोपून तो घरी आला. त्याला खूप थकवा आला होता. घसा तर पार कामातून गेल्यासारखा वाटत होता. सगळे शरीरच गळल्यासारखे भासत होते. मनदेखील निपचित पडू पाहत होते… किती प्रचंड मोर्चा! लोकशक्तीचा तो प्रचंड हुंकार, त्यांचा उत्साह आणि पोटतिडकीचा साक्षात्कार… एकसारखे, दुपारपासूनचे ते चित्र त्याच्या नजरेसमोर तरळत होते… अन् आता विरून गेलेला तो अफाट जनसमुदायाचा लोंढा! जणू मुलीची सासरी पाठवणी केलेल्या प्रेमळ पित्यासारखी त्याची अवस्था झाली होती. एक वेगळीच सायंकाळ त्याने अनुभवली होती. हृदयाच्या खोल कप्प्यात कायम साठवून ठेवण्याजोगी ती एक आठवण होती…..
दुपार टळत असतानाच, घराघरांतून माणसे उतरू लागली होती. कुणी बसमधून, कुणी खाजगी गाड्यातून जात होते, तर काही चक्क पायी चालत होते. घड्याळाच्या काट्याने तीन दर्शवायच्या आधीच प्रचंड जनसमुदायाचा ओघ त्या छोट्या शहराच्या तहसीलदार कचेरीकडे वाहू लागला होता. त्यात सर्व जातीधर्माचे आणि समाजाच्या सर्व थरांतील लोक होते. गरीब-श्रीमंत होते. बायका-मुले होती. तरुण-तरुणी होत्या. म्हातारे-कोतारे होते. ललना तर हिरव्याहिरव्या पेहरावात अफलातून शोभून दिसत होत्या. आपल्या हिरव्यागार नगरीला मॅच होईलसा रंग त्यांनी आज जणू मुद्दाम निवडला होता. मोर्च्यातील बहुतेकांनी हातात माडाच्या हिरव्या पात्या आणि हिरवी झुडपे उंचावून पकडली होती. त्या मोर्चाची ती प्रतीके होती. ती सगळी माणसे माणुसकीच्या धाग्यांनी बांधली गेली होती. आकाशातील घनभरले ढग स्तिमित होऊन निसर्गाच्या रक्षणासाठी कटिबद्ध झालेला मानवतेचा साक्षात्कार टक लावून पाहत होते. मग, शिस्तबद्ध सैनिकासारखा सरकत तो जमाव पुढे गेला; रस्त्याला जणू माणसांचा पूर आला होता…
‘सामान्य माणसा जागा हो, माणुसकीचा धागा हो…’ या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता. त्या संध्याकाळी, रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांना आपला पहिला गियर बदलता आला नाही… मग, मोर्चाचे महाकाय सभेत रूपांतर झाले. कलावंत कार्यकर्त्यांनी पथनाट्य सादर केले. तिथे उपस्थित असलेल्या भव्यदिव्य मानवतेला त्यांनी आपल्या कर्तव्याची झिंग चढवली. कलाकर्तव्याचा तो अनोखा मिलाफ होता. त्याचा कैफ काही अवीटच होता. हिरव्या शालूतील आपल्या नगरीचे वस्त्रहरण करणाऱ्या सिमेटासुराच्या दुःशासनाला शह देण्यासाठी, तिथल्या लोकांनी मनातल्या मनात ठोकलेल्या शड्डूचे पडसाद त्या निर्मळ वातावरणात उमटत होते. जनताजनार्दनाचे ते आगळे वेगळे रूप पाहून तो पार भारावून गेला. आपल्यावर लोकांनी टाकलेला विश्वास पाहून तो आणि त्याचे सहकारी जबाबदारीच्या जाणीवेने नतमस्तक झाले. त्यांनी जनतेला कोटीकोटी प्रणाम केले. भाषणे झाली. सर्वधर्मसमभावाचे गोडवे गायले गेले, आपल्या नगरीचे हिरवेपण राखण्याच्या निश्चयाचा पुनरुच्चार झाला. त्यागाची तयारी दर्शविली गेली.
अखेर, सगळ्यांचे हात उंचावले गेले.
‘हम होगे कामयाब…’चे आशावादी गाणे गळ्यागळ्यांतून ओघळले. उत्कट भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक होता तो. माणसाच्या रक्षणासाठी उभी असलेली आजूबाजूची वृक्षराजी भारावून डोलत होती. माणसांनी दाखविलेल्या कृतज्ञतेची पावती म्हणून आपली डहाळी-पाने झुळझुळू हलवून ते दाद देत होते. तो अपूर्व सोहळा संपला.
