सुखी माणूस
- क्लेमेंट डिमेलो, आय सी कॉलनी, बोरीवली
भ्रमणध्वनी- 9082318532
माझ्या नेहमीच्या जाण्या येण्याच्या रस्त्यालगत एक झोपडी होती. त्या झोपडीचे छप्पर गवताने शाकारले होते व त्यावर हिरव्या रंगाचे प्लास्टिकचे कापड टाकले होते. त्या झोपडीचा मालक झोपडीसमोर एका मोडक्या आराम खुर्चीवर रेलून बसला होता. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचे बनियान होते, बनियानवर हिरव्या, पिवळ्या रंगाचे कलरचे ठिपके पडलेले दिसत होते. झोपडीसमोर एक प्लास्टीकचा डबा ठेवला होता व त्या डब्यात एक ब्रश होता, जो रंगाने माखला होता. हा एवढा बायोडाटा पुरेसा होता, हे सांगण्यासाठी की, तो झोपडीसमोर बसलेला माणूस एक रंगारी असावा. त्या झोपडीतून रेडीओचा आवाज येत होता. हिंदी चित्रपटातील गाणी वाजत होती. मी क्षणभर तिथे थांबलो. त्या माणसाकडे पाहून विचार करू लागलो की, हाच तो सुखी माणूस असावा, ज्याला पाहून संत तुकडोजी महाराजांना ती सुप्रसिद्ध कविता सूचली होती, “राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, हया झोपडीत माझ्या… भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे….”
मला माझ्या ऑफिसातला ताप आठवला… मनात विचार आला की, आपण सहा आकडी पगार घेतो. पण बॉसचा धाक किती? कामाचा प्रेशर किती? आपण हे सगळे सहन करतो. मर मर मरतो! कशासाठी? तर चांगले जीवन जगण्यासाठी. आपणच आपल्या वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आपल्यापेक्षा हा माणूस जास्त सुखी आहे. क्षणभर वाटलं.. आपणही हया झोपडीवाल्यासारखे असतो तर बरे झाले असते. पण काय करणार? चांगल्या सोसायटीत राहतो तर स्पर्धेला सामोरे जावेच लागणार. काहीतरी विचारावे हया उद्देशाने मी त्या झोपडीच्या मालकाकडे गेलो.
“तुम्ही रंगारी आहात का?” मी.
डोळे मिटून रेडिओवर वाजणाऱ्या गाण्याचा आनंद घेणाऱ्या त्या माणसाने डोळे उघडले व माझ्याकडे पाहत म्हंटले, “हो.”
मग मी पुढचा प्रश्न विचारला, “ही झोपडी तुमचीच का?”
तेव्हा तो माणूस हसून म्हणाला, “झोपडी माझी पण जागा मालकाची. मी त्याच्याकडे काम करतो म्हणून त्याने राहायची सोय करून दिली आहे.”
मी पुढे दोन तीन प्रश्न विचारले आणि तिथून निघालो. पण विचारामागून विचार मनात येत होते … हयाचे एक बरे आहे. मालकाने राहायची सोयसुद्धा करून दिली आहे. इथे आपले सारे आयुष्य राहण्यासाठी घेतलेल्या घराचे हप्ते फेडण्यातच निघून जाते.
पुढे काही महिन्यासाठी कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो. परत आल्यानंतर जेव्हा मी माझ्या नेहमीच्या रस्त्याने जात होतो, तेव्हा अर्थातच माझे लक्ष त्या सुखी माणसाच्या झोपडीकडे गेले. अन मला आश्चर्याचा धक्का बसला. तिथे ती झोपडी नव्हती! अन त्या झोपडीचा मालक तो सुखी माणूसही नव्हता. त्याच्या झोपडीच्या जागी आता एक टुमदार बंगला उभा होता. अन तो बंगला त्या सुखी माणसाच्या मालकाचा असणार ह्याची मला खात्री होती. पण मग तो झोपडीत राहणारा गेला कुठे? मी त्या बंगल्यात राहणाऱ्या त्या बंगल्याच्या मालकाला त्याविषयी विचारले, तेव्हा त्या बंगल्याचा मालक माझ्याकडे जरा आश्चर्यानेच पाहू लागला. मी त्या माणसाची चौकशी का करतो? ह्याचेच त्याला आश्चर्य वाटले असावे. पण मग विचारलेल्या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलेच पाहिजे हया न्यायाने त्याने मला सांगितले “मला काय माहित? तो कुठे गेला ते.”
मी थोडीशी हिम्मत एकवटून म्हणालो, ” पण तो तुमच्याकडे काम करत होता ना?”
“काम करत होता; पण आता नाही करत. साला राहायला जागा मागत होता. दिला हाकलून .. जो पर्यंत शक्य होते तो पर्यंत दिली राहायला जागा…” व त्याने आणखी एक शिवी हासडली!
काही दिवसांनी मी मुलांची शाळा सुरु होणार म्हणून त्यांना पुस्तके आणण्यासाठी विरार स्टेशनला जात असताना, रस्त्याकडेला कोपऱ्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळेच्या अंगणात मला तो सुखी माणूस सापडला. मी वाट वाकडी करून त्याच्याकडे गेलो. थोडीशी चौकशी केली असता त्याने मला सांगितले की, ” मालक देत असलेल्या पगारात भाड्याच्या घरात राहणे शक्य होत नाही. मालकाला सांगितले तर त्याने, “परवडत नसेल तर येऊ नको असे सांगितले…. मग मीच सोडली नोकरी.” आता हया सुखी माणसाने दुसऱ्या मालकाकडे नोकरी धरली होती; पण राहायला घर नव्हते. मला त्याची दया आली. मी खिशात हात घालून शंभर रुपयाची नोट बाहेर काढली व ती नोट त्याच्या हातात दिली. त्याने फार उपकार झाले अशा अर्थाने माझ्याकडे पाहिले व हात जोडले.
तोच आभाळात ढगांचा गडगडाट सुरू झाला. पाऊस येणार म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. घरी पोहचलो अन मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मी बाल्कनीत बसून कोसळणार्या पावसाकडे पाहत होतो. इतक्यात बायकोने गरम गरम भजी अन वाफाळता चहा माझ्यासमोर आणून ठेवला. बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता पण मला त्याचा अजिबात त्रास होत नव्हता. उलट त्या तो पाऊस पाहून मन मोरासारखे थुईथुई नाचत होते. मला आता अचानक तो झोपडीत राहणारा व आता परागंदा झालेला तो सुखी माणूस आठवला.. आता तो काय करत असेल? पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी तो कुठे गेला असेल? आता त्याने त्याचा संसार कुठे थाटला असेल? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनातून वारूळ फुटून त्यातून बाहेर पडणान्या मुंग्यासारखे बाहेर पडू लागले. काही दिवसांपूर्वी कामाच्या प्रचंड व्यापाने कटाळलेलो मी आता स्वतःला प्रश्न विचारत होतो, “खरा सुखी माणूस कोण?”