पोलिस नावाचा माणूस…
- ॲलेक्स अंब्रोज मच्याडो, 7208161213
सिग्नलचा पिवळा रंग बघून गोविंदाने गाडीचा स्पीड वाढवला. त्याच्या पुढच्या गाड्या भराभर सिग्नल क्रॉस करून गेल्या आणि नेमकी त्याची गाडी येता येता सिग्नल लाल झाला. कुठून कोण जाणे, हवालदाराच्या शिट्टीचा आवाज आला आणि पाठोपाठ आडवा हात. गोविंदाने मनातल्या मनात चरफडत गाडी थांबवली. गेली ना आता आणखी पाच मिनिटं… आधीच उशीर झालाय आणि त्यात आणखी हा घोळ. त्याने बाजूच्या सीटवर बसलेल्या अमोघकडे पाहिलं. तो सुद्धा वैतागला होता.
“आपण पोहोचू ना रे वेळेवर?” पाठीमागच्या सीटवरून सूनिताचा आवाज आला.
“हो गं, पोहोचू आपण वेळेवर. तीन मिनिटांचा तर आहे सिग्नल.” गोविंदा बोलला.
“पप्पा, मधला रस्ता एकदम मोकळा आहे. एकपण वाहन नाही दिसत.” अमोघ गोविंदाला म्हणाला.
अचानक गोविंदाच्या लक्षात आलं. अरे खरंच, मधला रस्ता अगदी रिकामा आहे. हा सरळ एअरपोर्टला जाणारा रस्ता. त्याच्या समोरच्या सिग्नलवर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या गाड्यांची रांग लागली होती. त्याने बाहेर आजूबाजूला नजर टाकली. रस्त्याच्या दुतर्फा आणि सभोवताली बराच पोलीसफाटा दिसत होता. गोविंदा मनातल्या मनात चरकला. आज एवढा कसा पोलीस बंदोबस्त?
तीन मिनिटं करता करता दहा मिनिटं होऊन गेली गाडी थांबल्याला. गाड्यांची रांग वाढतच चालली होती. हॉर्नचे चित्रविचित्र आवाज चालले होते. बाजूच्या फुटपाथवर दोन बाजूंनी, दोन पोलिसांनी दोर पकडून अडवून ठेवलेली लोकांची गर्दी आता वैतागली होती. मध्येच कोणीतरी खोळंबलेला, रागाने पोलिसांशी हुज्जत घालत होता.
अमोघची आणि सूनिताची देखिल अस्वस्थता आता वाढत चालली होती. गोविंदाने गाडीच्या खिडकीची काच खाली घेतली. डोकं थोडंसं बाहेर काढत, बाजूलाच उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला हाक मारली.
“साहेब, आम्ही खोळंबलोय कधीपासून. सिग्नलला एवढा उशीर का होतोय आज?”
“मिनिस्टर जाणार आहेत आज इकडून. त्यामुळे बंदोबस्त आहे आज.” कॉन्स्टेबल त्याच्याकडे पाहात म्हणाला.
हे सगळे व्हीआयपी लोकांना त्रासच देत असतात. आता ह्या गर्दीच्या वेळी, एवढं लोकांना खोळंबून ठेवायची काही गरज आहे का? कोणी काही अर्जंट कामासाठी निघालं असेल, कोणी कोणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललं असेल…
“पप्पा, आपल्याला उशीर तर होणार नाही ना?” अमोघच्या आवाजात काळजी आणि अस्वस्थता जाणवत होती.
“गोविंद, त्यांना जरा रिक्वेस्ट करून बघ ना. सोडतील आपल्याला कदाचित. समोरचा रस्ता मोकळा तर आहे.” सुनिता खिडकीच्या काचेतून बाहेर त्या कॉन्स्टेबलकडे पाहात म्हणाली. सूनिताचं बोलणं जरी बालिश वाटलं तरी गोविंदाला त्यापाठच्या तिच्या भावना समजत होत्या…
अमोघ त्यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय हुशार. यावर्षीचा युनिव्हर्सटीचा गोल्ड मेडलिस्ट. आज कुलगुरूंच्या हस्ते, युनिव्हर्सिटीच्या प्रशस्त प्रांगणात त्याचा सन्मान होणार होता. अमोघ, गोविंदा आणि सूनितासाठी ही खूप मोठ्या अभिमानाची आणि आनंदाची बाब. त्यांना सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागली होती कार्यक्रमाची.
सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होणार होता, पण अमोघला त्याच्या पालकांसोबत एक तास आधीच हजर राहायला सांगितलं होतं. अमोघने घड्याळात बघितलं. दहा वाजून गेले होते. तो खूप अस्वस्थ झाला.
“गोविंद, बघ ना त्यांना विचारून एकदा.” पुन्हा एकदा सुनीताचा आवाज आला. तिला अमोघची अस्वस्थता बघवत नव्हती. गोविंदा मनातल्या मनात विचार करत होता, पोलिसांना काही विचारावं तर कधी वसकन अंगावर येतील याचा नेम नाही. चारचौघात उगाच अपमान. गोविंदाने मंद स्मित करत एकदा सूनिताकडे आणि अमोघकडे पाहिलं. त्याने उघड्या खिडकीतून पुन्हा जरा डोकं बाहेर काढलं. गाडीपासून काही अंतरावर एक इन्स्पेक्टर उभे होते. अमोघने गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरून तो चालत त्यांच्याजवळ गेला. राकट चेहरा, सावळा वर्ण आणि धिप्पाड देहयष्टी असलेल्या इन्स्पेक्टरांची भेदक नजर गोविंदावर पडली.
“साहेब.” गोविंदाने सगळा धीर एकवटला होता.
“काय आहे?” त्यांच्या आवाजात एक जरब होती. बाहेर खूप ऊन होतं. घामामुळे त्यांचा खाकी युनिफॉर्म ठिकठिकाणी भिजला होता. कपाळावरून, चेहऱ्यावरून घामाच्या धारा निथळत होत्या.
“साहेब, आमची गाडी सोडा ना प्लीज. कधीपासून खोळंबलोय आम्ही. एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी जायचंय साहेब.खरंच आम्हाला उशीर होतोय.”
“एवढे सुशिक्षित असून कळत नाही का हो तुम्हाला?”
“अहो पण…”
“अहो, आम्हाला आमची ड्युटी करू द्या ना. सांगितलं ना एकदा की नाही सोडता येणार म्हणून.”
“तुमचा स्वतःचा मुलगा असता तर तुम्ही असे राहिले असतात का थांबून?” गोविंदाच्या ओठावर आले होते शब्द, पण उच्चारण्याचं धाडस झालं नाही त्याला. त्याची नजर त्यांच्या छातीवरील बिल्ल्याकडे गेली. तो तसाच माघारी वळून गाडीत येऊन बसला.
“नाही ऐकत का हो?” सूनिताच्या प्रश्नावर त्याने फक्त मान वळवून तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकटक समोरच्या रस्त्यावर बघत राहिला.
इतक्यात आजूबाजूला उभ्या असलेल्या पोलिसांची धावपळ सुरू झाली. शिट्टया वाजू लागल्या. लोकांना मागे सरकविण्यासाठी पोलिसांचे हातवारे सुरू झाले.दुरून, समोरच्या रस्त्यावरून गाड्यांचा मोठा ताफा वेगाने पुढे येताना दिसू लागला. लोकांमध्ये मोठमोठ्याने कुजबूज सुरू झाली. गर्दीतील लोकं आपल्या पायांच्या टाचा उंचावून बघण्याचा प्रयत्न करू लागले. क्षणार्धात गाड्यांचा तो ताफा, सुसाट वेगाने सिग्नल वरच्या गर्दीला पार करून निघून गेला. काही वेळ त्या गाड्यांचा आवाज त्यांच्या मागे घुमत राहिला.
सिग्नलला एव्हढा वेळ खोळंबून राहिलेल्या गाड्यांचे हॉर्न चित्रविचित्र आवाजात बाजू लागले. बाजूला अडकलेली लोकांची गर्दी सुद्धा पुढे सरकली.
गोविंदाने मनगटावरील घड्याळाकडे बघत गाडीचा वेग वाढवला. त्यांची गाडी कार्यक्रमस्थळी पोहोचली तोपर्यंत साडेदहा वाजून गेले होते. गोविंदाने गाडी पार्क केली आणि ते सगळे घाईघाईले प्रवेशद्वारातून आत शिरले. स्वयंसेवकांने छान हसत त्यांचं स्वागत केलं. त्यांना घेऊन तो एकदम पुढच्या रांगेकडे निघाला.अमोघ आजचा मानकरी होता. त्यामुळे त्यांची बसण्याची व्यवस्था एकदम पहिल्या रांगेत होती. पहिल्या रांगेत इतर मानकरी देखील आपल्या पालकांसोबत बसलेले होते. अमोघ थोडासा उत्तेजीत झाल्यासारखा वाटत होता. साहजिकच होतं म्हणा ते. इतक्या लोकांसमोर, कुलगुरूंच्या हस्ते सत्कार होणार होता त्याचा आज. त्याने केलेल्या मेहनतीची आणि कष्टाची जणू पोचपावती मिळणार होती त्याला. गोविंदाने आणि सुनिताने हळुच मान वळवून मागे पाहिले. सभागृह लोकांनी भरून गेलं होतं. त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. दोघांची कौतुकभरली नजर एकाच वेळी अमोघच्या चेहऱ्याकडे गेली.