मग, नभाने आपला आनंद व्यक्त केला. टपटप करीत जलफुलांचा सडा हिरव्या नगरीवर बरसला… एक चळवळ त्या सुपीक जमिनीत रुजून गेली होती.
पण, त्याच्या मनात ही चळवळ त्याआधीच रुजली होती… तो प्रसंग त्याला अजूनही तस्साच आठवत होता… एक हुशार विद्यार्थी म्हणून तो लहानपणापासून नावाजला होता. चौकस बुद्धी नि कष्टाची तयारी या गुणांमुळे तो उच्च शिक्षण घेऊन आपल्या जन्मगावी परतला होता. त्यांच्या छोट्या शहराजवळच्या एका संशोधनसंस्थेत त्याला संशोधकाची नोकरी मिळाली होती. रोज लोकल ट्रेनमधून तो त्या मोठ्या शहरात जा-ये करू लागला होता. आपल्या संशोधन-तपश्चर्येत तो पार गढून गेला होता. त्यामुळे, आजूबाजूला घडत असलेल्या काही गोष्टी त्याला प्रारंभी जाणवल्याच नाहीत.
परंतु, गाडीघोड्यातील वाढती गर्दी जाचक ठरू लागली होती. ‘हे इतके लोक येतात कुठून?’ या प्रश्नावर उत्तर शोधत असताना, एकेक गोष्ट त्याच्या लक्षात येऊ लागली.
मोठ्या शहरातल्या औद्योगिक क्षेत्रात नोकरी करणारा कामगार आपली निवाऱ्याची गरज भागविण्यासाठी, शहरालगतच्या या सुंदर नगरीत येऊ लागला होता. त्याची नगरी हिरव्या-हिरव्या गावांनी वेढलेली होती. या गावांत भूमीपुत्र शेतकरी वंशपरंपरेने गुण्यागोविंदाने राहत होते. शहरातल्या लोकांची दुधदुभत्याची, भाजीपाला नि फळाफुलांची गरज भागवित होते… पण, शहरातील काही बिल्डर मंडळींची नगरीला जणू दृष्ट लागली आणि इकडच्या जमिनीचा एकेक तुकडा इमारतीच्या घशात पडू लागला. स्थानिक दोन टक्केवाल्यांचा सुळसुळाट झाला व गरीब शेतकरी पैशाच्या आमिषाला बळी पडू लागले. हिरव्यागार सृष्टीचे पिवळ्या सिमेटासुरात रूपांतर होऊ लागले.
लोकांचा लोंढा येत होता. त्याच्या गरजा वाढत होत्या. वाहतूक यंत्रणा अपुरी पडत होती. त्यामुळेच, गाड्याघोड्यातून झिम्म गर्दी वाहत होती.
एकदा गाडीत त्याला संशोधन संस्थेतला सहकारी भेटला. तो अलीकडेच त्यांच्या नगरीत राहायला आला होता. त्याच्या हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची पिशवी होती.
“हे रे काय? या रिकाम्या बाटल्या कुठे नेतोयस?” त्याने सहजपणे विचारले.
“साहेब काय सांगू? स्वस्तात फ्लॅट मिळतो, म्हणून शहरापासून दूर इथं राहायला आलो. पाण्याची मुबलक सोय आहे अशी वल्गना बिल्डरने केली होती, त्याला आम्ही भुललो. अहो, आम्हाला टँकरचा पाणीपुरवठा होतो, तोही अपुरा. त्या पाण्यात माती असते. जीवजंतू तरंगताना दिसतात. प्रसंगी मेलेले उंदीर, साप आढळतात. तेव्हा, मुलांसाठी मी रोज ऑफिसमधून बाटल्यांत पाणी भरून आणतो.”
“अरे पण, तुम्ही तक्रार करायला हवी. या असल्या पाण्याने आरोग्य बिघडेल! अन् तू किती दिवस ऑफिसमधून पाणी आणशील?”
“कुणाकडे तक्रार करायची? आम्हाला कोणी वाली नाही! बिल्डर लॉबीची गुंडगिरी तर भलतीच वाढली आहे. सरकारी यंत्रणा तर त्यांची हुजरेगिरी करण्यात गुंतली आहे. जरा कुठे जाब विचारला की मारहाण होते. आम्ही तर जीव मुठीत धरून जगतोय.”