व्यासपीठावरील साधीच पण मनमोहक सजावट लक्ष वेधून घेत घेत होती. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती..सौम्य आवाजात सभागृहात सनईचे सूर घुमत होते. वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. काही वेळातच निवेदन सुरू झालं. कुलगुरु आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर येऊन बसले स्थानापन्न झाले. कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक वगैरे आटोपलं आणि सत्काराच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. निवेदक एकेक नावाची घोषणा करत होते, त्या उमेदवाराची थोडक्यात माहिती देत होते आणि त्याप्रमाणे ते उमेदवार आपल्या पालकांसह स्टेजवर येत होते. टाळ्यांच्या गजरात कुलगुरूंकडून मानपत्र घेत होते. कुलगुरु दोन शब्द प्रत्येकाशी बोलत होते त्यांना शुभेच्छा देत होते. कॅमेराची क्लिकक्लिक होत फ्लॅशेस उडत होते. सत्कारमूर्ती आणि त्याचे पालक ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना जाणवत होता. अमोघ आता अधिकच उत्तेजीत झाला होता.
त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर एक उमेदवार बसला होता. त्याच्याबरोबर फक्त त्याची आई होती. वडील दिसत नव्हते.
“ह्या मुलाचे वडील कसे काय आले नाहीत बरं? ” अगदी हळू आवाजात सुनीता गोविंदाच्या कानात पुटपटली.
“काय माहित. कदाचित मोठे बिझिनेसमॅन असतील. बिझी असतील.वेळ नसेल मिळाला.” गोविंदाची मिश्किल टिप्पणी.
“कसला मेला बिझिनेस तो. आपल्या मुलांचं कौतुक पण करायला वेळ नाही म्हणे.” थोडं थांबून ती पुन्हा पुटपुटली,
“मला वाटतं कदाचित ते…”
सुनीताचं वाक्य पूर्ण होतंय एव्हढ्यात स्टेजवरून निवेदकाने पुढचं नांव उच्चारलं…
“केतन जयवंत गायकवाड” त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेला तो तरुण आणि त्याची आई उठून उभी राहीली आणि स्टेजच्या दिशेने चालू लागले. अभिमानाने.त्या तरुणाच्या चालण्यामध्ये एक निराळाच आत्मविश्वास आणि रुबाब दिसत होता. त्याच्याकडे पाहताना गोविंदाला काहीतरी ओळखीचं असल्यागत वाटत होतं.
निवेदक त्या उमेदवाराविषयी माहिती देत होते. त्यांनी पुन्हा एकदा त्याचं नांव उच्चारलं,
“केतन जयवंत गायकवाड.”
…आणि गोविंदाच्या डोळ्यासमोर तो सिग्नलवरचा प्रसंग उभा राहिला. मिनिस्टर जाणार म्हणून रणरणत्या उन्हात बंदोबस्तासाठी उभे असलेले ते पोलिस इन्स्पेकटर. अंगावरील युनिफॉर्म घामाने भिजलेला. कपाळावर घामाच्या धारा. त्यांच्या छातीवरील तो बिल्ला गोविंदाला ठळकपणे दिसू लागला…
“जयवंत लक्ष्मण गायकवाड.”
स्टेजवर ‘केतन जयवंत गायकवाड’ कुलगुरूंकडून मानपत्र स्वीकारत होता. त्याची आई कौतुकभरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहात होती.
नकळतपणे गोविंदा बसल्या जागेवरून उठून उभा राहिला होता. केतनकडे पाहात त्याचे हात टाळ्या वाजवू लागले होते…
कर्तव्यतत्परतेमुळे आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहू न शकणाऱ्या जयवंत लक्ष्मण गायकवाड ह्या पोलिस नावाच्या माणसाला जणू त्याची ती मानवंदना होती…