आपल्या सहकाऱ्याचे बोलणे ऐकून तो कळवळला. किंबहुना, लवकरच त्या गुंडगिरीचा त्याला स्वतःला प्रत्यय आला. त्या दिवशी ऑफिसला जाताना, तो प्रसंग घडला. गाडीत तो प्रसंग घडला.
गाडीतल्या गर्दीत, बसण्याच्या जागेसाठी तर नेहमीच रस्सीखेच चालू असते. त्या दिवशी एका अपंग तरुणावर एका धडधाकट माणसाने हात उगारला. वर्तमानपत्र वाचण्यात मग्न असलेल्या त्याच्या, हे लक्षात येताच, त्याने त्या माणसाचा हात मागूनच पकडला. तो माणूस चकित होत, मागे वळून म्हणाला, “तू हात कुणाचा पकडला आहे, माहीत आहे? गब्रूदादाचा माणूस आहे मी!”
“हे बघ, तुझ्या गब्रुदादाला मी ओळखत नाही. सार्वजनिक ठिकाणी एका अपंग माणसावर अन्याय होतोय, ते मी सहन करणार नाही,” त्या आक्रस्ताळी माणसाचा हात घट्ट पकडीत, तो सात्त्विक संतापाने म्हणाला.
अपमानित झालेल्या त्या माणसाने झटका देत आपला हात सोडवून घेतला खरा, पण त्याने शिटी मारताच चारपाच जण गर्दीतून वाट काढीत तिथे पोहोचले. अचानक त्या सगळ्यांनी हल्ला चढवला नि त्याला बेदम मारहाण केली. गाडीत एवढे लोक होते, पण सगळे मूग गिळून बसले होते. कुणीही विरोध करण्यास धजावला नाही की त्याला वाचविण्यास पुढे आला नाही. तो रक्तबंबाळ झाला होता. स्वतःला कसाबसा वाचवित, तो पुढच्या स्टेशनवर उतरला.
संध्याकाळी, त्याला पाहण्यासाठी त्याचे नातेवाईक, मित्र आले होते. त्याला आश्चर्य वाटले. हीच मंडळी सकाळी गाडीत होती, तेव्हा चिडीचूप बसली होती. किती भेकड बनले आहेत, आपले लोक? त्यांच्यात निर्भयपणाची ठिणगी पेटवली पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्यास त्यांना प्रवृत्त केले पाहिजे.
बस्स! त्या दिवशीच त्याने मनातल्या मनात निश्चय केला. आपले लोक संकटात आहेत. आपला गाव संकटात आहे. आपले पर्यावरण धोक्यात आहे. चूप बसून चालणार नाही… तो गावोगाव फिरला. समविचारी तरुणांना गोळा करून, आपली भूमिका त्यांच्यापुढे मांडली. या भूमीचे, तिच्या निसर्गाचे, पर्यायाने इथल्या भूमीपुत्रांचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांना पटवून दिले….
त्या सर्वांची परिणती, त्या ऐतिहासिक मोर्चात झाली होती. शासनयंत्रणा खडबडून जागी झाली होती. मोर्चाचे पडसाद राज्याच्या विधानसभेत उमटले होते… त्यामुळे, स्वतः बिल्डर असलेले त्या नगरीचे आमदार मात्र डिवचले गेले होते. पण त्यांना माघार घेऊन कसे चालेल? शासनाने कोणतीही चौकशी करावी, असा आग्रह त्यांनी देखील धरला. पण, गुंडशाहीच्या दबावाखाली एकेकटा सामान्य माणूस जाबजबाब द्यायला पुढे यायला तयार होईना.
मात्र, ‘नगर पर्यावरण संरक्षण समिती’ने शासनाला आपल्या निवेदनात खडसावून सांगितले….
‘इथल्या शेतीच्या जमिनीतून पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. हे पाणी बिल्डिंगच्या कामासाठी वापरले जात आहे. ह्या उपशामुळे विहिरीतील पाण्याची पातळी खूप खालावली आहे. तसेच, पाण्याची क्षारता हळूहळू वाढत आहे. लोकांच्या आरोग्यावर तसेच पिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. तेव्हा, त्वरित पाण्याचा उपसा थांबला पाहिजे.’
परंतु त्यांच्या आमदाराने विधानसभेत म्हटले, ‘हा परिस्थितीचा विपर्यास आहे. माझ्या विभागात ना गुंडशाही, ना पर्यावरणाला धोका! शासनाला हवे तर त्यांनी चौकशी समिती नेमून, आमच्या नगरीतल्या गावांतील विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासून पाहावेत.’ शासन-यंत्रणा आमदाराच्या बाजूने होती. पण, लोकदबावापुढे नमणे त्यांना भाग पडले. विहिरीतल्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी एक जिल्हास्तरीयः समिती नेमली गेली. बिल्डरलॉबीशी संलग्न असलेल्या टँकर असोसिएशनने समितीच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कारण पाणी तपासणी झाली तर त्यांचे पितळ उघडे पडणार होते…
समितीचा निष्कर्ष जाहीर करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती. स्वतः आमदाराने त्यासाठी पुढाकार घेतला होता. शासकीय अधिकारी, आमदार, काही बड़े बिल्डर, टँकर असोसिएशनचे दोन चार प्रतिनिधी, सोबत ‘नगर पर्यावरण संरक्षण समिती’चे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.
त्याला तर आवर्जून आमंत्रण होते. पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी अहवाल वाचला, तेव्हा टँकर असोशिएशनच्या प्रतिनिधींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्या नगरीतील विहिरीतले पाणी पिण्यालायक असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्यातील क्षार नि अविद्राव्य द्रव्ये माफक प्रमाणात असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला.
आपल्या हातातील अहवालाची प्रत उंचावत नि स्मित करीत आमदार म्हणाले, “काय संशोधक महाशय, आता काय म्हणायचंय तुम्हाला?”
त्यांना जणू त्याला खिजवायचं होतं. हा लोकांचा लिडर व्हायला निघालाय ना? तेव्हा, त्याची खास जिरवायची संधी तो राजकारणी कसा सोडणार?
त्याच वेळी, आपल्या हातातली अहवालाची प्रत चाळतच तो उभा राहिला. बैठकीतील मंडळी क्षणभर तो काय म्हणतोय या उत्सुकतेने ऐकू लागली.
‘पब्लिक हेल्थ लॅबमधील अधिकाऱ्यांनी नुकताच आपला निष्कर्ष जाहीर केला आहे. त्यांचा आदर ठेवून, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे…’ तो क्षणभर थांबला. सगळे कमालीचे अवाक होत, त्याच्या पुढच्या बोलण्याची प्रतीक्षा करू लागले.
‘या अहवालावरून नजर फिरविली तर लक्षात येते की आपल्याकडील विविध विहिरीतील पाण्याचे नमुने तपासून, त्याचे जे रिझल्टस् आढळले आहेत, ते इंडियन स्टॅण्डर्डच्या आय. एस् : ३०२५ या मानकाशी तपासून पाहिले गेले आहेत. वास्तविक ती एक चूक आहे. कारण आय. एस् ३०२५ हे भारतीय मानक, औद्योगिक क्षेत्रात वापरायच्या पाण्याची कसोटी ठरविते. याचा अर्थ असा की पिण्याच्या पाण्याची तुलना ही इमारती बांधण्यासाठी वापरायच्या पाण्याशी केली गेली आहे. वास्तविक, पिण्याच्या पाण्याची पात्रता ठरविण्यासाठी आय. एस् : १०५०० हे मानक उपलब्ध आहे. ते तुलनेने कडक आहे. ह्या मानकातील विविध घटकांच्या प्रमाणाशी तुलना केली तर आपल्याकडील विहिरीतले पिण्याचे पाणी खूपच खराब झालेले आढळून येईल. त्यातील क्षार वाढलेले आहेत व ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते, हे लक्षात येईल. मला वाटते, अज्ञानी सामान्य माणसाच्या डोळ्यांत शासनाचे मान्यवर अधिकारी धूळ फेकत आहेत…”
तो बोलत असताना, आमदार मध्येच उठले व बैठक सोडून तावातावाने निघून गेले. हेल्थ लॅबोरेटरीतील अधिकाऱ्यांचे चेहरे पार पडून गेले होते. तिथे उपस्थित असलेली बिल्डरमंडळी व टँकरवाले तर मान खाली घालून होते. विविध ठिकाणांहून आलेले वर्तमानपत्रांचे वार्ताहर मात्र भराभर टिपणे काढीत होते…..
आणखी एक नैतिक विजय चळवळीच्या पदरी पडला होता… चळवळ भक्कम होत गेली होती….
(कथासंग्रह – बंध रेशमाचे, प्रकाशन- जून 2000)